Sunday, May 26, 2019

भारताचे विश्वचषक स्पर्धेतील वर्चस्व

१९८३ चा विश्वविजेता संघ


२०११ चा विश्वविजेता संघ



विश्वचषक विजेते कर्णधार -- महेंद्रसिंग धोनी व कपिल देव

१९८३ चा विश्वचषक उंचावताना कपिल देव

२०११ चा विश्वचषक हातात घेतलेला महेंद्रसिंग धोनी

भारताचे  विश्वचषक स्पर्धेतील वर्चस्व 


         २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेला ३० मे पासून सुरवात होत आहे. या आधी ११ वेळा हि स्पर्धा झालेली आहे.  भारताने २ वेळा, वेस्ट इंडिजने २ वेळा, पाकिस्तान एकदा व श्रीलंकेने एकदा, ऑस्ट्रेलियाने तब्बल ५ वेळा हि स्पर्धा जिंकलेली आहे. यावेळची स्पर्धा इंग्लंडमध्ये होत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे आहे. भारतीय संघात विराट कोहलीबरोबर रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, हार्दिक पांडया, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, केदार जाधव हे फलंदाज तर जसप्रीत बुमराह, महमद शमी, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल हे गोलंदाज आहेत. 
         भारताने आतापर्यत २ विश्वचषक स्पर्धा जिंकल्या. एक १९८३ साली कपिल देवच्या नेतृत्वाखाली जिंकली तर दुसरी स्पर्धा २०११ साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकली. १९८३ सालची स्पर्धा हि इंग्लंडमध्ये खेळवण्यात आली तर २०११ सालची स्पर्धा हि भारत, श्रीलंका, बांगलादेश या देशांमध्ये खेळवण्यात आली. १९८३ साली भारताने वेस्ट इंडिजचा ४० धावांनी पराभव करून विश्वचषकावर आपले नाव कोरले तर २०११ साली श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव करत विश्वचषक विजेतेपद पटकावले. या दोन्ही स्पर्धेंचा आढावा पुढीलप्रमाणे घेतला आहे. 
१९८३ ची विश्वचषक स्पर्धा --
          या स्पर्धेत भारताला साखळी पद्धतीत   झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज व ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळायचे होते. भारताने यशपाल शर्माच्या खेळीच्या बळावर सलामीला वेस्ट इंडिजला हरवून क्रिकेटजगताला हादरा दिला. मग संदीप पाटीलच्या अर्धशतकाच्या बळावर दुबळ्या झिम्बाब्वेवर आरामात विजय मिळवला. नंतर ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडिज यांनी भारतावर दणदणीत विजय मिळवले. त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताची एकवेळ ५ बाद १७ अशी केविलवाणी अवस्था झाली होती. परंतु कपिल देवने १३८ चेंडूत १६चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद १७५  धावांची  वादळी  खेळी केली. या खेळीमुळे भारताने झिम्बाब्वेबर विजय मिळवला. त्यानंतर अखेरच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाला ११८ धावांनी हरवून उपांत्य फेरीत प्रवेश  केला. या सामन्यात मदन लाल आणि रॉजर बिन्नी यांनी प्रत्येकी चार बळी घेत उल्लेखनीय कामगिरी केली. उपांत्य फेरीत भारताची गाठ इंग्लंड संघाबरोबर पडली. या सामन्यात यशपाल शर्मा, मोहिंदर अमरनाथ, संदीप पाटील यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडवर ६ विकेट राखून विजय मिळवला व अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. अंतिम सामन्यात भारताची गाठ पडली दोन विश्वविजेतेपद मिळवलेल्या बलाढय वेस्ट इंडिज संघाबरोबर. या सामन्यात वेस्ट इंडिजने आपल्या गोलंदाजीच्या भेदक माऱ्याने भारताचा डाव १८३ धावात संपवला. के. श्रीकांतने थोडाफार प्रतिकार करत सर्वाधिक ३८ धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत वेस्ट इंडिज फलंदाजीला खिंडार पाडले व त्यांचा डाव १४० धावात संपुष्टात आला. या  विजयात मोलाचा वाटा उचलला तो मोहिंदर अमरनाथने. त्याने फलंदाजीत २६ धावा केल्या तसेच १२ धावात ३ बळी घेऊन अष्टपैलू कामगिरी केली. भारताने वेस्ट इंडिजचा ४३ धावांनी पराभव करत हि विश्वचषक स्पर्धा जिंकली.
