Saturday, October 27, 2018

डॉ. काशिनाथ घाणेकर आणि सुबोध भावे





डॉ. काशिनाथ घाणेकर आणि सुबोध भावे 

          काशिनाथ घाणेकर हे प्रसिद्ध नाटय कलाकार होते तसेच ते दन्त वैद्य (डेंटल सर्जन) होते. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९३० रोजी झाला. त्यांनी अभिलाषा या हिंदी सिनेमात नंदा सोबत काम केले तसेच दादी माँ या चित्रपटात अशोक कुमार आणि बिना रॉय यांच्या मुलाची भूमिका केली. 
             वसंत कानेटकर लिखित "रायगडाला जेव्हा जाग येते" या नाटकात त्यांनी संभाजीची भूमिका केली. त्यांची हि भूमिका फार प्रसिद्ध झाली. नंतर त्यांनी इथे ओशाळला मृत्यू, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू, आनंदी गोपाळ, शितू, तुझं आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, मधुमंजिरी इ. नाटकात काम केले. 
               काशिनाथ घाणेकर यांनी मराठी नाटकांबरोबरच मराठी सिनेमातही काम केले. १९५३ साली धरम पत्नी, १९६० साली पाठलाग, १९६४ साली मराठा तितुका मेळवावा, १९६६ साली दादी माँ, १९६७ साली मधुचंद्र, १९६८ साली एकटी, प्रीत शिकवा मला, अभिलाषा, १९७० साली देव माणूस, १९७१ साली अजब तुझे सरकार व झेप, १९७६ साली हा खेळ सावल्यांचा या चित्रपटात त्यांनी काम केले. यातील पाठलाग, मराठा तितुका मेळवावा, मधुचंद्र व हा खेळ सावल्यांचा या चित्रपटांना चांगली प्रसिद्धी मिळाली. मधुचंद्र सिनेमाने तर त्यांना नाटय कलाकाराचे मराठी चित्रपटाचे सुपर स्टार बनवले. या सिनेमातील "मधू इथे अन चंद्र तिथे झुरतो अंधारात. अजब हि मधुचंद्राची रात" हे गाणे त्याकाळी चांगलेच यशस्वी झाले. हा खेळ सावल्यांचा हा चित्रपटही चांगलाच यशस्वी ठरला. यातील "गोमू संगतीनं माझ्या तू येशील का" व "रात्रीस खेळ चाले हा खेळ सावल्यांचा" हि गाणी यशस्वी ठरली. 
          डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारित "आणि....डॉ. काशिनाथ घाणेकर" हा चित्रपट येत आहे. अभिजित देशपांडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, सुमित राघवन यांनी महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. सुबोध भावे आणि प्राजक्ता माळी यांच्यावर "गोमू संगतीनं माझ्या तू येशील का" हे गाणे चित्रित झाले. सुबोध भावेंनी या गाण्यात काशिनाथ घाणेकर यांचा हुबेहूब अभिनय केला. 
























Friday, October 26, 2018

कारगिल युद्ध -- एक यशोगाथा भाग २ "ऑपरेशन विजय"





कारगिल युद्ध -- एक यशोगाथा 
                                   भाग २
"ऑपरेशन विजय"  

