Saturday, March 23, 2019

कथा विवेकानंदांची -- हजरजबाबी विवेकानंद




कथा विवेकानंदांची -- हजरजबाबी विवेकानंद 

        एका ब्रिटिशाने विवेकानंदाना विचारले, "सगळे कपाने चहा पीत आहेत आणि तू एकटा असभ्यासारखे बशीतून चहा पीत आहेस, कारण काय?"
          विवेकानंद म्हणाले, "यावेळी जर कोणी नवीन माणूस येथे आला तर मी एकटाच माझ्याजवळचा अर्धा चहाचा कप त्याला देऊ शकतो, कारण तुम्ही सर्वानी तुमचे कप उष्टे केले आहेत. आपल्याजवळ असलेल्या गोष्टीचा अर्धा वाटा दुसऱ्याला द्यायचा हि आमच्या देशाची संस्कृती आहे."
          विवेकानंदांचे हे उत्तर ऐकून सभेतील सर्वजण निरुत्तर झाले. 

विवेकानंदांच्या हजरजबाबीपणाचा दुसरा किस्सा पुढीलप्रमाणे घडला,
          स्वामी विवेकानंद युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन येथे कायद्याचे शिक्षण घेत होते. एक पीटर नावाचे प्रोफेसर विवेकानंद यांचा तीव्र द्वेष करत होते. 
          एक दिवस डायनिंग रूममध्ये प्रो. पीटर जेवण करत असताना विवेकानंद हातात जेवणाचे ताट घेऊन आले आणि प्रो. पीटर यांच्या शेजारी असलेल्या खुर्चीत जाऊन बसले. प्रो. पीटर यांना विवेकानंद शेजारी बसलेले आवडले नाही. ते चिडून विकेकानंदांना म्हणाले, "मि. विवेकानंद, एक सुंदर पक्षी आणि एक घाणेरडे डुक्कर कधीच एकत्र बसून जेवण करीत नाहीत." 
          विवेकानंद यांनी शांतपणे प्रो पीटर यांच्याकडे पहिले व म्हणाले, "तुम्ही इथे बसा..मी उडून दूर जातो..!"
          वर्गात प्रो पीटर यांनी विवेकानंदांना एक प्रश्न विचारला, "तू रस्त्याने जात असताना तुला दोन पिशव्या पडलेल्या दिसल्या. एका मध्ये पैसे आहेत तर दुसऱ्या पिशवीत शहाणपणा भरलेला आहे. तू कुठली पिशवी उचलशील?"
          विवेकानंदांनी क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले, "पैशाची पिशवी उचलीन."
          विवेकानंदांचे उत्तर ऐकून प्रो पीटर हेटाळणीच्या सुरात म्हणाले, "मी तुझ्या जागी असतो तर शहाणपणाची पिशवी उचलली असती."
          विवेकानंद म्हणाले, "बरोबर आहे.. ज्याचे जवळ जे नाही तेच त्याने घ्यावे. माझे जवळ पैसे नाहीत म्हणून मी पैशाची पिशवी उचलीन."
          हे उत्तर ऐकून प्रो पीटर निरुत्तर झाले.












  