२०११ ची विश्वचषक स्पर्धा --
          या स्पर्धेत भारताकडे कप्तान महेंद्रसिंग धोनीबरोबर सचिन, सेहवाग, गौतम गंभीर, विराट कोहली, युवराज सिंग, युसूफ पठाण, सुरेश रैना अशी दमदार फलंदाजी होती तर झहीर खान, आशिष नेहरा, हरभजनसिंग असे गोलंदाज होते. भारताला  बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, हॉलंड आणि आयर्लंड  सोबत ब गटात स्थान देण्यात आले. सलामीच्या सामन्यात भारताने बांगलादेश विरुद्ध सेहवाग १७५ धावा आणि कोहली १०० धावा यांच्या खेळीच्या जोरावर ४ बाद ३७० धावांचा डोंगर उभारला. बांगलादेशला हे आव्हान पेलवले नाही. भारताने बांगलादेशचा ८७ धावांनी पराभव करून विजय नोंदवला. बंगळूरला इंग्लंडविरुद्धचा सामना टाय झाला. या सामन्यात सचिनने शतक झळकावले. मग भारताने आयर्लंड व हॉलंडला हरवले. नागपूरला भारताची गाठ दक्षिण आफ्रिकेशी पडली. या सामन्यात सचिनने शतक ठोकले परंतु नंतर भारतीय फलंदाजी कोसळली व पराभवाला सामोरे जावे लागले. चेन्नईत झालेल्या साखळीतील वेस्ट इंडिजविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात भारताने युवराजसिंगच्या शतकाच्या बळावर ८० धावांनी विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. अहमदाबादला झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. उपांत्य सामन्यात भारताची गाठ पडली पाकिस्तानबरोबर. या  सामन्याला मोठे महत्व प्राप्त झाले होते. दोन्ही देशांचे पंतप्रधान हा सामना बघायला उपस्थित होते.  वहाब रियाझने टिच्चून गोलंदाजी करत ४६ धावात भारताचे ५ फलंदाज तंबूत धाडले परंतु सचिनच्या ८५ धावांच्या खेळीमुळे भारताने २६० धावांपर्यंत मजल मारली. सचिनची हि खेळी भारतासाठी महत्वपूर्ण ठरली. पाकिस्तानला विजयासाठीचे २६० धावांचे आव्हान पेलवले नाही. भारताने पाकिस्तानचा २९ धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. २ एप्रिल २०११ रोजी वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताची गाठ श्रीलंकेबरोबर पडली. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना महेला जयवर्धनेच्या (८८ चेंडूत नाबाद १०३ धावा) शतकाच्या जोरावर ६ बाद २७४ धावा केल्या. विजयी धावसंख्येचा पाठलाग करताना सचिन व सेहवाग लवकर बाद झाले व भारताची अवस्था २ बाद ३१ अशी झाली. नंतर गंभीर आणि कोहली  यांनी डाव सावरला. दोघांनी ८३ धावांची भागीदारी केली. कोहली बाद झाला आणि युवराजसिंगच्या जागी महेंद्रसिंग धोनी खेळायला आला. दोघांनी जबाबदारीपूर्व खेळी करत भारताला दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळवून दिले. गंभीरने ९७ धावा केल्या तर महेंद्रसिंग धोनीने ७९ चेंडूत नाबाद राहात ९१ धावा केल्या. धोनी सामनावीर ठरला तर युवराज सिंगने ३६२ धावा व १५ बळी अशी अष्टपैलू कामगिरी करत मालिकावीरचा पुरस्कार पटकावला.
          




















