Saturday, May 29, 2021

कविता -- हव्यास पैशाचा

 

 कविता -- हव्यास पैशाचा 

अरे अरे माणसा कशाला तुला हव्यास पैशाचा ?

जाता यमसदनी हा देह सोडूनी,

पशू राहील गोठयामध्ये,

धनदौलत तिजोरीमध्ये,

पिढ्यान-पिढ्याचा जमीनजुमला 

राहील जागच्याजागी,

पत्नी येईल निरोप देण्यास दारापाशी,

सगेसोयरे येतील स्मशानापाशी. 

देह चढवतील चितेवरती,

तुझे नाही मागे काही उरती. 

आता तरी शहाणा हो,

नको धरू हव्यास पैशाचा,

पैसा आहे क्षणभंगुर,

साठा करून ठेव पैशाचा.










कविता -- प्रेम


कविता -- प्रेम 

एखादयावर प्रेम करणं खूप सोपं असतं,

पण निभावून नेणं फार कठीण असतं,

प्रेमात राहण्यात वाटते माया, 

सोबत असणाऱ्याची छाया,

प्रेमाचा अंत तर नसतो,

पण जीवनाचा शेवट असतो ।। १ ।।

प्रेम हे मनानं मनावर 

केलेलं अद्भुत गारुड असतं,

ते विसरणं खूप कठीण असतं,

असं हे प्रेम 'एक ईश्वरी देणं असतं'. ।। २ ।।

Tuesday, May 25, 2021

शराबी -- उत्कट अभिनयाचा अविष्कार

 

 शराबी -- उत्कट अभिनयाचा अविष्कार 

          हा चित्रपट १८ मे १९८४ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता सत्येंद्र पाल असून दिग्दर्शक प्रकाश मेहरा आहेत. या चित्रपटाची कथा प्रकाश मेहरा यांनी लिहिली असून पटकथा लक्ष्मीकांत मेहरा यांनी लिहिली आहे. कादर खान यांनी संवाद लिहिले आहेत. या चित्रपटातील गाणी अंजान व प्रकाश मेहरा यांनी लिहिली असून बप्पी लहरी यांनी संगीतबद्ध केली आहेत. आशा भोसले, किशोर कुमार यांनी गाणी गायली आहेत. अमिताभने किशोर कुमार समवेत 'जहाँ मिल जाये चार यार' हे गाणे गायले आहे. अमिताभवर चित्रित झालेले 'दे दे प्यार दे' हे गाणे सुपरहिट झाले. हे गाणे आजही लोकप्रिय आहे. 

          या चित्रपटात अमिताभ बच्चन, जयाप्रदा, प्राण, ओम प्रकाश, रणजीत, सुरेश ओबेरॉय यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. या संपूर्ण चित्रपटात अमिताभ दारूच्या नशेत दाखवला आहे. अमिताभने दारुड्याची भूमिका अफलातून केली आहे. त्याच्या सर्वश्रेष्ठ भुमिकेपैकी हि एक भुमिका आहे. 

          या चित्रपटात विकीचे (अमिताभ) वडील (प्राण) आपल्या व्यवसायामुळे विकीकडे संपुर्ण दुर्लक्ष करतात. त्यांना मुलापेक्षा आपला व्यवसाय प्रिय असतो. विकीला हे कळते तेव्हा त्याला लहान वयातच दारूचे व्यसन लागते. वडिलांचे त्याच्याकडे दुर्लक्ष असते परंतु मुन्शी (ओम प्रकाश) त्याचा वडिलांप्रमाणे सांभाळ करतो. वडिलांचे प्रेम त्याला देतो. विकीलाही ते जवळचे वाटू लागतात. एका प्रसंगात तर असे दाखवले आहे कि, विकी आपल्या वडिलांबरोबर भांडून घराबाहेर पडतो. त्याच्या बरोबर मुन्शीही बाहेर पडतो. एके ठिकाणी दोघे रस्त्याच्या कडेला रात्र काढतात. विकीला दारूची तलफ होते. एका माणसाची अर्धवट पडलेली दारूची बाटली तोंडाला लावतो. विकी दारूसाठी तडफडत असलेला बघून मुन्शी दुसऱ्या दिवशीपासून काम करू लागतो. एके दिवशी काम करताना एका अपघातात मुन्शीचा मृत्यू होतो. मुन्शीच्या मृत्यूला आपले दारूचे व्यसनच जबाबदार आहे असे वाटून विकी दारू सोडतो. हा प्रसंग अमिताभने व ओम प्रकाशने उत्तम वठवला आहे. 

          एका प्रसंगात अमिताभ जयप्रदाचा पत्ता चार गुंडाना विचारतो. ते गुंड त्याला पत्ता सांगणेऐवजी त्याच्याकडून घडयाळ, चेन, पैसे हिसकावून घेतात. जयाप्रदाला भेटून आल्यावर अमिताभ परत त्या गुंडाना बारमध्ये भेटतो. ते गुंड दारू पीत बसलेले असतात तिथे जावून 'ओ चार कहाँ और आप कहाँ' असे म्हणत त्यांची धुलाई करतो व त्यांच्याकडून आपल्या सर्व वस्तू परत मिळवतो. 

            या चित्रपटात विकीचे मीनावर उत्कट प्रेम दाखवले आहे. ती एक स्टेजवर नृत्य करणारी कलाकार दाखवली आहे. विकी तिच्या प्रेमासाठी शोची सारी तिकिटे खरेदी करतो. आपल्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी तिची आतुरतेने वाट बघतो. 'इंतहा हो गयी इंतजार की' या गाण्यातून आपल्या प्रेमाच्या भावना प्रकट करतो. 

          या चित्रपटात अमिताभ आपला डावा हात कोटाच्या खिश्यात घालून संवाद बोलताना दाखवला आहे. खरे तर शुटिंगदरम्यान एक बॉम्ब अमिताभच्या हातात फुटला होता. त्यामुळे त्याचा हात भाजला होता. त्या अवस्थेतही तो शुटिंग करीत होता. हाताची जखम लपवण्यासाठी डावा हात खिश्यात घालून संवाद बोलत होता. तरुण पोरांच्यात हि स्टाईल प्रसिद्ध झाली. 

             या चित्रपटातील अमिताभचे डायलॉग चांगलेच लोकप्रिय झाले. 

