Tuesday, May 16, 2023

अवीट गोडीचे गाणे -- भरजरी ग पितांबर दिला फाडुन

 

वनमालाबाई(शामची आई) व माधव वझे(शाम)

 अवीट गोडीचे गाणे -- भरजरी ग पितांबर दिला फाडुन

            'भरजरी गं पितांबर दिला फाडुन' हे अवीट गोडीचे गाणे शामची आई या चित्रपटातील आहे. साने गुरुजींच्या शामची आई या कादंबरीवर आचार्य अत्रेंनी सिनेमा काढला होता. त्या सिनेमात माधव वझेंनी शामची तर वनमाला बाईंनी आईची भूमिका केली होती. या गाण्याला संगीत दिलंय, वसंत देसाई यांनी तर याचे बोल लिहीलेत, प्रत्यक्ष प्रल्हाद केशव अत्रेंनी. हे गाणं आपल्या सुमधूर आवाजाने सजवलंय, आशा भोसले यांनी. या सिनेमातली सगळीच गाणी सुंदर आहेत. सुवर्णपदक मिळवणारा हा पहिला सिनेमा होता. पहिल्या मराठी चित्रपटाला सुवर्ण पदक मिळाले. आशाताईंचा आवाज म्हणजे प्रत्येकाच्या काळजाला भिडणारा असा होता. या चित्रपटातील सर्वच गाणी सुंदर आहेत. अगदी आज जरी ही गाणी ऐकली तरी लगेच डोळ्यांतून आपोआप पाणी येतं. 

          हे गीत म्हणजे भाऊ बहिणीच्या निःस्वार्थ प्रेमाचा अविष्कार आहे. पहिल्या कडव्यात अत्रे म्हणतात कि, श्रीहरीचे बोट कापले असूनसुद्धा सुभद्रा पाठची बहीण असूनही चिंधी फाडून देत नाही. तिला श्रीहरीच्या बोटापेक्षा शालू नि पैठणी महत्वाची वाटते. म्हणूनच अत्रे म्हणतात कि, पाठची बहीण झाली वैरीण. 

         दुसऱ्या कडव्यात अत्रेंनी द्रौपदीचे श्रीहरीवरील असलेल्या प्रेमाचे सुंदर वर्णन केले आहे. द्रौपदी म्हणते, हरीची मी कोण आहे तरी हरीने म्हणजेच श्रीकृष्णाने मला बहीण मानली आहे. या भावाने मला वसने म्हणजेच वस्त्रे देऊन माझी लाज राखली आहे. तोच हरी आज चिंधीसाठी माझ्याकडे आला आहे. त्याचे माझ्यावर एवढे ऋण आहे कि माझ्या काळजाची चिंधी करून हरीला देईन. द्रौपदीने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता आपला भरजरी पितांबर फाडला व चिंधी म्हणून हरीला दिला. म्हणूनच अत्रे म्हणतात कि, त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून. 

          खरोखरच द्रौपदीचे हरीवर मनापासून व निःस्वार्थ प्रेम आहे. म्हणूनच तिने आपला भरजरी पीतांबर फाडून दिला. भक्ती, प्रेम असावे तर द्रौपदी सारखे. तिला भरजरी पीतांबरपेक्षा हरीवरील भक्ती, प्रेम मोलाचे वाटले. जे रक्ताच्या नात्याला अंतरीचे प्रेम कळले नाही ते मानलेल्या नात्याला कळले. म्हणूनच अत्रे म्हणतात कि, 'रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम पटलि पाहिजे अंतरीची खुण' द्रौपदीची निःस्वार्थ (लाभाविण) भक्ती, प्रेम बघून हरी प्रसन्न झाले.

          प्रल्हाद केशव आत्रे यांनी जितके भावपूर्ण व अर्थपूर्ण हे गीत लिहिले आहे  तितक्याच उत्कटपणे व सुरेल आवाजात आशा भोसले यांनी हे गीत गायले आहे. अजूनही या गाण्याचे स्वर कानावर पडले कि, मन प्रसन्न, आनंदी होतं.

