सावळे सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयी माझे ।। १ ।।
आणिक काही इच्छा आम्हां नाही चाड । तुझे नाम गोड पांडुरंगा ।। २ ।।
जन्मोजन्मी ऐसें मागितले तुज । आम्हांसी सहज दयावे आता ।। ३ ।।
तुका म्हणे तुज ऐसे जी दयाळ । धुंडिता सकळ नाहीं आम्हां ।। ४ ।।
ओवी : सावळे सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयी माझे ।। १ ।। आणिक काही इच्छा आम्हां नाही चाड । तुझे नाम गोड पांडुरंगा ।। २ ।।
अर्थ : हे देवा, तुझे सावळे, सुंदर व मन हरण करणारे जे रूप आहे, ते सर्व काळ माझ्या हृदयात राहो. हे पांडुरंगा, तुझे नाम फार गोड आहे. त्यावाचून दुसरी कोणतीही इच्छा नाही.
भावार्थ : तुकाराम महाराज विठ्ठलाची अंत:करणापासून भक्ती करू लागले. विठ्ठलाच्या नामस्मरणात, भजन-कीर्तनात तल्लीन होऊ लागले. त्यांचे जीवनच विठ्ठलमय होऊन गेले. विठ्ठलाशी एकरूप झाले. ते विठ्ठलाशी एवढे एकरूप झाले कि त्यांचा देह कोणता व विठ्ठलाचा कोणता हे ओळखता येईना. त्यांचे अंत:करण पवित्र व निर्मळ असल्याने विठ्ठलाने त्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले. विठ्ठल त्यांच्या हृदयात असल्याने त्यांना परमानंद झाला. विठ्ठलाने आता कायमच आपल्या हृदयात राहावे असे त्यांना वाटू लागले. म्हणूनच ते विठ्ठलाला म्हणतात कि, "तुझे सावळे, सुंदर व मनाला आकर्षित करणारे (हरण करणारे) मनोहरी असे रूप आहे ते कायमच (निरंतर) माझे हृदयात राहो.
तुकाराम महाराज विठ्ठलाची भक्ती करू लागल्यापासून त्यांचे तोंडात सतत विठ्ठलाचे नाव असायचे. ते विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग असायचे. जेवताना, झोपताना, काम करत असतानासुद्धा ते विठ्ठलाचे नाव घ्यायचे. विठ्ठलाचे नाव घेतल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. 'विठ्ठल-विठ्ठल', 'पांडुरंग-पांडुरंग' असा नामघोष त्यांच्या तोंडातून सतत निघत असे. असे अमृताहून गोड नाव त्यांना आवडू लागले होते. म्हणूनच ते विठ्ठलाला म्हणतात कि, "हे पांडुरंगा, तुझे नाम फार गोड आहे व हेच नाम माझे मुखात सतत राहो. या नामावाचून तोंडात कुठलाही अपशब्द येऊ नये अशी मनापासून इच्छा आहे."
ओवी : जन्मोजन्मी ऐसें मागितले तुज । आम्हांसी सहज दयावे आता ।। ३ ।। तुका म्हणे तुज ऐसे जी दयाळ । धुंडिता सकळ नाहीं आम्हां ।। ४ ।।
अर्थ : त्याप्रमाणे तुला आम्ही जन्मोजन्मी मागत आलो, म्हणून ते आता तरी आम्हाला सहज दयावे. तुकाराम महाराज म्हणतात, "अहो देवा, तुमच्यासारखे दयावंत सर्व ठिकाणी शोध करून पाहिले असताही आम्हास कोणी दिसत नाही."
भावार्थ : तुकाराम महाराज विठ्ठलाला विनवणी करतात कि, आम्ही तुला जन्मोजन्मी मागत आलो म्हणजेच तुझे गोड नाम आहे ते सतत मुखात राहो, तुझे सावळे, सुंदर, मनोहारी रूप निरंतर माझे हृदयात राहो, तुझा सतत सहवास घडो, माझे हातून तुझी सेवा घडो तसेच माझेकडून तुझी भक्ती घडो. या सर्व गोष्टी तुम्ही आम्हास सहज दयाव्यात. यापेक्षा वेगळे काही आम्हाला नको आणि तुम्ही ते दयाल कारण तुमच्यासारखे दयाळु (दयावंत), कृपावंत या ठिकाणी शोध करून पाहिले असताही कोणी दिसत नाही.
No comments:
Post a Comment