१) भाई वाह, मुंछे हो तो नथुलाल जैसी हो वरना ना हो ।

२) अरे भाई, शराबी को शराबी नही तो क्या पुजारी कहोगे, गेंहू को गेंहू नही तो क्या जवारी कहोगे ।

३) हमारी जिंदगी का तंबू तीन बांबू पे खडा है... शायरी...शराब...और आप ।

४) तोफा देने वाले कि नियत देखीं जाती है तोफें कि किमत नही देखी जाती।

५) दो आसू इस आँख से गिरे, फिर दो ऊंस आँख से, फीर दो इस आँख से, दो उस आँख से, फिर दो इस आँख से, दो उस आँख से, कितने हुए? नौ लाख के हार के लिये, बाराह लाख के  आंसू ?

६) शराब की बोतल पर अगर मैं लेबल की तरह चिपक गया हूं, तो उस लेबल को चिपकाने वाले आप हैं.ये इंसान नहीं है, ये तो मशीन है. ऐसी मशीन जो सिर्फ नोट छापती है और नोट खाती है.

          अमिताभच्या जबरदस्त अभिनयामुळे, त्याच्या तोंडून असलेल्या  संवादांमुळे व गाण्यांमुळे हा चित्रपट सुपरहिट झाला. तिकीट खिडकीवर तुफान चालला. अमिताभच्या अभिनयासाठी व गाण्यांसाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करीत होते. 

          
























Monday, May 24, 2021

 

 कुली -- अमिताभला संजीवनी 

           हा चित्रपट १९८३ साली प्रदर्शित झाला. ह्या चित्रपटाची निर्मिती केतन देसाई यांनी केली असून मनमोहन देसाई यांनी दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा कादर खान यांनी लिहिली आहे. या चित्रपटातील गाणी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केली असून शब्बीर कुमार, अलका याज्ञीक, अनुराधा पौडवाल, शैलेंद्र सिंग, आशा भोसले,  सुरेश वाडकर यांनी गाणी गायली आहेत. अमिताभच्या आवाजासाठी पहिल्यांदाच शब्बीर कुमारच्या आवाजाचा उपयोग करण्यात आला. 

          या चित्रपट अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, रती अग्निहोत्री, शोभा आनंद, कादर खान, वहिदा रेहमान, पुनीत इस्सर, सुरेश ओबेरॉय यांच्या महत्वपूर्ण भुमिका आहेत. निळू फुले यांना छोटासा रोल मिळाला आहे यात पण त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. अमिताभने रेल्वे कुलीची भुमिका साकारली असून इकबाल अस्लम खान हे नाव धारण केले आहे. अमिताभने या चित्रपटात रेल्वे हमालांवर होणाऱ्या अन्यायाविरुध्द आवाज उठवलेला आहे. 

अमिताभचा विनोदी प्रसंग --

          अमिताभ म्हणलं कि विनोद आलाच. दिग्दर्शक अमिताभच्या विनोदी प्रसंगाचा खुबीने चित्रपटात वापर करून घेतो. या चित्रपटातही रती अग्निहोत्रीबरोबरचा रेडिओवरून आम्लेट बनवण्याचा प्रसंग पोट धरून हसायला लावतो. अमिताभ रती अग्निहोत्रीला उचलून घरी आणतो त्याचवेळी रेडिओवर आम्लेट तयार करण्याची कृती सांगितली जात असते. रती स्टेशन बदलते तेव्हा योगासनावरील कार्यक्रम सुरु होतो. अमिताभ रेडिओ स्टेशनवरील कार्यक्रमानुसार कृती करत असतो. पुढे मिरची खाण्याबद्दल उपदेश केला जातो, तेव्हा अमिताभने तोंड तिखट झाल्याचे जे एक्स्प्रेशन दिले आहे ते लाजवाब. रती पुन्हा स्टेशन बदलते व योगाचे प्रात्यक्षिक सांगितले जाते. अमिताभ त्याप्रमाणे योगांचे प्रात्यक्षिक करतो व त्याचे पाय एकमेकांत अडकून बसतात तेव्हा तो रतीला 'हमारी टांग जरा उलझी है, उसको जरा सुलझाईये' अशी विनंती करतो. इकडे गॅसवर ठेवलेले आम्लेट करपून जाते. 

अमिताभला अपघात --

          या चित्रपटावेळी हाणामारीच्या दृश्यांच्यावेळी पुनीत इस्सर बरोबर मारामारी करीत असताना अमिताभ टेबलाला धडकला व टेबलाचा कोपरा पोटात घुसून जखमी झाला. जखमेचे स्वरूप इतके गंभीर होते  कि डॉक्टरांनी अमिताभच्या जगण्याची आशाच सोडून  दिली. डॉक्टरांनी ऑपरेशन केले. ऑपरेशन झाल्यावर अमिताभला मुंबईला आणण्यात आले. बंगळूरमधील ऑपरेशन यशस्वी झाले नव्हते त्यामुळे आणखी एक ऑपरेशन करणे भाग होते. यासाठी त्याला मुंबईच्या ब्रीच कॅंडी इस्पितळात आणले गेले. ऑपरेशन झाल्यावर सुद्धा दोन आठवडे अमिताभची मृत्यूशी झुंज चालू होती. अमिताभ या अपघातातून सुखरूप बाहेर पडावा यासाठी देशभर सर्व जातीधर्माचे लोक प्रार्थनास्थळांमध्ये जाऊन दुवा मागत होते, नवस बोलत होते. हॉस्पिटल बाहेर रक्तदान करण्यासाठी लोक रांगा लावत होते. आपला आवडता हिरो या अपघातातून लवकर बरा होऊन त्याचे पडदयावर कधी एकदा दर्शन मिळते असे अमिताभच्या चाहत्यांना झाले होते. 

          अमिताभ या अपघातातून बरा झाला. लोकांनी केलेल्या प्रार्थनेमुळे व दुव्यांमुळे अमिताभला संजीवनी मिळाली. तो मृत्यूच्या दाढेतून परत फिरला. यातून बरा होऊन तो कुलीच्या शुटिंगला सज्ज झाला व चित्रपट पुर्णही केला. 