Saturday, May 25, 2019

अवीट गोडीचे गाणे -- अश्विनी ये ना ! ये ना !


अवीट गोडीचे गाणे -- अश्विनी ये ना ! ये ना !

          'अश्विनी ये ना ! ये ना !' हे गम्मत जम्मत या चित्रपटातील गीत आहे. हा चित्रपट सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केला. हा चित्रपट १९८७ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा व पटकथा वसंत सबनीस यांनी लिहिली. या चित्रपटातील गाणी अनुराधा पौडवाल, किशोर कुमार व सचिन पिळगावकर यांनी गायलेली आहेत. किशोर कुमार यांनी पहिल्यांदाच मराठी चित्रपटात पार्श्वगायन केलेले आहे. गीते शांताराम नांदगावकर यांनी लिहिली असून संगीत अरुण पौडवाल यांनी दिले आहे. 
          या चित्रपटात सचिन पिळगावकर, अशोक सराफ, वर्षा उसगावकर, चारुशीला साबळे, सुधीर जोशी व सतीश शहा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वर्षा उसगावकर यांचा हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटापासूनच त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. सतीश शहा यांचाही हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. हा विनोदी चित्रपट आहे. 
          'अश्विनी ये ना ! ये ना !' हे युगलगीत असून अशोक सराफ व चारुशीला साबळे यांच्यावर चित्रित झाले आहे. हे गाणे किशोर कुमार व अनुराधा पौडवाल यांनी गायले आहे तर या गाण्याला अरुण पौडवाल यांनी संगीत दिले आहे. 

 अश्विनी ये ना ! ये ना !

प्रिये, जगू कसा तुझ्याविना मी राणी ग
कशी ही जिंदगीत आणिबाणी ग
ये ना प्रिये ! तु ये ना प्रिये
मी तर प्रेम दिवाणा रसिला
दे प्यार जरासा नशिला
मी तर प्रेम दिवाणा रसिला
दे प्यार जरासा नशिला

प्रिया, उगाच संशयात मी बुडाले रे
तुला छळून मी जळून गेले रे
ये साजणा ! तु ये साजणा
विसर झाले गेले सख्या रे
शरण आले राया तुला रे
विसर झाले गेले सख्या रे
शरण आले राया तुला रे

प्रिये, जगू कसा तुझ्याविना मी राणी ग
कशी ही जिंदगीत आणिबाणी ग
ये ना प्रिये ! तु ये ना प्रिये

मंद धुंद ही गुलाबी हवा
प्रीत गंध हा शराबी नवा
हात हा तुझाच हाती हवा
झोंबतो तनूस हा गारवा
तुझीमाझी प्रीती अशी फुले मधुराणी
फुलातुनी उमलती जशी गोड गाणी
तू ये ना, तू ये ना
ना ना ना !

ये... जगू कसा तुझ्याविना मी राणी ग
कशी ही जिंदगीत आणिबाणी ग
ये ना प्रिये
ये साजणा
तु ये ना प्रिये !
तु ये साजणा








Friday, May 24, 2019

मराठी कविता -- एक मैत्रीण असावी

 
मराठी कविता -- एक मैत्रीण असावी 

आयुष्यात स्वतःची एक मैत्रीण असावी,
कुठलाही शिष्ठपणा न करता, दिल खुलास असावी,
पळस पानी थेंबासारखी, ती नितळ असावी,
जी कायम अबोध बालका सारखी हसत असावी,
आयुष्यात स्वतःची एक मैत्रीण असावी ।। १ ।।

जिच्या सोबत एक संध्याकाळ, एक स्पेशल असावी,
पण ती स्वतः कायम 'सोशल' असावी,
मैत्री नात्यात 'नथिंग ऑफिसिअल' असावी,
आयुष्यात स्वतःची एक मैत्रीण असावी ।। २ ।।

जिची चाहूल एक, ऋतू पालवी सारखी असावी,
जिची सोबत श्रावण-सरी, ओली असावी,
जिच्या केस घसरणीत, पानगळ असावी, 
आयुष्यात स्वतःची एक मैत्रीण असावी ।। ३ ।।

जिच्या नाती, सर्व धागी अतूट असावी,
जिची हास्य खळखळ, बेछुट असावी,
जिची मन भावना, रेशीम कोमल असावी, 
आयुष्यात स्वतःची एक मैत्रीण असावी ।। ४ ।।

जी माझ्या संगतीस, कायम आतुर असावी, 
जिला माझ्या सहवासाची, खूप ओढ असावी,
माझ्या जोक्सला कायम पुरुषी हसावी,
आयुष्यात स्वतःची एक मैत्रीण असावी ।। ५ ।।

कधी माझ्या न बोलण्याने, अलगद शोकाकुल व्हावी,
माझ्या अबोल्याची छटा चेहऱ्यावर झळकावी,
आयुष्यात स्वतःची एक मैत्रीण असावी ।। ६ ।।

कुठे असेल ती, जरा लवकर गवसावी,
तिची प्रफुल्लित बहर, लवकर बरसावी,
माझ्या शुभ्र आयुष्याला, तिचीच रंगत असावी,
आयुष्यात स्वतःची एक मैत्रीण असावी,
आयुष्यात स्वतःची एक मैत्रीण असावी ।। ७ ।।
 























































