'नेमेचि येतो पावसाळा' या उक्तीनुसार नेमेचि येते आषाढी वारी! आषाढ महिना सुरु झाला, कि वारकऱ्यांना वेध लागतात विठुरायाच्या दर्शनाचे. मग, त्यांचे पाय आपोआप वळतात पंढरीच्या वारीकडे. 'मला आस विठूरायाची । पाऊले चालती पंढरीची ।।' या उक्तीप्रमाणे सर्व वारकरी आळंदी, देहूला जमतात. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता, न दमता न थकता पंढरपुरापर्यंत चालत जातात. त्यांना फक्त आस लागलेली असते ती विठुरायाचे दर्शन घेण्याची.
संसारातील सारे पाश तोडून लाखोहून अधिक वारकरी या वारीत सहभागी झालेले असतात. या वारीत वयाला बंधन नाही. त्याप्रमाणे उच्च-नीच व जाती-पातीलाही बंधन नाही. या वारीत प्रत्येकाला सामावून घेण्याचे सामर्थ्य असते. म्हणूनच दिन, दुबळे, गरीब, श्रीमंत, अठरापगड जातीचे तसेच लहान, मोठे, वयस्कर, पुरुष व स्त्रिया या वारीत सहभागी झालेले असतात. विठ्ठल हीच त्यांची जात व विठ्ठल हाच त्यांचा धर्म झालेला असतो. विठ्ठल भक्तीने या सर्वांना एकत्र गुंफलेले असते. हातात टाळ, मृदंग घेऊन त्याचा नाद करत व मुखाने 'विठ्ठल-विठ्ठल', 'पांडुरंग पांडुरंग' म्हणत वारकरी माउलींच्या पालखी सोबत चालत असतात. त्याच वेळेस त्यांना आपल्या सोबत माऊलीच चालत आहे असे वाटते. या कल्पनेनेच त्यांचा थकवा पळून जाऊन त्यांच्यात उत्साह संचारतो. चालण्यासाठी माऊलीच त्यांच्या पायात बळ देते आहे, असे त्यांना वाटते.
जिथे ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचा मुक्काम असतो, तिथे भक्तीमय वातावरण तयार होते. सगळीकडे वारकऱ्यांच्या राहुटया लागल्या जातात. या राहुटयांमधून भजन, कीर्तनाचा स्वर ऐकू येत असतो. हरिनामाचा गजर सुरु असतो. सगळीकडे 'विठ्ठल-विठ्ठल', 'पांडुरंग पांडुरंग' असे स्वर कानावर पडत असतात. सगळीकडे पवित्र, निर्मळ, भक्तिमय वातावरण तयार झालेले असते. स्वर्गच पृथ्वीवर अवतरला आहे, असा भास होतो.
मी नोकरीनिमित्त लोणंदला राहायला असताना हा अनुपम्य सोहळा अनुभवला आहे. माउलींचा मुक्काम लोणंदनगरीत असतो तेव्हा तेथील वातावरण भक्तिमय झालेले असते. भक्तजन हरिभजनात दंग झालेले असतात. सगळीकडे हरिनामाचा गजर चालू असतो. लोणंद नगरीत वैष्णवांचा मेळाच भरलेला असतो. भक्तीचा महापूर ओसंडून वाहत असतो. या महापुरात सर्व भक्तजन न्हाऊन निघत असतात. 'अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ।।' या उक्तीनुसार लोणंदनगरी विठ्ठलाशी एकरूप झालेली असते. माउलींच्या सेवेत दंग असते. हा भक्तिपूर्ण अनुपम्य सोहळा मी अनुभवला आणि धन्य झालो.

No comments:
Post a Comment