अमिताभचे संवाद --

           अमिताभचा चित्रपट म्हणलं कि त्याच्या करारी आवाजातील संवाद आलेच. त्याचे संवाद ऐकण्यासाठीसुद्धा लोक चित्रपटगृहात गर्दी करत असतात. त्याचे काही प्रसिद्ध संवाद 

१)  हमारी तारीफ जरा लंबी है, बचपनसे सर पे है अल्लाह का हाथ और अल्लारखा है अपने साथ ।'

२)  हम मजदुरोंका सीना लोहे कि दिवार  है और येह हमारे हथियार है, ये हमारा पेट पाल भी सकते है और तुम जानवरोंका पेट फाड भी सकते है ।

           अमिताभने उत्कृष्ठ अभिनय केला. त्याला ऋषी कपूर व रती अग्निहोत्री यांनी उत्कृष्ठ साथ केली. सर्व कलाकारांनी केलेल्या उत्कृष्ठ  अभिनयामुळे व अपघातामुळे अमिताभला मिळालेल्या सहानुभूतीच्या लाटेमुळे प्रेक्षकांनी हा चित्रपट  पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी केली. हा चित्रपट सुपरहिट ठरला.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

      

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 














Sunday, May 23, 2021

मुक्कदर का सिकंदर -- प्रेमाचा पंचकोन

 

 मुक्कदर का सिकंदर -- प्रेमाचा पंचकोन

          हा चित्रपट २७ ऑक्टोबर १९७८ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक प्रकाश मेहरा होते. या चित्रपटाची कथा लक्ष्मीकांत शर्मा यांनी लिहिली असून पटकथा विजय कौल यांची आहे. कादर खान यांनी संवाद लिहिले आहेत. या चित्रपटातील गाणी अंजान यांनी लिहिली असून कल्याणजी-आनंदजी यांनी संगीतबद्ध केली आहेत. अमिताभ बच्चन, विनोद  खन्ना, राखी, रेखा, अमजद खान, निरुपा रॉय यांच्या मुख्य भुमिका आहेत. मयूर राज वर्मा या बाल कलाकाराने लहान सिकंदरची (अमिताभची) भूमिका उत्तम वठवली आहे. 

          शेवटचे 'जिंदगी तो बेवफा है' हे दर्दभरे गीत किशोर कुमारने गावे असे मोहमद रफी यांना वाटत होते परंतु संगीत दिग्दर्शक कल्याणजी-आनंदजी यांनी सांगितले कि या  गाण्याला मोहमद रफी यांचा आवाज सूट होईल. मोहमद रफी हे गाणे गायला तयार झाले व त्यांनी हे गाणे गायले. अमिताभच्या मृत्यूच्या प्रसंगावेळी हे गीत गायले जाते. विनोद खन्नावर हे गाणे चित्रित झाले आहे. 

          प्रकाश मेहराबरोबर काम केलेल्या ९ चित्रपटांपैकी हा अमिताभचा  ५ वा चित्रपट होता. चित्रपटात सर्वसाधारणपणे प्रेमाचा त्रिकोण दाखवतात पण या चित्रपटात प्रेमाचा पंचकोन दाखवला आहे. अमिताभचे राखीवर प्रेम असते. रेखाचे प्रेम अमिताभवर असते. अमजदखानचे प्रेम रेखावर असते. राखीचे प्रेम विनोद खन्नावर असते व विनोद खन्नाचेही प्रेम राखीवर असते. लेखकाने एकमेकांच्या प्रेमाच्या कथा सुंदररित्या गुंफल्या आहेत व प्रकाश मेहरांनी पडदयावर उत्कृष्टरीत्या दाखविल्या आहेत. या प्रेमकथा बघताना कुठेही कंटाळा वाटत नाही उलट या प्रेमकथेत प्रेक्षकच गुंतून पडतो. 

          ह्या चित्रपटातील नायक हळवा दाखवला आहे. खऱ्या प्रेमासाठी आसुसलेला आहे. त्याचे जिच्यावर प्रेम असते  तिच्याशी तो उघडपणे व्यक्त करू शकत नाही. मनातले प्रेम ओठावर येत नाही. तिच्यासाठी तो झुरत असतो, तिच्या आठवणीने व्याकूळ होत असतो. मनातले दुःख कमी करण्यासाठी व आपली वेदना विसरण्यासाठी तो कोठीवालीचा आसरा घेतो. कोठीवालीसुद्धा त्याच्यावर मनापासून प्रेम करू लागते पण तिला कळते कि आपले ज्याच्यावर प्रेम आहे त्याचे दुसरीवरच प्रेम आहे मग ती विष खाऊन आत्महत्या करते. ह्या चित्रपटात नायक अमिताभ आहे तर त्याचे राखीवर प्रेम आहे. कोठीवाली रेखा आहे. 

          अमिताभचे प्रेम राखीवर आहे. राखी त्याची लहानपणीची मेमसाब आहे. या मेमसाबच्या प्रेमात तो अखंड बुडालेला असतो पण आपले प्रेम तिच्यापुढे व्यक्त करू शकत नाही. आपली वेदना विसरण्यासाठी अमिताभ कोठीवर येतो तेव्हा अमिताभला बघून रेखा त्याच्या प्रेमात पडते. दोघेही प्रेमाचे भुकेले आहेत. वेदना, तडफड एकच आहे पण दोघांचे प्रेम वेगळे आहे. एक दिवस अमिताभला कळते कि विनोदची प्रेयसी राखी म्हणजेच आपली मेमसाब आहे. तो कोठीवर जाऊन रेखाला हि हकीकत सांगतो तेव्हा रेखाला त्याचे खरे प्रेम कोठे आहे हे समजते. ती पाठमोरी उभी राहून ऐकत असते. तिला मनातून वेदना होत असतात. तिचा प्रेमभंग झाल्याने मनातून तुटून जाते. एवढयात अमजद खान तिथे येतो आणि तो अमिताभवर हल्ला करतो. अमजद खानचे प्रेम रेखावर असते पण रेखा व अमिताभवर त्याचा संशय असतो. या संशयापोटीच तो अमिताभचा कट्टर दुश्मन बनतो. एक दिवस विनोद खन्ना रेखाकडे येतो व तिला सांगतो कि अमिताभचा नाद सोड. विनोद खन्नाला ती आश्वासन देते कि अमिताभला भेटणेऐवजी मरण पत्करीन. अमिताभ रेखाला भेटायला येतो तेव्हा ती अंगठीतील विष पिते व अमिताभच्या बाहुपाशात प्राण सोडते. यात अमिताभचे व रेखाचे प्रेम निस्वार्थ आहे. दोघेही प्रेम मिळवण्यासाठी आसुसलेले आहेत. 

