महिला क्रिकेट मधील "राज" -- मिताली राज
हवाई दलातून निवृत्त झालेल्या वडिलांनी तिला सिकंदराबाद येथील क्रिकेट प्रशिक्षण वर्गात पाठवले. तेव्हा ती मैदानाबाहेर उभी राहून भावाचा सराव बघायची. भावाचा सराव संपला कि त्याच्या हातातील बॅट घेऊन मैदानाच्या चारी बाजूला चेंडू मारत बसायची. तिची चेंडू मारण्याची पद्धत पाहून प्रशिक्षकांनी तिच्यातील गुणवत्ता हेरली व तिला प्रशिक्षण दयायला सुरवात केली. यातूनच तिला क्रिकेटची गोडी लागली. आज ती महिला क्रिकेटमध्ये उत्कृष्ठ फलंदाज म्हणून ओळखली जाते. तिने दोन दशके महिला क्रिकेटवर "राज" केले. या महिला क्रिकेट खेळाडूचे नाव मिताली राज होय. मितालीचा जन्म जोधपूर, राजस्थान येथे ३ डिसेंबर १९८२ रोजी झाला. मितालीचा जन्म तमिळ कुटुंबात झाला. तिचे वडीलांचे नाव दोराज राज तर आईचे नाव लीला राज आहे. तिचे वडील हवाई दलातून (इंडियन एअर फोर्स) निवृत्त झाले.
मितालीच्या क्रिकेट कारकिर्दीला १९९९ मध्ये झालेल्या आयर्लंड विरुद्धच्या एकदिवशीय सामान्यापासून सुरवात झाली. या सामन्यात तिने ११४ धावांची नाबाद शतकी खेळी साकारली. त्यानंतर तीन वर्षांनी तिला कसोटी खेळण्याची संधी मिळाली. पहिल्या कसोटीत ती शून्यावर बाद झाली परंतु दुसऱ्या कसोटीत तिने अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर तिने आपल्या बॅटचा करिष्मा दाखवायला सुरवात केली. फलंदाजीच्या जोरावरच तिला भारतीय महिला क्रिकेटचे कर्णधारपद मिळाले. पहिल्याच विश्वचषक स्पर्धेतील न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात तिने नाबाद ९१ धावांची खेळी साकारत भारताला अंतिम फेरीत नेले. कसोटी क्रिकेटमध्ये २१४ धावांची खेळी करत दुहेरी शतक करण्याची कामगिरी केली. तिच्या फलंदाजीमुळेचे तिला "महिला क्रिकेट मधील लेडी सचिन तेंडुलकर" हि उपाधी मिळाली.
मिताली आपल्या क्रिकेट कारकिर्दीत १० कसोटी सामने खेळली. यात ५१ च्या सरासरीने १ शतक व ४ अर्धशतकांसह ६६३ धावा केल्या. २०३ एकदिवशीय सामन्यात ५१.२९ च्या सरासरीने ७ शतक व ५२ अर्धशतकांसह ६७२० धावा केल्या. ८९ टी - २० सामन्यात ३७.५२ च्या सरासरीने १७ अर्धशतकांसह २३६४ धावा केल्या. मितालीने ३२ टी - २० सामन्यात देशाचे नेतृत्व केले असून यात श्रीलंका (२०१२), बांगलादेश (२०१४) आणि भारत (२०१६) मध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेचा समावेश आहे. मितालीने २०२१ मधील होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी टी - २० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. भारताला विश्वकरंडक जिंकून देणे हे तिचे स्वप्न आहे. तिच्या जबरदस्त खेळामुळे २००३ साली अर्जुन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले तर २०१५ साली पदमश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मिताली क्रिकेटमध्ये येऊ पहाणाऱ्या अनेक तरुण मुलींची रोलमॉडेल बनली आहे.
No comments:
Post a Comment