अंजर्लेचा कड्यावरचा गणपती
आंजर्ले हे रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकाठी वसलेले एक गाव. या गावी कड्यावरचा गणपती हे प्रसिद्ध व पुरातन सिद्धिविनायक मंदिर आहे. दापोलीपासून २० कि.मी. अंतरावर उंच कड्यावर असलेले हे मंदिर पेशवे काळाच्याही आधीपासूनच आहे असे सांगण्यात येते. किनाऱ्यावर आंजर्लेश्वर हे शम्भूमहादेवाचे तसेच सिद्धिविनायकाचे अशी दोन मंदिरे होती. जसजशी समुद्राची पातळी वाढू लागली, तसतसे हे मंदिर पाण्यात जाऊ लागले. तेंव्हा गणपतीने आपला मुक्काम जवळच्याच एका कड्यावर हलविला. मंदिराच्या वाटेवर एक पावलाचा ठसा उमटला आहे. गणपतीचे पाऊल म्हणून भक्तिभावाने या पावलाच्या ठशाची पूजा केली जाते. या मंदिराचा जीर्णोद्धार १७८४ साली झाला असून या मंदिराचे नूतनीकरण १९९१ साली झाले. मंदिराच्या चारही कोपऱ्यांवर पुरातन बकुळ वृक्ष असून वनस्पती शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हे वृक्ष सहाशे वर्षांपूर्वीचे आहेत. आंजर्ले गावातून जोग नदीची खाडी ओलांडून गेले कि सुमारे २५० पायऱ्या चढून गेल्यावर एक पठार लागते. मंदिरात सहा फूट उंचीचा एक दगडी तट आहे. गाभाऱ्यातील मूर्ती पूर्वाभिमुख असून मंदिराच्या बांधणीवर वेगवेगळ्या काळातील म्हणजे मोगल, रोमन, गॊथिक शैलींचा प्रभाव दिसतो. गणेशाची मूर्ती पाच फूट उंचीची असून उजव्या सोंडेची आहे तसेच हि मूर्ती सिंहासनावर विराजमान झालेली आहे. मूर्ती बेसाल्ट दगडापासून बनवलेली असून तैलरंगाने रंगविलेली आहे. मूर्तीच्या बाजूला रिद्धी सिद्धी च्या सुमारे एक फूट उंचीच्या मूर्ती आहेत. आवर्जून पाहण्याजोगे असे हे कोकणातील श्रीगणेशाचे एक धार्मिक स्थान आहे.
अंजर्लेचा गणपती
गणपतीचे मंदिर
No comments:
Post a Comment