          अमिताभने सिकंदरची भुमिका उत्तम प्रकारे निभावली आहे. रेखाची जोहराबाईची भुमिका लक्षात राहण्यासारखी आहे. या दोघांवर चित्रित झालेले गाणे 'सलाम-ए-इष्क मेरी जान' चांगलेच लोकप्रिय झाले. अमिताभ म्हणजेच सिकंदर मोठा होतो तेव्हा तो मोटरसायकलवरून येत असतो व आपल्याच धुंदीत 'रोते हुवे आते है सब' हे गाणे गुणगुणतो. हि अमिताभची एन्ट्री प्रेक्षकांच्या टाळ्या घेऊन जाते. ह्या गाण्यालासुद्धा चांगलीच लोकप्रियता मिळाली. हे गाणे आजही गुणगुणले जाते. 'ओ साथी रे' हे अमिताभवर चित्रित झालेल्या दर्दभऱ्या गाण्यालासुद्धा चांगलीच लोकप्रियता मिळाली. 

          उत्कृष्ठ अभिनयामुळे अमिताभला फिल्मफेअरतर्फे दिल्या जाणाऱ्या 'सर्वश्रेष्ठ अभिनेता' पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. सर्व कलाकारांनी केलेल्या उत्कृष्ठ अभिनयामुळे व लोकप्रिय गाण्यांमुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला.
















Saturday, May 22, 2021

तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- तुज ऐसा कोण उदाराची रासी ।


 तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- तुज ऐसा कोण उदाराची रासी ।

तुज ऐसा कोण उदाराची रासी । आपुलेचि देसी पद दासा ।। १ ।।

शुद्ध हीन कांही न पाहासी कुळ । करिसी निर्मळ वास देहीं ।। २ ।।

भावें हे कदान्न खासी त्याचे घरी । अभक्तांच्या परी नावडती ।। ३ ।।

नवजासी जेथें दुरी दवडिता । न येसी जो चित्ता योगियांच्या ।। ४ ।।

तुका म्हणे ऐसी ब्रीदें तुझी खरी । बोलतील चारी वेद मुखें ।। ५ ।।

तुज ऐसा कोण उदाराची रासी । आपुलेचि देसी पद दासा ।। १ ।।

शुद्ध हीन कांही न पाहासी कुळ । करिसी निर्मळ वास देहीं ।। २ ।।

अर्थ : तुझ्यासारखा औदार्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे ? साक्षात आपले स्वतःचेच पद तू आपल्या दासांना देतोस. चांगले कुळ, वाईट कुळ तू काही पाहात नाहीस. ज्या कोणाचा निर्मळ देह झाला असेल त्या देहामध्ये वास्तव्य करतोस. 

भावार्थ : विठ्ठल आपल्या भक्तांबाबत दयाळू आहे, प्रेमळ आहे. जो कोणी भक्त विठ्ठलाची अंतःकरणापासून भक्ती करीत असेल, त्याचे नित्यनियमाने नामःस्मरण घेत असेल अशा भक्तांना आपल्या हृदयात स्थान देतो. विठ्ठलाच्या हृदयात स्थान मिळवणे म्हणजे उंच पद मिळवण्यासारखेच आहे. हे स्थान मिळवण्यासाठी (पद मिळवण्यासाठी) विठ्ठलाची पराकोटीची भक्ती करावी लागते. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, गोरा कुंभार, सावतामाळी, नरहरी सोनार, चोखामेळा, बंका महार, जनाबाई, कान्होपात्रा, भागू महारीण या संतांनी विठ्ठलाची अंतःकरणापासून भक्ती केली. विठ्ठल हा त्यांचा श्वास होता. विठ्ठलाशी ते एकरूप झाले  होते. विठ्ठलालाही त्यांची भक्ती आवडत होती. त्यांची भक्ती बघूनच विठ्ठलाने त्यांना आपल्या हृदयात स्थान दिले. विठ्ठलाने त्यांची जात पात, कुळ चांगले कि वाईट हे न बघता त्यांना आपल्या अंतरंगात स्थान दिले. विठ्ठल आपल्या भक्तांबाबत कधीच दुजाभावपणा करीत नाही उलट सर्व भक्तांवर मनापासून प्रेम करतो, त्यांना माया लावतो. म्हणूनच बंका, भागू, जना, चोखा हे क्षूद्र जातीचे असूनसुद्धा विठ्ठलाने यांना आपले प्रेम दिले, यांच्यावर माया केली. कान्होपात्रा तर एका गणिकेची (वेश्येची) मुलगी होती तरीही विठ्ठलाने तिला आपलेसे केले. तिला आपल्या अंतरंगात स्थान दिले. याचाच अर्थ असा कि विठ्ठलाच्या ठायी जात-पात, धर्म, कूळ, उच-नीच या गोष्टींना थारा नाही. जो भक्त विठ्ठलाची अंतःकरणापासून भक्ती करेल त्यालाच विठ्ठल आपले स्वतःचे पद बहाल करतो म्हणजेच आपल्या अंतरंगात वसवतो, हृदयात स्थान देतो. 

          विठ्ठल ज्या भक्ताचा निर्मळ देह झाला असेल अशा देहात वास्तव्य करतो म्हणजेच देहातील काम, क्रोध, लोभ, मत्सर, वासना, अहंकार इत्यादी दुर्गुण जाऊन त्या देहात फक्त निस्वार्थीभावना असेल तसेच देहाने मोहमायेचा, साऱ्या संसाराचा त्याग करून आपला देह देवाचे चरणी वाहिला असेल, या देहात देवाव्यतिरिक्त कुणाला स्थान नसेल तसेच हा देह देवाशी एकरूप झाला असेल अशा देहात देव वास्तव्य करितो कारण हा देह पवित्र, निर्मळ झालेला असतो. अशा देहात देवाला वास्तव्य करायला आवडते. देवही अशा भक्तांमध्ये एकरूप झालेला असतो. 

भावें हे कदान्न खासी त्याचे घरी । अभक्तांच्या परी नावडती ।। ३ ।।

अर्थ :  मोठया प्रीतीने भक्तांच्या घरी जाऊन निरस अन्नाचे सेवन करितोस. अभक्तांचे गोड अन्नही तुला आवडत नाही. 

