Saturday, September 28, 2019

अभिनयातील शहेनशाह -- अमिताभ बच्चन





अभिनयातील शहेनशाह -- अमिताभ बच्चन 

               नुकताच अभिनयातील उत्तुंग कामगिरीसाठी अमिताभ बच्चन यांना चित्रपट क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. त्यांना हा पुरस्कार मिळणे म्हणजे त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सलामच आहे. आज पंचाहत्तरी ओलांडली तरीही चित्रपट क्षेत्रात अमिताभ बच्चन आपले पाय घट्ट रोवून उभे आहेत. त्यांचा चित्रपट क्षेत्रातील अभिनय प्रवास म्हणजे एक दंतकथाच आहे. त्यांनी चित्रपट क्षेत्रातील सुरवातीच्या आलेल्या अपयशाने खचून न जाता स्वबळावर अभिनय कलेत इथपर्यंत मजल मारली. 
                अमिताभ यांची सुरवातीची रुपेरी पडद्यावरची कारकीर्द तशी चाचपडतच झाली. किरकोळ शरीरयष्टी व ताडमाड उंची यामुळे त्यांना चित्रपट क्षेत्रात काम दयायला कोणी तयार नव्हतं. त्यांच्या उंचीकडे बघून दिग्दर्शक त्यांना नाकारत होते. त्यांचा घोगरा व उंच आवाज असल्याने अमिताभ यांना आकाशवाणीवरही प्रवेश नाकारला गेला. त्यांचा पहिला चित्रपट सात हिंदुस्थानी साफ आपटला गेला. सत्तरच्या दशकात रुपेरी पडद्यावर चॉकलेट नायक व नायिकांचा जमाना होता. त्यांच्या प्रेमकहाण्या बघण्यासाठी लोक चित्रपटगृहात गर्दी करत होते त्यामुळे अमिताभ यांच्या अभिनयाकडे कुणाचे विशेष लक्ष जात नव्हते. आनंद चित्रपटातही राजेश खन्नाच्या अभिनयाची प्रशंसा केली गेली. 
                 त्यावेळी समाजात भवतालच्या परिस्थितीबद्दल अस्वस्थता, असंतोष होता. लोकांना अन्यायाविरुध्द लढणारा नायक पाहिजे होता. याच काळात सलीम-जावेद यांनी लिहिलेला जंजीर सिनेमा प्रदर्शित झाला आणि अमिताभच्या रूपानं अन्यायाविरुध्द लढणाऱ्या नायकाचा जन्म झाला. इथूनच त्यांची अँग्री यंग मॅन ची कारकीर्द सुरु झाली. गुंडाच्या खुर्चीवर लाथ मारून 'ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही' अशी तंबी देणारा हा अँग्री यंग मॅन प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवून गेला आणि त्यानंतरची चार दशकं हे वादळ चित्रपटसृष्टीत घोंगावत राहिलं. 
                          अमिताभ यांच्या  जंजीर, दीवार, शोले, नमक हलाल, मुकद्दर का सिकंदर, डॉन, शराबी, नसीब, सुहाग, सत्ते पे सत्ता, कुली, त्रिशूल, लावारीस, अमर अकबर अँथोनी, शहेनशाह  या चित्रपटातील भूमिका चांगल्याच गाजल्या. दीवारमध्ये गुंडाना गोडाऊनमध्ये बंद करून व चावी त्यांच्याच खिशात ठेवून धुलाई करणारा, शोले मध्ये मैत्रीला जगणारा, त्रिशूल मध्ये आपल्या आईवर अन्याय करणाऱ्या स्वतःच्या बापालाच आव्हान देणारा, शहेनशहामध्ये रात्री शहेनशहा बनून गुंडाना धडा शिकवणारा तसेच पिकू मध्ये प्रेक्षकांना मनोसक्त हसवणारा अशा विविध भूमिका अमिताभ यांनी साकारल्या. "ग्यारा मुलको कि पुलिस डॉन का इंतजार कर रही है, लेकिन डॉन को पकडना मुश्किल हि नही, नामूनकिन है,' हा डॉन मधील डॉयलॉग तर "रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप लगते है, नाम है शहेनशाह" हा शहेनशाह चित्रपटातील डॉयलॉग प्रचंड गाजला. 
                या महानायकाचं वैयक्तिक आयुष्यही अनेक चढ-उतारांनी भरलेलं आहे. कुली चित्रपटाचे चित्रीकरणाचे वेळेस हाणामारीचा प्रसंग चालू असताना पुनीत इस्सर यांचा ठोसा अमिताभ यांच्या पोटाला लागला. या अपघाताने त्यांना मृत्यूच्या दारात नेवून उभं केलं. मात्र अमिताभ या प्रसंगातूनही सुखरूप बाहेर पडले. त्यांनी एबीसीएल हि कंपनी स्थापन केली परंतु या कंपनीतही त्यांना आर्थिक फटका बसला. ते कर्जबाजारी झाले. परंतु कष्टाच्या जोरावर यातूनही ते बाहेर पडले. कौन बनेगा करोडपती सारखा टीव्ही शो त्यांनी स्वीकारला व आपल्या आवाजाच्या फेकीने व आदबशीर बोलण्याने टीव्ही शो प्रसिध्द केला. हा महानायक अजूनही न थकता, न दमता अथक काम करतो. 



























































