Friday, May 12, 2023

डॅम इट आणि बरेच काही - महेश कोठारे यांचा चित्रपट क्षेत्रातील जीवनपट

 

 डॅम इट आणि बरेच काही - महेश कोठारे यांचा चित्रपट क्षेत्रातील जीवनपट

         'डॅम इट आणि बरेच काही' हे मेहता पब्लिशिंग हाऊस ने प्रकाशित केलेले व मंदार जोशी यांचे शब्दांकन असलेले पुस्तक नुकतेच माझ्या संग्रही आले. हे पुस्तक म्हणजे महेश कोठारेंचा जीवनपटच आहे. चित्रपट क्षेत्रात व निर्मितीत आलेले चांगले वाईट अनुभव त्यांनी या पुस्तकात मांडले आहेत. बालकलाकार, चित्रपटातील मुख्य नायक, खलनायक, लेखक, निर्माता, दिग्दर्शक, वितरक अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी निभावल्या. या भूमिका निभावत असताना त्यांना अनेक अडचणी आल्या, संकटे आली परंतु जिद्द व आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी अडचणी व संकटावर मात केली.
          महेश कोठारेंनी धुमधडाका, दे दणादण, थरथराट, धडाकेबाज, झपाटलेला असे चांगले व दर्जेदार चित्रपट मराठी रसिकांना दिले. मराठी चित्रपटसृष्टीवर मरगळ आली होती तेव्हा त्यांनी अशा उत्कृष्ट व विनोदी चित्रपटांची निर्मिती करुन मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी दिली. खरं तर महेश कोठारे वकिली करत होते व वकिली करता करता चित्रपट क्षेत्रात काम करत होते. असेच एकदा न्यायाधीशांनी त्यांना विचारले की, "तुम्ही अॅक्टर आहात की लॉयर?" महेश कोठारेंनी लागलीच उत्तर दिले, "अॅक्टर" तिथूनच त्यांची वकिलीची कारकीर्द संपून अॅक्टर व डायरेक्टरची कारकीर्द सुरू झाली.
       महेश कोठारेंनी धुमधडाकाच्या वेळचा प्रसंग सांगितला आहे की, जेव्हा महेश कोठारे धुमधडाका चित्रपट निर्माण करत होते तेव्हा त्यांना पैशाची आवश्यकता होती तेव्हा त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रकडे पाच लाख रुपये कर्जाची मागणी केली परंतु 'असल्या प्रपोजल्सना आम्ही एन्टरटेन करीत नाही' असे मॅनेजरने सांगून त्यांची फाईल फेकून दिली. परंतु बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्षांचे सचिव श्री महाजन यांचेशी बोलणे झालेवर त्यांची कर्जाची फाईल मंजूर झाली व त्यांना पैसे मिळून त्यांचे काम चालू झाले.  
          धुमधडाका चित्रपटावेळेस महेश कोठारेंनी लक्ष्मीकांत बेर्डेंना एक रुपया मानधन देवून साईन केले. नंतर लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारेंच्या चित्रपटाचे अविभाज्य भाग बनले. महेश लक्ष्या ही जोडी सुपरहिट ठरली. महेश कोठारेंना धडाकेबाज मधील कवठया महांकाळ हे खलनायकाचे नाव सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ या गावाच्या नावावरून सुचले तसेच ही व्यक्तीरेखा बाबला या गुजराती कलाकाराने साकारली. झपाटलेला चित्रपटावेळेस रामदास पाध्ये यांनी आठ बाहुले तयार केले परंतु महेश कोठारेंच्या पसंतीस उतरले नाहीत शेवटी पाध्येंनी नववा बाहुला तयार केला तो महेश कोठारेंच्या पसंतीस उतरला. असे आणखी काही किस्से महेश कोठारेंनी आपल्या पुस्तकात सांगितले आहेत.
          महेश कोठारेंनी चित्रपट क्षेत्रातील बालकलाकार म्हणून झालेला प्रवास सुरू होवून छोट्या पडद्यावरील निर्मिती पर्यंत येऊन थांबला. त्यांनी हा प्रवास या पुस्तकात सुरेखरित्या मांडला आहे. हे पुस्तक वाचताना महेश कोठारेंचा जीवनपटच डोळ्यासमोर उभा राहतो. या पुस्तकामुळे जिद्दी, आत्मविश्वासू, अभ्यासू वृत्ती ही त्यांची दुसरी बाजू कळली. चित्रपट क्षेत्रात करिअर करणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक म्हणजे 'टेक्स्ट बुक गाईड' आहे. ओघवती व समजेल अशी भाषा, रंगीत छायाचित्रे, सुबक मांडणी, आकर्षक मुखपृष्ठ व सुंदर शब्दांकन यामुळे हे पुस्तक परिपुर्ण झाले आहे व संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे.

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...