Friday, May 24, 2019

लावणीसम्राट पट्ठे बापूराव अर्थात श्रीधर बाळकृष्ण कुलकर्णी



लावणीसम्राट पट्ठे बापूराव अर्थात श्रीधर बाळकृष्ण कुलकर्णी 

          तमाशा म्हणले कि डोळ्यापुढे उभ्या राहतात ढोलकीच्या तालावर नाचणाऱ्या नृत्यांगना. त्यांनी लावण्या म्हणायला सुरवात केली कि घायाळ झालेली पिकली पानं आणि अवखळ तरुणाई नकळत पायाचा ठेका धरू लागते. शिट्यांचा आवाज घुमू लागतो. कानावर शब्द येतात 'गाडी आणावी भुरक्याची भुरक्याची दोन चाकी'. हे शब्द आहेत रेठरे हरणाक्ष, ता. वाळवा येथे राहणारे श्रीधर बाळकृष्ण कुलकर्णी यांचे. 
          श्रीधर शिक्षणासाठी औंधला गेला. बडोद्याच्या 'कालानुभव' मध्ये त्यानं यंत्र दुरुस्तीचे धडे घेतले. तिथल्या सांस्कृतिक वातावरणात त्याच्या प्रतिभेला धुमारे फुटले. मग तो गावाकडं येऊन कुलकर्णीपद सांभाळू लागला तरी कवनाची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. कानात घुमणारा ढोलकी तुणतुण्याचा घुंगराचा नाद त्याच्या प्रतिभेला आव्हान देऊ लागला आणि श्रीधर लावण्या लिहू लागला. 
          'श्रेष्ठ वर्ण मी ब्राह्मण असुनी ठेविले सोवळे घालुनी घडी, मशाल धरली हाती तमाशाची लाज लावली देशोधडी' असे म्हणणाऱ्या श्रीधरचा सर्वत्र डंका वाजू लागला. तो रसिकांचा 'पट्ठे बापूराव' झाला. घराण्याचे रीतिरिवाज, कर्मकांड आणि सोवळे-ओवळे झुगारून देणाऱ्या बापूनं काही काळ किराणा दुकान चालवलं. काही काळ मास्तरकी केली. पुढं तो कुस्तीगीरही झाला. पण त्याच्यासोबत अखेरपर्यंत राहिली ती लावणीचं. 
          बापूनं स्वतःचा फड उभारला. हलगीसम्राट हैबतीमुळं त्याला भेदिकांची गोडी लागली. त्याच्या दिलखेचक ढंगदार लावण्यांमुळं फड चहुमुलखी धावू लागला. दरम्यान एक मदमस्त लावण्यवती पवळा  हिवरगावकर त्याच्या जीवनात आली. मूर्तिमंत लावण्याची मादक नशा त्याच्या शब्दातून पाझरू लागली. या जोडीनं अवघ्या महाराष्ट्रावर राज्य केलं. सगळा मराठी मुलुख शृंगाररसात न्हाऊन निघाला. बापू शाहूराजांच्या दरबारातही गेला. त्यांच्या आयुष्यातला तो सुवर्णकाळ होता. पवळा सोडून गेली आणि बापूच्या वैभवाला जणू ग्रहणचं लागलं. मग सुरु झाली आयुष्याची फरफट. मग बापूनं २२ डिसेंबर १९४५ रोजी जगाचा निरोप घेतला. 
          गण, गौळण, छक्कड, बतावणी, भेदिक, शृंगारिक लावण्या हा बापूंचा प्रांत. 'तीन ताडाच्या माडीवरती सुंदरा एक दिसली, हातात ऐना केस मोकळे, रूप न्याहळीत बसली.' असं लिहिणारे बापू त्या सुंदरीला 'तू कोण कुणाची फाकडी गं, नथ सर्ज्याची देतो वाकडी गं' असं विचारतात तेव्हा आजही तमाशात शिट्टयांचा पाऊस  पडतो. 'पट्ठे बापूराव' हि सहा अक्षरं आजही तमासगिरांवर अधिराज्य गाजवतात. त्यांच्या शब्दावर लावण्यरसाची बरसात होते. चवळीच्या शेंगेसारखी कमनीय शरीरं गवताच्या पात्यासारखी लवलवतात. सारा मराठी मुलूख घुंगरांच्या बोलावर झुलू लागतो. जोपर्यंत लावणी आहे तोपर्यंत पट्ठे बापूरावांच्या शब्दांची नशा कायमच राहील. 




























































 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...