डॉन -- गाणी, कथा, अभिनयाची जमलेली भट्टी
'डॉन का इंतजार तो ग्यारह मुलकोकी पोलीस कर रही है...' हा डायलॉग ऐकला कि अमिताभचा डॉन चित्रपट डोळ्यासमोर येतो. १९७८ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता नरिमन इराणी असून चंद्रा बारोट यांनी दिग्दर्शन केले आहे. सलीम - जावेद यांनी या चित्रपटासाठी कथा लेखन केले आहे. कल्याणजी - आनंदजी यांनी संगीत दिले असून अंजान व इंदीवर यांनी गाणी लिहिली आहेत. किशोर कुमार, लता मंगेशकर, आशा भोसले यांनी गाणी गायली आहेत. या चित्रपटात अमिताभने दुहेरी भूमिका (डॉन व विजय) साकारली आहे. झीनत अमान, प्राण, इफ्तेकार, ओम शिवपुरी यांच्या मुख्य भूमिका आहेत.
अमिताभवर चित्रित झालेली 'अरे दिवानो, मुझे पहचानो', 'खैके पान बनारसवाला', हेलन व अमिताभवर चित्रित झालेले 'ये मेरा दिल यार का दिवाना', अमिताभ व झीनतवर चित्रित झालेले ' जिसका मुझे था इंतजार' हि गाणी चांगलीच प्रसिध्द झाली असून या गाण्यांची जादू अजूनही आहे. हि गाणी अजूनही लोकप्रिय असून ऐकावीशी वाटतात. खैके पान बनारसवाला या गाण्यामूळे फिल्मफेअर तर्फे दिला जाणारा 'सर्वश्रेष्ठ गीतकारा' च्या पुरस्कारासाठी अंजान यांना नामांकन मिळाले. खैके पान बनारसवाला या गाण्यामूळे फिल्मफेअर तर्फे दिला जाणारा 'सर्वश्रेष्ठ पार्श्वगायकाचा' पुरस्कार किशोर कुमार यांना मिळाला तर 'ये मेरा दिल यार का दिवाना' या गाण्यामूळे फिल्मफेअर तर्फे दिला जाणारा 'सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिकेचा' पुरस्कार आशा भोसले यांना मिळाला. ये मेरा दिल यार का दिवाना व खैके पान बनारसवाला या गाण्यांच्या लोकप्रियतेमुळे २००६ साली प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या डॉन या चित्रपटात हि दोन गाणी समाविष्ट करण्यात आली.
अमिताभवर चित्रित झालेले खैके पान बनारसवाला हे गाणे याआधी बनारसी बाबू या चित्रपटात देव आनंदवर चित्रित करणार होते परंतु ह्या गाण्याची आवश्यकता वाटत नसल्याने देवानंदने हे गाणे या सिनेमातून काढायला लावले. नंतर हे गाणे डॉन या चित्रपटात घेतले व अमिताभवर चित्रित केले. हे गाणे सुपरहिट झाले व प्रत्येकाच्या तोंडी आले.
अशी झाली चित्रपट निर्मिती --
प्रोड्युसर व सिनेमाटोग्राफर नरिमन इराणी हे सुनील दत्त अभिनीत जिंदगी जिंदगी हा चित्रपट तयार करत होते परंतु हा चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना तोंड दयावे लागले. त्यांच्यावर १.२ मिलियन कर्जाचा बोजा झाला व हे कर्ज ते फेडू शकत नव्हते. नरिमन इराणी यांनी याआधी मनोज कुमारच्या रोटी कपडा और मकान या चित्रपटासाठी सिनेमाटोग्राफर म्हणून काम केले होते. या चित्रपटातील कलाकारांनी म्हणजेच अमिताभ बच्चन, झीनत अमान, प्राण व सहाय्यक दिग्दर्शक चंद्रा बारोट यांनी नरिमन इराणी यांना मदत करायचे ठरवले. त्यांनी दुसरा चित्रपट निर्माण करण्याची तयारी केली व या चित्रपटात नरिमन इराणी यांना सहभागी करून घेण्याचे ठरवले. त्यांनी लेखक सलीम - जावेद यांना एक कथा लिहिण्यासाठी विनंती केली. त्यांनी लिहिलेली एक कथा ऐकविली. याआधी हि कथा बऱ्याच निर्मात्यांनी नाकारली होती. अमिताभ व इतर कलाकारांनी हि कथा ऐकली. या कथेचे नाव डॉन ठेवले व या कथेवरून डॉन चित्रपट बनवण्याचे ठरवले व या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रा बारोट यांनी करायचे असे ठरले. या चित्रपटात अमिताभने डॉनचे पात्र साकारले. झीनत अमान व प्राणनेही यात भूमिका केली.