भारतीयांना उशिरा मिळालेली खबर --
          सुरुवातीला अनेक कारणांमुळे कारगिलची घुसखोरीचा पत्ता लागण्यास उशीर झाला. मुख्यत्वे पाकिस्तानने अनेक भागात तोफांचा मारा केल्यामुळे शोधपथक पाठवण्यास दिरंगाई झाली. भारतीय लष्कराच्या मते, हा तोफखान्याचा मारा नेहेमीचा असतो, त्यात नवे काही नाही. पाकिस्तानने हा मारा नियंत्रण रेषेपलीकडील सैनिकांना/घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी केला. मेच्या दुसऱ्या आठवडयात स्थानिक मेंढपाळ यांनी घुसखोरीची सूचना भारतीय सैन्याला दिली. त्यानुसार भारतीय सैनिकांनी टेहळणीसाठी तुकडी पाठवली. तिच्यावर हल्ला करण्यात आला. व घुसखोरी झाल्याचे सिद्ध झाले. 
          भारतीय सरकारने "ऑपरेशन विजय" या नावाखाली कारगिलच्या युद्धासाठी कार्यवाही चालू केली. त्यासाठी संख्येने सुमारे २,००,००० इतक्या सैनिकांचा आधार घेण्यात आला. परंतु भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर युद्ध करणे शक्य नव्हते. त्यामुळे रेजिमेंटल व बटालियन पुरतीच कारवाई शक्य होती. अर्थातच सैनिकांची संख्या २०००० पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली. अर्धसैनिक व वायुदल मिळून भारताने एकूण ३०००० पर्यंत सैनिक कारगिलच्या युद्धात वापरले. 
          भारतीय वायुसेनेकडूनही "ऑपरेशन सफेद सागर" सुरु झाले. या ऑपरेशनद्वारे पायदळ सैन्याची ने-आन करण्यासाठी मोठी भूमिका वायुसेनेने निभावली. मोठे बॉम्ब वाहून नेण्यासाठी लागणारे मोठे विमानतळ, भौगोलिक परिस्थितीमुळे या भागात नसल्याने इथेही वायुसेनेची व्याप्ती मर्यादित होती. 
भारतीय प्रत्युत्तर --
          कारगिलचे युद्ध सुरु झाल्यानंतर केवळ रसद तोडण्यासाठी पाकिस्तानचा श्रीनगर-लेह मार्ग कापून काढायचा इरादा आहे हे नाकी झाले. भारताने सैन्य जमवाजमविचे प्रयत्न सुरु केल्यानंतर पाकिस्तानकडून श्रीनगर-लेह मार्गावर मोठ्या प्रमाणावर उखळी तोफांचा मारा करण्यात आला. प्रत्युत्तरादाखल भारताकडून श्रीनगर-लेह या राष्ट्रीय महामार्गाच्या जवळचा भाग ताब्यात घेण्यास जास्त महत्व देण्यात आले. असे केले कि हा महामार्ग सुकर होणार होता. 
          घुसखोरांनी आधुनिक शस्त्रास्त्रांनी चौक्या सुरक्षित केल्या होत्या. बंदुका, स्वयंचलित मशीन गन, छोट्या उखळी तोफा व विमानभेदी क्षेपणास्त्रे यांनी चौक्या सज्ज होत्या. तसेच चौंक्याचा सभोतालचा परिसर पेरलेल्या सुरुंगानी संरक्षित केला होता. यातील ८००० सुरुंग भारतीय सेनेने युद्ध संपल्यावर निकामी केले. या चौक्यांना पाठीमागून पाकिस्तानी हद्दीतून मोठ्या प्रमाणावर तोफखान्याचे संरक्षण मिळाले होते. पाकिस्तानने या युद्धाआधी त्या परिसरातील चालकरहित विमानांमधून टेहळणीदेखील केली होती. वर नमूद केल्याप्रमाणे भारतातर्फे आधी महामार्गालगतच्या चौक्यांवर हल्ले करण्यात आले. हा मारा बहुतांश कारगिलच्या जवळच्या भागावर केंद्रित करण्यात आला. या चौंक्यांवर ताबा मिळाल्याने भारताने काबीज केलेल्या जागेत भर पडली व हा महामार्गही सुरक्षित होत गेला. जसा महामार्ग सुरक्षित होत गेला तसे पुढील हल्ल्यांचे नियोजन सूत्रबद्ध रीतीने होत गेले. 
          महामार्गाच्या जवळच्या चौक्यांवरील भारतीय आक्रमणात टायगर हिल व तोलोलिंग शिखर या दोन चौकीवजा शिखरांवरील आक्रमणे नोंद घेण्याजोगी होती. यानंतर बटालिक व तूतुर्क या सियाचीन लगतच्या भागाला लक्ष करण्यात आले. यातील काही जागा गमावणे पाकिस्तानी संरक्षणाच्या दृष्टीने परवडणारे न्हवते. पॉईंट ४५९० व पॉईंट ५३५३ या त्यापैकी काही महत्वाच्या जागा होत्या. (या भागात शिखरांना नावे त्यांच्या उंचीप्रमाणे असतात). ४५९० हा महामार्गाला सर्वात जवळचा पॉईंट होता तर ५३५३ हे यद्धातील सर्वात अधिक उंचीचे शिखर होते. पॉईंट ४५९० वर १४ जून १९९९ रोजी भारतीय सेनेने ताबा मिळवला व युद्धाचे पारडे हळूहळू भारताच्या बाजूने झुकू लागले. याच शिखराच्या ताब्यासाठी भारतीय सेनेला सर्वाधिक मनुष्यहानी सोसावी लागली. जरी भारतीय सेनेने जूनच्या मध्यापर्यंत महामार्गासाठी महत्वाची ठिकाणे ताब्यात घेण्यास यश मिळवले असले तरी पाकिस्तानी बाजूने युद्धाच्या अंतापर्यंत तोफखान्याचा भडीमार चालूच होता. 

