वृक्षारोपण करताना
आंब्याचे झाड
फणसाचे झाड
चिंचेचे झाड
एक तरी झाड लावू
आज आपण दुष्काळ, पाणीटंचाईशी सामना करत आहोत, त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे प्रचंड वृक्षतोड. झाडांची चाललेली अमानुष कत्तल. आपल्या स्वार्थासाठी वृक्षतोड करायची, जंगलसंपत्ती नष्ट करायची. त्या जागी काँक्रीटचे जंगल उभे करायचे. टोलेजंग इमारती बांधायच्या. प्रचंड उन्हाच्या तडाख्यात झाडाखाली थंडगार सावलीत विसावा घेण्यासारखे दुसरे सुख कोणते? परंतु, वृक्षतोड करून आपणच आपले हे सुख हिरावून घेत आहोत. जिथे वृक्षवेली आहेत, तिथे मन कसे प्रसन्न, ताजेतवाने वाटते. थंडगार व प्रसन्न वातावरणामुळे झाडाच्या सावलीतून हलावेसे वाटत नाही; परंतु जिथे वृक्षवेली नाहीत, तिथे रखरखीतपणा जाणवतो. क्षणभरही तिथे थांबावेसे वाटत नाही.
वृक्षवेली आपल्यासाठी जशा उपयोगी आहेत, तसेच पक्ष्यांसाठीही तो हक्काचा निवारा आहे. झाडावर घरटे बांधून पक्षी आपल्या निवाऱ्याची सोय करीत असतात. दिवसभर दाणापाणी शोधून संध्याकाळी पक्षी आपल्या घरटयाकडे परतत असतात; परंतु आपण वृक्षतोड करून पक्ष्यांचा निवाराच हिरावून घेत आहोत. काही दिवसांनी अशी वेळ येईल, कि झाडे-झुडपे नाहीत त्यामुळे पक्ष्यांचा किलकिलाटही ऐकू येणार नाही. आपल्या मुलांना फक्त पुस्तकांमधून वाचून झाडाझुडपांची माहिती द्यावी लागेल. आपण खेळलेल्या सुरपारंब्या, झाडावर चढून किंवा दगडाने पाडून खाल्लेल्या कैऱ्या, चिंचा, आवळे, बोरे यांच्या नुसत्या गोष्टीच आपण मुलांना सांगत बसणार. आपल्याला साधे खरचटले, तर किती वेदना होतात? वृक्षांवर तर आपण कुऱ्हाडीचे घाव घालीत असतो. कुऱ्हाडीच्या घावांनी वृक्षांना किती वेदना होत असतील? आपण सजीव आहोत, म्हणून आपल्या वेदना बोलून दाखवतो. पण, वृक्षांचे काय?
आम्ही राहतो त्याच्या पाठीमागे एक बाभळीचे मोठे झाड होते. त्या झाडावर विविध पक्ष्यांनी आपला निवारा वसवला होता. सकाळ, संध्याकाळ पक्ष्यांच्या गुंजनाने व किलबिलाटाने मन प्रसन्न व्हायचे. वातावरणात एक सजीवपणा येत होता. परंतु, एकेदिवशी वृक्षावर कुऱ्हाडीचे घाव पडू लागले. हळूहळू वृक्ष जमीनदोस्त होऊ लागला. पक्ष्यांचा निवारा हिरावू लागला. आता तर त्या जागी ना झाड दिसते, ना पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. ती जागा आता रखरखीत वाटू लागली आहे.
सगळीकडे भीषण दुष्काळ पडला आहे. पाणीटंचाई जाणवू लागली आहे. आता खरी वेळ आली आहे, आपण जागे होण्याची. जिथे मोकळी जागा दिसेल तिथे वृक्षारोपण करायलाच पाहिजे. वृक्ष-वेली, पशु-पक्षी हे आपले सोयरे आहेत म्हणजेच आपले नातेवाईक असून त्यांचा सांभाळ करणे, त्यांची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे.
सध्या फ्लॅट संस्कृती असल्यामुळे मोठी झाडे लावायला जागा सापडत नाही; परंतु ग्यालरीत किंवा टेरेसवर छोटी छोटी रोपे लावून सुंदर बाग तयार होईल. इमारतीचे नवीन बांधकाम करताना झाडे लावण्यासाठी काही जागा राखीव ठेवली पाहिजे. त्यात आपण एक तरी झाड लावण्याचा व ते जगवण्याचा संकल्प करूया.
No comments:
Post a Comment