Sunday, March 28, 2021

शोले -- अमिताभसाठी माईलस्टोन चित्रपट

 शोले -- अमिताभसाठी माईलस्टोन चित्रपट 


          हा चित्रपट १९७५ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मिती जी. पी. सिप्पी यांनी केली असून दिग्दर्शक रमेश सिप्पी होते. या चित्रपटाची कथा सलीम जावेद यांनी लिहिली आहे. ह्या चित्रपटातील गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली असून संगीत राहुल देव बर्मन यांनी दिले आहे. किशोर कुमार, लता मंगेशकर, मन्ना डे यांनी गाणी गायली आहेत. 'मेहबुबा मेहबुबा' हे गीत राहुल देव बर्मन यांनी गायले आहे. धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, संजीवकुमार, हेमा मालिनी, जया भादुरी, अमजद खान यांनी महत्वाच्या भूमिका केल्या. धर्मेंद्रने वीरूची, अमिताभने जयदेवची, संजीवकुमारने ठाकूर बलदेव सिंगची, अमजद खानने गब्बरसिंगची भूमिका केली. हि भूमिका नंतर प्रचंड गाजली. या भुमिकेमुळे अमजद खानची हिंदी चित्रपटसृष्टीत एक उत्कृष्ठ कलाकार म्हणून ओळख निर्माण झाली. या चित्रपटात प्रत्येक कलाकाराने आपल्या वाटयाला आलेली भूमिका योग्यरीत्या निभावली. 

          अमिताभने या चित्रपटात भुरटया चोराची भूमिका केली आहे. अमिताभ व धर्मेंद्र दोघे मिळून भुरटया चोऱ्या करत असतात व सारखे जेलमध्ये जात असतात. या दोघांवर चित्रित झालेले 'ये दोस्ती हम नहीं तोडेंगे' हे गाणे दोघांच्या मैत्रीची साक्ष देते. अमिताभ यांची शांत, संयमी, बुध्दीवान अशी भूमिका दाखवली आहे. त्याच्या चेहऱ्यावरील हावभावसुद्धा शांत, विचारी दाखवले आहेत. हेमामालिनीची सारखी बडबड चालू असताना कानात कापसाचे बोळे घालून  हेमामालिनीला "तुम्हारा नाम क्या है बसंती?" असे विचारणे किंवा आमराईत वीरू बसंतीला बंदूक चालवायला शिकवत असताना "मैंने तों आँखे पहलेही बंद कर रखी है" असे म्हणणे हे प्रसंग अमिताभच्या शांत स्वभावाची ओळख करून देतात. जय (अमिताभ) वीरूच्या लग्नासाठी बसंतीच्या मौसीकडे मागणी घालायला जातो हा प्रसंग अमिताभच्या अभिनयाने उत्तम वठवला गेला. एकीकडे मित्राचे वाईट गुण गायचे तर दुसरीकडे लग्न झाल्यावर या वाईट गुणातून तो बाहेर पडेल असे मौसीला समजून सांगायचे. या तीन मिनिटांच्या प्रसंगात अमिताभ विनोदी शैलीने मौसीला मित्राबद्दल छान पटवून सांगताना दाखवला आहे. आजही हे तीन मिनिटांचे दृश्य बघितले कि, दैनंदिन तणाव विसरायला होते. 

          जय राधावर (जया भादुरी) मनातून प्रेम करू लागतो. हे प्रेम व्यक्त करण्यासाठी तो माऊथ ऑर्गन (बाजा) चा उपयोग करतो. राधा जेव्हा रात्री दिवे घालवत असते तेव्हा जय तिला बघतो व माऊथ ऑर्गन वाजवू लागतो. दोघांमध्ये न बोलताही संवाद चाललेला असतो. दोघेही एकमेकांकडे आकर्षित झालेले असतात. दोघांनाही एकमेकांबद्दल ओढ वाटू लागलेली असते. जय व राधाचे प्रेमाचे शब्देविण संवादाचे प्रसंग अमिताभ व जया भादुरीने उत्तमरीत्या साकारले आहेत. 

          शेवटच्या प्रसंगात जयला गुंडांच्या गोळ्या लागतात. तो जखमी होतो तरीही तरीही वीरूला बसंतीला घेऊन गावात जायला सांगतो. वीरू जायला नकार देतो. जय नाणेफेक करतो व जिंकतो. वीरू व बसंती गावात जातात तोपर्यंत जय गुंडांना थोपवून धरतो. वीरू गावातील लोकांना घेऊन येतो. जय अखेरचे श्वास मोजत असतो. जय वीरूच्या कुशीत आपला जीव सोडतो. या प्रसंगातील जयच्या (अमिताभ) मृत्यूमुळे प्रेक्षकही भावनाविवश होतात. 

          हा चित्रपट मल्टीस्टार असला तरी अमिताभसाठी मैलाचा दगड (माईलस्टोन) ठरला. या चित्रपटामुळे अमिताभसाठी सुपरस्टार पदाची दारे उघडली गेली.
























तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...