भारतीय प्रत्युत्तर उर्वरित भाग ३ मध्ये वाचा. 























Wednesday, October 17, 2018

श्रीराम चरित्र व आपण -- एक गुंफण भाग २



श्रीराम चरित्र व आपण -- एक गुंफण  भाग २

          मी हे करतो पण, मला पूर्ण ऐकायचे नसते तर मला माझे म्हणणे खरे करायचे असते. मग त्यासाठी मला विरोध करावा लागला तरी चालेल आणि काही वेळानी माझ्या लक्षात येते कि माझं कुठं चुकलं? हेच मी शांतपणाने घेतल असत तर? माझ्याकडून अशा रीतीने अनेक वेळा मर्यादाभंग होत राहतो व मला आनंद मिळण्यापेक्षा जास्त दुःखच मिळत राहते. ज्या प्रसंगी बोलायला हवे, विरोध दर्शवायला हवा त्या प्रसंगी मी मौन धारण करून बसतो. दरवेळेस मला माझ्या मनाप्रमाणे घटना घडाव्या असे वाटत असते व जर असे घडले नाही तर अपेक्षाभंगाचे दुःख सतावत राहते. आपल्या आयुष्यात असे का घडत राहते याचे एक कारण म्हणजे परिस्थिती हाताळताना आपला संयम कमी पडतो, मनःशांतीचा अभाव निर्माण होतो. आपण एकतर भावनेच्या अति आहारी जातो नाहीतर अति व्यावहारिक बनतो. हे दोन्ही वागणे चुकीचे ठरू शकते. 
          रामाला जेव्हा समजते कि, आपल्याला वनवासाला जायचे आहे तेव्हा त्याच्याही मनात नक्कीच काहूर उठले असणार पण! योग्य गोष्टींचा स्वीकार व अयोग्य गोष्टींचा त्याग ह्या मर्यादेनुसार श्री रामाने वनवास स्वीकारला. राजोपभोगांचा त्याच क्षणी त्याग केला कारण त्या परिस्थितीत तेच योग्य होते. 
               समजा जर रामाने थोडा तरी विरोध दर्शवला असता तर? कैकयी मातेला वडील दशरथ राजाने दिलेले दोन वर त्यांना पुरे करता आले नाहीत याचे शल्य कायम रामाच्या मनात राहिले असते. पत्नीला दिलेला शब्द पूर्ण करू शकले नाहीत याची सल कायम राजा दशरथाच्या मनात राहिली असती व पित्याला मान खाली घालावी लागली असती. 
               राम हा आदर्श पुत्र ह्याच साठी आहे कि, पित्याचा शब्द, मातेची आज्ञा कायम शिरसावन्द्य मानली. सर्व गोष्टींच्या परिणामांबद्दल विचार करून वनवास स्वीकारला. ते सुद्धा बंधू लक्ष्मणासह पत्नी सीता व स्वतः माता कैकयी व पिता दशरथाच्या पायावर डोके ठेवून मग वनवासाला निघतात. 
               ज्याकाळी जी गोष्ट, जो निर्णय उचित आहे तोच घेणे म्हणजे मर्यादा पुरुषार्थ होय व तोच श्रीरामाने केला आहे. श्रीराम चरित्र अभ्यासातून आपल्यात उचिततेचं बदल घडवून आणणे ह्या सारखा चांगला विचार व त्यानुसार केलेले आचरण म्हणजेच आपल्या विचारांवर रामाच्या सदशील विचारांच्या प्रभावाची झालेली गुंफण होय. 