भावार्थ : विठ्ठल आपल्या भक्तांवर मनापासून प्रेम करतो म्हणूनच आपल्या आवडत्या भक्तांच्या घरी जाऊन साधी चटणी भाकरीही गोड मानून खातो व तृप्त होतो. कृष्णाने सुदाम्याने आणलेले पोहे आवडीने खाल्ले. लहानग्या नामदेवाने घरून आणलेला नैवेद्द विठ्ठल आवडीने खात होता. देवाने विदुराच्या घरच्या कण्या आवडीने खाल्ल्या. यातूनच देवाचे आपल्या भक्तांवर किती प्रेम आहे हे दिसून येते. भक्तसुद्धा निस्वार्थभावनेने, शुद्ध भक्तीभावाने व देवावरील प्रेमापोटी आपल्या घासातला घास देवाला देत असतो म्हणूनच शबरीने रामाला चाखलेली उष्टी बोरे दिली व ती बोरे रामाने आवडीने खाल्ली. काही भक्त आपला मोठेपणा, श्रीमंती दाखवण्यासाठी देवाला लाडू, जिलेबी, बासुंदी पुरी असले गोडाधोडाचे जेवण देतो. यातून या भक्ताचे देवावरील प्रेम दिसत नसून अहंकार, बडेजावपणा दिसून येतो व जिथे अहंकार आहे तिथे देव जात नाही म्हणूनच अभक्तांचे गोड अन्नही देवाला आवडत नाही. 

नवजासी जेथें दुरी दवडिता । न येसी जो चित्ता योगियांच्या ।। ४ ।।

तुका म्हणे ऐसी ब्रीदें तुझी खरी । बोलतील चारी वेद मुखें ।। ५ ।।

अर्थ : भक्तांनी घरातून हाकलून दिले तरी जात नाहीस पण योग्यांच्या ध्यानात देखील तू येत नाहीस. तुकाराम महाराज म्हणतात, अशी तुझी खरी ब्रीदें आहेत असे चार वेद सांगतात. 

भावार्थ : विठ्ठल आपल्या आवडत्या भक्तांच्या घरात वास्तव्य करतो कारण ह्या घरात सतत विठ्ठलनामाचा घोष चालू असतो. घरातील सर्व मंडळी विठ्ठल भक्तीत व नामस्मरणात तल्लीन झालेले असतात. घर विठ्ठल  नुसते विठ्ठलभक्तीने भारावून गेलेले असते त्यामुळे या घरात दुष्ट प्रवृत्तींना थारा नसतो. हे घर सात्विकतेने भरून गेलेले असते, पवित्र, निर्मळ झालेले असते. अशा घरात आनंद, सुख-समृद्धी नांदत असते. या घरातील माणसांची वृत्ती समाधानी झालेली असते व जिथे सुख, शांती, समाधान असते तिथे देव आपले वास्तव्य करतो. अशा घरात राहायला देवाला आवडते म्हणूनच अशा घरातून देवाला भक्ताने हाकून(हाकलून) दिले तरी परत येतो. 

           काही योगी रात्रंदिवस ध्यान करीत बसलेले असतात पण त्यांचे चित्त ध्यानात नसते. आपण योगी आहोत, सिद्धपुरुष आहोत, देव माझ्यावर प्रसन्न झाला असून त्याचेकडून मला सिद्धी प्राप्त झाली आहे हे लोकांना दाखवण्यासाठी त्यांची ध्यानधारणा चालू असते. या ध्यानधारणेत त्यांचा दिखावाच जास्त असतो. या ध्यानधारणेत भक्तीचा लवलेश कमी असतो किंबहुना नसतोच. म्हणूनच यांनी केलेली ध्यानधारणा देवापर्यंत पोहोचत नाही. म्हणूनच या योग्यांनी रात्रंदिवस जरी ध्यानधारणा केली तरी विठ्ठल त्यांचे चित्तात (ध्यानात) येत नाही. 

           तुकाराम महाराज म्हणतात, देव आपल्या भक्तांची जात-पात, कुळ न बघता आपल्या भक्तांवर प्रेम करतो, त्यांच्यावर माया करतो. त्यांच्या देहात वास्तव्य करतो, त्यांचे घरात राहतो व त्यांचे हातचे खातो. देव आपल्या भक्तांच्या प्रेमापोटी हे सारे करत असतो. देवाचे व भक्ताचे नाते वात्सल्याचे झालेले असते. या वात्सल्यापोटीच देव आपल्या भक्ताची काळजी वाहत असतो. भक्ताचे रक्षण करीत असतो. हीच खरी देवाची ओळख (ब्रीद) आहे हे चारी वेदामध्ये सांगितले आहे.

         

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 













 

Wednesday, May 12, 2021

डॉन -- गाणी, कथा, अभिनयाची जमलेली भट्टी

 

 डॉन -- गाणी, कथा, अभिनयाची जमलेली भट्टी 

          'डॉन का इंतजार तो ग्यारह मुलकोकी पोलीस कर रही है...' हा डायलॉग ऐकला कि अमिताभचा डॉन चित्रपट डोळ्यासमोर येतो. १९७८ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता नरिमन इराणी असून चंद्रा बारोट यांनी दिग्दर्शन केले आहे. सलीम - जावेद यांनी या चित्रपटासाठी कथा लेखन केले आहे. कल्याणजी - आनंदजी यांनी संगीत दिले असून अंजान व इंदीवर यांनी गाणी लिहिली आहेत. किशोर कुमार, लता मंगेशकर, आशा भोसले यांनी गाणी गायली आहेत. या चित्रपटात अमिताभने दुहेरी भूमिका (डॉन व विजय) साकारली आहे. झीनत अमान, प्राण, इफ्तेकार, ओम शिवपुरी यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

          अमिताभवर चित्रित झालेली 'अरे दिवानो, मुझे पहचानो', 'खैके पान बनारसवाला', हेलन व अमिताभवर चित्रित झालेले 'ये मेरा दिल यार का दिवाना', अमिताभ व झीनतवर चित्रित झालेले ' जिसका मुझे था इंतजार' हि गाणी चांगलीच प्रसिध्द झाली असून या गाण्यांची जादू अजूनही आहे. हि गाणी अजूनही लोकप्रिय असून ऐकावीशी वाटतात. खैके पान बनारसवाला या गाण्यामूळे  फिल्मफेअर तर्फे दिला जाणारा 'सर्वश्रेष्ठ गीतकारा' च्या पुरस्कारासाठी अंजान यांना नामांकन मिळाले. खैके पान बनारसवाला या गाण्यामूळे  फिल्मफेअर तर्फे दिला जाणारा 'सर्वश्रेष्ठ पार्श्वगायकाचा' पुरस्कार किशोर कुमार यांना मिळाला तर 'ये मेरा दिल यार का दिवाना'  या गाण्यामूळे  फिल्मफेअर तर्फे दिला जाणारा 'सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिकेचा' पुरस्कार आशा भोसले यांना मिळाला. ये मेरा दिल यार का दिवाना व खैके पान बनारसवाला या गाण्यांच्या लोकप्रियतेमुळे २००६ साली प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या डॉन या चित्रपटात हि दोन गाणी समाविष्ट करण्यात आली. 