भाजपचा सच्चा नेता -- मनोहर पर्रीकर




भाजपचा सच्चा नेता -- मनोहर पर्रीकर 

          गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे दि. १७ मार्च २०१९ रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी स्वादुपिंडाचा कर्करोग या आजाराने निधन झाले. त्यांनी चार वेळा गोव्याचे मुख्यमंत्रीपद व देशाचे संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. 
          मनोहर पर्रीकर यांचा जन्म १३ डिसेंबर १९५५ रोजी म्हापसा, गोवा येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल मध्ये झाले व व पुढील शिक्षण म्हापसाच्या न्यू गोवा हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी १९७८ साली मुंबईच्या प्रसिद्ध असलेल्या इंडियन इन्स्टिटयूट टेकनॉलॉजीमधून (आयआयटी मधून) धातुशास्त्र विषयात अभियांत्रिकीची पदवी घेतली. मनोहर पर्रीकर हे भारतात आधारप्रणाली सुरु करण्यासाठी झटलेल्या नंदन निलकेणी यांचे आयआयटीतील सहअध्यायी आहेत. 
राजकीय वाटचाल --
          युवक असतानाच पर्रीकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल झाले. त्यावेळेपासून त्यांनी संघकार्य चालू केले. ते संघात मुख्य इन्स्ट्रक्टर होते. १९९४ मध्ये ते गोवा विधानसभेवर निवडून गेले. २४ ऑक्टोबर २००० मध्ये गोव्याचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यांचा कार्यकाल २४ ऑक्टोबर २००० ते २७ फेब्रुवारी २००२ असा राहिला. ५ जून २००२ मध्ये परत एकदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले परंतु भाजपच्या ४ आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांना कार्यकाल पूर्ण करता आला नाही. त्यांचा कार्यकाल २९ जानेवारी २००५ पर्यंतच राहिला. ९ मार्च २०१२ रोजी पर्रीकर तिसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले परंतु त्यांना केंद्रात देशाच्या संरक्षणपदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी बोलावले त्यामुळे त्यांना नोव्हेंबर २०१४ मध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. १४ मार्च २०१७ रोजी ते चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले तसेच गोव्याचे तेरावे मुख्यमंत्री झाले. मनोहर पर्रीकर हे ९ नोव्हेंबर २०१४ ते १३ मार्च २०१७ पर्यंत देशाचे संरक्षणमंत्री होते. 
संघातील सच्चा स्वयंसेवक --
          पर्रीकर बालवयापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जात होते. त्यांनी नागपूर येथील संघाच्या मुख्यालयात तृतीय वर्षापर्यंत शिक्षण घेतले. वयाच्या २६ व्या वर्षी म्हापसा शाखेचे संघचालक झाले. आयआयटीमधून पदवी घेईपर्यंत ते संघाचे मुख्य शिक्षक बनले होते. 
राजकारणातील वेगळेपण --
          पर्रीकर यांनी मुख्यमंत्री झाल्यावर सरकारी बंगल्यात राहणे नाकारले. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार आपल्या घरातूनच चालू केला. त्यांनी सरकारी गाडी कधीही वापरली नाही. ते स्वतःच्या गाडीमधूनच फिरायचे. मुख्यमंत्री झाल्यावरसुद्धा त्यांनी आपला साधेपणा जपला. त्यांनी कधी बडेजावपणा केला नाही कि अधिकाराचा गैरफायदा घेतला नाही. त्यांनी  मुख्यमंत्रीपदी  असताना  स्वच्छ, पारदर्शक कारभार केला त्यामुळे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा कुठलाही आरोप झाला नाही. त्यांनी शेवटपर्यंत 'भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप नसलेला निष्कलंक राजकारणी' अशी प्रतिमा जपली. त्यामुळेच गोवेकरांनी त्यांच्यावर विश्वास टाकला व तब्बल चार वेळा मुख्यमंत्री म्हणून निवडून दिले. 
          असा सच्चा नेता, कार्यकर्ता व स्वयंसेवक अचानक निघून गेला. त्यांच्या जाण्याने गोव्यातील भाजपचा आधारस्तंभच निखळला. गोव्यातील भाजपच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली. गोवेकरांना त्यांच्या स्वच्छ, पारदर्शक कारभाराची सवय झाली होती. त्यांनी पर्रीकरांना मनोमन आपला नेता मानला होता. हाच नेता आता गोवेकरांना परके करून अनंतात विलीन झाला.












 












 
          


























 












 

Friday, March 15, 2019

अवीट गोडीचे गाणे -- अजीब दास्ताँ है ये, कहाँ शुरू कहाँ खतम




अवीट गोडीचे गाणे -- अजीब दास्ताँ है ये, कहाँ शुरू कहाँ खतम

          हे गाणे 'दिल अपना और प्रीत पराई' या चित्रपटातील आहे. हा चित्रपट १९६० साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन किशोर साहू यांनी केले. या चित्रपटात राज कुमार, मीना कुमारी, नादिरा यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाला संगीत शंकर जयकिशन यांनी दिले आहे तर गीते लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी यांनी गायलेली आहेत. शैलेंद्र व हसरत जयपुरी यांनी गाणी लिहिली आहेत. 
         या चित्रपटातील सर्वच गाणी सुरेल आहेत. त्यातीलच 'अजीब दास्तां है ये' हे गाणे लतादीदींच्या सुरेल आवाजामुळे सुपरहिट झाले. हे गाणे शैलेंद्र यांनी लिहिले असून शंकर जयकिशन यांनी संगीत दिले आहे. या गाण्यातून शैलेंद्र यांनी नायिकेची व्यथा मांडली आहे. ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो व त्याची आयुष्यभर साथ मिळावी याची स्वप्न बघतो पण प्रेम करणारी व्यक्तीच दुसऱ्या कोणाची तरी होते व आपल्यापासून दूर जाते हि व्यथा या गाण्यात नायिकेची दाखवली आहे. हे गाणे राज कुमार, मीना कुमारी व नादिरा यांच्यावर चित्रित झाले आहे. 

