Friday, August 31, 2018

बँका सुरु राहणार

बँका सुरु राहणार 

          एक ते आठ सप्टेंबर दरम्यान बँका बंद राहणार असल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावरून प्रसारित केला जात आहे. खरे तर हा संदेश खोटा आहे. साप्ताहिक सुटी वगळता बँका नियमित चालू राहणार आहेत असे स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. गोकुळाष्टमीला बँकांना सुटी राहणार नाही तसेच रिझर्व्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांचा संप असला तरी कोणत्याही बँका बंद राहणार नाहीत. सर्व बँकांचे कामकाज सुरळीत चालू राहणार आहे. 
          सोशल मीडियावर एखादा मेसेज टाकायचा असेल तर आधी खात्री करावी. कारण अशा मेसेजमुळे लोकांची दिशाभूल होऊ शकते. या आधीही १० रुपयांची नाणी चलनातून बाद झाली असा खोटा मेसेज पसरवला गेला त्यामुळे त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सोसावा लागला. त्यामुळे असे मेसेज टाकताना काळजी घ्यावी. 

Sunday, August 26, 2018

प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायक

प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायक 

          प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर दोनशे वर्षांपासून अस्तित्वात आहे. १९ नोव्हेंबर १८०१ रोजी मंदिराचा पहिला जीर्णोद्धार झाला. जुने मंदिर चुना-विटांनी बांधलेले होते. श्रीसिद्धिविनायकाची मूर्ती काळ्या पाषाणाची असून तिची उंची अडीच फूट आणि रुंदी दोन फूट आहे. मूर्ती उजव्या सोंडेची असून, तिच्या वरच्या एका हातात कमळ व दुसऱ्या हातात परशू, खालील उजव्या हातात जपमाळ तर डाव्या हातात मोदकाची वाटी आहे. गळ्यात सर्पाकृती जानवे आहे. पाषाणाच्या मखरात कोरलेल्या श्रीसिद्धिविनायकाच्या बाजूंना रिद्धी-सिद्धी या ऐश्वर्य, भरभराट, समृद्धी व मांगल्य यांचे प्रतीक असलेल्या देवता उभ्या आहेत. मूर्तीच्या कपाळावर शंकराच्या तृतीय नेत्राप्रमाणे नेत्र कोरलेला आहे. मुकुट सोनेरी असून, संपूर्ण मूर्ती रक्तगंधानुलीप्त सजविलेली आहे. रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती अत्यंत आकर्षक आहेत. 
          मंदिराची अलीकडेच नयनरम्य व सुबक प्रासाद वास्तू बांधण्यात आली असून, तिच्यावरील कळस प्रतिष्ठापना व कुंभाभिषेक सोहळा शारदापीठाचे शंकराचार्य जगद्गुरू भारतीतीर्थ महास्वामी यांच्या हस्ते १३ जून १९९४ रोजी विधिपूर्वक पार पडला. नूतनीकरण करताना जुन्या मंदिराचा कळस व्यवस्थितरीत्या उतरवून सभामंडपात ठेवण्यात आला. मात्र श्रीसिद्धिविनायकाची मूर्ती मूळ स्थानापासून न हलविता वस्तू बहुमजली बांधून गाभाऱ्यावरील प्रत्येक मजल्यावर वेष्टित भिंती बांधून कळसापर्यंत मोकळी जागा राहील याची काळजी घेण्यात आली आहे. प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन भाविकांना घेता आले नाही तरी दिड हजार किलो वजनाच्या बारा फूट उंच अश्या प्रचंड सोनेरी कळसाचे दर्शन घेतल्यानंतर 'श्रीं' चे दर्शन घेतल्याची प्रचिती येते. नव्या मंदिराचा गाभारा विस्तीर्ण असून त्याला पाच दरवाजे आहेत. प्रमुख तीन दरवाजे आहेत, त्यांची उंची तेरा फूट आहे. त्यामुळे सभामंडपातून तसेच पोटमाळ्यावरून 'श्रीं' चे दर्शन घेता येते. 
          मंदिराचा गाभारा अष्टकोनी असून त्यात दहा फूट रुंद व नऊ फूट उंचीचे चांदीचे मखर बसविलेले आहे. घुमट सुवर्णविलेपनाने आकर्षित दिसेल असा तयार केला आहे. पाच हजार लोलकांचे मोठे झुंबर लावण्यात आले आहे. मंदिराच्या वास्तूमधील पहिला मजला हा पोटमाळा म्हणून पूजा व दर्शनासाठी उपयोगात आणला जातो. दुसऱ्या मजल्यावर महानैवेद्य बनविण्यासाठी स्वयंपाकगृह व ब्रह्मवृंदासाठी विश्रांतीगृह आहे. तिसऱ्या मजल्यावर मंदिराचे केंद्रीय कार्यालय आहे. अध्यक्ष कक्ष, अधिकाऱ्यांच्या, सदस्यांच्या आणि विश्वस्तांच्या होणाऱ्या सभेकरिता समिती कक्ष, तसेच संगणक कक्षही आहे. चौथ्या मजल्यावर ग्रंथालय असून तेथे धार्मिक, शैक्षणिक, ललितवाङ्मय, वैद्यक, तंत्रशास्त्र, अर्थशास्त्र आदी विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिका आहे. मंदिराच्या मुख्य शिखरावरील बारा फुटी कळसाव्यतिरिक्त पाच फूट उंचीचे तीन व साडेतीन फुटांचे तेहतीस असे एकूण सदतीस सुवर्णविलेपित कळस आहेत. 
श्रीसिद्धिविनायकाची आकर्षक मूर्ती 


