श्रीराम चरित्र व आपण -- एक गुंफण भाग २
मी हे करतो पण, मला पूर्ण ऐकायचे नसते तर मला माझे म्हणणे खरे करायचे असते. मग त्यासाठी मला विरोध करावा लागला तरी चालेल आणि काही वेळानी माझ्या लक्षात येते कि माझं कुठं चुकलं? हेच मी शांतपणाने घेतल असत तर? माझ्याकडून अशा रीतीने अनेक वेळा मर्यादाभंग होत राहतो व मला आनंद मिळण्यापेक्षा जास्त दुःखच मिळत राहते. ज्या प्रसंगी बोलायला हवे, विरोध दर्शवायला हवा त्या प्रसंगी मी मौन धारण करून बसतो. दरवेळेस मला माझ्या मनाप्रमाणे घटना घडाव्या असे वाटत असते व जर असे घडले नाही तर अपेक्षाभंगाचे दुःख सतावत राहते. आपल्या आयुष्यात असे का घडत राहते याचे एक कारण म्हणजे परिस्थिती हाताळताना आपला संयम कमी पडतो, मनःशांतीचा अभाव निर्माण होतो. आपण एकतर भावनेच्या अति आहारी जातो नाहीतर अति व्यावहारिक बनतो. हे दोन्ही वागणे चुकीचे ठरू शकते.
रामाला जेव्हा समजते कि, आपल्याला वनवासाला जायचे आहे तेव्हा त्याच्याही मनात नक्कीच काहूर उठले असणार पण! योग्य गोष्टींचा स्वीकार व अयोग्य गोष्टींचा त्याग ह्या मर्यादेनुसार श्री रामाने वनवास स्वीकारला. राजोपभोगांचा त्याच क्षणी त्याग केला कारण त्या परिस्थितीत तेच योग्य होते.
समजा जर रामाने थोडा तरी विरोध दर्शवला असता तर? कैकयी मातेला वडील दशरथ राजाने दिलेले दोन वर त्यांना पुरे करता आले नाहीत याचे शल्य कायम रामाच्या मनात राहिले असते. पत्नीला दिलेला शब्द पूर्ण करू शकले नाहीत याची सल कायम राजा दशरथाच्या मनात राहिली असती व पित्याला मान खाली घालावी लागली असती.
राम हा आदर्श पुत्र ह्याच साठी आहे कि, पित्याचा शब्द, मातेची आज्ञा कायम शिरसावन्द्य मानली. सर्व गोष्टींच्या परिणामांबद्दल विचार करून वनवास स्वीकारला. ते सुद्धा बंधू लक्ष्मणासह पत्नी सीता व स्वतः माता कैकयी व पिता दशरथाच्या पायावर डोके ठेवून मग वनवासाला निघतात.
ज्याकाळी जी गोष्ट, जो निर्णय उचित आहे तोच घेणे म्हणजे मर्यादा पुरुषार्थ होय व तोच श्रीरामाने केला आहे. श्रीराम चरित्र अभ्यासातून आपल्यात उचिततेचं बदल घडवून आणणे ह्या सारखा चांगला विचार व त्यानुसार केलेले आचरण म्हणजेच आपल्या विचारांवर रामाच्या सदशील विचारांच्या प्रभावाची झालेली गुंफण होय.
No comments:
Post a Comment