Monday, October 7, 2019

पानिपतचा रणसंग्राम

 

 पानिपतचा रणसंग्राम 

          एखाद्याचा पूर्ण पराभव झाला कि, 'त्याचे पानिपत झाले' अशा आशयाची म्हण वापरली जाते. किंवा 'विश्वासराव गेला पानिपतात' असेही म्हणले जाते. १४ जानेवारी १७६१ रोजी झालेल्या पानिपतच्या लढाईला २५० वर्षे पूर्ण झाली तरी या म्हणींच्या निमित्ताने पानिपतच्या युध्दाच्या आठवणी ताज्या होतात. मराठे व अहमदशहा अब्दाली यांच्यात झालेले घनघोर युद्ध व या युद्धात मराठयांचा झालेला पूर्ण पराभव अजूनही विसरला जात नाही. 
            खरे तर मराठयांची गनिमी काव्याने लढून शत्रूचा पराभव करणे अशी ख्याती होती. त्याला कारण म्हणजे मनुष्यबळ व शस्त्रसाठा कमी. तसेच डोंगरकपारी व झाडेझुडपे यांचा पुरेपूर वापर. परंतु पानिपतची लढाई हि सपाट प्रदेशावर लढली गेली. गनिमी काव्याने लढायला पानिपतच्या प्रदेशावर साधी टेकडी नव्हती. जे लढायचे ते समोरासमोर. तरीही मराठ्यांनी आपल्या तलवारीची दहशत अब्दालीला बसवलीच. या युद्धाच्या वेळी मराठयांना बऱ्याच संकटांचा सामना करावा लागला. एकीकडे संकटे तर दुसरीकडे अब्दालीचे अफाट सैन्य. तरीही मराठे निकराने झुंज देत होते. परंतु त्यांचे दुर्दैव आड येत होते. शेवटी अब्दालीने मराठयांचा पूर्ण पराभव केला. 
            पानिपतच्या युद्धात मराठयांचा पराभव का झाला? त्याची कारणे कोणती? यासाठी पानिपतचे युद्धच डोळ्यासमोर आणले पाहिजे. म्हणजे मराठे त्वेषाने लढूनसुद्धा का जिंकू शकले नाहीत हे कळेल. 
             अब्दालीच्या आक्रमणापासून पातशाहीचे रक्षण करण्यासाठी मराठे पानिपतच्या दिशेने धावले. याची जबाबदारी रघुनाथरावांनी घ्यावी असे मराठा सरदारांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी १ कोटीच्या खजिन्याची मागणी केली. हि मागणी परवडत नसल्याने भाऊसाहेब पेशव्यांची या मोहिमेवर नियुक्ती झाली. भाऊसाहेब पेशव्यांनी लगेचच अब्दालीला धूळ चारण्यासाठी ५० हजार फौजेसह दिल्लीच्या दिशेने कूच केले. अयोध्येचा नवाब शोजाउद्देला, गुजरातचा कमाल उद्दिखान, बिजोसिंग, माधोसिंग, बुंदेलखंडचे हिंदू राजे या सर्वांना 'अब्दाली परकीय आहे, तो हिंदुस्थानावर राज्य करायला येतोय.' असे भाऊसाहेबांनी पत्रातून कळवले व मदतीसाठी आवाहन केले. परंतु यांनी कुणीही भाऊसाहेबांना प्रतिसाद दिला नाही. 
             १६ ऑक्टोबरला भाऊसाहेबांच्या सैन्याने अब्दालीच्या ६ हजार पठाणांना कापून काढत कुंजपुरा किल्ला जिंकला. कुंजपुऱ्याच्या पराभवाने संतापलेल्या अब्दालीने पानिपतजवळ नूरपूरला तळ ठोकला. मराठे अब्दालीसमोर दोन कोसांवर तळ ठोकून राहिले. दोन्ही सैन्यात किरकोळ चकमकी चालू होत्या. पंजाबातून आला सिंगाकडून येणारी रसद अब्दालीने बंद पाडली. मराठयांना रसदेचा पुरवठा करणारे गोविंदपंत बुंदेले अब्दालीच्या सैन्याशी झालेल्या चकमकीत धारातिर्थी पडले त्यामुळे मराठयांची रसद तुटली आणि छावणीत उपासमार होऊ लागली. जनावरांना दाणापाणी मिळणे अवघड झाले. बाहेरून रसद मिळण्याची शक्यताही मावळली. तशाही स्थितीत कडाक्याच्या थंडीत भाऊसाहेब, विश्वासराव आणि मराठयांचे सैन्य अब्दालीचा पराभव करायचा अशी इर्षा बाळगून होते. 
