Tuesday, August 21, 2018

श्री क्षेत्र गणपतीपुळे

श्री क्षेत्र गणपतीपुळे 

               भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर गणपतीपुळे हे स्वयंभू देवस्थान असून, येथील श्री गणेशाला या देशाची पश्चिमद्वार देवता म्हणून ओळखले जाते. या श्री गणेशाची स्थापना परशुरामाने केली असा प्राचीन ग्रंथात उल्लेख आढळतो. गणपतीपुळे मंदिरात गणपतीची स्वयंभू प्रतिमा असली तरी हा संपूर्ण डोंगर श्रीगणेशाचे स्वरूप असल्याचे मानण्यात येते. 
               या गणपतीबाबत एक आख्यायिका अशी सांगितली जाते कि इसवी सन १६०० वर्षांपूर्वी बाळंभटजी भिडे नावाचे खोत या गावात राहत होते. एकदा त्यांच्यावर संकट आले असता त्यांनी गणपतीची आराधना केली. त्यावेळी त्यांच्या स्वप्नात गणपतीने दृष्टांत दिला कि, "मी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी गणेशगुळे येथून प्रकट झालो आहे." तेव्हा खोतांनी सर्व परिसराची साफसफाई केली असता दोन गंडस्थळे व दंतयुक्त स्वरूप धारण केलेली अशी गणेशाची मूर्ती आढळून आली. खोतांनी या मूर्तीची पूजाअर्चा सुरु केली. कालांतराने येथे मंदिर स्थापन झाले. 
               हे गणेश मंदिर डोंगराच्या पश्चिम बाजूस पायथ्याशी आहे. गणेश मंदिराचा मुख्य दरवाजा उत्तरेस आहे. त्यातून आत प्रवेश केल्यावर देवाचा मुख्य गाभारा लागतो. गाभारा पश्चिमाभिमुख आहे. गाभाऱ्यात पूर्वेकडील बाजूस मध्यभागी कमानदार खोबणीत श्रींची शिळा आहे. या शिळेला शेंदूर लावून व गंध-फुलांनी गणेशाची ओंकारयुक्त सोंड व इतर अवयव रेखून त्याची पूजाअर्चा केली जाते. समुद्र किनाऱ्यावर वसलेले श्रीगणेशाचे हे स्वयंभू स्थान. मंदिरामागच्या संपूर्ण टेकडीला श्रीगणेशरूप मानून तिच्याभोवती भाविक प्रदक्षिणा घालतात. हा प्रदक्षिणा मार्ग दगडी असून गोविंदपंत बुंदेले यांनी बांधला आहे. हा मार्ग एक किलोमीटर लांबीचा आहे. या वाटेवर 'शुंडास्थान' असून येथे दगडामध्ये गणेशाची सोंड साकारलेली आहे. 
               मंदिराबाहेरील किनारा समुद्राच्या भरती-ओहोटीच्या रूपात पुळणीने तयार झाल्यामुळे या गणेशाला 'पुळ्याचा गणपती' असे म्हणतात. तर या गावास 'गणपतीपुळे' असे म्हणतात. मंदिरासमोर बारा किलोमीटर लांबीचा रुपेरी वाळूचा समुद्रकिनारा आहे. भरतीच्या वेळी मंदिराच्या पायथ्याला समुद्राचे पाणी स्पर्शून जाते. दरवर्षी फेब्रुवारी व नोव्हेंबर महिन्यात मावळतीच्या सूर्याची सोनेरी किरणे श्रींच्या मूर्तीवर पडतात. गणपतीपुळे प्रमाणेच गणेशगुळे हेही गणेशाचे स्थान आहे. या दोन्ही ठिकाणी गणेश चतुर्थीस गणेश मूर्ती घरी बसविण्याची प्रथा नाही. 


गणपतीपुळेचा गणपती 


गणपतीची आरती 


गणपतीचे आकर्षक मंदिर 













No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...