Sunday, August 26, 2018

प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायक

प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायक 

          प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर दोनशे वर्षांपासून अस्तित्वात आहे. १९ नोव्हेंबर १८०१ रोजी मंदिराचा पहिला जीर्णोद्धार झाला. जुने मंदिर चुना-विटांनी बांधलेले होते. श्रीसिद्धिविनायकाची मूर्ती काळ्या पाषाणाची असून तिची उंची अडीच फूट आणि रुंदी दोन फूट आहे. मूर्ती उजव्या सोंडेची असून, तिच्या वरच्या एका हातात कमळ व दुसऱ्या हातात परशू, खालील उजव्या हातात जपमाळ तर डाव्या हातात मोदकाची वाटी आहे. गळ्यात सर्पाकृती जानवे आहे. पाषाणाच्या मखरात कोरलेल्या श्रीसिद्धिविनायकाच्या बाजूंना रिद्धी-सिद्धी या ऐश्वर्य, भरभराट, समृद्धी व मांगल्य यांचे प्रतीक असलेल्या देवता उभ्या आहेत. मूर्तीच्या कपाळावर शंकराच्या तृतीय नेत्राप्रमाणे नेत्र कोरलेला आहे. मुकुट सोनेरी असून, संपूर्ण मूर्ती रक्तगंधानुलीप्त सजविलेली आहे. रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती अत्यंत आकर्षक आहेत. 
          मंदिराची अलीकडेच नयनरम्य व सुबक प्रासाद वास्तू बांधण्यात आली असून, तिच्यावरील कळस प्रतिष्ठापना व कुंभाभिषेक सोहळा शारदापीठाचे शंकराचार्य जगद्गुरू भारतीतीर्थ महास्वामी यांच्या हस्ते १३ जून १९९४ रोजी विधिपूर्वक पार पडला. नूतनीकरण करताना जुन्या मंदिराचा कळस व्यवस्थितरीत्या उतरवून सभामंडपात ठेवण्यात आला. मात्र श्रीसिद्धिविनायकाची मूर्ती मूळ स्थानापासून न हलविता वस्तू बहुमजली बांधून गाभाऱ्यावरील प्रत्येक मजल्यावर वेष्टित भिंती बांधून कळसापर्यंत मोकळी जागा राहील याची काळजी घेण्यात आली आहे. प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन भाविकांना घेता आले नाही तरी दिड हजार किलो वजनाच्या बारा फूट उंच अश्या प्रचंड सोनेरी कळसाचे दर्शन घेतल्यानंतर 'श्रीं' चे दर्शन घेतल्याची प्रचिती येते. नव्या मंदिराचा गाभारा विस्तीर्ण असून त्याला पाच दरवाजे आहेत. प्रमुख तीन दरवाजे आहेत, त्यांची उंची तेरा फूट आहे. त्यामुळे सभामंडपातून तसेच पोटमाळ्यावरून 'श्रीं' चे दर्शन घेता येते. 
          मंदिराचा गाभारा अष्टकोनी असून त्यात दहा फूट रुंद व नऊ फूट उंचीचे चांदीचे मखर बसविलेले आहे. घुमट सुवर्णविलेपनाने आकर्षित दिसेल असा तयार केला आहे. पाच हजार लोलकांचे मोठे झुंबर लावण्यात आले आहे. मंदिराच्या वास्तूमधील पहिला मजला हा पोटमाळा म्हणून पूजा व दर्शनासाठी उपयोगात आणला जातो. दुसऱ्या मजल्यावर महानैवेद्य बनविण्यासाठी स्वयंपाकगृह व ब्रह्मवृंदासाठी विश्रांतीगृह आहे. तिसऱ्या मजल्यावर मंदिराचे केंद्रीय कार्यालय आहे. अध्यक्ष कक्ष, अधिकाऱ्यांच्या, सदस्यांच्या आणि विश्वस्तांच्या होणाऱ्या सभेकरिता समिती कक्ष, तसेच संगणक कक्षही आहे. चौथ्या मजल्यावर ग्रंथालय असून तेथे धार्मिक, शैक्षणिक, ललितवाङ्मय, वैद्यक, तंत्रशास्त्र, अर्थशास्त्र आदी विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिका आहे. मंदिराच्या मुख्य शिखरावरील बारा फुटी कळसाव्यतिरिक्त पाच फूट उंचीचे तीन व साडेतीन फुटांचे तेहतीस असे एकूण सदतीस सुवर्णविलेपित कळस आहेत. 
श्रीसिद्धिविनायकाची आकर्षक मूर्ती 


श्रीसिद्धिविनायकाची आरती 














No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...