               छावणीत उपासमार सुरु होती तरी युद्धाची तयारी जोरात होती. भाऊसाहेबांनी सर्व सरदारांच्या समवेत चर्चा करून १४ जानेवारी मकर संक्रांत या दिवशी युद्धाला तोंड फोडायचा निर्णय घेतला. गोलाची लढाई करायचे ठरले. चंद्राकृती व्यूहरचनेत इब्राहिम गारद्याचा तोफखाना सर्वात पुढे, त्याशेजारी दामाजी गायकवाड, विठ्ठल शिवदेचे घोडदळ, भाऊसाहेब व विश्वासराव सर्वात पुढे नेतृत्व करणार होते. भाऊसाहेबांच्या मागे यशवंतराव पवार, समशेर बहाद्दर, सटवोजी जाधव, नाना पुरंदरे यांची पथके होती. त्यामागे जनकोजी शिंदेचे पथक होते. सर्वात पिछाडीला मल्हारराव होळकर होते. मराठे लढाईला तोंड फोडणार हे कळताच अब्दालीनेही पहाटेच युद्धाची तयारी केली. छावणीवर हल्ला होऊ नये आणि मराठयांना पळून जाता येऊ नये अशी तयारी त्याने केली. हिंदी रोहिल्याना त्याने मध्ये ठेवले. वजीर शाह अली खान याला हुजरातीच्या फौजेसमोर ठेवले. त्याच्या डाव्या बाजूस शूजाचा तोफखाना आणि ३ हजार सैन्य होते. डावीकडे नजीबखान १५ हजार बंदूकधारी पायदळासह होता. डाव्या बाजूस शहापसंद खान ५ हजार स्वारांसह होता. 
               सकाळी ९ ते ९.३० च्या दरम्यान इब्राहीमखानाने तोफेला बत्ती देऊन युद्धाला तोंड फोडले. इब्राहिमखानाच्या आगीसमोर अब्दालीच्या सैन्याचा पाडाव लागला नाही. हुजरातीच्या सैन्याने वजीराच्या तुकडयांवर जोरदार हल्ला चढवल्यामुळे शूजा आणि वजीराचे सैन्य पळून जाऊ लागले. दुपारी २ वाजेपर्यंत झालेल्या धुमश्चक्रीत मराठयांच्या बाजूने विजय झुकलेला होता. परंतु विठ्ठल शिवदे आणि गायकवाडांच्या फौजेने उतावीळपणा करून रोहिल्यांच्या फौजेवर धावून गेले व त्यांच्या बंदुकांनी नामोहरण झाले. हा गोंधळ झाल्यामुळे इब्राहिमखानाचा तोफखाना बंद पडला. 
               इब्राहिमखानाची ७ हजार गारद्यांची फौज जीव तोडून लढायला लागली. हातघाईची लढाई सुरु झाली. गारदी आणि रोहील्यांत तीन तास तुंबळ लढाई झाली. यात गारद्यांनी २० हजार पठाणांचे मुडदे पाडले. रोहिल्यांचे सैन्य यमुना तिराकडे पळायला लागले. विजयश्री मराठयांच्याकडे झुकलेली असतानाच, अब्दालीने ७ हजारांची उंटावरील बंदुकधाऱ्यांची राखीव फौज लढायला पुढे आणली. या नव्या हल्ल्याने मराठयांवर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्याने मराठे गोंधळून गेले. उपाशीपोटी लढत असलेले मराठे सैन्य दुपारपर्यंत थकले होते. त्यातच घोडयावर स्वार झालेल्या विश्वासरावांना गोळी लागली. ते खाली पडले आणि मराठयांचा धीर खचला. मराठी सैन्य वाट फुटेल तिकडे पळत सुटले. तरीही भाऊसाहेब लढत होते. तुकोजी शिंदेही धारातिर्थी पडला. शेवटी तर भाऊसाहेबांपाशी ७५ स्वार उरले होते. तशाही स्थितीत भाऊसाहेब लढाई जिंकण्याची उमेद बाळगून होते. दुपारी ४ वाजता लढाईचा रागरंग बदलला. पानिपतच्या रणमैदानावर मराठी सैन्य उरले नव्हते. मल्हाररावांसह पळून जाणाऱ्या मराठी सैन्याचा अब्दालीच्या सैन्याने पाठलाग करून दिसेल त्याला कापून काढले. अब्दालीच्या सैन्याने प्रचंड कत्तल केली. रणांगणावर प्रेताचे खच पडले होते. सुर्यास्तापर्यंत पानिपतच्या रणभूमीवर एकही लढवय्या मराठा शिल्लक नव्हता. मराठयांचा पूर्ण पराभव झाला त्याला कारण म्हणजे दिवसभर उपाशी पोटी राहून लढायचे त्यामुळे शेवटीशेवटी त्यांच्या अंगात त्राणच उरला नाही. भाऊसाहेबांनी लढता लढता आपला देह ठेवला तेव्हा ते अवघे ३० वर्षाचे होते व विश्वासराव अवघे १८ वर्षाचे होते. जरी हे युद्ध मराठे हरले तरी भाऊसाहेब व विश्वासराव यांच्या कर्तबगारीने हे युद्ध अजरामर झाले.







































































































No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...