भरजरी ग पितांबर दिला फाडुन
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण

सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिण
विचाराया गेले नारद म्हणून
बोट श्रीहरिचे कापले ग बाई
बांधायाला चिंधी लवकर देई
सुभद्रा बोलली, “शालु नि पैठणी
फाडुन का देऊ चिंधी तुम्हांसी मी?”
पाठची बहीण झाली वैरिण !

द्रौपदी बोलली, “हरिची मी कोण?
परि मला त्याने मानिली बहीण
काळजाचि चिंधी काढून देईन
एवढे तयाचे माझ्यावरी ऋण
वसने देऊन प्रभु राखी माझी लाज
चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज !”
त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून

प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसि ज्याची भक्ती तैसा नारायण
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम
पटलि पाहिजे अंतरीची खुण
धन्य तोचि भाऊ, धन्य ती बहीण
प्रीती जी करिती जगी लाभाविण
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्‍न

 


 

Sunday, May 14, 2023

अभिमान


 
अभिमान 

          हा चित्रपट १९७३ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता सुशीला कामत व पवन कुमार जैन असून हृषीकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटातील गाणी मजरुह सुलतानपुरी यांनी लिहिली असून सचिनदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केली आहेत. मोहमद रफी, लता मंगेशकर, किशोर कुमार यांनी आपल्या सुरेल आवाजात गाणी गायली आहेत. अमिताभ बच्चन, जया भादुरी, असरानी, बिंदू यांच्या मुख्य भुमिका आहेत. 

           हृषीकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या उत्कृष्ठ चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे. या चित्रपटात जया बच्चन यांचा एकमेव आवाज लता मंगेशकर होता, तर अमिताभ बच्चन यांना तीन गायकांनी आवाज दिला होता.

           मनहर उधासने "लुटे कोई मन का नगर"  या गाण्यासाठी साठी डेमो रेकॉर्ड केला आणि तो मुकेशने गायला होता ; तथापि मुकेशने नकार दिला कारण त्याला वाटले की डेमो चांगला आहे आणि उधासला संधी दिली पाहिजे. हे गाणे मनहर उदास व लता मंगेशकर यांच्या आवाजात गायले गेले व अजरामर झाले. मुकेशमुळेच मनहर उदासला चांगले गीत गायला संधी मिळाली व या संधीचे मनहर उदासने सोने केले. 

          समीक्षकांच्या म्हणण्यानुसार सितारवादक रवी शंकर व अन्नपूर्णा देवी यांच्या वैवाहिक जीवनातील तणावावर हा चित्रपट आधारित आहे तर काहींच्या  म्हणण्यानुसार  गायक किशोर कुमार व त्यांची पहिली पत्नी रुमा घोष यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. हा चित्रपट भारताबरोबर श्रीलंकेमध्येसुद्धा सुपरहिट झाला तसेच कोलंबोमधील एम्पायर चित्रपटगृहात सलग ५९० दिवस दाखवला गेला.

कथानक --

               सुबीर कुमार (अमिताभ बच्चन) हा एक व्यावसायिक गायक आहे ज्याची कारकीर्द प्रतिभावंत असून वाढत आहे. तो लग्न करण्याचा विचार करत नाही - जोपर्यंत तो उमाला भेटत नाही, उमा(जया भादुरी)  एक गोड खेडेगावची मुलगी जी संगीताने प्रतिभावान आहे. सुबीर उमाच्या प्रेमात पडतो आणि तिच्याशी लग्न करतो. तो आपल्या नववधूला घेऊन मुंबईला परततो.  सुबीर एक गायक म्हणून आपली कारकीर्द चालू ठेवतो आणि उमाच्या गाण्याच्या कारकिर्दीला चालना देतो. तथापि, उमाची गायन कारकीर्द जोमाने भरभराटीस येऊ लागते व सुबीरची कारकीर्द गडगडते.