श्रीसिद्धिविनायकाची आरती 














Saturday, August 25, 2018

मोरूची मावशी फेम विजय चव्हाण यांचे निधन

मोरूची मावशी फेम विजय चव्हाण यांचे निधन 

          मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेते विजय चव्हाण यांचे दिनांक २४ ऑगष्ट २०१८ रोजी फुफ्फुसाच्या आजाराने निधन झाले. त्यांनी मुंबईतल्या मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात वयाच्या ६३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 
             विजय चव्हाण यांना प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेल्या मोरूची मावशी या नाटकातील मावशीच्या स्त्री भूमिकेमुळे ओळखले जाते. या नाटकातील चव्हाण यांचे "टांग टिंग टींगा कि टांग टिंग टींगा" हे गाणे प्रसिद्ध झाले. या नाटकाचे दोन हजार प्रयोग झाले. या नाटकामुळे विजय चव्हाण यांना मावशीच्या भूमिकेमुळे एका उंचीवर नेवून ठेवले. 
          विजय चव्हाण यांचा अभिनय क्षेत्रात प्रवेश अपघातानेच झाला. त्याचे असे झाले कि, कॉलेजच्या नाटकात काम करणारा एक कलाकार आजारी पडला. अशा वेळी विजय चव्हाण यांना नाटकात काम करायला सांगितले. हे नाटक यशस्वी झाले आणि सुरु झाला विजय चव्हाण यांच्या अभिनयाचा प्रवास. खरे तर त्यांनी कॉलेजची गरज म्हणून नाटकात काम केले. नंतर पुन्हा एकदा कॉलेजच्यावतीने एका यूथ फेस्टिवलमध्ये विजय चव्हाण यांनी एकांकिकेत भाग घेतला. यातील भूमिकेबद्दल त्यांना बक्षीसही मिळाले. 
          विजय चव्हाण, अभिनेते विजय कदम व अन्य एक मित्र  या तिघांनी मिळून "रंगतरंग" नावाची नाटयसंस्था सुरु केली. त्यानंतर विजय चव्हाण यांची लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी ओळख झाली. बेर्डेनीच पुरुषोत्तम बेर्डेना टूरटूर नाटकाबद्दल विजय चव्हाण यांचे नाव सुचवले. त्यामुळे त्यांना टूरटूर नाटक करायला मिळाले. या नाटकामुळेच त्यांना "हयवदन" हे नाटक मिळाले. हे नाटक बघूनच सुधीर भट यांच्याकडून विजय चव्हाण यांना "मोरूची मावशी" नाटकाबद्दल बोलावणे आले. या आलेल्या संधीचे चव्हाण यांनी सोने केले. या नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडविला. या नाटकामुळे विजय चव्हाण यांची मोरूची मावशी म्हणून एक वेगळी ओळख झाली. मोरूची मावशी म्हणाले कि विजय चव्हाण यांचेच नाव डोळ्यासमोर येते. विजय चव्हाण यांनी हि भूमिका अजरामर केली. विजय चव्हाण व मोरूची मावशी हे नाते घट्ट झाले होते. विजय चव्हाण यांच्या जाण्याने मोरूची मावशी पोरकी झाली. 
विजय चव्हाण 

 