Saturday, October 13, 2018

श्रीराम चरित्र व आपण -- एक गुंफण भाग १


श्रीराम चरित्र व आपण -- एक गुंफण  
                                      भाग  १

           राम ह्या एकाक्षरी मंत्रात अवघे विश्व सामावले आहे. 
          राम आपल्याला काय शिकवतो तर त्या ईश्वरदत्त कर्म स्वातंत्राचा कसा उपयोग करून घ्यायचा. सामान्य जीवन जगतानाही कधी शांत राहायचे, कधी काय योग्य ते बोलायचे किंवा कधी हातात शस्त्र घ्यायचे. 
          राम हा महाविष्णूचा एक अवतार आहे. रावणाचा नाश करण्यासाठी घेतलेला एक मानवी अवतार. 
          आपल्या आयुष्यातही असे रावण येत असतात. कधी जीवनात भौतिक स्वरूपात अनुभवायला येतात तर कधी मनरूपी सागरात एका अदृश्य पोकळीत अक्राळ विक्राळ आकृतीत अनुभवायला येतात. आपण जीवनभर ह्याच संभ्रमावस्थेत असतो कि, याचा सामना कसा करायचा. एका रावणानंतर अशा अनेक रावणांचा सामना आपल्याला करावाच लागतो. हा समाज हि मग रावणाप्रमाणे दहा तोंडे वासून आपल्याला त्रास देतच राहतो. 
           ह्या वरचा उपायही श्री रामावतारामध्ये रामाने आपल्याला दिला आहे. किंबहुना रावणाच्या वधाबरोबर आपण ह्या कलियुगातील रावणाचा कसा संहार करायचा मग, तो भौतिक पातळीवरील असो वा मनुरूपी ह्याचा धडा श्री रामाने घालून दिला आहे. 
              ।। रामोराज मणि सदा विजयते ।।
       प्रत्यक्ष महिषासुर मर्दिनीने हा दिलेला आशीर्वाद आहे. राम व रामनाम सैदव विजयी होवो. हाच आशीर्वाद बळ बनून श्रीरामाच्या पाठीशी राहिला व तो रावणाचा वध करू शकला. 
           परमेश्वर अद्वितीय अद्भुत आहे. आपल्या सारख्या सामान्य मानवासाठी त्याच्याकडे एक अवतार लीला म्हणून पाहावे का देव म्हणून पाहावे व त्याचे कसे अनुकरण करावे हे समजणे व तसे वागणे दुरप्रास्थ आहे. त्या ईश्वराने मानवाच्या कल्याणासाठी पृथ्वीवर मानव रूपात अवतार घेतला. मानव काय सहन करतील इतके कष्टात ते जीवन जगले. 
          एका सामान्य मानवासाठी उन्हातान्हात राबणे, काबाडकष्ट करणे ह्या पेक्षा खडतर जीवन जगणे कठीण आहे. मग, वनवासाला जाणं ह्यचा तर आपण विचार ही करू शकत नाही.  
            राम हा आदर्श पुत्र, आदर्श शिष्य, आदर्श पती, आदर्श बंधू व स्वतः ईश्वर आहे आणि जीवनाचा मार्गदर्शक हि आहे. ज्याचा राज्याभिषेक दुसऱ्या दिवशी होणार होता अशा संपूर्ण राजेशाही थाटात वाढलेल्या सर्वांच्या लाडक्या सुकुमार रामावर माता कैकयीच्या आज्ञेने पूर्ण राजोपभोगांचा त्याग करून वल्कले परिधान करून वनवासाला जायची वेळ येते. 
          असा प्रसंग कोणा सामान्य मानवावर आला असता तर? मग तो कितीही संयमी असो, त्याने थोडा तरी विरोध केला असता. त्याला थोडा तरी राग आलाच असता. पण! पहा तो श्रीरामाचा शांत प्रसन्न चेहरा, जराही असे जाणवत नाही कि, त्यांच्या मनाविरुद्ध घडते आहे. ह्या आज्ञेचा हि श्री रामाने सन्मानच केला व हि मर्यादा सुद्धा लीलया पाळली. अगदी वनवासात असतानाही सीता माता व लक्ष्मणासोबत त्यांचा राम होता अर्थात त्यांचा आनंद होता. खरे आत्मिक समाधान होते. 











        










       
























          

Friday, October 12, 2018

कारगिल युद्ध -- एक यशोगाथा भाग १





कारगिल युद्ध -- एक यशोगाथा 
                                   भाग १

          इ. स. १९९९ च्या उन्हाळ्यात पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरु झाले. हि ठाणी कारगिल व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागा होती. अनेक महिन्यांच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर भारताला हि ठाणी परत मिळवण्यात यश मिळाले. हे युद्ध आजवरचे सर्वाधिक उंचीवर लढले गेलेले युद्ध आहे. ह्या युद्धाची अतिउंचावर लढले गेलेले युद्ध म्हणून इतिहासात नोंद झाली असेल.