               अखेरीस, उमा  तिच्या पतीपेक्षा अधिक यशस्वी होते.  सुबीरकडून ईर्ष्या निर्माण होते. त्याचा अभिमान आणि मत्सर हे लग्न मोडून काढण्यास कारणीभूत ठरतात. सुबीरचा अहंकार वाढतो व तिचा द्वेष करू लागतो यामुळे दोघांच्या वैवाहिक जीवनात तणाव उत्पन्न होतो. यानंतर दोघे वेगळे होतात. सुबीर आपल्या ईर्षेवर मात करू शकेल का हा प्रश्न पडतो. जेव्हा जोडपे वेगळे होतात आणि उमाचा गर्भपात होतो तेव्हा चित्रपट अतिशय संवेदनशील परिस्थितीत पोहोचतो. त्याच्या काकूंकडून जोरदार टीका झाल्यानंतर, ते पुन्हा भावनिक पुनर्मिलनमध्ये एकत्र येतात आणि ते एकत्र गातात.

               अमिताभ बच्चन व जया भादुरी यांनी उत्कृष्ठ काम केले. आपली जोडीदार आपल्या बरोबरीच्या कलाक्षेत्रात आपल्याला मागे टाकून पुढे जाते, प्रसिद्धी मिळवते तेव्हा आपल्यातील अहंकार जागा होऊन आपल्याच जोडीदाराचा आपण तिरस्कार करू लागतो हे अमिताभने आपल्या अभिनयातून उत्कृष्ठपणे सादर केले आहे. जया भादुरीनेही अमिताभला उत्तम साथ दिली. दोघांच्या उत्कृष्ठ कलाकारीने हा चित्रपट सुंदर झाला व परत परत बघावासा वाटतो. सुंदर अभिनयामुळे जया भादुरीने फिलेफेअरचा 'बेस्ट एक्टरेस' (उत्कृष्ठ नायिका) हा किताब मिळवला.

 

 


                                     "लुटे कोई मन का नगर" सुपरहिट गाणे

 

 

 

 

 

 

 

 

 

 

नमक हराम

 नमक हराम 

          हा चित्रपट २३ नोव्हेंबर १९७३ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता जयेंद्र पांडया असून दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी आहेत. या चित्रपटाची कथा गुलझार व हृषीकेश मुखर्जी यांनी लिहिली आहे. या चित्रपटातील गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली असून राहूल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केली आहेत. आशा भोसले, उषा मंगेशकर, किशोर कुमार यांनी गाणी गायली आहेत. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, सिमी गरेवाल, रेखा, असरानी यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

          राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचे बरोबर हृषीकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला हा दुसरा चित्रपट आहे याआधी या दोघांना घेऊन त्यांनी आनंद हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट सोमू(राजेश खन्ना) व विकी(अमिताभ बच्चन) या दोन मित्रांवर घेतलेला आहे. 

कथानक --

          सोमू(राजेश खन्ना) एक सामान्य घराण्यातला असून विधवा आई व बहिणीबरोबर दिल्लीत राहतो तर विकी(अमिताभ बच्चन) श्रीमंत घराण्यातील दाखवला आहे. एके दिवशी विकीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने डॉक्टर त्यांना आराम करायला सांगतात. विकी वडिलांचा व्यवसाय सांभाळतो. या दरम्यान विकीचे जुने कर्मचारी व युनियन लीडरशी भांडण होते त्यामुळे सर्व कर्मचारी संपावर जातात. विकीचे वडील मध्यस्थी करतात व विकीला कर्मचाऱ्यांची माफी मागायला सांगतात. विकी माफी मागतो व संप मिटतो. 

          सोमू विकीच्या कारखान्यात मजदूर म्हणून कामाला लागतो व आपल्या साथीदारांबरोबर दोस्ती करतो. कालांतराने तो युनियन लीडर बनतो. विकी व सोमूच्यात तणाव निर्माण होतो व विकी मारला जातो.