               
विजय चव्हाण यांचे फेमस गाणे 









Friday, August 24, 2018

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती 

          श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व सत्यशील प्रस्थ होते. पुण्यातील बुधवारपेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची राहायची इमारत होती. त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ. लक्षुमीबाई हे दोघेही  दुःखी झाले. दरम्यानच्या काळात त्यांचे गुरु श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले कि, आपण काही काळजी करू नका, आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा व त्यांची रोज पूजा करा. हि दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्ज्वल करते त्याप्रमाणे हि दोन दैवते तुमचे नाव उज्ज्वल करतील. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेटजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली. ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती. त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, श्री. मोरप्पाशेठ गाडवे उर्फ काका हलवाई, नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव, नारायणराव भुजबळ, रामराव बुटलेर, गणपतराव विठोजी शिंदे, सरदार परांजपे, शिवरामपंत परांजपे, गोपाळराव रायकर, नारायणराव दरोडे यांसह सर्व थरातील लोकांनी या समारंभाला हजेरी लावली होती. गणपतीची हि पहिली मूर्ती शुक्रवार पेठीतील अकरा मारुती मंदिरात ठेवलेली आहे. व तिची नित्य नियमाने पूजा चालू असते. 
           सन १८९४ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. सन १८९६ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला. दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. परंतु त्यांनी सुरु केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी व तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरु ठेवली. त्याकाळी हा गणपती बाहुलीच्या हौदाचा सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जात होता. या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तरुण मंडळ करीत होते. सध्या हि मूर्ती आपल्या कोंढवा येथील बाबुराव गोडसे पिताश्री वृद्धाश्रमातील मंदिरात आहे. 
           सन १८९६ साली बनवलेल्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती. त्यामुळे सन १९६७ साली आपल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सवानिमित्त तत्कालीन सुवर्णयुग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणपतीची नवीन मूर्ती बनविण्याचा संकल्प केला व त्यासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार श्री. शिल्पी यांना पाचारण केले. त्यांच्याकडून लहान मातीची मूर्ती नमुना म्हणून करून घेतली. बाळासाहेब परांजपे यांनी कार्यकर्त्यांना ती मूर्ती प्रोजेक्टरवरून मोठ्या पडदयावर दाखविली व सर्वानुमते ती आधीच्या मूर्तीसारखी असल्याची खात्री पटल्यानंतर मोठया मूर्तीचे काम प्रत्यक्षात सुरु झाले. पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर श्री. शिल्पी यांनी त्याकाळी जे ग्रहण झाले त्या दिवशी संगम घाटावर ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली. गणेश यंत्राची पूजा केली व त्यानंतर ज्या ठिकाणी मातीची मूर्ती तयार केली होती, त्याच ठिकाणी येऊन विधिवत धार्मिक गणेश याग केला, व त्यानंतर ते सिद्ध श्रीयंत्र मंगलमूर्तीच्या पोटामध्ये सर्वांसमक्ष ठेवले. शिल्पी यांनी जमलेल्या लोकांना या मंगलमूर्तीची तुम्ही सर्वांनी दररोज नित्य नियमाने पूजा करा व त्याचे शेवटपर्यंत पावित्र्य राखा असे सांगितले. त्याकाळी हि मूर्ती बनविण्याचा खर्च सुमारे ११२५/- (एक हजार एकशे पंचवीस रुपये फक्त) इतका आला होता. 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती 
दगडूशेठ गणपतीची आरती 

















