Saturday, February 24, 2024

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

 

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥

घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥
तुम्ही घ्या र डोळे सुख । पाहा विठोबाचे मुख ॥
तुम्ही ऐका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥
मना तेथे धाव घेई । राहे विठोबाचे पायी ॥
तुका म्हणे जीवा । नको सोडू या केशवा ॥
 
ओवी :
घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥
तुम्ही घ्या र डोळे सुख । पाहा विठोबाचे मुख ॥ 
 
अर्थ : हे माझे वाचे, तू विठोबाचे गोड नाव निरंतर घेत जा. अहो डोळे हो, तुम्ही विठोबाचे गोड मुख पहा आणि याचे सुख घ्या. 
भावार्थ : तुकाराम महाराज विठ्ठलभक्तीत रमू लागले होते. रात्रंदिवस ते विठ्ठलाची भक्ती करीत होते, त्याचे नामस्मरण घेत होते. विठ्ठलाच्या भजन-कीर्तनात तल्लीन होत होते. त्यांनी आपला संपूर्ण देहच विठ्ठलाला अर्पण केला होता. त्यांच्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या अंगठयापर्यंत विठ्ठल खेळत होता. त्यांची सर्व इंद्रिये विठ्ठलाच्या अधीन झाली होती. त्यांच्या नसानसात विठ्ठल होता तर त्यांच्या हृदयात विठ्ठलाने वास केला होता. त्यांचे मुखात सतत विठ्ठलाचे नाव असायचे, तर डोळ्यांनी विठ्ठलाचे सावळे, सुंदर, मनोहरी रूप पहायचे. मुखात विठ्ठलाचे गोड नाम असल्याने व डोळ्यांनी मनोहरी रूप पाहिल्याने त्यांच्या मनाला सुख प्राप्त व्हायचे, समाधान वाटायचे. मनाला आनंद वाटायचा. म्हणूनच ते म्हणतात कि, '' हे माझे वाचे, तू विठोबाचे गोड नाव निरंतर घेत जा. अहो डोळे हो, तुम्ही विठोबाचे गोड मुख पहा आणि याचे सुख घ्या."

ओवी :
तुम्ही ऐका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥
मना तेथे धाव घेई । राहे विठोबाचे पायी ॥ 
 
अर्थ : अहो कान हो, तुम्ही विठोबाचे नेहमी गुणानुवाद ऐकत जा. हे मना तू निरंतर तिकडेच धाव घे आणि विठोबाचे पायापाशी सतत राहा. 
भावार्थ : तुकाराम महाराजांचे मुखातून सतत विठ्ठलाचे गोड नाम बाहेर पडायचे तसेच सतत भजन-कीर्तनात तल्लीन असायचे. हे सुस्वर त्यांचे कानात सतत घुमायचे. विठ्ठलाचे गुणानुवाद ऐकायचा त्यांना छंदच लागला होता. कुठेही गेले तरी त्यांचे कानावर विठ्ठलनामाचे शब्द पडायचे त्यामुळे त्यांचे मन समाधानी, आनंदीत व्हायचे तसेच त्यांचे मन सतत विठ्ठल भक्तीकडे धाव घ्यायचे. त्यांचे मनातच विठ्ठल असायचा त्यामुळे त्यांना विठ्ठल दर्शनाची ओढ लागलेली असायची. पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतो व त्याच्या चरणांपाशी बसतो असे सतत त्यांचे मनात यायचे. म्हणूनच ते म्हणतात कि, "अहो कान हो, तुम्ही विठोबाचे नेहमी गुणानुवाद ऐकत जा. हे मना तू निरंतर तिकडेच धाव घे आणि विठोबाचे पायापाशी सतत राहा."
 
ओवी : तुका म्हणे जीवा । नको सोडू या केशवा ॥
 
अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवा, तू केशव देवाला टाकू नकोस. 
भावार्थ : तुकाराम महाराज आपल्या जीवाला सांगत आहेत कि, तू केशव देवाला म्हणजेच विठ्ठलाला टाकू नकोस. यातून त्यांना असे सांगायचे आहे कि, जो पर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत विठ्ठलाचे विस्मरण होऊ देऊ नको. त्याचे गोड नाम मुखात असू दे. त्याच्या भक्तीत खंड पडू देऊ नकोस. तुकाराम महाराज विठ्ठलाची अंतःकरणापासून भक्ती करत असत. त्यांची भक्ती अखंड चाललेली असे. विठ्ठल त्यांचा जीव कि प्राण होता. म्हणूनच ते म्हणतात कि, "माझ्या जीवा, तू केशव देवाला टाकू नकोस."












 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...