                



















Sunday, September 15, 2019

अवीट गोडीचे गाणे -- राजसा जवळी जरा बसा




अवीट गोडीचे गाणे -- राजसा जवळी जरा बसा 

               काही गाणी अशी असतात कि कितीही ऐकली तरी मन भरतच नाही. ते गाणे परत परत ऐकावेसे वाटते. अशा गाण्यात गोडवा अधिक असतो. अशा गाण्यांचे स्वर कानावर पडले कि पाय आपोआपच थबकतात. अशा गाण्यांपैकी "राजसा जवळी जरा बसा" हे अवीट गोडीचे गाणे आहे. हे गाणे बैठकीची लावणी या प्रकारात मोडते. 
               कवी ना. धो. महानोर यांनी बरीच सुंदर मराठी गाणी लिहिली. त्यांच्या गाण्यांनी मराठी माणसाला चांगलीच भुरळ घातली. त्यांनी लिहिलेले "राजसा, जवळी जरा बसा" हे मनाला भुरळ घालणारे गाणे आहे. खरं तर हि शृंगारिक लावणी आहे. हि लावणी अश्लील न वाटता ऐकायला कानाला गोड वाटते. या लावणीला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या गोड आवाजात गाऊन साज चढवला आहे तर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिले आहे म्हणूनच अजूनही हे गीत मराठी माणसाच्या हृदयावर अधिराज्य गाजवते. 


  
राजसा, जवळी जरा बसा 
जीव हा पिसा तुम्हाविण बाई 
कोणता करू शिणगार सांगा तरी काही ।। धृ ।।

त्या दिशी करून दिला विडा 
पिचला माझा चुडा कहर भलताच 
भलताच रंगला काथ लाल ओठांत ।। १ ।।
राजसा ...
राजसा, जवळी जरा बसा 
जीव हा पिसा तुम्हाविण बाई 
कोणता करू शिणगार सांगा तरी काही 

ह्या तुम्ही शिकविल्या खुणा 
सख्या सजना, देह सकवार 
सोसता न येईल अशी दिली अंगार ।। २ ।।
राजसा ...
राजसा, जवळी जरा बसा 
जीव हा पिसा तुम्हाविण बाई 
कोणता करू शिणगार सांगा तरी काही 
 
मी ज्वार नवतीचा भार 
अंग जरतार ऐन हुरड्यात 
तुम्ही नका जाऊ साजणा हिवाळी रात ।। ३ ।।
राजसा ...
राजसा, जवळी जरा बसा 
जीव हा पिसा तुम्हाविण बाई 
कोणता करू शिणगार सांगा तरी काही 















 

