Wednesday, May 3, 2023

अवीट गोडीचे गाणे - एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे

  


अवीट गोडीचे गाणे - एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे

           'एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे' हे अवीट गोडीचे गाणे जगाच्या पाठीवर या चित्रपटातील आहे. हा चित्रपट १९६० साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मिती, लेखन, दिग्दर्शन व अभिनय राजा परांजपे यांनी केले आहे. हा चित्रपट म्हणजे सबकुछ राजा परांजपे आहेत. या चित्रपटासाठी पटकथा व संवाद ग दि माडगूळकर यांनी लिहिले आहेत. या चित्रपटासाठी गीत लेखन ग दि माडगूळकर यांनी केले असून संगीतबद्ध सुधीर फडके यांनी केली आहेत. यातील गाणी सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायली आहेत. या चित्रपटात राजा परांजपे, सीमा देव, राजा गोसावी, रमेश देव, शरद तळवळकर, धुमाळ यांच्या मुख्य भूमिका असून  ग दि माडगूळकर यांची छोटी भूमिका आहे. 

               'एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे' हे अवीट गोडीचे गाणे सुधीर फडके यांनी गायले आहे  व संगीतबद्धसुद्धा केले आहे. या गाण्याचा अर्थ इतका सुंदर आहे. जरतारी वस्त्र हे अनेक धाग्यांनी विणलेले असते तसेच माणसाचे आयुष्य हे अनेक धाग्यांनी विणलेले आहे. त्यातीलच एक धागा हा सुखाचा असतो तर अनेक धागे (शंभर) दुःखाचे असतात. म्हणजेच सुख हे जवाएवढे असते तर दुःख पर्वताएवढे असते. 

               दुसऱ्या कडव्यात  ग दि मा म्हणले आहेत कि हे जरतारी वस्त्र आता पांघरत असला तरी येसी उघडा जासी उघडा म्हणजेच जन्माला येताना उघडा आलास म्हणजेच येताना काहीही घेऊन आला नाहीस तर जातानाही उघडा जाणार आहेस म्हणजेच जातानाही काही घेऊन जाणार नाहीस. जे काही आहे ते इथे सोडून जाणार आहेस. पण आल्यावर व जाण्याच्या आधी वस्त्रासाठी तुला तीन प्रवेशांचे नाटक करावे लागणार आहे. 

               तिसऱ्या कडव्यात ग दि मानी तीन प्रवेशांचे नाटक सांगितले आहे की मानवाला करावे लागतच आहे. पहिला प्रवेश हा बालपणाचा असतो. मुकी अंगडी बालपणाची म्हणजेच या प्रवेशात माणूस कोणताही कपडा घालतो. त्याला या कपड्यातील काही कळत नसते. जसे बालपणात कपड्याबाबत अनभिज्ञ असतो तसेच मोह, आशा, लोभ, स्वार्थ यापासून अनभिज्ञ असतो. दुसरा प्रवेश हा तारुण्याचा असतो.  रंगित वसने तारुण्याची म्हणजेच तारुण्यात तो विविध व रंगीत वस्त्रे परिधान करतो. जस जसा तो बालपणातून तारुण्याकडे येऊ लागतो तसे त्याच्या मनात मोह, आशा, लोभ वाढू लागतात. बालपणात वस्त्राबाबत अनभिज्ञ असणारा माणूस तरुणपणात वस्त्राबाबत सतर्क होतो. तरुणपणात त्याचे मन धावू लागते, सैरभैर होते. रंगीत वसने (वस्त्रे) हे मोह, आशा, लोभ याचे प्रतीक आहे. तिसरा प्रवेश हा वार्धक्याचा असतो. जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे. वार्धक्यात सर्व  मोह, आशा, लोभ संपलेल्या असतात. जे काही समोर येईल ते स्वीकारायचे व जीवन जगायचे. कुठल्याही गोष्टीत आशा करायची नाही कि मोह बाळगायचा नाही. मोह, आशा, लोभ हि तारुण्यात पांघरलेली रंगीत वस्त्रे वार्ध्यक्यात टाकून द्यायची. जीर्ण शाल म्हणजेच जीर्ण शरीर शेवटी राहते तेच पांघरायाचे व हेच वार्धक्याचे लेणे आहे.

                चौथ्या कडव्यात ग दि मा म्हणले आहेत कि या वस्त्राते विणतो कोण एकसारखी नसती दोन म्हणजेच विणलेली दोन वस्त्रे एकसारखी नसतात. तसेच दोन माणसाचे आयुष्य हे एकसारखे नसून वेगवेगळे आहे. एकाला कमी प्रमाणात सुख-दुःख तर एकाला जास्त प्रमाणात सुख-दुःख. पण सुख दुःख सगळ्यांना आहेतच. जसे विणलेल्या वस्त्राचे हात कुणाला दिसत नाहीत तसेच तसेच सुख दुःख देणाऱ्याचेही हात या त्रिखंडात कुणाला दिसले नाहीत.  

                 जीवनाचा सुंदर अर्थ ग दि मांनी या गाण्यात सांगितला आहे व तितक्याच उत्कटतेने हे गीत बाबूजींनी म्हणजेच सुधीर फडकेंनी गायले आहे. हे अवीट गोडीचे गाणे खालीलप्रमाणे,

एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचेएक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचेजरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचेएक धागा सुखाचा
 
पांघरसी जरि असला कपडायेसी उघडा जासी उघडापांघरसी जरि असला कपडायेसी उघडा जासी उघडाकपड्यासाठी करिसी नाटक तीन प्रवेशांचेएक धागा सुखाचा
 
मुकी अंगडी बालपणाचीरंगित वसने तारुण्याचीमुकी अंगडी बालपणाचीरंगित वसने तारुण्याचीजीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचेएक धागा सुखाचा
 
या वस्त्राते विणतो कोणएकसारखी नसती दोनया वस्त्राते विणतो कोणएकसारखी नसती दोनकुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकऱ्याचेएक धागा सुखाचा
 

 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...