अमिताभचा राजेश खन्नाबरोबर काम न करण्याचा निर्णय --

          या चित्रपटात शेवटी अमिताभ मारला जातो. राजेश खन्नाला जेव्हा हे कळते तेव्हा तो  हृषीकेश मुखर्जी यांचेवर दबाव आणून चित्रपटाचा शेवट बदलण्यास सांगतो. कारण आनंद मध्ये राजेश खन्नाला प्रेक्षकांकडून जशी सहानुभूती मिळाली तशी अमिताभ चित्रपटाच्या शेवटी मरण पावला तर प्रेक्षकांकडून मिळणारी सहानुभूती अमिताभला मिळणार होती. पण हृषीकेश मुखर्जी यांनी दबावाला बळी न पडता चित्रपटाचा शेवट बदलला नाही. अमिताभला जेव्हा हि गोष्ट कळली तेव्हा राजेश खन्नाबरोबर काम न करण्याचा निर्णय त्याने घेतला. 

          अमिताभने या चित्रपटात उत्कृष्ठ भूमिका केली. या भुमिकेमुळे त्याला फिल्मफेअरचा 'बेस्ट सपोर्टींग ऍक्टर' हा किताब देण्यात आला. या चित्रपटामुळे प्रेक्षकांना आनंद नंतर अमिताभ व राजेश खन्ना यांच्या अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळाली. या चित्रपटाच्या वेळी राजेश खन्ना सुपरस्टार होता तर अमिताभची सुपरस्टार पदाकडे वाटचाल सुरु होती. 








 

 

 

 

 

 

 










Friday, May 12, 2023

डॅम इट आणि बरेच काही - महेश कोठारे यांचा चित्रपट क्षेत्रातील जीवनपट

 

 डॅम इट आणि बरेच काही - महेश कोठारे यांचा चित्रपट क्षेत्रातील जीवनपट

         'डॅम इट आणि बरेच काही' हे मेहता पब्लिशिंग हाऊस ने प्रकाशित केलेले व मंदार जोशी यांचे शब्दांकन असलेले पुस्तक नुकतेच माझ्या संग्रही आले. हे पुस्तक म्हणजे महेश कोठारेंचा जीवनपटच आहे. चित्रपट क्षेत्रात व निर्मितीत आलेले चांगले वाईट अनुभव त्यांनी या पुस्तकात मांडले आहेत. बालकलाकार, चित्रपटातील मुख्य नायक, खलनायक, लेखक, निर्माता, दिग्दर्शक, वितरक अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी निभावल्या. या भूमिका निभावत असताना त्यांना अनेक अडचणी आल्या, संकटे आली परंतु जिद्द व आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी अडचणी व संकटावर मात केली.
          महेश कोठारेंनी धुमधडाका, दे दणादण, थरथराट, धडाकेबाज, झपाटलेला असे चांगले व दर्जेदार चित्रपट मराठी रसिकांना दिले. मराठी चित्रपटसृष्टीवर मरगळ आली होती तेव्हा त्यांनी अशा उत्कृष्ट व विनोदी चित्रपटांची निर्मिती करुन मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी दिली. खरं तर महेश कोठारे वकिली करत होते व वकिली करता करता चित्रपट क्षेत्रात काम करत होते. असेच एकदा न्यायाधीशांनी त्यांना विचारले की, "तुम्ही अॅक्टर आहात की लॉयर?" महेश कोठारेंनी लागलीच उत्तर दिले, "अॅक्टर" तिथूनच त्यांची वकिलीची कारकीर्द संपून अॅक्टर व डायरेक्टरची कारकीर्द सुरू झाली.
       महेश कोठारेंनी धुमधडाकाच्या वेळचा प्रसंग सांगितला आहे की, जेव्हा महेश कोठारे धुमधडाका चित्रपट निर्माण करत होते तेव्हा त्यांना पैशाची आवश्यकता होती तेव्हा त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रकडे पाच लाख रुपये कर्जाची मागणी केली परंतु 'असल्या प्रपोजल्सना आम्ही एन्टरटेन करीत नाही' असे मॅनेजरने सांगून त्यांची फाईल फेकून दिली. परंतु बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्षांचे सचिव श्री महाजन यांचेशी बोलणे झालेवर त्यांची कर्जाची फाईल मंजूर झाली व त्यांना पैसे मिळून त्यांचे काम चालू झाले.  
          धुमधडाका चित्रपटावेळेस महेश कोठारेंनी लक्ष्मीकांत बेर्डेंना एक रुपया मानधन देवून साईन केले. नंतर लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारेंच्या चित्रपटाचे अविभाज्य भाग बनले. महेश लक्ष्या ही जोडी सुपरहिट ठरली. महेश कोठारेंना धडाकेबाज मधील कवठया महांकाळ हे खलनायकाचे नाव सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ या गावाच्या नावावरून सुचले तसेच ही व्यक्तीरेखा बाबला या गुजराती कलाकाराने साकारली. झपाटलेला चित्रपटावेळेस रामदास पाध्ये यांनी आठ बाहुले तयार केले परंतु महेश कोठारेंच्या पसंतीस उतरले नाहीत शेवटी पाध्येंनी नववा बाहुला तयार केला तो महेश कोठारेंच्या पसंतीस उतरला. असे आणखी काही किस्से महेश कोठारेंनी आपल्या पुस्तकात सांगितले आहेत.
          महेश कोठारेंनी चित्रपट क्षेत्रातील बालकलाकार म्हणून झालेला प्रवास सुरू होवून छोट्या पडद्यावरील निर्मिती पर्यंत येऊन थांबला. त्यांनी हा प्रवास या पुस्तकात सुरेखरित्या मांडला आहे. हे पुस्तक वाचताना महेश कोठारेंचा जीवनपटच डोळ्यासमोर उभा राहतो. या पुस्तकामुळे जिद्दी, आत्मविश्वासू, अभ्यासू वृत्ती ही त्यांची दुसरी बाजू कळली. चित्रपट क्षेत्रात करिअर करणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक म्हणजे 'टेक्स्ट बुक गाईड' आहे. ओघवती व समजेल अशी भाषा, रंगीत छायाचित्रे, सुबक मांडणी, आकर्षक मुखपृष्ठ व सुंदर शब्दांकन यामुळे हे पुस्तक परिपुर्ण झाले आहे व संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे.

