Saturday, August 22, 2020

महाराष्ट्रातील गणपतीची प्रसिध्द ठिकाणे

 महाराष्ट्रातील गणपतीची प्रसिध्द ठिकाणे 

 

          हिंदू धर्मात गणपतीच्या पूजेला महत्वाचे स्थान आहे. त्याची पूजा विघ्नहर्ता या नात्याने इतर कोणत्याही देवतांच्या उपासनेत प्रारंभी केली जाते. गणपती सर्वांची विघ्ने दूर करतो असा समज असल्याने त्याची मनापासून आराधना केली जाते. गणपतीची काही प्रसिध्द ठिकाणे पुढीलप्रमाणे 

महाराष्ट्रातील  अष्टविनायक 

           अष्टविनायक हि महाराष्ट्रातील आठ मानाची आणि प्रतिष्ठेची गणपती मंदिरे आहेत. हि मंदिरे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आहेत. या मंदिरांना स्वतंत्र इतिहास आहे.  हि मंदिरे पुणे, रायगड आणि नगर जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्यातील १. मोरगावचा मोरेश्वर, २. थेऊरचा चिंतामणी, ३. रांजणगावचा महागणपती, ४. ओझरचा विघ्नेश्वर, ५. लेण्याद्रीचा गिरीजात्मक रायगड जिल्ह्यातील ६. महडचा वरदविनायक, ७ पालीचा बल्लाळेश्वर नगर जिल्याहातील ८. सिध्दटेकचा श्री  सिद्धीविनायक हि आठ प्रसिध्द ठिकाणे आहेत. 

विदर्भातील अष्टविनायक 

           महाराष्ट्रात जसे अष्टविनायक प्रसिध्द आहेत तसेच विदर्भातही आठ गणपती प्रसिध्द आहेत. हि आठ  महत्वाची क्षेत्रे असून त्यांना विदर्भातील अष्टविनायक म्हणातात. श्री महागणपती (अदासा  ता. सावनेर जि नागपूर), श्री चिंतामणी गणेश (कळंब जि यवतमाळ), एकचक्रा गणेश (केळझर जि वर्धा), श्री अष्टदशभुज गणेश ( रामटेक), श्रीवरद गणेश (भद्रावती), श्री टेकडी गणेश (नागपूर), श्री भृशुंड गणेश (भंडारा), श्री पंचानन गणेश (पवनी जि भंडारा) या आठ गणपतींचा समावेश होतो. 

कोकणातील अष्टविनायक 

           कोकणात गणपतीला विशेष स्थान आहे. या परिसरातही अष्टविनायक मानले जातात. यामध्ये गणपतीपुळेतील पुळ्याचा गणपती, गणेशगुळे येथील गलबतवाल्यांचा गणपती, हेदवी  येथील दशभुज लक्ष्मी गणेश, आंबोली येथील आंबोलीचा गणपती, गुहागरचा उरफाटा गणपती, आंजर्ले येथील  कड्यावरचा श्रीसिद्धिविनायक, सोनगाव येथील  बर्वे यांचा गणपती, परशुराम येथील परशुराम गणेश या आठ गणपतींचा समावेश होतो. 

गणपतीची साडेतीन पीठे 

           महाराष्ट्रात गणेशाची साडेतीन पीठे असून  त्यात मोरगावचा मयुरेश्वर, चिंचवडचा मंगलमूर्ती, राजूरचा महागणपती हि तीन पीठे असून पद्मालय येथील प्रबालगणेश हा अर्धपीठ आहे.


















Sunday, August 16, 2020

"अमिताभ" पर्व (मी लिहीत असलेल्या "अमिताभ" पर्व या पुस्तकातील लेख)

 "अमिताभ" पर्व 

(मी लिहीत असलेल्या "अमिताभ" पर्व या पुस्तकातील लेख) 

           ताडमाड उंची, किरकोळ शरीरयष्टी, घोगरा आवाज लाभलेल्या अमिताभ यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. त्यांचा बॉलिवूड मधील यशस्वी प्रवास थक्क करणारा आहे. 

          अमिताभ बच्चन यांची चित्रपटसृष्टीत एन्ट्री 'सात हिंदुस्थानी' या चित्रपटाने झाली. या चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक ख्वाजा अहमद अब्बास हे होते. या चित्रपटासाठी त्यांना पाच हजार मानधन देण्यात आले. नंतर सुनील दत्त यांनी निर्मित केलेल्या 'रेश्मा और शेरा' या चित्रपटात काम केले. या चित्रपटात त्यांनी एका मुक्याची भूमिका साकारली. 