अजीब दास्ताँ है ये, कहाँ शुरू कहा खतम

ये मंजिले हैं कौनसी, वो समझ सके हम

ये रोशनी के साथ क्यूँ, धूंआ उठा चिराग से
ये ख्वाब देखती हू मैं के, जग पडी हू ख्वाब से

मुबारके तुम्हे के तुम, किसी के नूर हो गए
किसी के इतने पास हो के, सब से दूर हो गए

किसी का प्यार लेके तुम, नया जहां बसाओगे
ये शाम जब भी आयेगी, तुम हमको याद आओगे










Saturday, March 9, 2019

अवीट गोडीचे गाणे -- कशी झोकात चालली कोळ्याची पोर




अवीट गोडीचे गाणे -- कशी झोकात चालली कोळ्याची पोर 

          हे  गाणे मोलकरीण चित्रपटातील आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन यशवंत पेठकर यांनी केले असून निर्मिती गजानन शिर्के यांची आहे. या चित्रपटाची पटकथा व संवाद यशवंत पेठकर यांनी लिहिले आहेत. या चित्रपटातील गीते पी. सावळाराम व ग.दि. माडगूळकर यांनी लिहिली असून या गीतांना संगीत वसंत देसाई यांनी दिले आहे. पार्श्वगायन आशा भोसले, लता मंगेशकर व तलत मेहमूद यांनी केले आहे. या चित्रपटात सुलोचना, रमेश देव, सीमा देव, इंदिरा चिटणीस यांनी प्रमुख भूमिका केल्या आहे. 
          या चित्रपटात 'देव जरी मज कधी भेटला', 'कशी झोक्यात चालली कोळ्याची पोर', 'हसले आधी कोणी', 'दैव जाणिले कुणी', 'एक वार तरी राम दिसावा' हि गीते असून त्यापैकीच एक अवीट गोडीचे गाणे पुढे दिले आहे. 

कशी झोकात चालली कोळ्याची पोर 
जशी चवथीच्या चंद्राची कोर ।। धृ ।।

फेसाळ दर्याचं पाणी खारं 
पिसाट पिऊनी तुफान वारं 
उरात हिरव्या भरलं हो सारं 
भरतीच्या ज्वानीला त्याहून जोर ।। १ ।।
कशी झोकात हो...कशी झोकात हो... कशी झोकात चालली कोळ्याची पोर 
जशी चवथीच्या चंद्राची कोर ।। धृ ।।

टाकून टाकशील किती रं जाळी 
मेघाची सावली कुणाला घावली 
वाऱ्यानं अजुनी पाठ नाही शिवली 
वाटेला बांग दिली हिच्या समोर ।। २ ।।
कशी झोकात हो...कशी झोकात हो... कशी झोकात चालली कोळ्याची पोर 
जशी चवथीच्या चंद्राची कोर ।। धृ ।।

केसांची खुणगाठ चाचपून पाहिली 
फुलांची वेणी नखऱ्यानं माळली 
कुणाला ठावं रं कुणावर भाळली 
प्रीतिचा चोर तिचा राजाहून थोर ।। ३ ।।
कशी झोकात हो...कशी झोकात हो... कशी झोकात चालली कोळ्याची पोर 
जशी चवथीच्या चंद्राची कोर ।। धृ ।।




 











 

