तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा ।
विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा । करी पापा निर्मूळ ।। १ ।।
भाग्यवंता छंद मनी । कोड कानी ऐकती ।। २ ।।
विठ्ठल हे दैवत भोळे । चाड काळें न धरावी ।। ३ ।।
तुका म्हणे भलते याती । विठ्ठल चित्ती तो धन्य ।। ४ ।।
ओवी : विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा । करी पापा निर्मूळ ।। १ ।। भाग्यवंता छंद मनी । कोड कानी ऐकती ।। २ ।।
अर्थ : विठ्ठल हा मंत्र सोपा आहे असे व्दिवार सांगतो, आणि तोच समूळ पाप नाहीशे करतो. जे कोणी भाग्यवान आहेत त्यांच्याच मनास त्याचा छंद असतो. त्याचेच कोड-कौतुक कानांनी ऐकतात.
भावार्थ : विठ्ठल हा असा देव आहे कि, त्याचे नुसते नामस्मरण केले तरी आपल्या भक्तांना तो संकटातून सोडवतो. विठ्ठलाला अंतःकरणापासून केलेली भक्ती प्रिय आहे व जो कोणी भक्त त्याची मनापासून भक्ती करेल, त्याचे नित्यनियमाने नाव घेईल त्यालाच विठ्ठल मदत करतो. ज्या भक्ताच्या हातून एखादे पाप घडले तर त्या पापातून भक्ताला मुक्त करतो. तुकाराम महाराजांच्या मते माणसाला जर पापापासून मुक्ती मिळवायची असेल तर नवस-सायास, होम-हवन असले उपचार करायला नकोत. त्याने फक्त 'विठ्ठल-विठ्ठल' हा सोपा व तोंडाने म्हणण्यासारखा मंत्र आहे तो म्हणावा.
एकदा का विठ्ठलाच्या प्रेमात पडले कि भक्ताला विठ्ठलाचाच छंद लागतो. त्याची गोडी लागते. म्हणजे सतत विठ्ठलाचे नामस्मरण करणे, विठ्ठलाच्या भजन-कीर्तनात दंग राहणे, एकादशीच्या दिवशी उपवास करणे, पंढरपूरची वारी करणे असे नित्यक्रम भक्ताकडून होत असतात. हे सर्व भक्त विठ्ठलाच्या प्रेमापोटी, भक्तीपोटी करत असतात. यामुळे भक्तांना विठ्ठलाजवळ जाता येते. विठ्ठलसुद्धा अशा भक्तांना आपल्या हृदयाशी कवटाळतो. आपले कृपाछत्र धरतो. तुकाराम महाराजांच्या मते, असे भक्त खरोखरच भाग्यवान आहेत व अशा भक्तांनाच विठ्ठलाचे कोड-कौतुक केलेले आवडते (विठ्ठलाचे कोड-कौतुक कानांनी ऐकतात.)
ओवी : विठ्ठल हे दैवत भोळे । चाड काळें न धरावी ।। ३ ।। तुका म्हणे भलते याती । विठ्ठल चित्ती तो धन्य ।। ४ ।।
अर्थ : विठ्ठल हे दैवत फार भोळे आहे. त्यासंबंधी काळ कोणतीही इच्छा धरीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे चित्तामध्ये विठ्ठल आहे तो कोणत्याही जातीचा असला तरी तो धन्य आहे.
भावार्थ : तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात कि, विठ्ठल हे दैवत भोळे आहे. खरोखरच विठ्ठल हा भोळा आहे कारण गरीब-श्रीमंत, कोणत्याही जातीचा, धर्माचा असो त्याची भक्ती करू शकतो. त्याची भक्ती करण्यासाठी पैसा - अडका मोजावा लागत नाही कि फार मोठा खर्च करावा लागत नाही. त्याची भक्ती करण्यासाठी वेळ-काळाचे बंधन नसते तसेच उपास-तापास, नवस-सायास, होम-हवन, बळी असले उपचार करण्याची गरज नसते. फक्त विठ्ठलाला त्याची अंतःकरणापासून केलेली भक्ती आवडते मग तो कोणत्याही जातीचा अगर धर्माचा असो; विठ्ठल अशा भक्तांकडील गरिबी अगर श्रीमंती बघत नाही; पैसा-अडका, संपत्ती बघत नाही. जो कोणी भक्त अंतःकरणापासून भक्ती करेल त्यालाच विठ्ठल आपल्या हृदयाशी कवटाळतो. आपल्या चरणांपाशी जागा देतो. आपले कृपाछत्र धरतो. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, 'जो विठ्ठलाची भक्ती करतो, त्याचे नामस्मरण करतो त्यालाच विठ्ठल जवळ करतो. त्याच्या चित्तामध्ये विठ्ठल आहे असे भक्त खरोखरच धन्य आहेत.'
No comments:
Post a Comment