        अमिताभ यांनी हृषीकेश मुखर्जी निर्मित 'आनंद' या चित्रपटात बाबू मोशायची भूमिका साकारली.  ह्या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते राजेश खन्ना तर सहकलाकाराच्या भूमिकेत होते अमिताभ. अमिताभ यांनी धीरगंभीर  आवाज व प्रभावी व्यक्तिमत्वाच्या जोरावर छाप पाडली पण प्रेक्षकांनी सारे  श्रेय राजेश खन्ना यांना दिले.  त्यांच्या अभिनयाची प्रशंसा केली. या चित्रपटानंतर अमिताभ यांनी प्यार कि कहानी, परवाना, बॉम्बे टू  गोवा या चित्रपटात काम केले. आनंद, बॉम्बे टू गोवा हे दोन चित्रपट सोडले तर अमिताभ यांना फारसे यश आले नाही. 

          अमिताभ यांनी बन्सी बिरजू, एक नजर, संजोग, रास्ते का पत्थर, गहरी चाल, बंधे हाथ  या चित्रपटात नायक म्हणून काम केले. परंतु हे चित्रपट यशस्वी झाले नाहीत. ह्या चित्रपटांचे अपयश बघता अमिताभ यांनी नायक म्हणून स्वीकारलेल्या चित्रपटातून निर्माते, दिग्दर्शक यांनी त्यांना काढले. त्यांच्यावर  अपयशाचा शिक्का बसला. त्यांची उंची, भसाडा व घोगरा आवाज यामुळे त्यांना चित्रपटात कोणी काम देईनासे झाले. एवढे अपयश येऊनही त्यांनी हार मानली नाही. ते खचून न जाता प्रयत्न करतच राहिले. चांगल्या संधीच्या शोधात होते व तशी संधी जंजीरच्या रूपात त्यांच्याकडे चालून आली. 

          अमिताभ यांना नायक म्हणून जंजीर चित्रपट मिळाला. या चित्रपटात त्यांची पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका होती. त्यांची नायिका होती जया भादुरी तर खलनायक होते अजित. अमिताभ यांनी या चित्रपटात खलनायकाविरुध्द लढण्याची भूमिका निभावली. या भूमिकेमुळे त्यांची 'अँग्री यंग मॅन' ची प्रतिभा निर्माण झाली. या चित्रपटात खलनायकाविरुध्द म्हणजेच अन्यायाविरुध्द लढणारा नायक प्रेक्षकांना भावला. या आधीचे नायक शामळू, नायिकेच्या मागे पळणारे होते. नायिकेच्या प्रेमात गुरफटलेले होते. मारझोड त्यांच्या पचनी पडत नव्हती. त्यांच्या प्रेम कहाण्या बघण्यासाठी लोक चित्रपटगृहात गर्दी करत होते. त्याकाळी रुपेरी पडदयावर चॉकलेट नायक व नायिकांचा जमाना होता. परंतु अमिताभ यांनी जंजीर नंतर चित्रपटसृष्टीचे सारे चित्रच पालटवले. त्यांच्या प्रत्येक चित्रपटात अन्यायाविरुध्द लढणारा नायक दाखवला गेला. त्यांच्या अभिनयाने प्रत्येकाच्या मनातील अन्यायाविरूद्धची आग बाहेर पडत होती. प्रत्येक जण अमिताभला आपला नेता मानू लागला. अमिताभचे चित्रपट बघून अनेक सामान्य व गरीब प्रेक्षकांना वाटायचे कि त्याने आपल्या समस्यांवर आवाज उठवावा. वास्तवात त्याने अन्यायाशी लढून गरीब जनतेला न्याय द्यावा असे सामान्य प्रेक्षकांना वाटू लागले. प्रेक्षकांनी त्यांना एका उंचीवर नेवून ठेवले. त्यांच्याकडे आपोआपच सुपरस्टारचे पद आले. अमिताभ यांच्या यशात सलीम जावेद या कथा लेखकांचा, प्रकाश मेहरा, मनमोहन देसाई या दिग्दर्शकांचा तर किशोर कुमार या गायकाचा समावेश होता. या सर्वांनी मिळून अमिताभ यांना सुपरस्टार पदापर्यंत नेवून पोचवले. 

          अमिताभ यांनी आपल्या उंचीमुळे, दमदार आवाजामुळे व आपल्या अभिनय कौशल्यामुळे या चित्रपटांचे सोने केले. त्यांच्या अभिनयावर प्रेक्षक प्रेम करू लागले होते. त्यांचा प्रत्येक चित्रपट तिकीट खिडकीवर सुपरहिट ठरत होता. हाऊसफुल्लचे बोर्ड लागत होते. त्यांचा चित्रपटसृष्टीतील यशस्वी प्रवास सुरू झाला होता. 'अमिताभ' नावाने एक पर्व सुरू झाले होते.

  

 

 

 

 

 

 

 

 

          



















        

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...