तुकाराम महाराज गाथा - अभंग - राहो आतां हेंचि ध्यान । डोळा मन लंपट ॥
राहो आतां हेंचि ध्यान । डोळा मन लंपट ॥१॥
कोंडकोंडुनि धरीन जीवें । देहभावें पूजीन ॥२।।
होईल येणें कळसा आलें । स्थिरावलें अंतरीं ॥३।।
तुका म्हणे गोजिरिया । विठोबा पायां पडों द्या ॥४॥
ओवी : राहो आतां हेंचि ध्यान । डोळा मन लंपट ॥१॥ कोंडकोंडुनि धरीन जीवें । देहभावें पूजीन ॥२।।
अर्थ : हे पांडुरंगाचे विटेवरील ध्यान माझ्या डोळ्यांपुढे जसेचे तसे राहो, आणि माझे मन त्याठिकाणी सक्त होवो. मग आपल्या जीवामध्ये त्या ध्यानाला कोंडून धरीन आणि मजमध्ये असणारा जो देहभाव, तो मी त्याला वाहून पूजा करीन.
भावार्थ : तुकाराम महाराज विठ्ठल भक्तीत, त्याचे नामस्मरणात अखंड बुडाले होते. विठ्ठलाच्या भक्तीरसात न्हाऊन निघत होते. भजन-कीर्तनात रंगून जात होते. त्यांनी विठ्ठलाला आपल्या अंतःकरणातच स्थान दिले होते. त्यांचे डोळ्यापुढे विठ्ठलाचे गोड गोजिरे रूप दिसत होते. कसे दिसत होते हे रूप तर डोक्यावर सोनेरी मुकुट परिधान केलेला, कानात मकरकुंडले घातलेली, कपाळी कस्तुरी मळवट भरलेला आहे, गळ्यात तुळशीमाळा घातलेल्या आहेत, कंठात कौस्तुभमणी झळकत आहे, कमरेला पितांबर नेसला आहे व त्याच्या तेजात सूर्यचंद्राच्या प्रभा लोपून गेल्या आहेत असे सावळे सुंदर विटेवर उभे राहिलेले रूप तुकाराम महाराजांना डोळ्यापुढे दिसत आहे व हे रूप (ध्यान) जसेच्या तसे डोळ्यांपुढे राहो असे त्यांना वाटत आहे. या विठ्ठलाच्या रूपावर आपले मन सक्त होवो (मन जडो) म्हणजेच विठ्ठलाच्या रूपावर आपले मन भाळले जावून विठ्ठलाबद्दल अधिकाधिक प्रेम वाढो असे त्यांना वाटत आहे.
तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या जीवामध्ये त्या ध्यानाला कोंडून धरीन म्हणजेच पांडुरंगाला आपल्या जीवामध्ये म्हणजेच मनामध्ये साठवून ठेवीन. हृदयाच्या गाभाऱ्यात पांडुरंगाला स्थान देईन. माझा संपूर्ण देह पांडुरंगाशी एकरूप होईल व मजमध्ये असणारा जो देहभाव म्हणजेच पांडुरंगाबद्दल असणारा भक्तिभाव, प्रेमभाव पांडुरंगाला वाहून त्याची पूजा करीन.
ओवी : होईल येणें कळसा आलें । स्थिरावलें अंतरीं ॥३।। तुका म्हणे गोजिरिया । विठोबा पायां पडों द्या ॥४॥
अर्थ : अशा प्रकारे ते ध्यान माझ्या अंतःकरणामध्ये स्थिर झाले, म्हणजे हि गोष्ट कळसाला आल्यासारखी होईल. तुकाराम महाराज म्हणतात, हे गोजिरवाण्या देवा, मला तुमच्या पाया पडू द्या.
भावार्थ : तुकाराम महाराज पांडुरंगाची अंतःकरणापासून भक्ती करत होते. रात्रंदिवस त्याचे नामस्मरणात, भजन कीर्तनात तल्लीन होत होते. त्यांनी आपल्या मनामध्ये विठ्ठलाला साठवले होते. हृदयात स्थान दिले होते. त्यांच्या अंतःकरणात पांडुरंगाशिवाय दुसऱ्या कुणालाही स्थान नव्हते. त्यांचे अंतःकरणातून पांडुरंगाचे ध्यान (रूप) निघू नये, ते कायमचे रहावे असे त्यांना वाटत होते म्हणूनच ते म्हणतात कि, पांडुरंगाचे ध्यान माझ्या अंतःकरणामध्ये स्थिर झाले म्हणजे हि गोष्ट कळसाला आल्यासारखी होईल. म्हणजेच पांडुरंगाची केलेली भक्ती, आराधना पूर्ण होईल.
तुकाराम महाराजांना पांडुरंगाचे गोजिरवाणे रूप डोळ्यासमोर दिसत आहे. या रूपावर ते भाळले आहेत. त्यांना पांडुरंगाबद्दल प्रेम वाटू लागले आहे. या प्रेमापोटीच त्यांना पांडुरंगाच्या पाया पडण्याचा मोह आवरता येईना. म्हणूनच ते पांडुरंगाला विनवणी करतात कि, हे गोजिरवाण्या देवा, मला तुमच्या पाया पडू द्या.
हे पांडुरंगाचे विटेवरील ध्यान माझ्या डोळ्यांपुढे जसेचे तसे राहो
No comments:
Post a Comment