Thursday, May 11, 2023

लावारीस

 

 लावारीस 

          हा चित्रपट २२ मे १९८१ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक प्रकाश मेहरा होते. या चित्रपटाची कथा शशिभूषण, दीनदयाळ शर्मा यांनी लिहिली असून संवाद कादर खान यांनी लिहिले आहेत. या चित्रपटातील गाणी अंजान यांनी लिहिली असून कल्याणजी-आनंदजी यांनी संगीतबद्ध केली आहेत. 'अपनी तो जैसी तैसी' हे गीत प्रकाश मेहरा यांनी लिहिले. या चित्रपटातील गाणी किशोर कुमार, अलका याग्निक, आशा भोसले, मन्ना डे यांनी गायली आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन, अमजद खान, झीनत अमान, राखी, सुरेश ओबेरॉय, रंजीत यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

          'मेरे अंगनेमे तुम्हारा क्या काम है' हे पुरषी आवाजातील गाणे अमिताभने गायले आहे तर स्त्री आवाजातील गाणे अलका याग्निक यांनी गायले आहे. या गाण्यासाठी अलका याग्निक यांना फिल्मफेयरचे 'बेस्ट फीमेल प्लेबॅक सिंगर' चे नामांकन मिळाले तर अमिताभला 'बेस्ट ऍक्टर' चे नामांकन मिळाले. 

           अमिताभने गायलेले 'मेरे अंगनेमे तुम्हारा क्या काम है' हे गीत फारच प्रसिद्ध झाले. या गीतात अमिताभने स्त्रीवेष धारण केला तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या पत्नींचा जसे कि लंबी, मोठी, काली, गोरी, छोटी चा उल्लेख करून विनोदी ढंगात नाच केला. विनोदी पद्धतीने पत्नींचा उल्लेख केल्यामुळे व स्त्रीवेष धारण करून विनोदी पद्धतीने नाचल्यामुळे प्रेक्षकांना हे गाणे चांगलेच आवडले. प्रेक्षकही ह्या गाण्यावर बेहद्द खुश होऊन नाचत होते. 

