Saturday, October 6, 2018

सैराट झालं जी....!




सैराट झालं जी....!

          सैराट चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटातील "सैराट" गाण्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्र "झिंगाट" झाला. या चित्रपटामुळे उलट-सुलट चर्चा चालू झाल्या. काही प्रश्न ऐरणीवर आले. सैराटची कथाच जातीभेदावर आधारलेली आहे. त्यात मुलगा व मुलगी भिन्न जातीचे दाखवले आहेत. दोघांचे कॉलेजमध्ये जमलेले प्रेम, घरच्यांना न जुमानता पळून जाणे व शेवटी द्वेषभावनेतून दोघांची केलेली हत्या हे या चित्रपटात दाखवले आहे. 
          सैराटमुळे बरेच प्रश्न उपस्थित झाले. त्यातील पहिला प्रश्न म्हणजे अल्पवयीन प्रेम. मुले जेव्हां तारुण्यात प्रवेश करतात तेव्हा मुलांच्या शरीरात वेगळे बदल होत जातात. याची जाणीव साधारण चौदा-पंधरा वर्षांपासून व्हायला सुरवात होते. यातच मुले-मुली एकमेकांकडे आकर्षिली जातात. दोघांच्यात प्रेमभावना उत्पन्न व्हायला लागते. प्रेमापुढे त्यांना समाजाचा, आई-वडील, नातेवाईकांचा विसर पडू लागतो. हि मुले वर्तमानात जगत असतात. त्यांना भविष्याचा काहीच विचार नसतो. शाळा-कॉलेजमधील प्रेम वर्तमानाशी निगडित असते. या मुलांकडे भविष्याबद्दल काहीच तरतूद नसते. प्रेमात पडल्यावर प्रेम शेवटपर्यंत कसे निभवायचे ह्यावर काहीच मार्ग सापडत नाही. मग प्रेमभंग झाल्यावर मुलगा किंवा मुलगी वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्येसारखे मार्ग अवलंबतात. 
          दुसरा प्रश्न म्हणजे घरातून पळून जाणे. एकदा का दोघेही प्रेमात पडले कि त्यांना संपूर्ण जगाचा विसर पडतो. हे विश्व दोघांचेच वाटू लागते. दोघांनाही एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटतो. यासाठी दोघांच्याही मनात लग्नाबद्दल विचार चालू होतात. एकमेकांना संपूर्ण जीवनभर साथ देण्याच्या आणाभाका दिल्या जातात. वचने घेतली जातात. घरात लग्नाचा विषय काढला कि तणावाचे वातावरण निर्माण होते. मतभेद चालू होतात. लग्नाला विरोध होतो. घरातले लग्नाला संमती देत नाहीत म्हणले कि घरातल्यांना न जुमानता दोघेही पळून जाण्याचा मार्ग अवलंबतात. यामुळे दोन्ही घराण्यांची नाचक्की होते, बदनामी होते. यासाठी लग्नाचे निर्णय घेण्याआधी आईवडिलांना, नातेवाईकांना विश्वासात घेऊन सर्व गोष्टी समजून सांगितल्या पाहिजेत. पालकांनीही आपला हट्टीपणा, अहंकार बाजूला ठेवून दोघांच्या सुखासाठी, उज्वल भविष्यासाठी लग्नाला संमती दिली पाहिजे. 
          तिसरा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे जातीभेद, उच्चं-नीच वर्ण, द्वेषभावना. हल्ली मुले-मुली शिक्षण किंवा नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने एकत्र येत असतात. बराच वेळ एकमेकांच्या सहवासात घालवत असतात. एकमेकांची माने, विचार जुळू लागतात. यातूनच त्यांच्यात प्रेमभावना उत्पन्न होते. जेव्हा दोघेही लग्नाचा निर्णय घेतात तेव्हा जातीभेद, उच्चंनीच वर्ण आड येतात. दोघेही वेगवेगळ्या जातीचे असतील तर घरच्यांचा विरोध ठरलेलाच असतो. यातूनच घरात वितंडवाद निर्माण होतात. आपला समाज एवढा पुढारलेला आहे, शिकलेला आहे परंतु उच्चं-नीच, जातीभेदाच्या चक्रातून बाहेर पडायलाच तयार नाही. प्रत्येकजण आपल्या जातीला चिकटून बसलेला आहे व या जातीभेदातूनच एकमेकांबद्दल द्वेषभावना निर्माण होते. द्वेषभावनेतूनच सैराटसारखे हत्या, खून यासारखे प्रकार घडतात. 
          सैराटमुळे बराच उहापोह झाला. बरेच प्रश्न उपस्थित झाले. पण हे प्रश्न अनुत्तरीतच राहणार आहेत. शाळा-कॉलेजमधील वय अजाणत असतं. तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना कुणाच्यातरी प्रेमात पडावंसं वाटतं. परंतु त्याबरोबर आपल्या भविष्याचा, करिअरचाही विचार करायला हवा. पळून जाऊन सगळेच मार्ग सुटतात असे नाही. पळून गेल्याने एक तर दोन्ही घरच्यांचा आधार तुटतो. युवक-युवती एकटे, एकाकी पडतात. कुणाचाही आधार नसल्याने व उत्पनाचे साधन नसल्याने असहाय्य व्हायला होते. याच असाहाय्यतेचा फायदा घेण्यासाठी बाहेरचे नराधम टपलेले असतात. आजचा तरुणवर्ग बराच समझदार झालेला आहे. उच्चंशिक्षित झालेला आहे. जाती-पातीच्या भिंती तोडू पाहत आहे. माणुसकी हीच जात त्यांना माहित आहे. पालकांनीही अशा मुलांना जातीपातीच्या कोंदणात न अडकवता त्यांना समजून घ्यावे, सहकार्य करावे. त्यांचीही बाजू समजून घ्यावी. त्यांच्याबद्दल असलेला राग, द्वेष बाजूला ठेवून त्यांच्या आनंदासाठी, भविष्यासाठी सहकार्य केले तर "सैराट" सारखा शेवट होणार नाही. 
          














No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...