Saturday, October 13, 2018

श्रीराम चरित्र व आपण -- एक गुंफण भाग १


श्रीराम चरित्र व आपण -- एक गुंफण  
                                      भाग  १

           राम ह्या एकाक्षरी मंत्रात अवघे विश्व सामावले आहे. 
          राम आपल्याला काय शिकवतो तर त्या ईश्वरदत्त कर्म स्वातंत्राचा कसा उपयोग करून घ्यायचा. सामान्य जीवन जगतानाही कधी शांत राहायचे, कधी काय योग्य ते बोलायचे किंवा कधी हातात शस्त्र घ्यायचे. 
          राम हा महाविष्णूचा एक अवतार आहे. रावणाचा नाश करण्यासाठी घेतलेला एक मानवी अवतार. 
          आपल्या आयुष्यातही असे रावण येत असतात. कधी जीवनात भौतिक स्वरूपात अनुभवायला येतात तर कधी मनरूपी सागरात एका अदृश्य पोकळीत अक्राळ विक्राळ आकृतीत अनुभवायला येतात. आपण जीवनभर ह्याच संभ्रमावस्थेत असतो कि, याचा सामना कसा करायचा. एका रावणानंतर अशा अनेक रावणांचा सामना आपल्याला करावाच लागतो. हा समाज हि मग रावणाप्रमाणे दहा तोंडे वासून आपल्याला त्रास देतच राहतो. 
           ह्या वरचा उपायही श्री रामावतारामध्ये रामाने आपल्याला दिला आहे. किंबहुना रावणाच्या वधाबरोबर आपण ह्या कलियुगातील रावणाचा कसा संहार करायचा मग, तो भौतिक पातळीवरील असो वा मनुरूपी ह्याचा धडा श्री रामाने घालून दिला आहे. 
              ।। रामोराज मणि सदा विजयते ।।
       प्रत्यक्ष महिषासुर मर्दिनीने हा दिलेला आशीर्वाद आहे. राम व रामनाम सैदव विजयी होवो. हाच आशीर्वाद बळ बनून श्रीरामाच्या पाठीशी राहिला व तो रावणाचा वध करू शकला. 
           परमेश्वर अद्वितीय अद्भुत आहे. आपल्या सारख्या सामान्य मानवासाठी त्याच्याकडे एक अवतार लीला म्हणून पाहावे का देव म्हणून पाहावे व त्याचे कसे अनुकरण करावे हे समजणे व तसे वागणे दुरप्रास्थ आहे. त्या ईश्वराने मानवाच्या कल्याणासाठी पृथ्वीवर मानव रूपात अवतार घेतला. मानव काय सहन करतील इतके कष्टात ते जीवन जगले. 
          एका सामान्य मानवासाठी उन्हातान्हात राबणे, काबाडकष्ट करणे ह्या पेक्षा खडतर जीवन जगणे कठीण आहे. मग, वनवासाला जाणं ह्यचा तर आपण विचार ही करू शकत नाही.  
            राम हा आदर्श पुत्र, आदर्श शिष्य, आदर्श पती, आदर्श बंधू व स्वतः ईश्वर आहे आणि जीवनाचा मार्गदर्शक हि आहे. ज्याचा राज्याभिषेक दुसऱ्या दिवशी होणार होता अशा संपूर्ण राजेशाही थाटात वाढलेल्या सर्वांच्या लाडक्या सुकुमार रामावर माता कैकयीच्या आज्ञेने पूर्ण राजोपभोगांचा त्याग करून वल्कले परिधान करून वनवासाला जायची वेळ येते. 
          असा प्रसंग कोणा सामान्य मानवावर आला असता तर? मग तो कितीही संयमी असो, त्याने थोडा तरी विरोध केला असता. त्याला थोडा तरी राग आलाच असता. पण! पहा तो श्रीरामाचा शांत प्रसन्न चेहरा, जराही असे जाणवत नाही कि, त्यांच्या मनाविरुद्ध घडते आहे. ह्या आज्ञेचा हि श्री रामाने सन्मानच केला व हि मर्यादा सुद्धा लीलया पाळली. अगदी वनवासात असतानाही सीता माता व लक्ष्मणासोबत त्यांचा राम होता अर्थात त्यांचा आनंद होता. खरे आत्मिक समाधान होते. 











        










       
























          

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...