अवीट गोडीचे गाणे -- सांज ये गोकुळी
'सांज ये गोकुळी' हे वजीर या चित्रपटातील गीत आहे. हे गीत सुधीर मोघे यांनी लिहिले असून या गीताला श्रीधर फडके यांनी संगीत दिले आहे. हे गीत आशा भोसले यांनी स्वरबध्द केले आहे. अश्विनी भावे यांच्यावर हे गीत चित्रित झाले आहे.
सांजवेळ झाली कि हळुहळू अंधारून येतं. सगळ्या सावल्या सावळ्या होत जातात. संध्याकाळ होत होत रात्रीकडे झुकू लागते. सांजवेळेला सावळ्या कृष्णाच्या सावलीची सुंदर उपमा दिली आहे. रानात चरायला गेलेल्या, वासराच्या ओढीने धूळ उडवीत भराभरा घराकडे चाललेल्या गायी, सावळ्या शामरंगात बुडालेले रस्ते, किलबिलाट करत आकाशातून घरट्याकडे उडत जाणारे पाखरांचे थवे, दूर कुठेतरी मंदिरात घुमणारा घंटानाद! या गीतातून कवीने किती सुंदर वर्णन केलं आहे संध्याकाळचं. दूर काळोखात गडद काजळाच्या रेघेसारखी दिसणारी पर्वताची रंग, डोहात पडलेलं सावळं चांदणं. या साऱ्याला अमृताच्या ओंजळी उधळीत जात मंद वाहणाऱ्या वाऱ्याच्या बासरीची उत्तम साथ लाभली आहे. या गीतातून कवीने केलेली अप्रतिम कल्पना दिसून येते.
सांज ये गोकुळी, सावळी सावळी
सावळ्याची जणू साउली
धूळ उडवीत गाई निघाल्या
श्यामरंगात वाटा बुडाल्या
परतती त्यासवे पाखरांचे थवे
पैल घंटा घुमे राउळी
पर्वतांची दिसे दूर रांग
काजळाची जणू दाट रेघ
होई डोहातले चांदणे सावळे
भोवती सावळ्या चाहुली
माउली सांज अंधार पान्हा
विश्व सारे जणू होय कान्हा
मंद वाऱ्यावरी वाहते बासरी
अमृताच्या जणू ओंजळी
No comments:
Post a Comment