Friday, December 30, 2022

तुकाराम महाराज गाथा -- माझी भक्ति भोळी । एकविध भावबळी ।।

 


 तुकाराम महाराज गाथा -- माझी भक्ति भोळी । एकविध भावबळी ।।


माझी भक्ति भोळी । एकविध भावबळी ॥१॥
मी कां पडेन निराळा । ऐसा सांडूनि सोहळा ॥२॥
आतां अनारिसा । तेथे न व्हावें सहसा ॥३॥
तुका म्हणे जोडुनि पाय । पुढें उगा उभा राहें ॥४।। 

ओवी : माझी भक्ति भोळी । एकविध भावबळी ॥१॥ मी कां पडेन निराळा । ऐसा सांडूनि सोहळा ॥२॥

अर्थ : माझी भक्ती भोळी असून एकनिष्ठ आणि बळकट भावाची आहे, अशा प्रकारचा सोहळा टाकून मी कशाकरिता भक्ती सोहळ्यापासून वेगळा होऊ?

भावार्थ : तुकाराम महाराजांची भक्ती ही अंतःकरणापासून केलेली आहे. या भक्तीत कुठलाही स्वार्थभाव नाही किंवा देवाकडून काहीतरी प्राप्त व्हावे यासाठी केलेली भक्ती नाही. या भक्तीत देवाबद्दल प्रेम आहे. तुकाराम महाराज विठ्ठलाबद्दल एकनिष्ठ आहेत म्हणजेच त्यांच्यावर  कुठलेही संकट येवो अगर एखादी आपत्ती कोसळो या प्रसंगातही ते विठ्ठलाशी एकनिष्ठ राहतात. विठ्ठलाशी एकनिष्ठ असलेने त्यांचे मनात फक्त विठ्ठलाचे व त्याचे भक्तीविषयी विचार असतात. 

          कुठलाही सोहळा हा आनंद देणारा, मनाला समाधान देणारा असतो तसेच तुकाराम महाराजांचा भक्तीमय सोहळासुद्धा मनाला आनंद व समाधान देणारा आहे. या भक्तिमय सोहळ्यात तुकाराम महाराज आनंदाने भजन-कीर्तनात नाचत असतात, गात असतात. विठुनामाच्या गजरात तल्लीन झालेले असतात. ते मनाने व देहाने विठ्ठलमय झालेले असतात. अशा या भक्तिमय सोहळ्यामूळे त्यांना सुख प्राप्त होते, आत्मिक समाधान मिळते. म्हणूनच ते म्हणतात कि, "अशा प्रकारचा सोहळा टाकून मी कशाकरिता भक्ती           सोहळ्यापासून वेगळा होऊ?"

ओवी : आतां अनारिसा । तेथे न व्हावें सहसा ॥३॥ तुका म्हणे जोडुनि पाय । पुढें उगा उभा राहें ॥४।। 

अर्थ : ह्या ठिकाणी सहसा कधी वेगळे होऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात, अहो देवा, तुम्ही पाय जुळवून आमच्या पुढे उगाच उभे रहा. 

भावार्थ : भक्तिमय सोहळ्यापासून आनंद मिळतो, आत्मिक समाधान मिळते. मन उत्साही, प्रफुल्लित राहते. सतत देवाकडे धाव घेते. भक्तिमय सोहळ्यामूळे जे सुख प्राप्त होते ते इतर दुसऱ्या कुठल्या गोष्टीमुळे प्राप्त होत नाही. तसेच या सोहळ्यामुळे देवाशी एकरूप होता येते. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, "ह्या ठिकाणी (भक्तिमय सोहळ्याठिकाणी) सहसा कधी वेगळे होऊ नये."

          तुकाराम महाराजांना विठ्ठलभक्तीमुळे व त्याच्या दर्शनामुळे सुख प्राप्त होत होते, आत्मिक समाधान मिळत होते. विठ्ठलाचे चरण जरी पाहिले तरी त्यांना आनंद होत होता, मन उत्साही, प्रफुल्लित होत होते. म्हणूनच ते विठ्ठलाला म्हणतात कि, "अहो देवा, तुम्ही पाय जुळवून आमच्या पुढे उगाच उभे रहा."

 

 

 

 

 

 

 

 

 

 









 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...