Sunday, May 26, 2019

भारताचे विश्वचषक स्पर्धेतील वर्चस्व

१९८३ चा विश्वविजेता संघ


२०११ चा विश्वविजेता संघ



विश्वचषक विजेते कर्णधार -- महेंद्रसिंग धोनी व कपिल देव

१९८३ चा विश्वचषक उंचावताना कपिल देव

२०११ चा विश्वचषक हातात घेतलेला महेंद्रसिंग धोनी

भारताचे  विश्वचषक स्पर्धेतील वर्चस्व 


         २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेला ३० मे पासून सुरवात होत आहे. या आधी ११ वेळा हि स्पर्धा झालेली आहे.  भारताने २ वेळा, वेस्ट इंडिजने २ वेळा, पाकिस्तान एकदा व श्रीलंकेने एकदा, ऑस्ट्रेलियाने तब्बल ५ वेळा हि स्पर्धा जिंकलेली आहे. यावेळची स्पर्धा इंग्लंडमध्ये होत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे आहे. भारतीय संघात विराट कोहलीबरोबर रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, हार्दिक पांडया, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, केदार जाधव हे फलंदाज तर जसप्रीत बुमराह, महमद शमी, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल हे गोलंदाज आहेत. 
         भारताने आतापर्यत २ विश्वचषक स्पर्धा जिंकल्या. एक १९८३ साली कपिल देवच्या नेतृत्वाखाली जिंकली तर दुसरी स्पर्धा २०११ साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकली. १९८३ सालची स्पर्धा हि इंग्लंडमध्ये खेळवण्यात आली तर २०११ सालची स्पर्धा हि भारत, श्रीलंका, बांगलादेश या देशांमध्ये खेळवण्यात आली. १९८३ साली भारताने वेस्ट इंडिजचा ४० धावांनी पराभव करून विश्वचषकावर आपले नाव कोरले तर २०११ साली श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव करत विश्वचषक विजेतेपद पटकावले. या दोन्ही स्पर्धेंचा आढावा पुढीलप्रमाणे घेतला आहे. 
१९८३ ची विश्वचषक स्पर्धा --
          या स्पर्धेत भारताला साखळी पद्धतीत   झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज व ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळायचे होते. भारताने यशपाल शर्माच्या खेळीच्या बळावर सलामीला वेस्ट इंडिजला हरवून क्रिकेटजगताला हादरा दिला. मग संदीप पाटीलच्या अर्धशतकाच्या बळावर दुबळ्या झिम्बाब्वेवर आरामात विजय मिळवला. नंतर ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडिज यांनी भारतावर दणदणीत विजय मिळवले. त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताची एकवेळ ५ बाद १७ अशी केविलवाणी अवस्था झाली होती. परंतु कपिल देवने १३८ चेंडूत १६चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद १७५  धावांची  वादळी  खेळी केली. या खेळीमुळे भारताने झिम्बाब्वेबर विजय मिळवला. त्यानंतर अखेरच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाला ११८ धावांनी हरवून उपांत्य फेरीत प्रवेश  केला. या सामन्यात मदन लाल आणि रॉजर बिन्नी यांनी प्रत्येकी चार बळी घेत उल्लेखनीय कामगिरी केली. उपांत्य फेरीत भारताची गाठ इंग्लंड संघाबरोबर पडली. या सामन्यात यशपाल शर्मा, मोहिंदर अमरनाथ, संदीप पाटील यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडवर ६ विकेट राखून विजय मिळवला व अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. अंतिम सामन्यात भारताची गाठ पडली दोन विश्वविजेतेपद मिळवलेल्या बलाढय वेस्ट इंडिज संघाबरोबर. या सामन्यात वेस्ट इंडिजने आपल्या गोलंदाजीच्या भेदक माऱ्याने भारताचा डाव १८३ धावात संपवला. के. श्रीकांतने थोडाफार प्रतिकार करत सर्वाधिक ३८ धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत वेस्ट इंडिज फलंदाजीला खिंडार पाडले व त्यांचा डाव १४० धावात संपुष्टात आला. या  विजयात मोलाचा वाटा उचलला तो मोहिंदर अमरनाथने. त्याने फलंदाजीत २६ धावा केल्या तसेच १२ धावात ३ बळी घेऊन अष्टपैलू कामगिरी केली. भारताने वेस्ट इंडिजचा ४३ धावांनी पराभव करत हि विश्वचषक स्पर्धा जिंकली.
