Friday, June 21, 2024

तुकाराम महाराज गाथा - अभंग - माझी विठ्ठल माउली । प्रेमें पान्हा पान्हाइली ॥

तुकाराम महाराज गाथा - अभंग - माझी विठ्ठल माउली । प्रेमेंपान्हा पान्हाइली ॥

माझी विठ्ठल माउली । प्रेमें पान्हा पान्हाइली ॥१॥
कुर्वाळूनि लावी स्तनीं । न वजे दुरी जवळूनि ॥२॥
केली पुरवी आळी । नव्हे निष्ठुर कोंवळी ॥३॥
तुका म्हणे घांस । मुखीं घाली ब्रम्हरस ॥४॥

ओवी : माझी विठ्ठल माउली । प्रेमें पान्हा पान्हाइली ॥१॥ कुर्वाळूनि लावी स्तनीं । न वजे दुरी जवळूनि ॥२॥

अर्थ : माझी विठ्ठल आई आहे ती मजविषयीच्या प्रेमपान्ह्याने पान्हावली आहे. मला कुरवाळून तिने आपल्या स्तनी लाविले आहे. ती माझ्या जवळून दूर जात नाही. 

भावार्थ : तुकाराम महाराजांचे व विठ्ठलाचे नाते वात्सल्याचे आहे. विठ्ठल तुकाराम महाराजांची आई आहे तर तुकाराम महाराज विठ्ठलाचे लेकरू. आई आपल्या लेकरावर मनापासून प्रेम करत असते म्हणूनच आपल्या लेकराला पाहिल्यावर तिला पान्हा फुटतो. लेकराला प्रेमाने कुरवाळून आपल्या स्तनाला लावून लेकरू तृप्त होईपर्यंत दूध पाजते. लेकरू दुध पिवून तृप्त झाले कि आईला समाधान होते. तसेच विठ्ठलालाही तुकाराम महाराजांना पाहिल्यावर प्रेमपान्हा फुटतो. म्हणजेच विठ्ठल तुकाराम महाराजांवर अतोनात प्रेम करतो. आपल्या प्रेमपान्ह्याने तुकाराम महाराजांना चिंब भिजवतो. तुकाराम महाराज तृप्त होत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर प्रेम करतो. जोपर्यंत तुकाराम महाराज तृप्त होत नाहीत, समाधान पावत नाहीत तोपर्यंत विठ्ठल त्यांच्यापासून दूर जात नाही.  

ओवी : केली पुरवी आळी । नव्हे निष्ठुर कोंवळी ॥३॥ तुका म्हणे घांस । मुखीं घाली ब्रम्हरस ॥४॥

अर्थ : मी जो जो म्हणून हट्ट करीत आहे तो तो ती पुरवीत आहे, कारण ती निष्ठूर नसून कनवाळू आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ती माझ्या तोंडामध्ये ब्रह्मरसाचा घास घालीत आहे. 

भावार्थ : विठ्ठल आपल्या भक्तांची आई असल्याने आपल्या भक्तांवर कधीच निष्ठूर नसते उलट आपल्या भक्तांबाबत प्रेमळ,कनवाळू असते. या प्रेमामुळेच विठ्ठल आपल्या भक्तांचे लाड करीत असतो. भक्त जे जे हट्ट करतील ते ते हट्ट प्रेमाने पुरवीत असतो. विठ्ठल तुकाराम महाराजांची आई झाल्याने त्यांच्याबाबतही प्रेमळ, कनवाळू आहे व या प्रेमापोटीच तुकाराम महाराज जे जे हट्ट करतील ते ते हट्ट लाडीकपणे पुरवीत असतो. तसेच आई जसे प्रेमाने आपल्या बाळाला घास भरविते तसेच विठ्ठलही तुकाराम महाराजांना प्रेमाने ब्रह्मरसाचा घास भरवीत आहे.  

 


No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...