Saturday, March 23, 2019

भाजपचा सच्चा नेता -- मनोहर पर्रीकर




भाजपचा सच्चा नेता -- मनोहर पर्रीकर 

          गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे दि. १७ मार्च २०१९ रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी स्वादुपिंडाचा कर्करोग या आजाराने निधन झाले. त्यांनी चार वेळा गोव्याचे मुख्यमंत्रीपद व देशाचे संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. 
          मनोहर पर्रीकर यांचा जन्म १३ डिसेंबर १९५५ रोजी म्हापसा, गोवा येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल मध्ये झाले व व पुढील शिक्षण म्हापसाच्या न्यू गोवा हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी १९७८ साली मुंबईच्या प्रसिद्ध असलेल्या इंडियन इन्स्टिटयूट टेकनॉलॉजीमधून (आयआयटी मधून) धातुशास्त्र विषयात अभियांत्रिकीची पदवी घेतली. मनोहर पर्रीकर हे भारतात आधारप्रणाली सुरु करण्यासाठी झटलेल्या नंदन निलकेणी यांचे आयआयटीतील सहअध्यायी आहेत. 
राजकीय वाटचाल --
          युवक असतानाच पर्रीकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल झाले. त्यावेळेपासून त्यांनी संघकार्य चालू केले. ते संघात मुख्य इन्स्ट्रक्टर होते. १९९४ मध्ये ते गोवा विधानसभेवर निवडून गेले. २४ ऑक्टोबर २००० मध्ये गोव्याचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यांचा कार्यकाल २४ ऑक्टोबर २००० ते २७ फेब्रुवारी २००२ असा राहिला. ५ जून २००२ मध्ये परत एकदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले परंतु भाजपच्या ४ आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांना कार्यकाल पूर्ण करता आला नाही. त्यांचा कार्यकाल २९ जानेवारी २००५ पर्यंतच राहिला. ९ मार्च २०१२ रोजी पर्रीकर तिसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले परंतु त्यांना केंद्रात देशाच्या संरक्षणपदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी बोलावले त्यामुळे त्यांना नोव्हेंबर २०१४ मध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. १४ मार्च २०१७ रोजी ते चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले तसेच गोव्याचे तेरावे मुख्यमंत्री झाले. मनोहर पर्रीकर हे ९ नोव्हेंबर २०१४ ते १३ मार्च २०१७ पर्यंत देशाचे संरक्षणमंत्री होते. 
संघातील सच्चा स्वयंसेवक --
          पर्रीकर बालवयापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जात होते. त्यांनी नागपूर येथील संघाच्या मुख्यालयात तृतीय वर्षापर्यंत शिक्षण घेतले. वयाच्या २६ व्या वर्षी म्हापसा शाखेचे संघचालक झाले. आयआयटीमधून पदवी घेईपर्यंत ते संघाचे मुख्य शिक्षक बनले होते. 
राजकारणातील वेगळेपण --
          पर्रीकर यांनी मुख्यमंत्री झाल्यावर सरकारी बंगल्यात राहणे नाकारले. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार आपल्या घरातूनच चालू केला. त्यांनी सरकारी गाडी कधीही वापरली नाही. ते स्वतःच्या गाडीमधूनच फिरायचे. मुख्यमंत्री झाल्यावरसुद्धा त्यांनी आपला साधेपणा जपला. त्यांनी कधी बडेजावपणा केला नाही कि अधिकाराचा गैरफायदा घेतला नाही. त्यांनी  मुख्यमंत्रीपदी  असताना  स्वच्छ, पारदर्शक कारभार केला त्यामुळे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा कुठलाही आरोप झाला नाही. त्यांनी शेवटपर्यंत 'भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप नसलेला निष्कलंक राजकारणी' अशी प्रतिमा जपली. त्यामुळेच गोवेकरांनी त्यांच्यावर विश्वास टाकला व तब्बल चार वेळा मुख्यमंत्री म्हणून निवडून दिले. 
          असा सच्चा नेता, कार्यकर्ता व स्वयंसेवक अचानक निघून गेला. त्यांच्या जाण्याने गोव्यातील भाजपचा आधारस्तंभच निखळला. गोव्यातील भाजपच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली. गोवेकरांना त्यांच्या स्वच्छ, पारदर्शक कारभाराची सवय झाली होती. त्यांनी पर्रीकरांना मनोमन आपला नेता मानला होता. हाच नेता आता गोवेकरांना परके करून अनंतात विलीन झाला.












 












 
          


























 












 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...