Friday, March 8, 2019

पहिला मी अनुपम्य सोहळा



पहिला मी अनुपम्य सोहळा

          'नेमेचि येतो पावसाळा' या उक्तीनुसार नेमेचि येते आषाढी वारी! आषाढ महिना सुरु झाला, कि वारकऱ्यांना वेध लागतात विठुरायाच्या दर्शनाचे. मग, त्यांचे पाय आपोआप वळतात पंढरीच्या वारीकडे. 'मला आस विठूरायाची । पाऊले चालती पंढरीची ।।' या उक्तीप्रमाणे सर्व वारकरी आळंदी, देहूला जमतात. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता, न दमता न थकता पंढरपुरापर्यंत चालत जातात. त्यांना फक्त आस लागलेली असते ती विठुरायाचे दर्शन घेण्याची. 
          संसारातील सारे पाश तोडून लाखोहून अधिक वारकरी या वारीत सहभागी झालेले असतात. या वारीत वयाला बंधन नाही. त्याप्रमाणे उच्च-नीच व जाती-पातीलाही बंधन नाही. या वारीत प्रत्येकाला सामावून घेण्याचे सामर्थ्य असते. म्हणूनच दिन, दुबळे, गरीब, श्रीमंत, अठरापगड जातीचे तसेच लहान, मोठे, वयस्कर, पुरुष व स्त्रिया या वारीत सहभागी झालेले असतात. विठ्ठल हीच त्यांची जात व विठ्ठल हाच त्यांचा धर्म झालेला असतो. विठ्ठल भक्तीने या सर्वांना एकत्र गुंफलेले असते. हातात टाळ, मृदंग घेऊन त्याचा नाद करत व मुखाने 'विठ्ठल-विठ्ठल', 'पांडुरंग पांडुरंग' म्हणत वारकरी माउलींच्या पालखी सोबत चालत असतात. त्याच वेळेस त्यांना आपल्या सोबत माऊलीच चालत आहे असे वाटते. या कल्पनेनेच त्यांचा थकवा पळून जाऊन त्यांच्यात उत्साह संचारतो. चालण्यासाठी माऊलीच त्यांच्या पायात बळ देते आहे, असे त्यांना वाटते. 
          जिथे ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचा मुक्काम असतो, तिथे भक्तीमय वातावरण तयार होते. सगळीकडे वारकऱ्यांच्या राहुटया लागल्या जातात. या राहुटयांमधून भजन, कीर्तनाचा स्वर ऐकू येत असतो. हरिनामाचा गजर सुरु असतो. सगळीकडे 'विठ्ठल-विठ्ठल', 'पांडुरंग पांडुरंग' असे स्वर कानावर पडत असतात. सगळीकडे पवित्र, निर्मळ, भक्तिमय वातावरण तयार झालेले असते. स्वर्गच पृथ्वीवर अवतरला आहे, असा भास होतो. 
          मी नोकरीनिमित्त लोणंदला राहायला असताना हा अनुपम्य सोहळा अनुभवला आहे. माउलींचा मुक्काम लोणंदनगरीत असतो तेव्हा तेथील वातावरण भक्तिमय झालेले असते. भक्तजन हरिभजनात दंग झालेले असतात. सगळीकडे हरिनामाचा गजर चालू असतो. लोणंद नगरीत वैष्णवांचा मेळाच भरलेला असतो. भक्तीचा महापूर ओसंडून वाहत असतो. या महापुरात सर्व भक्तजन न्हाऊन निघत असतात. 'अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ।।' या उक्तीनुसार लोणंदनगरी विठ्ठलाशी एकरूप झालेली असते. माउलींच्या सेवेत दंग असते. हा भक्तिपूर्ण अनुपम्य सोहळा मी अनुभवला आणि धन्य झालो.
           













          












 

Sunday, March 3, 2019

मराठी कविता -- रंग




मराठी कविता -- रंग 


रंग तुझा रे निळा, 
माझ्यात उतरला ।
कोठेही पहिले तरी 
तूच दिसतोस मला ।। १ ।।

मागे वळून पाहता,
तू हसतोस बघूनी ।
अंतःकरणात माझ्या 
तूच सामावलेला ।। २ ।।

रंगुनी रंगात मी, 
भक्ती रंगात नहाले,
बघ ना रे कान्हा!
गोरीची निळी मी जाहले ।। ३ ।।

Friday, March 1, 2019

एक तरी झाड लावू



 वृक्षारोपण करताना 
 


 आंब्याचे झाड 

 