कथानक --

          धनवान राजकुमार रणवीर सिंह (अमजद खान) याचे प्रसिद्ध गायिका विद्या (राखी)  हिच्याशी गुप्तपणे संबंध चालू असतात. जेव्हा रणवीर सिंहला कळते कि विद्या गर्भवती राहिलेली आहे तेव्हा रणवीर सिंह विद्याला सोडून देतो. त्यामुळे विद्या पार कोलमडून पडते. तिची वाताहत होते. त्या परिस्थितीतही ती मुलाला जन्म देते व तिचे निधन होते. 

          जन्म दिलेल्या मुलाला गंगू गणपत (श्रीराम लागू) संभाळतो. तो सतत दारूच्या नशेतच असतो. दारूसाठी पैसे कमावून आणेल म्हणून गंगू त्याला मोठा करतो. मुलाचे नाव हिरा ठेवले जाते. हे नाव भटक्या कुत्र्यावरून ठेवले जाते. हिरा एका दारूच्या दुकानात काम करीत असतो व मिळालेला सर्व पैसा गंगूला देत असतो. गंगू मिळणारा पैसा दारूवर उडवत असतो. हिरा महेंद्रसिंहसाठी (रंजीत) काम करीत असतो. हिराचे प्रेम मोहिनीवर (झीनत अमान) बसते. मोहिनीचेही हिरावर प्रेम बसते पण हिरा लावारीस आहे हे तिला माहित नसते. हिरा सर्व सोडून रणवीर सिंहच्या येथे नोकरी करू लागतो. 

           महेंद्रसिंह हिराला मारण्याचा प्लॅन आखतो तेव्हा रणवीर सिंहला हिराबद्दल जाणीव होते. शेवटी रणवीर सिंह हिरा हा आपलाच मुलगा आहे हे स्वीकारतो. 

अमिताभचे प्रसिद्ध संवाद --

१) आपुन कुत्ते कि वो दुम है जो बारह बरस नली मे डालके रखो..नली टेढी हो जायेगी..आपून सीधा नही होगा. 

२) अपने किये कि सजा तो हर इन्सान को भुगतनी पडती है..लेकिन अपना जुर्म कुबुल करनेसे उसकी सजा झेलना आसान हो जाती है. 

३) आपून जिसके दरवाजे पे पॉव रखता है ना..उसके आख्खा डिपार्टमेंटका दरवाजा बंद हो जाता है. 

४) कभी कभी इन्सान अपने पाप का एक छोटासा पौधा छोडकर भाग जाता है.. लेकिन किस्मत उस पौधे को एक पेढ बनाकर उसके सामने खडा कर देती है. 

५) हम तो उन लोगों मे से है जो इस दुनिया मे सिर्फ शरीर लेकर पैदा हुए है.. हमारी ना तो तकदीर लिखी जाती है.. ना हि आसमान में हमारे मुक्कदर के सितारे होते है. 

 

 

          'मेरे अंगनेमे तुम्हारा क्या काम है' हे पुरषी आवाजातील गाणे अमिताभने गायले आहे

 

 

 

 

 



































 

 

 

 

 

 

 

 

   


Tuesday, May 9, 2023

खून पसीना


   खून पसीना 

          हा चित्रपट १९७७ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मिती बाबू मेहरा यांनी केली असून दिग्दर्शन राकेश कुमार यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा राकेश कुमार व के. के. शुक्ला यांनी लिहिली असून संवाद कादर खान यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, रेखा, निरुपा रॉय, असरानी, अरुणा इराणी, कादर खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

          या चित्रपटातील गाणी आशा भोसले, किशोर कुमार व लता मंगेशकर यांनी गायली असून कल्याणजी-आनंदजी यांनी संगीतबद्ध केली आहेत. किशोर कुमारच्या आवाजातील 'खून पसीनेकी जो मिलेगी तो खायेंगे' हे गाणे प्रचंड गाजले.

