"अमिताभ" पर्व
(मी लिहीत असलेल्या "अमिताभ" पर्व या पुस्तकातील लेख)
ताडमाड उंची, किरकोळ शरीरयष्टी, घोगरा आवाज लाभलेल्या अमिताभ यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. त्यांचा बॉलिवूड मधील यशस्वी प्रवास थक्क करणारा आहे.
अमिताभ बच्चन यांची चित्रपटसृष्टीत एन्ट्री 'सात हिंदुस्थानी' या चित्रपटाने झाली. या चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक ख्वाजा अहमद अब्बास हे होते. या चित्रपटासाठी त्यांना पाच हजार मानधन देण्यात आले. नंतर सुनील दत्त यांनी निर्मित केलेल्या 'रेश्मा और शेरा' या चित्रपटात काम केले. या चित्रपटात त्यांनी एका मुक्याची भूमिका साकारली.
अमिताभ यांनी हृषीकेश मुखर्जी निर्मित 'आनंद' या चित्रपटात बाबू मोशायची भूमिका साकारली. ह्या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते राजेश खन्ना तर सहकलाकाराच्या भूमिकेत होते अमिताभ. अमिताभ यांनी धीरगंभीर आवाज व प्रभावी व्यक्तिमत्वाच्या जोरावर छाप पाडली पण प्रेक्षकांनी सारे श्रेय राजेश खन्ना यांना दिले. त्यांच्या अभिनयाची प्रशंसा केली. या चित्रपटानंतर अमिताभ यांनी प्यार कि कहानी, परवाना, बॉम्बे टू गोवा या चित्रपटात काम केले. आनंद, बॉम्बे टू गोवा हे दोन चित्रपट सोडले तर अमिताभ यांना फारसे यश आले नाही.
अमिताभ यांनी बन्सी बिरजू, एक नजर, संजोग, रास्ते का पत्थर, गहरी चाल, बंधे हाथ या चित्रपटात नायक म्हणून काम केले. परंतु हे चित्रपट यशस्वी झाले नाहीत. ह्या चित्रपटांचे अपयश बघता अमिताभ यांनी नायक म्हणून स्वीकारलेल्या चित्रपटातून निर्माते, दिग्दर्शक यांनी त्यांना काढले. त्यांच्यावर अपयशाचा शिक्का बसला. त्यांची उंची, भसाडा व घोगरा आवाज यामुळे त्यांना चित्रपटात कोणी काम देईनासे झाले. एवढे अपयश येऊनही त्यांनी हार मानली नाही. ते खचून न जाता प्रयत्न करतच राहिले. चांगल्या संधीच्या शोधात होते व तशी संधी जंजीरच्या रूपात त्यांच्याकडे चालून आली.
अमिताभ यांना नायक म्हणून जंजीर चित्रपट मिळाला. या चित्रपटात त्यांची पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका होती. त्यांची नायिका होती जया भादुरी तर खलनायक होते अजित. अमिताभ यांनी या चित्रपटात खलनायकाविरुध्द लढण्याची भूमिका निभावली. या भूमिकेमुळे त्यांची 'अँग्री यंग मॅन' ची प्रतिभा निर्माण झाली. या चित्रपटात खलनायकाविरुध्द म्हणजेच अन्यायाविरुध्द लढणारा नायक प्रेक्षकांना भावला. या आधीचे नायक शामळू, नायिकेच्या मागे पळणारे होते. नायिकेच्या प्रेमात गुरफटलेले होते. मारझोड त्यांच्या पचनी पडत नव्हती. त्यांच्या प्रेम कहाण्या बघण्यासाठी लोक चित्रपटगृहात गर्दी करत होते. त्याकाळी रुपेरी पडदयावर चॉकलेट नायक व नायिकांचा जमाना होता. परंतु अमिताभ यांनी जंजीर नंतर चित्रपटसृष्टीचे सारे चित्रच पालटवले. त्यांच्या प्रत्येक चित्रपटात अन्यायाविरुध्द लढणारा नायक दाखवला गेला. त्यांच्या अभिनयाने प्रत्येकाच्या मनातील अन्यायाविरूद्धची आग बाहेर पडत होती. प्रत्येक जण अमिताभला आपला नेता मानू लागला. अमिताभचे चित्रपट बघून अनेक सामान्य व गरीब प्रेक्षकांना वाटायचे कि त्याने आपल्या समस्यांवर आवाज उठवावा. वास्तवात त्याने अन्यायाशी लढून गरीब जनतेला न्याय द्यावा असे सामान्य प्रेक्षकांना वाटू लागले. प्रेक्षकांनी त्यांना एका उंचीवर नेवून ठेवले. त्यांच्याकडे आपोआपच सुपरस्टारचे पद आले. अमिताभ यांच्या यशात सलीम जावेद या कथा लेखकांचा, प्रकाश मेहरा, मनमोहन देसाई या दिग्दर्शकांचा तर किशोर कुमार या गायकाचा समावेश होता. या सर्वांनी मिळून अमिताभ यांना सुपरस्टार पदापर्यंत नेवून पोचवले.
अमिताभ यांनी आपल्या उंचीमुळे, दमदार आवाजामुळे व आपल्या अभिनय कौशल्यामुळे या चित्रपटांचे सोने केले. त्यांच्या अभिनयावर प्रेक्षक प्रेम करू लागले होते. त्यांचा प्रत्येक चित्रपट तिकीट खिडकीवर सुपरहिट ठरत होता. हाऊसफुल्लचे बोर्ड लागत होते. त्यांचा चित्रपटसृष्टीतील यशस्वी प्रवास सुरू झाला होता. 'अमिताभ' नावाने एक पर्व सुरू झाले होते.
No comments:
Post a Comment