Saturday, September 14, 2019

आनंद व्दिगुणीत करणारा केरळवासीयांचा सण -- ओणम


रांगोळी काढताना महिला

 
ओणम सणादिवशी केळीच्या पानात वाढलेले भोजन



ओणम सणाच्या आनंदाप्रीत्यर्थ नृत्य करणाऱ्या महिला


आनंद व्दिगुणीत करणारा केरळवासीयांचा सण -- ओणम

            आपल्याइथे जशी दिवाळी साजरी केली जाते तसेच केरळमध्ये ओणम सण साजरा केला जातो. आपण दिवाळीत चकली, लाडू, करंजी असे गोडधोड पदार्थ करतो व आपल्या जवळच्या आप्तेष्टांना, नातेवाईकांना बोलावून खायला देतो तसेच केरळमध्ये लज्जतदार व गोडाधोडाचे पदार्थ बनवून आपल्या जवळच्या आप्तेष्टांना, नातेवाईकांना खायला देतात त्याबरोबर बदाम, पिस्ते, चारोळे घालून विशिष्ठ प्रकारची केलेली खीर प्यायला देतात त्यालाच ते पायसम म्हणतात. या दिवसात केरळवासीय नृत्य, संगीत, महाभोज यासारख्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करतात तसेच एकमेकांना शुभेच्छा देऊन आपला आनंद व्दिगुणीत करतात. 
              केरळमध्ये ओणम सणाचे महत्व फार आहे. आपल्याइथे दिवाळीचा सण ५ दिवस साजरा करतात तसेच केरळमध्ये १० दिवस पारंपारिक पद्धतीने साजरा करतात. शेतात धान्य उगवल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ हा सण साजरा केला जातो. ओणमच्या पहिल्या दिवसाला "अथम" म्हणतात तर शेवटच्या दिवसाला "थिरुओणम" असे म्हणतात. या दिवसात केरळवासीय घराला रंगरंगोटी करतात. महिला फुलांनी घर सजवतात. या सणादरम्यान मंदिरात तसेच प्रत्येक घरात पारंपारिक पद्धतीने पुजापाठ केला जातो. 
            राजा महाबली याच्या आदराप्रीत्यर्थ ओणम सण साजरा केला जातो. असे म्हणले जाते कि, थिरुओणम या दिवशी वर्षातून एकदा असुर राजा महाबली त्याच्या प्रजेला भेटण्यासाठी पाताळामधून धरतीवर अवतरतो. त्याला खुश करण्यासाठी आंबटगोडचे विविध पदार्थ बनवले जातात. देवाला या पदार्थांचा नैवेद्द दाखवला जातो व सगळे मिळून सामूहिक भोजन करतात. या दिवसात केळीच्या पानात भोजन करण्याची प्रथा आहे. 
            आम्ही लोणंदला असताना आमचे शेजारी नायर कुटुंब राहायला होते. त्यांनी आम्हाला ओणम सणाबद्दल माहिती व महत्व सांगितले. ओणम सणादिवशी त्यांच्या पारंपारिक पद्धतीने केळीच्या पानावर जेवण वाढले. जेवण झाल्यावर पायसम प्यायला दिले. पायसमची चव गोड व लज्जतदार होती. त्यांनी घरासमोर फुलांची छान रांगोळी घातली होती. त्या दिवसात त्यांचे घर उत्साहाने व आनंदाने भरून गेले होते. आम्ही त्यांना ओणम सणाबद्दल शुभेच्छा दिल्या व त्यांच्या आनंदात सहभागी झालो.




































