Friday, October 12, 2018

कारगिल युद्ध -- एक यशोगाथा भाग १





कारगिल युद्ध -- एक यशोगाथा 
                                   भाग १

          इ. स. १९९९ च्या उन्हाळ्यात पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरु झाले. हि ठाणी कारगिल व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागा होती. अनेक महिन्यांच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर भारताला हि ठाणी परत मिळवण्यात यश मिळाले. हे युद्ध आजवरचे सर्वाधिक उंचीवर लढले गेलेले युद्ध आहे. ह्या युद्धाची अतिउंचावर लढले गेलेले युद्ध म्हणून इतिहासात नोंद झाली असेल.

युद्धाचे स्थळ --
          कारगिल हे जम्मू व काश्मीरची राजधानी श्रीनगर पासून २०५ कि. मी. अंतरावर आहे. हे शहर पाकव्याप्त काश्मीरच्या नियंत्रण रेषेपासून जवळ आहे. कारगिल मध्ये काश्मीरमधील इतर ठिकाणांसारखे हवामान आहे. उन्हाळा हा सौम्य कडक तर हिवाळा अतिशय कडक असतो. तापमान उणे ४० अंश सेल्सियस पर्यंतही उतरू शकते. 
          राष्ट्रीय महामार्ग लेह ते श्रीनगर या रस्त्यावर कारगिल वसलेले आहे. कारगिलचे युद्ध होण्याचे प्रमुख कारण हा रस्ता हे होय. घुसखोरांनी पाकव्याप्त काश्मीरच्या जवळच्या आणि रस्त्याला समांतर अश्या १६० किलोमीटरच्या पट्ट्यातच घुसखोरी केली. लष्कराच्या अनेक चौक्या या भागात आहेत. त्यातील काही चौक्या समुद्रसपाटीपासून ५००० मीटरपेक्षाही अधिक उंचावर आहेत. नुसतेच कारगिल न्हवे तर आग्नेयेकडील द्रास व नैऋत्येकडील मश्को खोऱ्यातील, तसेच बटालिक विभागातील चौक्यांवरही घुसखोरी झाली. 
          कारगिल, द्रास व मश्को खोऱ्यातील चौक्या ह्या अतिउंचावर आहेत. अतिउंचावरील चौक्यांवर कडक हिवाळ्याच्या महिन्यात सैन्य तैनात करून ठेवणे अतिशय अवघड असल्याने, हिवाळ्यापूर्वी दोन्ही बाजूने सैन्याची माघार व्हावी आणि उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर व हवामान मानवी राहण्यास स्थिर झाल्यानंतर, ते ते सैन्य आपापल्या चौक्यांमध्ये परतावे, असा अलिखित समझोता भारत-पाकिस्तानमध्ये कारगिल युद्धाच्या आधीपर्यंत होता. या वेळेस मात्र, भारतीय सैन्य भारतीय चौक्यांवर परतण्यापूर्वीच पाकिस्तानी घुसखोरांनी ऐन हिवाळ्यात भारतीय चौक्यांचा ताबा घेतला. त्यामुळे कारगिलचे युद्ध भडकण्यास ठिणगी पडली. या चौक्यांचा ताबा घेतला गेल्याने राष्ट्रीय महामार्ग १ अ हा पाकिस्तानी तोफगोळ्यांच्या आणखी जवळच्या टप्प्यात आला. तसेच उंचावरील चौक्यांचा ताबा घुसखोरांकडे गेल्याने त्यांना उतारावरील चौक्यांवर नियंत्रण ठेवणे सोपे गेले. या चौक्या डोंगरमाथ्यावरील किल्ल्यांप्रमाणे होत्या. त्यांचा ताबा मिळवण्यास मोठ्या प्रमाणावर सैन्याची गरज लागते. त्यातच अतिउंची व कडाक्याची थंडी हे काम अजूनच अवघड करते.  

युद्धाची कारणे --
          इ.स. १९९८-९९ च्या हिवाळ्यात पाकिस्तानी लष्कराकडून अनेक तुकड्यांना मुजाहिदीनच्या वेषात भारतात नियंत्रण रेषेपलीकडे पाठवण्यात आले. या कारवाईला ऑपरेशन बद्र असे नाव देण्यात आले. कुणाच्याही लक्षात न येता त्यांनी रिकाम्या भारतीय चौक्यांचा ताबा घेतला. हिवाळ्यात प्रचंड थंडीमुळे भारतीय सैन्य माघारी घेतले गेले होते. या संधीचा फायदा पाकिस्तानी लष्कराने उठवला. नियंत्रण रेषेच्या जास्तीत जास्त आत घुसखोरी करून राष्ट्रीय महामार्ग १ च्या जवळ जायचे. असे केले कि, महामार्गावर कायमस्वरूपी ताबा मिळवता येईल आणि नंतर राजकीय वजन वापरून काश्मीरच्या प्रश्नाचे आंतर्राष्ट्रीयीकरण करणे पाकिस्तानला सोपे पडेल असा हा या कारवाईचा मुख्य उद्देश होता. भारताला नवीन नियंत्रण रेषा मान्य करायला भाग पाडले कि लडाख व सियाचीनला भारतापासून तोडणे सोपे जाईल असा पाकिस्तानी युद्धनीती तज्ज्ञांचा कयास होता तसेच घुसखोरीदरम्यान कारगिल/काश्मीर परिसरात अंतर्गत बंडखोरी भडकावून भारताला अजून बुचकळ्यात पाडण्याचा पाकिस्तानी व्यूह होता. 

पाकिस्तानी घुसखोरांचा भारतीय चौक्यांवर कब्जा --
          कडक हिवाळ्यातील महिन्यांमध्ये मनुष्यहानी कमी व्हावी म्हणून, अतिउंचावरील चौक्या रिकाम्या करायच्या असा प्रघात भारत व पाकिस्तान हे दोघेही पाळत. हवामान पुन्हा ठीकठाक झाल्यानंतर दोन्ही बाजूंचे सैन्य आपापल्या चौक्यांमध्ये परतून संरक्षणाची जबाबदारी घेत असे. 
          फेब्रुवारी इ.स. १९९९ मध्ये पाकिस्तानी लष्कराने कडक हिवाळ्यातच भारतीय चौक्यांचा ताबा घेणे आरंभले. पाकिस्तानने हि कारवाई अतिशय सूत्रबद्धरीत्या व भारतीय सैन्याला थांगपत्ता लागू न देता पार पाडली. यातच भर म्हणजे भारतीय गुप्तहेर खात्याला या घटनेची माहिती अजिबात मिळाली नाही. स्पेशल सर्विसेसच्या सर्वोत्कृष्ट तुकड्या, तसेच नॉर्दर्न लाइट इन्फट्रीच्या ४ ते ७ बटालियन तुकड्या या कामात गुंतल्या होत्या. रिकाम्या चौक्यांव्यतिरिक्त भारतीय सैन्याला हल्ला करायला अवघड जावे म्हणून मोक्याच्या जागाही ताब्यात घेण्यात आल्या. साधारणपणे, अतिउंचावरील एक मुख्य चौकी व त्याला टेका देण्याऱ्या दुय्यम उतारावरील व कमी उंचीवरील चौक्या ताब्यात घेण्यात आल्या. पाकिस्तानी मुख्य सैनिकांबरोबरच अफगाणी मुजाहिदीन, काश्मिरी मुजाहिदीन यानांही या कार्यवाहीत समाविष्ट केले गेले. 

पुढील भागात वाचा भारताने दिलेले प्रत्युत्तर 
          
          















No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...