बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिप क्रिकेट - १९८५ अंतिम सामना भारत विरुद्ध पाकिस्तान
अंतिम सामना - १० मार्च १९८५ (दिवस-रात्र)
भारत विरुद्ध पाकिस्तान
श्रीकांतच्या धडाकेबाज खेळीमुळे व रवी शास्त्रीच्या टिच्चून फलंदाजीमुळे भारत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स
हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, मेलबर्न येथे खेळवण्यात आला. या सामन्यात रेमंड इशरवूड (ऑस्ट्रेलिया) व टोनी क्राफ्टर (ऑस्ट्रेलिया) यांनी पंच म्हणून काम पाहिले. धडाकेबाज खेळीमुळे (७७ चेंडूत ६७ धावा) के श्रीकांतला सामनावीर पुरस्कार दिला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारताने न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला तर पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात दोन आशियाई व शेजारील देश चषकासाठी खेळत होते. हा सामना बघण्यासाठी ३५२९६ प्रेक्षकांनी उपस्थिती लावली. ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात नसूनसुद्धा इतक्या प्रेक्षकांनी उपस्थिती लावणे म्हणजे एक आश्चर्यच होते. अंतिम सामना जिंकून बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिप क्रिकेट चषकावर कुणाचे नाव कोरले जाणार याची उत्सुकता उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना व दूरदर्शनवरून बघणाऱ्या तमाम प्रेक्षकांना लागून राहिली होती. भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करत १९८३ ची विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे सर्व देशांचे लक्ष भारताकडे लागले होते. भारताने या स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी करत अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती त्यामुळे अंतिम सामन्यातही उत्कृष्ठ कामगिरी करून भारत चषकावर आपले नाव कोरणार का याची उत्सुकता तमाम प्रेक्षकांना लागून राहिली होती.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करायला सुरवात केली. डावाची सुरवात मुदस्सर नजर व मोहसीन खान यांनी केली. दोघांनी डावाची सुरवात सावध केली. धावसंख्या १७ झाली असताना मोहसीन खान अवघ्या ५ धावा काढून कपिल देवाच्या गोलंदाजीवर मोहमद अझरुद्दीनकडे झेल देऊन बाद झाला. धावसंख्या २९ झाली असताना कपिल देवने मुदस्सर नजरला १४ धावांवर यष्टीरक्षक विश्वनाथकडे झेल द्यायला लावून पाकिस्तानला झटका दिला. अशा तऱ्हेने कपिल देवने सलामीची जोडी २९ धावात तंबूत धाडली. कपिल देवनेच सुंदर चेंडू टाकून कासीम उमरला भोपळाही फोडू न देता त्रिफळाबाद करून आणखी एक झटका दिला. उमर बाद झाला तेव्हा पाकिस्तानची ३ बाद २९ अशी अवस्था झाली. धावसंख्या ३३ झाली असताना चेतन शर्माने रमीझ राजाला श्रीकांतकडे झेल द्यायला लावून पाकिस्तानला जबरदस्त हादरा दिला. रमीझ राजाला अवघ्या ४ धावा करता आल्या. अशा तऱ्हेने भारतीय गोलंदाजांनी विशेषतः कपिल देवने सुंदर गोलंदाजी करत ४ पैकी ३ बळी मिळवत ३३ धावात वरची फळी गारद करून पाकिस्तानला चांगेलच अडचणीत आणले.
पाकिस्तानचा संघ ४ बाद ३३ अशा अडचणीत सापडला असताना जावेद मियांदाद व इम्रान खान यांनी सावध व संयम राखून खेळायला सुरवात केली. त्यांनी एकेरी, दुहेरी धावसंख्येवर भर देत धावफलक हालता ठेवला. दोघांनी धावसंख्या १०१ पर्यंत नेली. दोघांच्यात ६८ धावांची भागीदारी झाली. हीच भागीदारी पाकिस्तानसाठी सर्वोच्च ठरली. हि जोडी टिकेल असे वाटत असतानाच इम्रान खान ३५ धावा (६७ चेंडू २ चौकार) काढून धावबाद झाला. सुनील गावस्करने अचूक फेकीने त्याला धावबाद केले. इम्रान खान बाद झाला तरी जावेद मियांदाद भारतीय गोलंदाजीचा समर्थपणे सामना करीत होता. त्याने सलीम मलिकला हाताशी धरून धावसंख्या १३१ पर्यंत नेली. दोघांच्यात ६ व्या गड्यासाठी ३० धावांची भागीदारी झाली. शिवरामकृष्णनने आपल्या फिरकी माऱ्याने सलीम मलिकला जाळ्यात ओढून चेतन शर्माकडे झेल द्यायला लावून बाद केले. मलिकने फक्त १४ धावा काढल्या. १३१ याच धावसंख्येवर शिवरामकृष्णनने जावेद मियांदादला चकवून यष्टीरक्षक विश्वनाथकरवी यष्टिचित करून महत्वाचा बळी मिळवला. जावेद मियांदादने सयंमी व सावध खेळी करत ९२ चेंडूत २ चौकार मारत ४८ धावा केल्या. पाकिस्तानसाठी याच धावा सर्वोच्च ठरल्या तसेच त्याने इम्रान खानबरोबर केलेली ६८ धावांची भागीदारी व सलीम मलिक बरोबर केलेली ३० धावांची भागीदारी पाकिस्तानसाठी मोलाची ठरली. जावेद मियांदाद बाद झाला तेव्हा पाकिस्तानची ७ बाद १३१ अशी अवस्था झाली.