              

Monday, September 9, 2019

श्री विठ्ठल संजीवनी अमृत

 


श्री विठ्ठल संजीवनी अमृत 

          श्री विठ्ठल हे शब्द केवळ संजीवनी अमृतच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, "ह्या विठ्ठल रंगानेच मी सर्वांगाने रंगून गेलो."
          तुकाराम महाराज जस-जसे विठ्ठल भक्तीत रमू लागले तसे त्यांच्या संसाराच्या साऱ्या चिंता मिटू लागल्या. त्यांना संसारातील पाशातून मुक्ती मिळाली. त्यांच्यावर कोसळलेल्या आपत्तींमुळे ते दु:खी झाले होते. जीवनातील त्यांचा रसच संपून गेला होता परंतु विठ्ठल भक्तीमुळे, नामस्मरणामुळे त्यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले. मोह,माया, मत्सर, क्रोध या गोष्टींपासून अलिप्त झाले. त्यांनी आपले सारे जीवनच विठ्ठलाला अर्पण केले. ते पूर्णतः विठ्ठलमय झाले. विठ्ठलाशी एकरूप झाले. विठ्ठलमुळे त्यांचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. ते संत पदापर्यंत पोचले. विठ्ठलाचे भजन-कीर्तन करणे, त्याचे नामस्मरण करणे, त्याची सतत भक्ती करणे हाच त्यांचा दररोजचा नित्यक्रम चालू झाला व यातूनच त्यांना आनंद मिळू लागला. जगातील इतर क्षणिक सुखांपेक्षा कितीतरी पटींनी त्यांना विठ्ठलनामामुळे सुख प्राप्त झाले. म्हणूनच ते म्हणतात कि श्री विठ्ठल ह्या एका शब्दापुढे सर्व सुखे फिकी पडतात. 
          श्री विठ्ठल ह्या शब्दातच एवढे चैतन्य साठवले आहे कि हे नाव घेतले कि साऱ्या चिंता मिटून जातात. दु:खे नाहीशी होतात. संकटे कुठल्याकुठे पळून जातात. श्री विठ्ठल म्हणजे पर्मोच्च आनंद आहे. जीवनामृत आहे. विठ्ठलनामातच मधुर रस आहे. हा रस कितीही प्याला तरी समाधान होत नाही. तुकाराम महाराजांनी तर विठ्ठलनामाला संजीवनी अमृतच म्हणले आहे. यावरूनच विठ्ठलनामाची किती महती आहे हे दिसून येते. 


Saturday, September 7, 2019

अवीट गोडीचे गाणे -- अष्टविनायका तुझा महिमा कसा

 


 
अवीट गोडीचे गाणे -- अष्टविनायका तुझा महिमा कसा

          अष्टविनायका तुझा महिमा कसा हे अष्टविनायक चित्रपटातील गीत आहे. अष्टविनायक हा चित्रपट १९७९ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक राजदत्त होते तर निर्माता सचिन पिळगावकर यांचे वडील शरद पिळगावकर होते. या चित्रपटात सचिन पिळगावकर, वंदना पंडित, रमेश भाटकर, शरद तळवळकर, वसंतराव देशपांडे, पद्मा चव्हाण, राजा गोसावी यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटातील गाणी शांता शेळके, शांताराम नांदगावकर, जगदीश खेबुडकर, मधुसुदन कालेलकर यांनी लिहिली असून अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर, वसंत देशपांडे यांनी गायली आहेत. अनिल-अरुण यांनी संगीत दिले आहे. 
           अष्टविनायका तुझा महिमा कसा हे गीत सचिन पिळगावकर व वंदना पंडित यांच्यावर चित्रित झाले आहे. हे गीत जगदीश खेबुडकर यांनी लिहिले असून अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, शरद जांभेकर,
चंद्रशेखर गाडगीळ, मल्लेश यांनी हे गीत गायले आहे. या गीताला अनिल मोहिले यांनी संगीत दिले आहे. या गीताचे वैशिष्ठय म्हणजे आठ गणपतींची माहिती दिली आहे तसेच अशोक सराफ, उषा चव्हाण, रवींद्र महाजनी, आशा काळे, सुधीर दळवी, जयश्री गडकर यांनाही या गाण्यात सहभागी करून घेतले आहे. 