युद्धाचे स्थळ --
          कारगिल हे जम्मू व काश्मीरची राजधानी श्रीनगर पासून २०५ कि. मी. अंतरावर आहे. हे शहर पाकव्याप्त काश्मीरच्या नियंत्रण रेषेपासून जवळ आहे. कारगिल मध्ये काश्मीरमधील इतर ठिकाणांसारखे हवामान आहे. उन्हाळा हा सौम्य कडक तर हिवाळा अतिशय कडक असतो. तापमान उणे ४० अंश सेल्सियस पर्यंतही उतरू शकते. 
          राष्ट्रीय महामार्ग लेह ते श्रीनगर या रस्त्यावर कारगिल वसलेले आहे. कारगिलचे युद्ध होण्याचे प्रमुख कारण हा रस्ता हे होय. घुसखोरांनी पाकव्याप्त काश्मीरच्या जवळच्या आणि रस्त्याला समांतर अश्या १६० किलोमीटरच्या पट्ट्यातच घुसखोरी केली. लष्कराच्या अनेक चौक्या या भागात आहेत. त्यातील काही चौक्या समुद्रसपाटीपासून ५००० मीटरपेक्षाही अधिक उंचावर आहेत. नुसतेच कारगिल न्हवे तर आग्नेयेकडील द्रास व नैऋत्येकडील मश्को खोऱ्यातील, तसेच बटालिक विभागातील चौक्यांवरही घुसखोरी झाली. 
          कारगिल, द्रास व मश्को खोऱ्यातील चौक्या ह्या अतिउंचावर आहेत. अतिउंचावरील चौक्यांवर कडक हिवाळ्याच्या महिन्यात सैन्य तैनात करून ठेवणे अतिशय अवघड असल्याने, हिवाळ्यापूर्वी दोन्ही बाजूने सैन्याची माघार व्हावी आणि उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर व हवामान मानवी राहण्यास स्थिर झाल्यानंतर, ते ते सैन्य आपापल्या चौक्यांमध्ये परतावे, असा अलिखित समझोता भारत-पाकिस्तानमध्ये कारगिल युद्धाच्या आधीपर्यंत होता. या वेळेस मात्र, भारतीय सैन्य भारतीय चौक्यांवर परतण्यापूर्वीच पाकिस्तानी घुसखोरांनी ऐन हिवाळ्यात भारतीय चौक्यांचा ताबा घेतला. त्यामुळे कारगिलचे युद्ध भडकण्यास ठिणगी पडली. या चौक्यांचा ताबा घेतला गेल्याने राष्ट्रीय महामार्ग १ अ हा पाकिस्तानी तोफगोळ्यांच्या आणखी जवळच्या टप्प्यात आला. तसेच उंचावरील चौक्यांचा ताबा घुसखोरांकडे गेल्याने त्यांना उतारावरील चौक्यांवर नियंत्रण ठेवणे सोपे गेले. या चौक्या डोंगरमाथ्यावरील किल्ल्यांप्रमाणे होत्या. त्यांचा ताबा मिळवण्यास मोठ्या प्रमाणावर सैन्याची गरज लागते. त्यातच अतिउंची व कडाक्याची थंडी हे काम अजूनच अवघड करते.  

युद्धाची कारणे --
          इ.स. १९९८-९९ च्या हिवाळ्यात पाकिस्तानी लष्कराकडून अनेक तुकड्यांना मुजाहिदीनच्या वेषात भारतात नियंत्रण रेषेपलीकडे पाठवण्यात आले. या कारवाईला ऑपरेशन बद्र असे नाव देण्यात आले. कुणाच्याही लक्षात न येता त्यांनी रिकाम्या भारतीय चौक्यांचा ताबा घेतला. हिवाळ्यात प्रचंड थंडीमुळे भारतीय सैन्य माघारी घेतले गेले होते. या संधीचा फायदा पाकिस्तानी लष्कराने उठवला. नियंत्रण रेषेच्या जास्तीत जास्त आत घुसखोरी करून राष्ट्रीय महामार्ग १ च्या जवळ जायचे. असे केले कि, महामार्गावर कायमस्वरूपी ताबा मिळवता येईल आणि नंतर राजकीय वजन वापरून काश्मीरच्या प्रश्नाचे आंतर्राष्ट्रीयीकरण करणे पाकिस्तानला सोपे पडेल असा हा या कारवाईचा मुख्य उद्देश होता. भारताला नवीन नियंत्रण रेषा मान्य करायला भाग पाडले कि लडाख व सियाचीनला भारतापासून तोडणे सोपे जाईल असा पाकिस्तानी युद्धनीती तज्ज्ञांचा कयास होता तसेच घुसखोरीदरम्यान कारगिल/काश्मीर परिसरात अंतर्गत बंडखोरी भडकावून भारताला अजून बुचकळ्यात पाडण्याचा पाकिस्तानी व्यूह होता. 