          अमिताभवर चित्रित झालेले खैके पान बनारसवाला हे गाणे याआधी बनारसी बाबू या चित्रपटात देव आनंदवर चित्रित करणार होते परंतु ह्या गाण्याची आवश्यकता वाटत नसल्याने देवानंदने हे गाणे या सिनेमातून काढायला लावले. नंतर हे गाणे डॉन या चित्रपटात घेतले व अमिताभवर चित्रित केले. हे गाणे  सुपरहिट झाले व प्रत्येकाच्या तोंडी आले. 

अशी झाली चित्रपट निर्मिती --

          प्रोड्युसर व सिनेमाटोग्राफर नरिमन इराणी हे सुनील दत्त अभिनीत जिंदगी जिंदगी हा चित्रपट तयार करत होते परंतु हा चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना तोंड दयावे लागले. त्यांच्यावर १.२ मिलियन कर्जाचा बोजा झाला व हे कर्ज ते फेडू शकत नव्हते. नरिमन इराणी यांनी याआधी मनोज कुमारच्या रोटी कपडा और मकान या चित्रपटासाठी सिनेमाटोग्राफर म्हणून काम केले होते. या चित्रपटातील कलाकारांनी म्हणजेच अमिताभ बच्चन, झीनत अमान, प्राण व सहाय्यक दिग्दर्शक चंद्रा बारोट यांनी नरिमन इराणी यांना मदत करायचे ठरवले. त्यांनी दुसरा चित्रपट निर्माण करण्याची तयारी केली व या चित्रपटात नरिमन इराणी यांना सहभागी करून घेण्याचे ठरवले. त्यांनी लेखक सलीम - जावेद यांना एक कथा लिहिण्यासाठी विनंती केली. त्यांनी लिहिलेली एक कथा ऐकविली. याआधी हि कथा बऱ्याच निर्मात्यांनी नाकारली होती. अमिताभ व इतर कलाकारांनी हि कथा ऐकली. या कथेचे नाव डॉन ठेवले व या कथेवरून डॉन चित्रपट बनवण्याचे ठरवले व या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रा बारोट यांनी करायचे असे ठरले. या चित्रपटात अमिताभने डॉनचे पात्र साकारले. झीनत अमान व प्राणनेही यात भूमिका केली. 

          हा चित्रपट पूर्ण व्हायला तब्बल साडे तीन वर्षे लागली. या अवधीत प्रोड्युसर इराणी यांचे निधन झाले. त्यामुळे बारोट यांच्यावर खर्चाचा भार आला तरीपण त्यांनी चित्रपटाच्या खर्चाला संयमाने तोंड दिले. त्यांना सर्वानी सहकार्य केले. नंतर हा चित्रपट सुपरहिट ठरला व उत्पन्नाचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. या उत्पन्नातून नरिमन इराणी यांचे कर्ज फिटले गेले. 

           अमिताभने या चित्रपटात अंडरवर्ल्ड डॉन व विजय अशी दुहेरी भूमिका साकारली. डॉन अतिगंभीर, निर्दयी, करारी दाखवला आहे तर त्याच्या चेहऱ्याशी साम्य असलेला विजय साधाभोळा, सरळमार्गी दाखवला आहे. 

          डॉन(अमिताभ बच्चन) मुंबई अंडरवर्ल्डचा एक कुविख्यात गुन्हेगार आहे. त्याचा शोध मुंबई पोलीस व इंटरपोल घेत असते पण या साऱ्यांना गुंगारा देत असतो. तो आपला सहकारी रमेश याची निर्दयपणे हत्या करतो यामुळे रमेशची होणारी बायको कामिनी (हेलन) डॉनला पोलिसाना पकडून देण्यासाठी प्रयत्न करते पण तिचीही हत्या केली जाते. रमेश आणि कामिनीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रोमा(झीनत अमान) डॉनच्या गँगमध्ये सामील होते. 

          डॉनला पकडण्यात पोलिसांना  यश येते परंतु यात डॉन मारला जातो. मुंबईच्या चाळीत राहणारा विजय नाच गाणे करून आपले व दोन मुलांचे (दिपू व मुन्नी) यांचे पोट भरत असतो. एकदा त्याची मुलाखत  डीएसपी डिसिल्वा यांच्याशी होते. डॉनच्या  चेहऱ्याशी साम्य असल्यामुळे डिसिल्वा विजयला डॉन बनण्यास सांगतात. त्यांच्या म्हणण्यानुसार विजय डॉन बनतो. डॉनची आठवण परत आल्याच्या खुशीमध्ये पार्टी चालू असताना पोलिसांची  धाड पडते व डॉन म्हणजेच विजय व त्याच्या गँगला पकडण्यात पोलिसांना यश येते परंतु यात डिसील्वाना गोळी लागते. विजय आपण डॉन नसून विजय असल्याचे पोलिसांना पटवून सांगण्याचा प्रयत्न करतो परंतु पोलीस त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. पोलीस समजतात हा डॉन आहे व नारंग व त्याचे सहकारी समजतात कि हा विजय आहे. 

           शेवटी विजय जेजे (प्राण) व रोमाच्या (झीनत अमान) मदतीने वरधान, नारंग व त्याच्या गॅंगला पोलिसांना पकडून देतो व आपण निर्दोष असल्याचा पुरावा म्हणून डायरी पोलिसांना देतो. 