             या गाण्याचा किस्साही मजेशीर आहे. अष्टविनायकांवर गाणे तयार करण्यासाठी शरद पिळगावकर जगदीश खेबूडकरांकडे गेले व त्यांना म्हणाले कि, "मी अष्टविनायकांवर गाणे तयार करत आहे. मला गाणे लिहून दया." जगदीश खेबुडकर म्हणाले, "मला तर अष्टविनायकांबद्दल काहीच माहिती नाही." शरद पिळगावकर म्हणाले, "काही काळजी करू नका. हे पुस्तक वाचा व यावरून तुमचे गाणे तयार करा." शरद पिळगावकरांनी खेबूडकरांच्या हाती अष्टविनायकाचे पुस्तक सोपवले व गाणे लिहायला सांगितले. खेबूडकरांनी ते पुस्तक वाचले व त्यावरून एका रात्रीत हे अवीट गोडीचे गाणे तयार झाले. अजूनही हे गाणे श्रोत्यांना मंत्रमुग्ध करते. 

 स्वस्तिश्री गणनायकं गजमुखं मोरेश्वर सिद्धीदम्‌
बल्लाळं मुरुडं विनायकं मढं चिंतामणी थेवरम्‌
लेण्यांद्रिं गिरीजात्मजं सुवरदंविघ्नेश्वरं ओझरम्‌
ग्रामोरांजण स्वस्थित: गणपती कुर्यात्‌ सदा मंगलम्‌

जय गणपती गुणपती गजवदना
आज तुझी पूजा देवा गौरीनंदना
कुडी झाली देऊळ छान काळजात सिंहासन
काळजात सिंहासन मधोमधी गजानन
दोहीकडे रिद्धिसिद्धि उभ्या ललना

अष्टविनायका तुझा महिमा कसा
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा

गणपती, पहिला गणपती
मोरगावचा मोरेश्वर लई मोठं मंदिर
अकरा पायरी हो अकरा पायरी हो
नंदी कासव सभामंडपी नक्षी सुंदर
शोभा साजरी हो शोभा साजरी हो
मोऱ्या गोसाव्यानं घेतला वसा

गणपती, दुसरा गणपती
थेऊर गावचा चिंतामणी
कहाणी त्याची लई लई जुनी
काय सांगू डाव्या सोंड्याचं नवाल केलं साऱ्यांनी
विस्तार त्याचा केला थोरल्या पेशव्यानी
रमा बाईला अमर केलं वृंदावनी
जो चिंता हरतो मनातली चिंतामणी
भगताच्या मनी त्याचा अजूनी ठसा

गणपती, तिसरा गणपती
सिद्धिविनायका तुझं सिद्धटेक गाव रं
पायावरी डोई तुझ्या भगताला पाव रं
दैत्यामारु कैकवार गांजलं हे नगर
विष्णुनारायण गाई गणपतीचा मंतर
टापूस मेलं नवाल झालं टेकावरी देऊळ आलं
लांबरुंद गाभाऱ्याला पितळेचं मखर
चंद्र सूर्य गरुडाची भोवती कलाकुसर
मंडपात आरतीला खुशाल बसा

गणपती, चौथा गणपती
पायी रांजणगावचा देव महागणपती
दहा तोंड हिचं हात जणू मूर्तीला म्हणती
गजा घालितो आसन डोळं भरुन दर्शन
सूर्य फेकी मूर्तीभर वेळ साधून किरण
किती गुणगान गावं किती करावी गणती
पुण्याईचं दान घ्यावं ओंजळ पसा

गणपती, पाचवा गणपती
ओझरचा इघ्नेश्वर लांब रुंद होई मूर्ती
जड जवाहीर त्याचं काय सांगू शिरीमंती
डोळ्यामंदी माणकं हो हिरा शोभतो कपाळा
तहानभूक हरपती हो सारा बघून सोहळा
चारी बाजू तटबंदी मधी गणाचं मंदिर
इघ्नहारी इघ्नहर्ता स्वयंभू जसा