पाकिस्तानी घुसखोरांचा भारतीय चौक्यांवर कब्जा --
          कडक हिवाळ्यातील महिन्यांमध्ये मनुष्यहानी कमी व्हावी म्हणून, अतिउंचावरील चौक्या रिकाम्या करायच्या असा प्रघात भारत व पाकिस्तान हे दोघेही पाळत. हवामान पुन्हा ठीकठाक झाल्यानंतर दोन्ही बाजूंचे सैन्य आपापल्या चौक्यांमध्ये परतून संरक्षणाची जबाबदारी घेत असे. 
          फेब्रुवारी इ.स. १९९९ मध्ये पाकिस्तानी लष्कराने कडक हिवाळ्यातच भारतीय चौक्यांचा ताबा घेणे आरंभले. पाकिस्तानने हि कारवाई अतिशय सूत्रबद्धरीत्या व भारतीय सैन्याला थांगपत्ता लागू न देता पार पाडली. यातच भर म्हणजे भारतीय गुप्तहेर खात्याला या घटनेची माहिती अजिबात मिळाली नाही. स्पेशल सर्विसेसच्या सर्वोत्कृष्ट तुकड्या, तसेच नॉर्दर्न लाइट इन्फट्रीच्या ४ ते ७ बटालियन तुकड्या या कामात गुंतल्या होत्या. रिकाम्या चौक्यांव्यतिरिक्त भारतीय सैन्याला हल्ला करायला अवघड जावे म्हणून मोक्याच्या जागाही ताब्यात घेण्यात आल्या. साधारणपणे, अतिउंचावरील एक मुख्य चौकी व त्याला टेका देण्याऱ्या दुय्यम उतारावरील व कमी उंचीवरील चौक्या ताब्यात घेण्यात आल्या. पाकिस्तानी मुख्य सैनिकांबरोबरच अफगाणी मुजाहिदीन, काश्मिरी मुजाहिदीन यानांही या कार्यवाहीत समाविष्ट केले गेले. 

पुढील भागात वाचा भारताने दिलेले प्रत्युत्तर 
          
          















Saturday, October 6, 2018

सैराट झालं जी....!




सैराट झालं जी....!