          अमिताभने डॉन व विजय या दुहेरी व्यक्तिरेखा उत्तम वठवल्या आहेत. त्याच्या या भुमिकेमुळे त्याला फिल्मफेअर तर्फे दिला जाणारा 'सर्वश्रेष्ठ अभिनेता' चा पुरस्कार दिला गेला. त्याला प्राणने व झीनत अमानने उत्तम साथ दिली. 

          'डॉन का इंतजार तो ग्यारह मुलकोकी पोलीस कर रही है... लेकिन सोनिया डॉनको पकडाना मुश्किल ही नही नमुन्किण है'

       'ये तुम जानती हो कि ये रिव्हॉल्वर खाली है, मैं जानता हूँ कि ये रिव्हॉल्वर खाली है, लेकिन पोलीस नही जानती कि ये रिव्हॉल्वर खाली है' हे अमिताभच्या आवाजातील संवाद चांगलेच गाजले. डॉनचे नाव काढले कि हे डायलॉग लगेच तोंडात येतात. 

          गाणी, कथा, अभिनय यामुळे या चित्रपटाची भट्टी चांगलीच जमली. हा चित्रपट सुपरहिट झाला.

         

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Monday, May 10, 2021

।। आई ।।

 

।। आई ।।

          आई या शब्दातच सारे विश्व सामावलेले आहे. आई वात्सल्यसिंधू असते. आईचे आपल्या मुलांवर मनापासून प्रेम असते. आईचे व मुलाचे नाते वात्सल्याचे असते. या नात्यात निस्वार्थीभावना असते. आई आपल्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते. मुलांना काही दुखले खुपले तर त्याच्या वेदना आईला होतात. मुलांच्या भविष्याबाबत आईला काळजी वाटत असते. ती आपल्या मुलांच्या भविष्याबाबत मार्गदर्शक ठरत असते. मुलांना योग्य मार्गावरून चालण्यास शिकवत असते. मुलांना घडवत असते. 

          शिवाजी महाराजांना घडवण्यात जिजाऊंचा मोठा वाटा होता. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच शिवाजी महाराज रयतेचे राजे झाले. त्यांनी आपले स्वराज्य स्थापन केले. दुसरे उदाहरण म्हणजे सिंधुताई सपकाळ. त्या अनाथ मुलांच्या माय झाल्या. अनाथ, रस्त्यावर सापडलेल्या, लोकांनी सोडलेल्या मुलांना त्यांनी आपलेसे केले. त्यांना आईची माया लावली. त्यांचे पालनपोषण केले, त्यांना वाढवले. पोटच्या पोराप्रमाणे मुलांचा सांभाळ केला. खरोखरच त्या अनाथ मुलांच्या माय झाल्या. 

          इथे आईच्या प्रेमाची गोष्ट सांगावीशी वाटते. आई हालअपेष्टा सोसून आपल्या बाळाला वाढवते, मोठे करते. मुलगा शिकून सवरून कमावता होतो. आई त्याचे लग्न चांगल्या मुलीशी लावून देते. काही काळानंतर मुलीला ती आई संसारात नकोशी वाटते म्हणून नवऱ्याला फितवून आईपासून दोघेही वेगळे होतात. मुलगा बायकोच्या प्रेमात आंधळा झालेला असतो. ती म्हणेल तसे वागत असतो. एकेदिवशी बायको त्याला सांगते कि, 'तुझ्या आईचे काळीज काढून आण.'  मुलगा बायकोच्या प्रेमात एवढा आंधळा झालेला असतो कि, मागचा पुढचा विचार न करता लगेच तयार होतो. 

          तो आपल्या आईकडे येतो व तिचे काळीज मागतो. मुलाच्या प्रेमापोटी आई आपले काळीज दयायला लगेच तयार होते. मुलगा आईचे काळीज काढतो व चालू लागतो. चालता चालता त्याच्या पायाला ठेच लागते व तो पडतो. त्याला लागलेले बघून आईचे काळीज गलबलते व बोलू लागते 'बाळा, लागले नाही ना तुला?' हे शब्द ऐकून मुलाचे हृदय द्रवते. त्याला वाईट वाटते. केलेल्या कृत्याचा पश्चाताप होतो.  या गोष्टीवरून असे दिसून येते कि आईचे आपल्या मुलावर किती प्रेम असते.

          पक्षी प्राण्यांच्यातही आईचे प्रेम दिसून येते. आई आपल्या पिलांसाठी चारा व अन्न शोधून आणते. त्यांच्या पंखात व अंगात बळ येईपर्यंत त्यांचा सांभाळ करते. भूमाता हि आपली आईच आहे. या जमिनीवर आपण धान्य पिकवतो. हि भूमाता आपली काळजी घेते, आपल्याला धान्य देऊन आपले पालनपोषण करते. गाईलाही आपण माता मानलेलं आहे. आई हि देवासमान असते व गाईच्या पोटात तेहेतीस कोटी देवांचे वास्तव्य असते म्हणूनच गाईला आपण गोमाता मानलेले आहे. 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

          


























Sunday, May 9, 2021

तुकाराम महाराज अभंग -- परिमळ म्हणू चोळू नये फूल ।

 तुकाराम महाराज अभंग-परिमळ म्हणू चोळू नये फूल ।

परिमळ म्हणू चोळू नये फूल । खाऊ नये मूल आवडते ।। १ ।।

      मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद । यंत्र भेदूनी नाद पाहूं नये ।। २ ।।

         कर्मफळ म्हणूनि इच्छू नये काम । तुका म्हणे वर्म दावू लोकां ।। ३ ।।

          तुकाराम महाराजांनी या अभंगात असे सांगितले आहे कि, 'आपण जे जे कर्म करणार आहोत ते फळ मिळवून देणारीच आहेत. पण त्या फळाची अपेक्षा न करता (कामेच्छा न धरता) कर्म करत रहावे.' तुकाराम महाराज या अभंगातून असे म्हणत आहेत कि, 'पुष्प हे सुगंधी आहे म्हणून त्याला हाताने चोळू नये. आपले मूल फार आवडते म्हणून खाऊ नये. मोत्याचे ठिकाणी असणाऱ्या पाण्याचा स्वाद चाखून पाहू नये. भांडयावर भांडी आपटून त्याचा नाद ऐकू नये.'