 कथानक --

          दोन चांगले मित्र (अमिताभ व विनोद खन्ना) वेगळे होतात व कादर खान या दोघांच्या परिवाराला संपवून टाकतो. हे दोन मित्र मोठे होतात व दोघे स्वतंत्रपणे गुन्हेगारीशी लढतात. शिवा/टायगर (अमिताभ बच्चन) हा स्वभावाने चांगला असून समाजामध्ये प्रिय असतो. तो आपल्या आईसोबत राहत असतो. शिवाचे रेखावर प्रेम असते व तिचेही शिवावर प्रेम असते. दोघेही लग्न करतात. 

          शेरा/अस्लम (विनोद खन्ना) हा देखील गुन्हेगारी आणि गुन्हेगारांशी लढा देत असतो पण तो एकाकी व निश्चल जीवन जगत असतो. 

          एके दिवशी एका निरपराध शेतकऱ्याची (असराणीची) हत्या होते. या हत्येसाठी शिवाला दोषी ठरवले जाते. त्याच्या आईच्या व पत्नीच्या सांगण्यावरून शिवा गाव सोडतो व दुसऱ्या गावात जाऊन प्रामाणिक व अहिंसक जीवन जगू लागतो. 

          असराणीच्या मृत्यूचा बदला घेण्याची जबाबदारी शेरावर सोपवली जाते. शेरा शिवाचा तपास लावतो. दोघांना कळते कि आपण हरवलेले मित्र आहोत. तसेच शिवा निर्दोष असल्याचेही शेराला कळते. मग दोघे एकत्र येऊन खलनायकाशी हाणामारी करतात व शेतकऱ्याच्या मृत्यूचा बदला घेतात. 

अमिताभचे डायलॉग --

१) आज के बाद आप का कोई भी आदमी यहां नजर नही आना चाहिए; वरना ऐसी धुलाई कारुंगा कि 

    सात पुश्तोन तक आपकी औलाद गंजी पैदा होगी. 

२) जिस दिन गरीब बगावत पर उतरता है; तो धनवान तो क्या उससे भगवान भी नहीं रोक सकता. 

३) तेरा हुस्न मेरी ताकत, तेरी तेज मेरी हिम्मत; संगम से जो औलाद पैदा होगी, यूं समज औलाद नही 

   फौलाद होगी. 










Wednesday, May 3, 2023

अवीट गोडीचे गाणे - एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे

  


अवीट गोडीचे गाणे - एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे

           'एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे' हे अवीट गोडीचे गाणे जगाच्या पाठीवर या चित्रपटातील आहे. हा चित्रपट १९६० साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मिती, लेखन, दिग्दर्शन व अभिनय राजा परांजपे यांनी केले आहे. हा चित्रपट म्हणजे सबकुछ राजा परांजपे आहेत. या चित्रपटासाठी पटकथा व संवाद ग दि माडगूळकर यांनी लिहिले आहेत. या चित्रपटासाठी गीत लेखन ग दि माडगूळकर यांनी केले असून संगीतबद्ध सुधीर फडके यांनी केली आहेत. यातील गाणी सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायली आहेत. या चित्रपटात राजा परांजपे, सीमा देव, राजा गोसावी, रमेश देव, शरद तळवळकर, धुमाळ यांच्या मुख्य भूमिका असून  ग दि माडगूळकर यांची छोटी भूमिका आहे. 

               'एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे' हे अवीट गोडीचे गाणे सुधीर फडके यांनी गायले आहे  व संगीतबद्धसुद्धा केले आहे. या गाण्याचा अर्थ इतका सुंदर आहे. जरतारी वस्त्र हे अनेक धाग्यांनी विणलेले असते तसेच माणसाचे आयुष्य हे अनेक धाग्यांनी विणलेले आहे. त्यातीलच एक धागा हा सुखाचा असतो तर अनेक धागे (शंभर) दुःखाचे असतात. म्हणजेच सुख हे जवाएवढे असते तर दुःख पर्वताएवढे असते. 