          सैराट चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटातील "सैराट" गाण्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्र "झिंगाट" झाला. या चित्रपटामुळे उलट-सुलट चर्चा चालू झाल्या. काही प्रश्न ऐरणीवर आले. सैराटची कथाच जातीभेदावर आधारलेली आहे. त्यात मुलगा व मुलगी भिन्न जातीचे दाखवले आहेत. दोघांचे कॉलेजमध्ये जमलेले प्रेम, घरच्यांना न जुमानता पळून जाणे व शेवटी द्वेषभावनेतून दोघांची केलेली हत्या हे या चित्रपटात दाखवले आहे. 
          सैराटमुळे बरेच प्रश्न उपस्थित झाले. त्यातील पहिला प्रश्न म्हणजे अल्पवयीन प्रेम. मुले जेव्हां तारुण्यात प्रवेश करतात तेव्हा मुलांच्या शरीरात वेगळे बदल होत जातात. याची जाणीव साधारण चौदा-पंधरा वर्षांपासून व्हायला सुरवात होते. यातच मुले-मुली एकमेकांकडे आकर्षिली जातात. दोघांच्यात प्रेमभावना उत्पन्न व्हायला लागते. प्रेमापुढे त्यांना समाजाचा, आई-वडील, नातेवाईकांचा विसर पडू लागतो. हि मुले वर्तमानात जगत असतात. त्यांना भविष्याचा काहीच विचार नसतो. शाळा-कॉलेजमधील प्रेम वर्तमानाशी निगडित असते. या मुलांकडे भविष्याबद्दल काहीच तरतूद नसते. प्रेमात पडल्यावर प्रेम शेवटपर्यंत कसे निभवायचे ह्यावर काहीच मार्ग सापडत नाही. मग प्रेमभंग झाल्यावर मुलगा किंवा मुलगी वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्येसारखे मार्ग अवलंबतात. 
          दुसरा प्रश्न म्हणजे घरातून पळून जाणे. एकदा का दोघेही प्रेमात पडले कि त्यांना संपूर्ण जगाचा विसर पडतो. हे विश्व दोघांचेच वाटू लागते. दोघांनाही एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटतो. यासाठी दोघांच्याही मनात लग्नाबद्दल विचार चालू होतात. एकमेकांना संपूर्ण जीवनभर साथ देण्याच्या आणाभाका दिल्या जातात. वचने घेतली जातात. घरात लग्नाचा विषय काढला कि तणावाचे वातावरण निर्माण होते. मतभेद चालू होतात. लग्नाला विरोध होतो. घरातले लग्नाला संमती देत नाहीत म्हणले कि घरातल्यांना न जुमानता दोघेही पळून जाण्याचा मार्ग अवलंबतात. यामुळे दोन्ही घराण्यांची नाचक्की होते, बदनामी होते. यासाठी लग्नाचे निर्णय घेण्याआधी आईवडिलांना, नातेवाईकांना विश्वासात घेऊन सर्व गोष्टी समजून सांगितल्या पाहिजेत. पालकांनीही आपला हट्टीपणा, अहंकार बाजूला ठेवून दोघांच्या सुखासाठी, उज्वल भविष्यासाठी लग्नाला संमती दिली पाहिजे. 
          तिसरा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे जातीभेद, उच्चं-नीच वर्ण, द्वेषभावना. हल्ली मुले-मुली शिक्षण किंवा नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने एकत्र येत असतात. बराच वेळ एकमेकांच्या सहवासात घालवत असतात. एकमेकांची माने, विचार जुळू लागतात. यातूनच त्यांच्यात प्रेमभावना उत्पन्न होते. जेव्हा दोघेही लग्नाचा निर्णय घेतात तेव्हा जातीभेद, उच्चंनीच वर्ण आड येतात. दोघेही वेगवेगळ्या जातीचे असतील तर घरच्यांचा विरोध ठरलेलाच असतो. यातूनच घरात वितंडवाद निर्माण होतात. आपला समाज एवढा पुढारलेला आहे, शिकलेला आहे परंतु उच्चं-नीच, जातीभेदाच्या चक्रातून बाहेर पडायलाच तयार नाही. प्रत्येकजण आपल्या जातीला चिकटून बसलेला आहे व या जातीभेदातूनच एकमेकांबद्दल द्वेषभावना निर्माण होते. द्वेषभावनेतूनच सैराटसारखे हत्या, खून यासारखे प्रकार घडतात. 
          सैराटमुळे बराच उहापोह झाला. बरेच प्रश्न उपस्थित झाले. पण हे प्रश्न अनुत्तरीतच राहणार आहेत. शाळा-कॉलेजमधील वय अजाणत असतं. तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना कुणाच्यातरी प्रेमात पडावंसं वाटतं. परंतु त्याबरोबर आपल्या भविष्याचा, करिअरचाही विचार करायला हवा. पळून जाऊन सगळेच मार्ग सुटतात असे नाही. पळून गेल्याने एक तर दोन्ही घरच्यांचा आधार तुटतो. युवक-युवती एकटे, एकाकी पडतात. कुणाचाही आधार नसल्याने व उत्पनाचे साधन नसल्याने असहाय्य व्हायला होते. याच असाहाय्यतेचा फायदा घेण्यासाठी बाहेरचे नराधम टपलेले असतात. आजचा तरुणवर्ग बराच समझदार झालेला आहे. उच्चंशिक्षित झालेला आहे. जाती-पातीच्या भिंती तोडू पाहत आहे. माणुसकी हीच जात त्यांना माहित आहे. पालकांनीही अशा मुलांना जातीपातीच्या कोंदणात न अडकवता त्यांना समजून घ्यावे, सहकार्य करावे. त्यांचीही बाजू समजून घ्यावी. त्यांच्याबद्दल असलेला राग, द्वेष बाजूला ठेवून त्यांच्या आनंदासाठी, भविष्यासाठी सहकार्य केले तर "सैराट" सारखा शेवट होणार नाही. 
          














