Saturday, September 28, 2019

अभिनयातील शहेनशाह -- अमिताभ बच्चन





अभिनयातील शहेनशाह -- अमिताभ बच्चन 

               नुकताच अभिनयातील उत्तुंग कामगिरीसाठी अमिताभ बच्चन यांना चित्रपट क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. त्यांना हा पुरस्कार मिळणे म्हणजे त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सलामच आहे. आज पंचाहत्तरी ओलांडली तरीही चित्रपट क्षेत्रात अमिताभ बच्चन आपले पाय घट्ट रोवून उभे आहेत. त्यांचा चित्रपट क्षेत्रातील अभिनय प्रवास म्हणजे एक दंतकथाच आहे. त्यांनी चित्रपट क्षेत्रातील सुरवातीच्या आलेल्या अपयशाने खचून न जाता स्वबळावर अभिनय कलेत इथपर्यंत मजल मारली. 
                अमिताभ यांची सुरवातीची रुपेरी पडद्यावरची कारकीर्द तशी चाचपडतच झाली. किरकोळ शरीरयष्टी व ताडमाड उंची यामुळे त्यांना चित्रपट क्षेत्रात काम दयायला कोणी तयार नव्हतं. त्यांच्या उंचीकडे बघून दिग्दर्शक त्यांना नाकारत होते. त्यांचा घोगरा व उंच आवाज असल्याने अमिताभ यांना आकाशवाणीवरही प्रवेश नाकारला गेला. त्यांचा पहिला चित्रपट सात हिंदुस्थानी साफ आपटला गेला. सत्तरच्या दशकात रुपेरी पडद्यावर चॉकलेट नायक व नायिकांचा जमाना होता. त्यांच्या प्रेमकहाण्या बघण्यासाठी लोक चित्रपटगृहात गर्दी करत होते त्यामुळे अमिताभ यांच्या अभिनयाकडे कुणाचे विशेष लक्ष जात नव्हते. आनंद चित्रपटातही राजेश खन्नाच्या अभिनयाची प्रशंसा केली गेली. 
                 त्यावेळी समाजात भवतालच्या परिस्थितीबद्दल अस्वस्थता, असंतोष होता. लोकांना अन्यायाविरुध्द लढणारा नायक पाहिजे होता. याच काळात सलीम-जावेद यांनी लिहिलेला जंजीर सिनेमा प्रदर्शित झाला आणि अमिताभच्या रूपानं अन्यायाविरुध्द लढणाऱ्या नायकाचा जन्म झाला. इथूनच त्यांची अँग्री यंग मॅन ची कारकीर्द सुरु झाली. गुंडाच्या खुर्चीवर लाथ मारून 'ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही' अशी तंबी देणारा हा अँग्री यंग मॅन प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवून गेला आणि त्यानंतरची चार दशकं हे वादळ चित्रपटसृष्टीत घोंगावत राहिलं. 
                          अमिताभ यांच्या  जंजीर, दीवार, शोले, नमक हलाल, मुकद्दर का सिकंदर, डॉन, शराबी, नसीब, सुहाग, सत्ते पे सत्ता, कुली, त्रिशूल, लावारीस, अमर अकबर अँथोनी, शहेनशाह  या चित्रपटातील भूमिका चांगल्याच गाजल्या. दीवारमध्ये गुंडाना गोडाऊनमध्ये बंद करून व चावी त्यांच्याच खिशात ठेवून धुलाई करणारा, शोले मध्ये मैत्रीला जगणारा, त्रिशूल मध्ये आपल्या आईवर अन्याय करणाऱ्या स्वतःच्या बापालाच आव्हान देणारा, शहेनशहामध्ये रात्री शहेनशहा बनून गुंडाना धडा शिकवणारा तसेच पिकू मध्ये प्रेक्षकांना मनोसक्त हसवणारा अशा विविध भूमिका अमिताभ यांनी साकारल्या. "ग्यारा मुलको कि पुलिस डॉन का इंतजार कर रही है, लेकिन डॉन को पकडना मुश्किल हि नही, नामूनकिन है,' हा डॉन मधील डॉयलॉग तर "रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप लगते है, नाम है शहेनशाह" हा शहेनशाह चित्रपटातील डॉयलॉग प्रचंड गाजला. 
                या महानायकाचं वैयक्तिक आयुष्यही अनेक चढ-उतारांनी भरलेलं आहे. कुली चित्रपटाचे चित्रीकरणाचे वेळेस हाणामारीचा प्रसंग चालू असताना पुनीत इस्सर यांचा ठोसा अमिताभ यांच्या पोटाला लागला. या अपघाताने त्यांना मृत्यूच्या दारात नेवून उभं केलं. मात्र अमिताभ या प्रसंगातूनही सुखरूप बाहेर पडले. त्यांनी एबीसीएल हि कंपनी स्थापन केली परंतु या कंपनीतही त्यांना आर्थिक फटका बसला. ते कर्जबाजारी झाले. परंतु कष्टाच्या जोरावर यातूनही ते बाहेर पडले. कौन बनेगा करोडपती सारखा टीव्ही शो त्यांनी स्वीकारला व आपल्या आवाजाच्या फेकीने व आदबशीर बोलण्याने टीव्ही शो प्रसिध्द केला. हा महानायक अजूनही न थकता, न दमता अथक काम करतो. 



























































                



















No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...