गणपती, सहावा गणपती
लेण्याद्री डोंगरावरी नदीच्या तीरी
गणाची स्वारी तयार गिरिजात्मक हे नाव
दगडामंदी कोरलाय्‌ भक्तिभाव
रमती इथे रंका संगती राव
शिवनेरी गडावर जल्म शिवाचा झाला हो
लेण्याद्री गणानी पाठी आशिर्वाद केला हो
पुत्राने पित्याला जन्माचा प्रसाद दिला हो
किरपेने गणाच्या शिवबा धाऊनी आला हो
खडकात केले खोदकाम दगडात मंडपी खांब
वाघ सिंह हत्ती लई मोठं दगडात भव्य मुखवट
गणेश माझा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा
आणि गिरिजात्मज हा तिनं बनवला पुतळा मातीचा
दगडमाती रुपदेवाचं लेण्याद्री जसा

सातवा गणपती राया
महड गावाची महसूर वरदविनायकाचं तिथं एक मंदिर
मंदिर लई सादसूद जसं कौलारू घर
घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची कळसाच्यावर
सपनात भक्ताला कळं देवळाच्या मागं आहे तळं
मूर्ती गणाची पाण्यात मिळं त्यानी बांधलं तिथं देऊळ
दगडी महिरप सिंहासनी या प्रसन्न मंगलमूर्ती हो
वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो
चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा

आठवा आठवा गणपती आठवा
पाली गावच्या बल्लाळेश्वरा आदिदेव तू बुद्धीसागरा
स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमूख सूर्यनारायण करी कौतुक
डाव्या सोंडेचे रूप साजिरे कपाळ विशाळ डोळ्यात हिरे
चिरेबंद या भक्कम भिंती देवाच्या भक्तीला कशाची भीती
ब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसा

मोरया मोरया मंगलमूर्ती, मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया
मोरया मोरया चिंतामणी मोरया, मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया
मोरया मोरया महागणपती मोरया, मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया
मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया, मोरया मोरया वरदविनायक मोरया
मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया, मोरया मोरया अष्टविनायक मोरया




 

महिला क्रिकेट मधील "राज" -- मिताली राज



महिला क्रिकेट मधील "राज" -- मिताली राज 

               हवाई दलातून निवृत्त झालेल्या वडिलांनी तिला सिकंदराबाद येथील क्रिकेट प्रशिक्षण वर्गात पाठवले. तेव्हा ती मैदानाबाहेर उभी राहून भावाचा सराव बघायची. भावाचा सराव संपला कि त्याच्या हातातील बॅट घेऊन मैदानाच्या चारी बाजूला चेंडू मारत बसायची. तिची चेंडू मारण्याची पद्धत पाहून प्रशिक्षकांनी तिच्यातील गुणवत्ता हेरली व तिला प्रशिक्षण दयायला सुरवात केली. यातूनच तिला क्रिकेटची गोडी लागली. आज ती महिला क्रिकेटमध्ये उत्कृष्ठ फलंदाज म्हणून ओळखली जाते. तिने दोन दशके महिला क्रिकेटवर "राज" केले. या महिला क्रिकेट खेळाडूचे नाव मिताली राज होय. मितालीचा जन्म जोधपूर, राजस्थान येथे ३ डिसेंबर १९८२ रोजी झाला. मितालीचा जन्म तमिळ कुटुंबात झाला. तिचे वडीलांचे नाव दोराज राज तर आईचे नाव लीला राज आहे. तिचे वडील हवाई दलातून (इंडियन एअर फोर्स) निवृत्त झाले. 
           मितालीच्या क्रिकेट कारकिर्दीला १९९९ मध्ये झालेल्या आयर्लंड विरुद्धच्या एकदिवशीय सामान्यापासून सुरवात झाली. या सामन्यात तिने ११४ धावांची नाबाद शतकी खेळी साकारली. त्यानंतर तीन वर्षांनी तिला कसोटी खेळण्याची संधी मिळाली. पहिल्या कसोटीत ती शून्यावर बाद झाली परंतु दुसऱ्या कसोटीत तिने अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर तिने आपल्या बॅटचा करिष्मा दाखवायला सुरवात केली. फलंदाजीच्या जोरावरच तिला भारतीय महिला क्रिकेटचे कर्णधारपद मिळाले. पहिल्याच विश्वचषक स्पर्धेतील न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात तिने नाबाद ९१ धावांची खेळी साकारत भारताला अंतिम फेरीत नेले. कसोटी क्रिकेटमध्ये २१४ धावांची खेळी करत दुहेरी शतक करण्याची कामगिरी केली. तिच्या फलंदाजीमुळेचे तिला "महिला क्रिकेट मधील लेडी सचिन तेंडुलकर" हि उपाधी मिळाली. 
               मिताली आपल्या क्रिकेट कारकिर्दीत १० कसोटी सामने खेळली. यात ५१ च्या सरासरीने १ शतक व ४ अर्धशतकांसह ६६३ धावा केल्या. २०३ एकदिवशीय सामन्यात ५१.२९ च्या सरासरीने ७ शतक व ५२ अर्धशतकांसह ६७२० धावा केल्या. ८९ टी - २० सामन्यात ३७.५२ च्या सरासरीने १७ अर्धशतकांसह २३६४ धावा केल्या. मितालीने ३२ टी - २० सामन्यात देशाचे नेतृत्व केले असून यात श्रीलंका (२०१२), बांगलादेश (२०१४) आणि भारत (२०१६) मध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेचा समावेश आहे. मितालीने २०२१ मधील होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी टी - २० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. भारताला विश्वकरंडक जिंकून देणे हे तिचे स्वप्न आहे. तिच्या जबरदस्त खेळामुळे २००३ साली अर्जुन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले तर २०१५ साली पदमश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मिताली क्रिकेटमध्ये येऊ पहाणाऱ्या अनेक तरुण मुलींची रोलमॉडेल बनली आहे.




