Monday, October 1, 2018

पुस्तक हे आपले मित्र


<a href="http://marathibloglist.blogspot.in/" target="_blank"><img title="मराठी ब्लॉग लिस्ट- मराठी ब्लॉग्सची डिरेक्टरी" src="http://s12.postimg.org/4aucbuf6x/MBL_Logo.jpg" /></a>

पुस्तक हे आपले मित्र 

          प्रत्येकाला मित्र हा असतोच, जो आपल्याशी बोलतो, आपल्या सोबत खेळतो, भांडतो वगैरे. पण अशीही मित्र असतात जी न बोलता आपल्याशी संवाद साधतात. व आपल्या मनातील गोष्ट पारखून घेतात ते म्हणजे पुस्तके. पुस्तकाशी खूप माणसांचे अतूट नाते आहे. अशीही काही माणसे आहेत कि जी पुस्तकांशिवाय राहू शकत नाहीत. पुस्तकांमुळे आपले मन प्रसन्न होते व आपल्याला सगळीकडे हर्षता वाटू लागते. 
          पुस्तक आपली इच्छा पूर्ण करते. पुस्तक आपल्याला खूप काही अश्या गोष्टी सांगते कि ते जीवनभर आपल्याला उपयोगी पडेल. पुस्तकांमुळे आपल्या मनात नवीनच भावना निर्माण होतात. आपले शरीर व मन चैतन्याने फुलून उठते. आपल्या मनात नवीन कल्पना सुचतात. आपली कल्पनाशक्ती व एकाग्रता वाढते. पुस्तकाने आपले ज्ञान वाढते व खूप काही शिकायला मिळते. आयुष्यात कुठलीही कठीण परिस्थिती असुदे पुस्तक आपल्याला कधीच एकटं सोडणार नाही. उलट आपली भिंत बनून आपली साथ देईल. पुस्तकामुळे आपल्याला आपली योग्यता व गुण कळतात. 
          पुस्तक आपल्याला स्वतःमध्ये रामवते. जी गोष्ट किंवा बातमी टीव्हीवर बघतो किंवा रेडिओवर ऐकतो पण तीच गोष्ट आपण पुस्तकात ध्यानपूर्वक वाचली तर आयुष्यभर आपल्या लक्षात राहील याची खात्री आहे. आपल्या डोक्यावर कामाचा ताण साठून राहिलेला असतो तो पुस्तकामुळे दूर होऊ शकतो. पुस्तक जरी निर्जीव असले तरी ते सजीवाचे काम करते पुस्तक आपले चांगले साथी बनून शेवटपर्यंत आपली साथ देत असते. आपल्या अंगात धीर, धैर्य व अनेक इतर गोष्टी जागृत होतात. आपल्या जीवनाची रीत बदलून जाते. 
          पुस्तक आपल्याला शिस्तीचं कसं पालन करावं व आपल्याला चांगल्या सवयी कश्या लावाव्यात हे सांगते. आपल्या अंगात झालेल्या सुजाणतेमुळे आपल्या जीवनातील अधोगती नष्ट होते व आपल्याला प्रगतीचा मार्ग दिसू लागतो. आपण स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो यामुळे आपल्यात आत्मविश्वास वाढतो. 
          पुस्तके अनेक प्रकारची आहेत जशी गंभीर, हास्यमय, कलाकृतीची, आनंदी इत्यादी. पुस्तकातील एकूण एक पात्र खरे आहे असे वाटते व त्या पुस्तकातील व्यक्तीसारखे वागावेसे वाटते. आपण पुस्तकातील एक-एक शब्दाचा किंवा ओळीचा विचार करू लागतो. आपण वाचत असताना पूर्णपणे मग्न होऊन जातो. पुस्तकामुळे संवाद वाढतात. 
          पुस्तक आणि आपले नाते पक्के होण्यासाठी नेहमी वाचन करावं लागतं. पुस्तकाची किंमत सोन्याहून अधिक आहे. पुस्तक हि एक मौल्यवान वस्तू आहे कारण पुस्तकामुळे आपल्याला ज्ञान प्राप्त होते. सोनं आपल्या अंगावर शोभतं, आपल्या अंगाची शोभा वाढवतं पण मनात सोन्याची चोरी होईल याची भीती असते. पण पुस्तकांचे तसे नसते. पुस्तकामुळे आपल्या अंगातील गुण दिसू लागतात, आपले विचार सगळ्यांना पटू लागतात व आपल्या गुणांची व विचारांची चोरी होऊ शकत नाही. पुस्तकात लपलेले विचार खूप सुंदर असतात. पुस्तकाची पैशाने किंमत कमी जास्त जरी असली तरी ते विचारशक्तीने मोठेच आहे. 



































तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...