               दुसऱ्या कडव्यात  ग दि मा म्हणले आहेत कि हे जरतारी वस्त्र आता पांघरत असला तरी येसी उघडा जासी उघडा म्हणजेच जन्माला येताना उघडा आलास म्हणजेच येताना काहीही घेऊन आला नाहीस तर जातानाही उघडा जाणार आहेस म्हणजेच जातानाही काही घेऊन जाणार नाहीस. जे काही आहे ते इथे सोडून जाणार आहेस. पण आल्यावर व जाण्याच्या आधी वस्त्रासाठी तुला तीन प्रवेशांचे नाटक करावे लागणार आहे. 

               तिसऱ्या कडव्यात ग दि मानी तीन प्रवेशांचे नाटक सांगितले आहे की मानवाला करावे लागतच आहे. पहिला प्रवेश हा बालपणाचा असतो. मुकी अंगडी बालपणाची म्हणजेच या प्रवेशात माणूस कोणताही कपडा घालतो. त्याला या कपड्यातील काही कळत नसते. जसे बालपणात कपड्याबाबत अनभिज्ञ असतो तसेच मोह, आशा, लोभ, स्वार्थ यापासून अनभिज्ञ असतो. दुसरा प्रवेश हा तारुण्याचा असतो.  रंगित वसने तारुण्याची म्हणजेच तारुण्यात तो विविध व रंगीत वस्त्रे परिधान करतो. जस जसा तो बालपणातून तारुण्याकडे येऊ लागतो तसे त्याच्या मनात मोह, आशा, लोभ वाढू लागतात. बालपणात वस्त्राबाबत अनभिज्ञ असणारा माणूस तरुणपणात वस्त्राबाबत सतर्क होतो. तरुणपणात त्याचे मन धावू लागते, सैरभैर होते. रंगीत वसने (वस्त्रे) हे मोह, आशा, लोभ याचे प्रतीक आहे. तिसरा प्रवेश हा वार्धक्याचा असतो. जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे. वार्धक्यात सर्व  मोह, आशा, लोभ संपलेल्या असतात. जे काही समोर येईल ते स्वीकारायचे व जीवन जगायचे. कुठल्याही गोष्टीत आशा करायची नाही कि मोह बाळगायचा नाही. मोह, आशा, लोभ हि तारुण्यात पांघरलेली रंगीत वस्त्रे वार्ध्यक्यात टाकून द्यायची. जीर्ण शाल म्हणजेच जीर्ण शरीर शेवटी राहते तेच पांघरायाचे व हेच वार्धक्याचे लेणे आहे.

                चौथ्या कडव्यात ग दि मा म्हणले आहेत कि या वस्त्राते विणतो कोण एकसारखी नसती दोन म्हणजेच विणलेली दोन वस्त्रे एकसारखी नसतात. तसेच दोन माणसाचे आयुष्य हे एकसारखे नसून वेगवेगळे आहे. एकाला कमी प्रमाणात सुख-दुःख तर एकाला जास्त प्रमाणात सुख-दुःख. पण सुख दुःख सगळ्यांना आहेतच. जसे विणलेल्या वस्त्राचे हात कुणाला दिसत नाहीत तसेच तसेच सुख दुःख देणाऱ्याचेही हात या त्रिखंडात कुणाला दिसले नाहीत.  

                 जीवनाचा सुंदर अर्थ ग दि मांनी या गाण्यात सांगितला आहे व तितक्याच उत्कटतेने हे गीत बाबूजींनी म्हणजेच सुधीर फडकेंनी गायले आहे. हे अवीट गोडीचे गाणे खालीलप्रमाणे,

एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचेएक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचेजरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचेएक धागा सुखाचा
 
पांघरसी जरि असला कपडायेसी उघडा जासी उघडापांघरसी जरि असला कपडायेसी उघडा जासी उघडाकपड्यासाठी करिसी नाटक तीन प्रवेशांचेएक धागा सुखाचा
 
मुकी अंगडी बालपणाचीरंगित वसने तारुण्याचीमुकी अंगडी बालपणाचीरंगित वसने तारुण्याचीजीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचेएक धागा सुखाचा
 
या वस्त्राते विणतो कोणएकसारखी नसती दोनया वस्त्राते विणतो कोणएकसारखी नसती दोनकुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकऱ्याचेएक धागा सुखाचा
 

 

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...