Tuesday, August 21, 2018

श्री क्षेत्र गणपतीपुळे

श्री क्षेत्र गणपतीपुळे 

               भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर गणपतीपुळे हे स्वयंभू देवस्थान असून, येथील श्री गणेशाला या देशाची पश्चिमद्वार देवता म्हणून ओळखले जाते. या श्री गणेशाची स्थापना परशुरामाने केली असा प्राचीन ग्रंथात उल्लेख आढळतो. गणपतीपुळे मंदिरात गणपतीची स्वयंभू प्रतिमा असली तरी हा संपूर्ण डोंगर श्रीगणेशाचे स्वरूप असल्याचे मानण्यात येते. 
               या गणपतीबाबत एक आख्यायिका अशी सांगितली जाते कि इसवी सन १६०० वर्षांपूर्वी बाळंभटजी भिडे नावाचे खोत या गावात राहत होते. एकदा त्यांच्यावर संकट आले असता त्यांनी गणपतीची आराधना केली. त्यावेळी त्यांच्या स्वप्नात गणपतीने दृष्टांत दिला कि, "मी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी गणेशगुळे येथून प्रकट झालो आहे." तेव्हा खोतांनी सर्व परिसराची साफसफाई केली असता दोन गंडस्थळे व दंतयुक्त स्वरूप धारण केलेली अशी गणेशाची मूर्ती आढळून आली. खोतांनी या मूर्तीची पूजाअर्चा सुरु केली. कालांतराने येथे मंदिर स्थापन झाले. 
               हे गणेश मंदिर डोंगराच्या पश्चिम बाजूस पायथ्याशी आहे. गणेश मंदिराचा मुख्य दरवाजा उत्तरेस आहे. त्यातून आत प्रवेश केल्यावर देवाचा मुख्य गाभारा लागतो. गाभारा पश्चिमाभिमुख आहे. गाभाऱ्यात पूर्वेकडील बाजूस मध्यभागी कमानदार खोबणीत श्रींची शिळा आहे. या शिळेला शेंदूर लावून व गंध-फुलांनी गणेशाची ओंकारयुक्त सोंड व इतर अवयव रेखून त्याची पूजाअर्चा केली जाते. समुद्र किनाऱ्यावर वसलेले श्रीगणेशाचे हे स्वयंभू स्थान. मंदिरामागच्या संपूर्ण टेकडीला श्रीगणेशरूप मानून तिच्याभोवती भाविक प्रदक्षिणा घालतात. हा प्रदक्षिणा मार्ग दगडी असून गोविंदपंत बुंदेले यांनी बांधला आहे. हा मार्ग एक किलोमीटर लांबीचा आहे. या वाटेवर 'शुंडास्थान' असून येथे दगडामध्ये गणेशाची सोंड साकारलेली आहे. 
               मंदिराबाहेरील किनारा समुद्राच्या भरती-ओहोटीच्या रूपात पुळणीने तयार झाल्यामुळे या गणेशाला 'पुळ्याचा गणपती' असे म्हणतात. तर या गावास 'गणपतीपुळे' असे म्हणतात. मंदिरासमोर बारा किलोमीटर लांबीचा रुपेरी वाळूचा समुद्रकिनारा आहे. भरतीच्या वेळी मंदिराच्या पायथ्याला समुद्राचे पाणी स्पर्शून जाते. दरवर्षी फेब्रुवारी व नोव्हेंबर महिन्यात मावळतीच्या सूर्याची सोनेरी किरणे श्रींच्या मूर्तीवर पडतात. गणपतीपुळे प्रमाणेच गणेशगुळे हेही गणेशाचे स्थान आहे. या दोन्ही ठिकाणी गणेश चतुर्थीस गणेश मूर्ती घरी बसविण्याची प्रथा नाही. 


गणपतीपुळेचा गणपती 


गणपतीची आरती 


गणपतीचे आकर्षक मंदिर 













Monday, August 20, 2018

अंजर्लेचा कड्यावरचा गणपती

अंजर्लेचा कड्यावरचा गणपती 

               आंजर्ले हे रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकाठी वसलेले एक गाव. या गावी कड्यावरचा गणपती हे प्रसिद्ध व पुरातन सिद्धिविनायक मंदिर आहे. दापोलीपासून २० कि.मी. अंतरावर उंच कड्यावर असलेले हे मंदिर पेशवे काळाच्याही आधीपासूनच आहे असे सांगण्यात येते. किनाऱ्यावर आंजर्लेश्वर हे शम्भूमहादेवाचे तसेच सिद्धिविनायकाचे अशी दोन मंदिरे होती. जसजशी समुद्राची पातळी वाढू लागली, तसतसे हे मंदिर पाण्यात जाऊ लागले. तेंव्हा गणपतीने आपला मुक्काम जवळच्याच एका कड्यावर हलविला. मंदिराच्या वाटेवर एक पावलाचा ठसा उमटला आहे. गणपतीचे पाऊल म्हणून भक्तिभावाने या पावलाच्या ठशाची पूजा केली जाते. या मंदिराचा जीर्णोद्धार १७८४ साली झाला असून या मंदिराचे नूतनीकरण १९९१ साली झाले. मंदिराच्या चारही कोपऱ्यांवर पुरातन बकुळ वृक्ष असून वनस्पती शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हे वृक्ष सहाशे वर्षांपूर्वीचे आहेत. आंजर्ले गावातून जोग नदीची खाडी ओलांडून गेले कि सुमारे २५० पायऱ्या चढून गेल्यावर एक पठार लागते. मंदिरात सहा फूट उंचीचा एक दगडी तट आहे. गाभाऱ्यातील मूर्ती पूर्वाभिमुख असून मंदिराच्या बांधणीवर वेगवेगळ्या काळातील म्हणजे मोगल, रोमन, गॊथिक शैलींचा प्रभाव दिसतो. गणेशाची मूर्ती पाच फूट उंचीची असून उजव्या सोंडेची आहे तसेच हि मूर्ती सिंहासनावर विराजमान झालेली आहे. मूर्ती बेसाल्ट दगडापासून बनवलेली असून तैलरंगाने रंगविलेली आहे. मूर्तीच्या बाजूला रिद्धी सिद्धी च्या सुमारे एक फूट उंचीच्या मूर्ती आहेत. आवर्जून पाहण्याजोगे असे हे कोकणातील श्रीगणेशाचे एक धार्मिक स्थान आहे. 
 अंजर्लेचा गणपती 



गणपतीचे मंदिर 





तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...