Saturday, October 12, 2019

कथा लेखन स्पर्धा -- अस्तित्व(कथा लेखन स्पर्धेतील व्दितीय क्रमांकाची कथा)



 कथा लेखन स्पर्धा





अस्तित्व
(कथा लेखन स्पर्धेतील व्दितीय क्रमांकाची कथा)

        नमस्कार...! मी कोण? माझं नाव काय? मलाच ठाऊक नाही. तरीही मला आज बोलायचंय. मनातलं सगळं बोलून मोकळं व्हायचंय. मलाच माझं नाव माहीत नाही, स्वतःचं अस्तित्व सांगता येत नाही; असं म्हटल्यावर लगेच सगळे मला वेड्यात काढतील, हसतील; पण माझं म्हणणं ऐकून घ्यावंच लागेल. प्रत्येकालाच मला सांगता नाही येणार माझं कोणाशी काय नातं आहे हे... तरीही तुम्हाला सगळ्यांना माझं हे म्हणणं ऐकावं लागेल.

          खरं तर कोणाला दोष द्यावा; कोणाला नको हेच समजत नाही, पण खरं सांगा आई-बाबा माझी चूक काय होती.? नेमकं माझं काय चुकलं.? कुठे चुकलो मी.? एकदा सांगा फक्त एकदा... तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही भेटत गेलात, प्रेमाच्या  रसात बुडून हरवून गेलात. अगदी प्रत्येक वेळी जगाचं भान विसरून एकमेकांना समर्पित करत एकरूप होत गेलात. अगदी त्या प्रत्येक भेटीत कसलेही भान ठेवता कधी पावसात भिजता भिजता, कधी समुद्राकाठी असं कुठे, कुठे अन् कित्येकदा रंगलात एकमेकांच्या रंगात. पण.....

          फक्त शरीर रूपाने एकरूप होण्याकरिता; तुमच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्याकरता होत गेला एकरूप.. फक्त आणि फक्त शरीर सुखासाठी; यौवनातल्या भाराऊन येणार्या कित्येक भावनांच्या पिंजऱ्यात अडकत तुम्ही भावनांच्या पूर्तीसाठी भेटत राहिलात. जगाची, समाजाची बंधन विसरून यौवनक्रीडेत रममाण झालात आणि मनातल्या उफाळून येणाऱ्या भावनांचा जसा चुराडा होत गेला, त्या संपून गेल्यावर मात्र तुम्ही  तुमच्या सो कॉल्ड विचारांनी हा खेळ थांबवलात. मॅच्युरिटीचा आव आणत बंधनात अडकता तुम्ही हा शरीर खेळ... हो....! मी शरीर खेळच म्हणेन..!!!शरीर खेळ थांबवलात आणि त्याच वेळी माझ्या अस्तित्वाच बीज पेरून तुम्ही मात्र बंधन मुक्त झालात. नव्या पिढीची लिव्ह इन रिलेशन शिप...

          पण माझं काय माझ्या निर्माण झालेल्या त्या अस्तित्वाचा तुमच्यापैकी कोणीच विचार नाही केला; काहीच वाटलं नाही.?बाबांचं सोड.. आई तुला सुद्धा काही वाटू नये? तुझ्यातच निर्माण होणाऱ्या लहानग्या जीवाची तुलाच माया वाटू नये? एवढा पापी होतो का मी? माझं अस्तित्व? तुला जड होतं होत ? तुला नको होतं, तर मग आधीच का विचार नाही केला सुरक्षिततेचा.. माझ्याही अन तुमच्याही. आईला तर माझ्या अस्तित्वाची जाणिव पुरेशी ठरली माझा तिरस्कार करून माझं अस्तित्व संपवण्यासाठीक्षणभराचा विचार करता अगदी बाबालाही सांगता संपवून टाकल सगळं.. मला मारून...

          खरंच आई इतकं सोपं असतं का हे सारं ?"भावना विरहित होऊन तरीही काही भावनांसाठी एकरूप होऊन पुन्हा वेगळं होणं?" आणि आपल्याच एका अस्तित्वाला ओझं समजून संपवून टाकणं? का? का मला स्वप्न पाहण्याआधीच मारलंस?मला समाजात जिवंत होण्याआधीच मारुन टाकलंस? मला एक अस्तित्व देऊन पूर्णत्वास जाण्याआधीच मारलंस? का आई का? " ।।आई माझा गुरु, आई कल्पतरु। ।।सौख्याचा सागरू ,आई माझी ।।"हे म्हणताना आता हसावं की रडावं हे मात्र कळत नाहीये. तरी आई मी नाही रागवलो तुझ्यावर.. फक्त हे प्रश्न सतावतात खूपदा. बाकी काहीच तक्रार नाही. शेवटी एकच सांगेन आई एकदा माझ्या जागी येऊन विचार कर एकदाच फक्त एकदा "भृण" बनून थोडं जगून बघ. त्या जाणिवेतून एकदाच फक्त एकदाच श्वास घेऊन बघ. मग होईल जाणिव माझ्या नसलेल्या अस्तित्वाची.





देवस्थळी पूर्वा प्रशांत

मु. पो चोरवणे, ता . संगमेश्वर, जि. रत्नागिरी

पिन. 415803

फोन नं. 7875107731

1 comment:

  1. फार छान कथा. आपलं अभिनंदन

    ReplyDelete

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...