जावेद मियांदाद बाद झाला तेव्हा पाकिस्तान चांगेलच दडपणाखाली होते कारण दीडशेच्या आत महत्वाचे खेळाडू तंबूत परतले होते. वसीम राजा व ताहीर नकाश खेळपट्टीवर होते. १४२ धावसंख्या झाली असताना ताहीर नकाश १० धावा काढून रवी शास्त्रीच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक विश्वनाथकडे झेल देवून बाद झाला. पाकिस्तान ८ बाद १४२. धावसंख्येत ३ धावांची भर पडल्यावर अनिल दलपत भोपळाही न फोडता शिवरामकृष्णनच्या गोलंदाजीवर रवी शास्त्रीकडे झेल देवून तंबूत परतला. दलपत बाद झाला तेव्हा पाकिस्तानची अवस्था ९ बाद १४५ अशी होती. पाकिस्तानचा डाव लवकर संपवण्याची संधी भारतीय गोलंदाजांकडे होती परंतु हि संधी वसीम राजा व अझीम हाफीज यांनी मिळू दिली नाही. दोघेही शेवटपर्यंत भारतीय गोलंदाजीचा सामना करीत धावसंख्या वाढवत होते. शेवटी त्यांनी ५० षटकात १७६ पर्यंत धावसंख्या नेली. दोघांनी नाबाद ३१ धावांची भागीदारी केली. वसीम राजा २१ धावा (२६ चेंडू १ चौकार) काढून नाबाद राहिला तर अझीम हाफीज ७ धावा काढून नाबाद राहिला. पाकिस्तानचा डाव ५० षटकात ९ बाद १७६ पर्यंत(३.५२ च्या धावगतीने) मर्यादित राहिला. भारतीय गोलंदाजांनी १८ अवांतर धावा (७ बाईज, ८ लेगबाय, २ नोबॉल, १ वाईड) देवून पाकिस्तानला धावसंख्या वाढवण्यास मदत केली.
भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ठ मारा करत पाकिस्तानला १७६ धावात रोखले. कपिल देवने उत्कृष्ठ मारा करत पाकिस्तानला पहिले तीन हादरे दिले. त्याच्या गोलंदाजीचे पृथ्थकरण असे होते ९ षटके १ निर्धाव २३ धावा ३ बळी. शिवरामकृष्णनने उत्कृष्ठ फिरकी मारा करत ९ षटकात ३५ धावा देत ३ गडी बाद केले. चेतन शर्मा व रवी शास्त्री यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
विजयासाठी ५० षटकात १७७ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या डावाची सुरवात रवी शास्त्री व के श्रीकांत यांनी केली. रवी शास्त्रीने सयंमी व सावध खेळी केली तर श्रीकांतने धडाकेबाज खेळी केली. दोघांनी मिळून पहिल्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली. या शतकी भागीदारीत महत्वाचा वाटा होता श्रीकांतचा. त्याने ७७ चेंडूत ६ चौकार मारत व २ उत्तुंग षटकार ठोकत जलदगती खेळी करत ६७ धावा केल्या. याच धावा भारतीय संघासाठी मोलाच्या ठरल्या तसेच त्याने शास्त्रीबरोबर केलेली १०३ धावांची भागीदारी भारतीय संघाच्या विजयाचा पाया घालून गेली. श्रीकांत बाद झाला तेव्हा भारताने १ बाद १०३ अशी मजल मारली होती. श्रीकांतच्या जागी मोहमद अझरुद्दीन खेळायला आला. त्याने व शास्त्रीने मिळून धावसंख्या १४२ पर्यंत नेली. दोघांच्यात उपयुक्त अशी ३९ धावांची भागीदारी झाली. अझरुद्दीन जलदगतीने खेळून धावा वाढवत होता. त्याने छोटी पण उपयुक्त खेळी खेळताना २६ चेंडूत ३ चौकार मारत २५ धावा केल्या. ताहीर नकाशने त्याला त्रिफळाबाद केले.
अझरुद्दीन बाद झाला तेव्हा भारताला विजयासाठी ३५ धावांची आवश्यकता होती व भारताचे ८ फलंदाज खेळायचे बाकी होते तसेच रवी शास्त्री एका बाजूला घट्टपणे पाय रोवून खेळपट्टीवर उभा होता व धावा वाढवत होता त्यामुळे भारत विजयाला कधी गवसणी घालणार व चषक आपल्या नावावर करणार याची एकच उत्सुकता तमाम भारतीय प्रेक्षकांना लागून राहिली होती. सर्व प्रेक्षक भारताच्या विजयाकडे डोळे लावून बसले होते व धावागणिक जल्लोष करीत होते. शेवटी शास्त्रीने व दिलीप वेंगसरकरने विजयासाठी उरलेल्या ३५ धावा काढून भारतीय प्रेक्षकांची उत्सुकता संपवली. भारताने उत्कृष्ठ खेळ करत ४७.१ षटकात २ गडी गमावत १७७ धावा करून पाकिस्तानवर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. ह्या विजयात महत्वाचा वाटा होता श्रीकांतचा. त्याने ७७ चेंडूत ६७ धावा केल्या. रवी शास्त्रीही संयमी फलंदाजी करत अफलातून खेळी खेळला. त्याने शेवटपर्यंत नाबाद राहात १४८ चेंडूंचा सामना करत ३ चौकार मारत उपयुक्त अशा ६३ धावा केल्या. दिलीप वेंगसरकरने १८ धावा करून विजयात खारीचा वाटा उचलला. फलंदाजीत व गोलंदाजीत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ठ व अफलातून कामगिरी करत बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिप ट्रॉफीवर (चषकावर) सुवर्णाक्षरांनी आपले नाव कोरले.
रवी शास्त्रीला 'स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू' म्हणून निवडण्यात आले तसेच त्याला बक्षीस म्हणून 'ऑडी १००' कार देण्यात आली. याच कार मधून भारतीय खेळाडूंनी मैदानावर फेरी मारली.
No comments:
Post a Comment