हा चित्रपट पूर्ण व्हायला तब्बल साडे तीन वर्षे लागली. या अवधीत प्रोड्युसर इराणी यांचे निधन झाले. त्यामुळे बारोट यांच्यावर खर्चाचा भार आला तरीपण त्यांनी चित्रपटाच्या खर्चाला संयमाने तोंड दिले. त्यांना सर्वानी सहकार्य केले. नंतर हा चित्रपट सुपरहिट ठरला व उत्पन्नाचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. या उत्पन्नातून नरिमन इराणी यांचे कर्ज फिटले गेले.
अमिताभने या चित्रपटात अंडरवर्ल्ड डॉन व विजय अशी दुहेरी भूमिका साकारली. डॉन अतिगंभीर, निर्दयी, करारी दाखवला आहे तर त्याच्या चेहऱ्याशी साम्य असलेला विजय साधाभोळा, सरळमार्गी दाखवला आहे.
डॉन(अमिताभ बच्चन) मुंबई अंडरवर्ल्डचा एक कुविख्यात गुन्हेगार आहे. त्याचा शोध मुंबई पोलीस व इंटरपोल घेत असते पण या साऱ्यांना गुंगारा देत असतो. तो आपला सहकारी रमेश याची निर्दयपणे हत्या करतो यामुळे रमेशची होणारी बायको कामिनी (हेलन) डॉनला पोलिसाना पकडून देण्यासाठी प्रयत्न करते पण तिचीही हत्या केली जाते. रमेश आणि कामिनीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रोमा(झीनत अमान) डॉनच्या गँगमध्ये सामील होते.
डॉनला पकडण्यात पोलिसांना यश येते परंतु यात डॉन मारला जातो. मुंबईच्या चाळीत राहणारा विजय नाच गाणे करून आपले व दोन मुलांचे (दिपू व मुन्नी) यांचे पोट भरत असतो. एकदा त्याची मुलाखत डीएसपी डिसिल्वा यांच्याशी होते. डॉनच्या चेहऱ्याशी साम्य असल्यामुळे डिसिल्वा विजयला डॉन बनण्यास सांगतात. त्यांच्या म्हणण्यानुसार विजय डॉन बनतो. डॉनची आठवण परत आल्याच्या खुशीमध्ये पार्टी चालू असताना पोलिसांची धाड पडते व डॉन म्हणजेच विजय व त्याच्या गँगला पकडण्यात पोलिसांना यश येते परंतु यात डिसील्वाना गोळी लागते. विजय आपण डॉन नसून विजय असल्याचे पोलिसांना पटवून सांगण्याचा प्रयत्न करतो परंतु पोलीस त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. पोलीस समजतात हा डॉन आहे व नारंग व त्याचे सहकारी समजतात कि हा विजय आहे.
शेवटी विजय जेजे (प्राण) व रोमाच्या (झीनत अमान) मदतीने वरधान, नारंग व त्याच्या गॅंगला पोलिसांना पकडून देतो व आपण निर्दोष असल्याचा पुरावा म्हणून डायरी पोलिसांना देतो.
अमिताभने डॉन व विजय या दुहेरी व्यक्तिरेखा उत्तम वठवल्या आहेत. त्याच्या या भुमिकेमुळे त्याला फिल्मफेअर तर्फे दिला जाणारा 'सर्वश्रेष्ठ अभिनेता' चा पुरस्कार दिला गेला. त्याला प्राणने व झीनत अमानने उत्तम साथ दिली.
'डॉन का इंतजार तो ग्यारह मुलकोकी पोलीस कर रही है... लेकिन सोनिया डॉनको पकडाना मुश्किल ही नही नमुन्किण है'
'ये तुम जानती हो कि ये रिव्हॉल्वर खाली है, मैं जानता हूँ कि ये रिव्हॉल्वर खाली है, लेकिन पोलीस नही जानती कि ये रिव्हॉल्वर खाली है' हे अमिताभच्या आवाजातील संवाद चांगलेच गाजले. डॉनचे नाव काढले कि हे डायलॉग लगेच तोंडात येतात.
गाणी, कथा, अभिनय यामुळे या चित्रपटाची भट्टी चांगलीच जमली. हा चित्रपट सुपरहिट झाला.
No comments:
Post a Comment