Friday, September 6, 2019

सांगली संस्थानचा गणपती -- चोर गणपती


सांगली संस्थानचा गणपती -- चोर गणपती 

          सांगलीत गणेश चतुर्थीच्या आधी संस्थानच्या गणपती मंदिरात लाकडी मूर्ती बसवली जाते. हाच चोर गणपती कारण हा केव्हा बसतो हेच कळत नाही. त्यानंतर गणेश चतुर्थीला सांगली संस्थानच्या उत्सवाला सुरवात होते. 
          सन १८९९ मध्ये राजवैदय सांभारे यांनी गणेशाची  प्रतिष्ठापना केली. या उत्सवात व्याख्यान व कीर्तनाचा कार्यक्रम झाला. या गणेशाची मूर्ती सुरवातीला शाडूची बनवण्यात आली होती. तिची प्रतिष्ठापना चतुर्थीला व्हायची; पण मूर्ती भंगल्यामुळे ती होऊ शकली नाही. त्यानंतर ११ फूट उंच व ७ फूट रुंदीची पांगिरा लाकडापासूनची मूर्ती बनवण्यात आली. आमराईतून ते लाकूड आणले गेले. या मूर्तीची स्थापना दशमीदिवशी झाली. 
          आधी चोर गणपती, नंतर संस्थानचा मुख्य गणपती, शेवटी सांभारेंचा गणपती अशी सांगलीच्या प्रतिष्ठापनेची परंपरा आहे. गजानन मिल गणेशोत्सवात पारंपरिक पद्धतीने कर्मचारी व मुद्दाम तयार करून घेतलेल्या हत्तीसोबत मिरवणूक काढली जाते. दैवज्ञ ब्राह्मण समाजातही महिला पारंपरिक नऊवारी साडी नेसून, दागिने घालून गजाननाच्या पालखीचे स्वागत करतात.  विजयंता मंडळाने लोककलेला प्राधान्य दिले. 
               पाचव्या दिवशी संस्थानच्या मिरवणुकीत लाकडी रथातून मिरवणूक निघते. ती दरबार हॉलमधून मुख्य रस्त्यावरून निघून गणपती मंदिरात येते. मंदिरातून सरकारी घाट येथे श्रींचे विसर्जन होते. मिरवणूक पाहण्यासाठी जिल्हाभरातून लोक येतात.
















तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...