         तुकाराम महाराजांना या अभंगातून असे सांगायचे आहे कि, फुल सुवासिक असले तरी ते जर हाताने चोळले तर त्याचा सुवासिकपणा संपून ते टाकून दयावे लागते. फुल जोपर्यंत चांगले आहे तोपर्यंत त्याचा सुवासिकपणा टिकून राहतो पण तेच फुल हाताने चोळले तर त्याचा सुवासिकपणा संपून ते टाकून दयावे लागते. म्हणजेच सुवासिकपणा हा फुलाचा सद्गुण तर हाताने फुल चोळणे म्हणजे दुर्गुण. आई वडील आपल्या मुलाचे प्रेमापोटी लाड करतात . हट्टापायी मागितलेली वस्तू लगेच देतात. नंतर तोच मुलगा मोठा झाल्यावर आई वडिलांना विसरतो, त्यांना लाथा मारायला कमी करत नाही. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, आपले मुल आवडत असले तरी त्याचा लाड करू नये (खाऊ नये). मोत्याचे ठिकाणी असणाऱ्या पाण्याचा स्वाद घेऊ नये म्हणजेच मोती समुद्राच्या पाण्यात सापडतात व समुद्राचे पाणी खारट लागते. पाणी खारट असल्याने पाणी पिववत नाही व या पाण्याने माणसाची तहान भागत नाही. पाणी असूनही पाणी पिता येत नाही हा समुद्राचा दुर्गुण होय. भांडयावर भांडी आपटून त्याचा नाद ऐकू नये म्हणजे घरात कडाक्याचे भांडण चालले असेल तर ते ऐकू नये कारण त्या भांडणात द्वेष, मत्सर, अपशब्द, शिव्या शाप, असे  दुर्गुण भरलेले असतात. या दुर्गुणांमुळे सुख प्राप्त न होता दुःखच होते. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 













 त्रिशूल - पिता पुत्राचा संघर्ष 

          सन १९७८ मध्ये प्रदर्शित झालेली हि चित्रपट निर्मिती. या चित्रपटाचे निर्माता गुलशन राय असून दिग्दर्शन यश चोप्रा यांचे आहे. या चित्रपटातील गाणी साहिर लुधियानवी यांनी लिहिली असून खय्याम यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटातील गाणी लता मंगेशकर, नितीन मुकेश, किशोर कुमार, येसूदास, पामेला चोपडा यांनी गायली आहेत.  अमिताभला डोळ्यासमोर ठेवून सलीम जावेद यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. 

          या चित्रपटात संजीव कुमार, अमिताभ बच्चन, शशी कपूर, राखी, वहिदा रहेमान, हेमा मालिनी, पूनम धिल्लो, सचिन, प्रेम चोपडा यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट संजीव कुमार, अमिताभ बच्चन व शशी कपूर या तिघांवर केंद्रित केला आहे. हा चित्रपट पिता पुत्राच्या संघर्षांवर आधारित आहे. संजीव कुमारने अमिताभच्या सावत्र बापाची भूमिका केली आहे तर शशी कपूर व पुनम धिल्लो अमिताभचे सावत्र बहीण भाऊ दाखवले आहेत. वहिदा रेहमानने अमिताभच्या आईची भुमिका साकारली आहे. अमिताभने विजय कुमारची भुमिका उत्तम वठवली आहे. संजीव कुमार व अमिताभ बच्चन यांच्यातील संघर्षाचे चित्रण उत्तम वठवले आहे. 

          सासऱ्याच्या मोठया बांधकाम व्यवसायात भागीदारी मिळतीय हे लक्षात आल्यावर व झटपट पैसा मिळवून श्रीमंत होण्यासाठी संजीव कुमार आपली प्रेयसी वहिदा रेहमानचा त्याग करतो व कामिनीशी लग्न करतो. वहिदा रेहमान हि गर्भवती असते परंतु संजीव कुमारला श्रीमंतीची भुरळ पडलेली असते. संजीव कुमारपासून वेगळी झालेली वहिदा रेहमान एका बाळाला जन्म देते. ती त्याचे नाव विजय ठेवते व त्याला शरीर व मनाने कणखर बनवते. 

          आपल्या आईला फसवून तिच्या बरबादीचे कारण बनलेल्या आपल्या पित्याचा सूड घेण्यासाठी व त्याची संपत्ती, व्यवसाय बरबाद करण्यासाठी दिल्लीला जातो. दोघांच्यात मग संघर्ष निर्माण होतो. विजय काही चांगले सौदे करतो त्यामुळे संजीव कुमारला व्यवसायात नुकसान होते. दोघांच्यात जरी संघर्ष होत असला तरी अमिताभला संजीवकुमार विषयी अपशब्द काढलेले आवडत नाहीत. शेवटी प्रेम चोपडा अमिताभला गोळी मारणार असतो तेवढयात संजीव कुमार मध्ये पडतो व गोळी त्याला लागते. मरणाच्या आधी संजीव कुमारला पश्चाताप होतो व अमिताभची माफी मागतो. अमिताभ संजीव कुमारला माफ करतो व कुटुंबासमवेत राहतो. 

          या चित्रपटात अमिताभ बच्चन व संजीव कुमार या अभिनयातील दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाची चमक प्रेक्षकांना दाखवली. अमिताभचे चित्रपट म्हणले कि प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करतातच, त्यातीलच हा एक चित्रपट. अमिताभसुध्दा प्रेक्षकांना चित्रपट बघण्याचा भरभरून आनंद देतो. 

          अमिताभचे चित्रपट आणि त्यातील संवाद हे एक समीकरणच झालेले आहे. त्याचे दमदार संवाद ऐकण्यासाठी प्रेक्षक चित्रपटात गर्दी करतात. ह्या चित्रपटातही अमिताभचे काही दमदार संवाद आहेत. हे संवाद   आजही दाद देवून जातात. 

१) मै पांच लाख का सौदा करने  आया हूँ ... और मेरी जेब में पांच फूटी कौडियाभी नही हें ।

२) मुझे पांच मिनिट ना मिलकर ... अपने अपना पांच लाख का नुकसान किया हैं । 

३) जिसने पच्चीस बरस अपनी माँ को हर रोज थोडा थोडा मरते देखा हो ... उससे मौत से क्या डर लग्ना ।

४) मेरे पास अपने बाप दादा कि दौलत कि नही, एक पैं है, और नही मुझे चाहिये ... मेरे पास अगर कुछ है तो  अपनी  माँ का दिया हुवा आशीर्वाद ।

         

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

         

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...