लावणीसम्राट पट्ठे बापूराव अर्थात श्रीधर बाळकृष्ण कुलकर्णी



लावणीसम्राट पट्ठे बापूराव अर्थात श्रीधर बाळकृष्ण कुलकर्णी 

          तमाशा म्हणले कि डोळ्यापुढे उभ्या राहतात ढोलकीच्या तालावर नाचणाऱ्या नृत्यांगना. त्यांनी लावण्या म्हणायला सुरवात केली कि घायाळ झालेली पिकली पानं आणि अवखळ तरुणाई नकळत पायाचा ठेका धरू लागते. शिट्यांचा आवाज घुमू लागतो. कानावर शब्द येतात 'गाडी आणावी भुरक्याची भुरक्याची दोन चाकी'. हे शब्द आहेत रेठरे हरणाक्ष, ता. वाळवा येथे राहणारे श्रीधर बाळकृष्ण कुलकर्णी यांचे. 
          श्रीधर शिक्षणासाठी औंधला गेला. बडोद्याच्या 'कालानुभव' मध्ये त्यानं यंत्र दुरुस्तीचे धडे घेतले. तिथल्या सांस्कृतिक वातावरणात त्याच्या प्रतिभेला धुमारे फुटले. मग तो गावाकडं येऊन कुलकर्णीपद सांभाळू लागला तरी कवनाची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. कानात घुमणारा ढोलकी तुणतुण्याचा घुंगराचा नाद त्याच्या प्रतिभेला आव्हान देऊ लागला आणि श्रीधर लावण्या लिहू लागला. 
          'श्रेष्ठ वर्ण मी ब्राह्मण असुनी ठेविले सोवळे घालुनी घडी, मशाल धरली हाती तमाशाची लाज लावली देशोधडी' असे म्हणणाऱ्या श्रीधरचा सर्वत्र डंका वाजू लागला. तो रसिकांचा 'पट्ठे बापूराव' झाला. घराण्याचे रीतिरिवाज, कर्मकांड आणि सोवळे-ओवळे झुगारून देणाऱ्या बापूनं काही काळ किराणा दुकान चालवलं. काही काळ मास्तरकी केली. पुढं तो कुस्तीगीरही झाला. पण त्याच्यासोबत अखेरपर्यंत राहिली ती लावणीचं. 
          बापूनं स्वतःचा फड उभारला. हलगीसम्राट हैबतीमुळं त्याला भेदिकांची गोडी लागली. त्याच्या दिलखेचक ढंगदार लावण्यांमुळं फड चहुमुलखी धावू लागला. दरम्यान एक मदमस्त लावण्यवती पवळा  हिवरगावकर त्याच्या जीवनात आली. मूर्तिमंत लावण्याची मादक नशा त्याच्या शब्दातून पाझरू लागली. या जोडीनं अवघ्या महाराष्ट्रावर राज्य केलं. सगळा मराठी मुलुख शृंगाररसात न्हाऊन निघाला. बापू शाहूराजांच्या दरबारातही गेला. त्यांच्या आयुष्यातला तो सुवर्णकाळ होता. पवळा सोडून गेली आणि बापूच्या वैभवाला जणू ग्रहणचं लागलं. मग सुरु झाली आयुष्याची फरफट. मग बापूनं २२ डिसेंबर १९४५ रोजी जगाचा निरोप घेतला. 
          गण, गौळण, छक्कड, बतावणी, भेदिक, शृंगारिक लावण्या हा बापूंचा प्रांत. 'तीन ताडाच्या माडीवरती सुंदरा एक दिसली, हातात ऐना केस मोकळे, रूप न्याहळीत बसली.' असं लिहिणारे बापू त्या सुंदरीला 'तू कोण कुणाची फाकडी गं, नथ सर्ज्याची देतो वाकडी गं' असं विचारतात तेव्हा आजही तमाशात शिट्टयांचा पाऊस  पडतो. 'पट्ठे बापूराव' हि सहा अक्षरं आजही तमासगिरांवर अधिराज्य गाजवतात. त्यांच्या शब्दावर लावण्यरसाची बरसात होते. चवळीच्या शेंगेसारखी कमनीय शरीरं गवताच्या पात्यासारखी लवलवतात. सारा मराठी मुलूख घुंगरांच्या बोलावर झुलू लागतो. जोपर्यंत लावणी आहे तोपर्यंत पट्ठे बापूरावांच्या शब्दांची नशा कायमच राहील. 




























































 

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...