 फणसाचे झाड 



 चिंचेचे झाड 




एक तरी झाड लावू 

          आज आपण दुष्काळ, पाणीटंचाईशी सामना करत आहोत, त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे प्रचंड वृक्षतोड. झाडांची चाललेली अमानुष कत्तल. आपल्या स्वार्थासाठी वृक्षतोड करायची, जंगलसंपत्ती नष्ट करायची. त्या जागी काँक्रीटचे जंगल उभे करायचे. टोलेजंग इमारती बांधायच्या. प्रचंड उन्हाच्या तडाख्यात झाडाखाली थंडगार सावलीत विसावा घेण्यासारखे दुसरे सुख कोणते? परंतु, वृक्षतोड करून आपणच आपले हे सुख हिरावून घेत आहोत. जिथे वृक्षवेली आहेत, तिथे मन कसे प्रसन्न, ताजेतवाने वाटते. थंडगार व प्रसन्न वातावरणामुळे झाडाच्या सावलीतून हलावेसे वाटत नाही; परंतु जिथे वृक्षवेली नाहीत, तिथे रखरखीतपणा जाणवतो. क्षणभरही तिथे थांबावेसे वाटत नाही. 
          वृक्षवेली आपल्यासाठी जशा उपयोगी आहेत, तसेच पक्ष्यांसाठीही तो हक्काचा निवारा आहे. झाडावर घरटे बांधून पक्षी आपल्या निवाऱ्याची सोय करीत असतात. दिवसभर दाणापाणी शोधून संध्याकाळी पक्षी आपल्या घरटयाकडे परतत असतात; परंतु आपण वृक्षतोड करून पक्ष्यांचा निवाराच हिरावून घेत आहोत. काही दिवसांनी अशी वेळ येईल, कि झाडे-झुडपे नाहीत त्यामुळे पक्ष्यांचा किलकिलाटही ऐकू येणार नाही. आपल्या मुलांना फक्त पुस्तकांमधून वाचून झाडाझुडपांची माहिती द्यावी लागेल. आपण खेळलेल्या सुरपारंब्या, झाडावर चढून किंवा दगडाने पाडून खाल्लेल्या कैऱ्या, चिंचा, आवळे, बोरे यांच्या नुसत्या गोष्टीच आपण मुलांना सांगत बसणार. आपल्याला साधे खरचटले, तर किती वेदना होतात? वृक्षांवर तर आपण कुऱ्हाडीचे घाव घालीत असतो. कुऱ्हाडीच्या घावांनी वृक्षांना किती वेदना होत असतील? आपण सजीव आहोत, म्हणून आपल्या वेदना बोलून दाखवतो. पण, वृक्षांचे काय? 
          आम्ही राहतो त्याच्या पाठीमागे एक बाभळीचे मोठे झाड होते. त्या झाडावर विविध पक्ष्यांनी आपला निवारा वसवला होता. सकाळ, संध्याकाळ पक्ष्यांच्या गुंजनाने व किलबिलाटाने मन प्रसन्न व्हायचे. वातावरणात एक सजीवपणा येत होता. परंतु, एकेदिवशी वृक्षावर कुऱ्हाडीचे घाव पडू लागले. हळूहळू वृक्ष जमीनदोस्त होऊ लागला. पक्ष्यांचा निवारा हिरावू लागला. आता तर त्या जागी ना झाड दिसते, ना पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. ती जागा आता रखरखीत वाटू लागली आहे. 
          सगळीकडे भीषण दुष्काळ पडला आहे. पाणीटंचाई जाणवू लागली आहे. आता खरी वेळ आली आहे, आपण जागे होण्याची. जिथे मोकळी जागा दिसेल तिथे वृक्षारोपण करायलाच पाहिजे. वृक्ष-वेली, पशु-पक्षी हे आपले सोयरे आहेत म्हणजेच आपले नातेवाईक असून त्यांचा सांभाळ करणे, त्यांची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. 
          सध्या फ्लॅट संस्कृती असल्यामुळे मोठी झाडे लावायला जागा सापडत नाही; परंतु ग्यालरीत किंवा टेरेसवर छोटी छोटी रोपे लावून सुंदर बाग तयार होईल. इमारतीचे नवीन बांधकाम करताना झाडे लावण्यासाठी काही जागा राखीव ठेवली पाहिजे. त्यात आपण एक तरी झाड लावण्याचा व ते जगवण्याचा संकल्प करूया.














 















 































 















 

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...