२०११ ची विश्वचषक स्पर्धा --
          या स्पर्धेत भारताकडे कप्तान महेंद्रसिंग धोनीबरोबर सचिन, सेहवाग, गौतम गंभीर, विराट कोहली, युवराज सिंग, युसूफ पठाण, सुरेश रैना अशी दमदार फलंदाजी होती तर झहीर खान, आशिष नेहरा, हरभजनसिंग असे गोलंदाज होते. भारताला  बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, हॉलंड आणि आयर्लंड  सोबत ब गटात स्थान देण्यात आले. सलामीच्या सामन्यात भारताने बांगलादेश विरुद्ध सेहवाग १७५ धावा आणि कोहली १०० धावा यांच्या खेळीच्या जोरावर ४ बाद ३७० धावांचा डोंगर उभारला. बांगलादेशला हे आव्हान पेलवले नाही. भारताने बांगलादेशचा ८७ धावांनी पराभव करून विजय नोंदवला. बंगळूरला इंग्लंडविरुद्धचा सामना टाय झाला. या सामन्यात सचिनने शतक झळकावले. मग भारताने आयर्लंड व हॉलंडला हरवले. नागपूरला भारताची गाठ दक्षिण आफ्रिकेशी पडली. या सामन्यात सचिनने शतक ठोकले परंतु नंतर भारतीय फलंदाजी कोसळली व पराभवाला सामोरे जावे लागले. चेन्नईत झालेल्या साखळीतील वेस्ट इंडिजविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात भारताने युवराजसिंगच्या शतकाच्या बळावर ८० धावांनी विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. अहमदाबादला झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. उपांत्य सामन्यात भारताची गाठ पडली पाकिस्तानबरोबर. या  सामन्याला मोठे महत्व प्राप्त झाले होते. दोन्ही देशांचे पंतप्रधान हा सामना बघायला उपस्थित होते.  वहाब रियाझने टिच्चून गोलंदाजी करत ४६ धावात भारताचे ५ फलंदाज तंबूत धाडले परंतु सचिनच्या ८५ धावांच्या खेळीमुळे भारताने २६० धावांपर्यंत मजल मारली. सचिनची हि खेळी भारतासाठी महत्वपूर्ण ठरली. पाकिस्तानला विजयासाठीचे २६० धावांचे आव्हान पेलवले नाही. भारताने पाकिस्तानचा २९ धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. २ एप्रिल २०११ रोजी वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताची गाठ श्रीलंकेबरोबर पडली. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना महेला जयवर्धनेच्या (८८ चेंडूत नाबाद १०३ धावा) शतकाच्या जोरावर ६ बाद २७४ धावा केल्या. विजयी धावसंख्येचा पाठलाग करताना सचिन व सेहवाग लवकर बाद झाले व भारताची अवस्था २ बाद ३१ अशी झाली. नंतर गंभीर आणि कोहली  यांनी डाव सावरला. दोघांनी ८३ धावांची भागीदारी केली. कोहली बाद झाला आणि युवराजसिंगच्या जागी महेंद्रसिंग धोनी खेळायला आला. दोघांनी जबाबदारीपूर्व खेळी करत भारताला दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळवून दिले. गंभीरने ९७ धावा केल्या तर महेंद्रसिंग धोनीने ७९ चेंडूत नाबाद राहात ९१ धावा केल्या. धोनी सामनावीर ठरला तर युवराज सिंगने ३६२ धावा व १५ बळी अशी अष्टपैलू कामगिरी करत मालिकावीरचा पुरस्कार पटकावला.
          




















No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...