Monday, September 9, 2019

श्री विठ्ठल संजीवनी अमृत

 


श्री विठ्ठल संजीवनी अमृत 

          श्री विठ्ठल हे शब्द केवळ संजीवनी अमृतच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, "ह्या विठ्ठल रंगानेच मी सर्वांगाने रंगून गेलो."
          तुकाराम महाराज जस-जसे विठ्ठल भक्तीत रमू लागले तसे त्यांच्या संसाराच्या साऱ्या चिंता मिटू लागल्या. त्यांना संसारातील पाशातून मुक्ती मिळाली. त्यांच्यावर कोसळलेल्या आपत्तींमुळे ते दु:खी झाले होते. जीवनातील त्यांचा रसच संपून गेला होता परंतु विठ्ठल भक्तीमुळे, नामस्मरणामुळे त्यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले. मोह,माया, मत्सर, क्रोध या गोष्टींपासून अलिप्त झाले. त्यांनी आपले सारे जीवनच विठ्ठलाला अर्पण केले. ते पूर्णतः विठ्ठलमय झाले. विठ्ठलाशी एकरूप झाले. विठ्ठलमुळे त्यांचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. ते संत पदापर्यंत पोचले. विठ्ठलाचे भजन-कीर्तन करणे, त्याचे नामस्मरण करणे, त्याची सतत भक्ती करणे हाच त्यांचा दररोजचा नित्यक्रम चालू झाला व यातूनच त्यांना आनंद मिळू लागला. जगातील इतर क्षणिक सुखांपेक्षा कितीतरी पटींनी त्यांना विठ्ठलनामामुळे सुख प्राप्त झाले. म्हणूनच ते म्हणतात कि श्री विठ्ठल ह्या एका शब्दापुढे सर्व सुखे फिकी पडतात. 
          श्री विठ्ठल ह्या शब्दातच एवढे चैतन्य साठवले आहे कि हे नाव घेतले कि साऱ्या चिंता मिटून जातात. दु:खे नाहीशी होतात. संकटे कुठल्याकुठे पळून जातात. श्री विठ्ठल म्हणजे पर्मोच्च आनंद आहे. जीवनामृत आहे. विठ्ठलनामातच मधुर रस आहे. हा रस कितीही प्याला तरी समाधान होत नाही. तुकाराम महाराजांनी तर विठ्ठलनामाला संजीवनी अमृतच म्हणले आहे. यावरूनच विठ्ठलनामाची किती महती आहे हे दिसून येते. 


No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...