Monday, May 10, 2021

।। आई ।।

 

।। आई ।।

          आई या शब्दातच सारे विश्व सामावलेले आहे. आई वात्सल्यसिंधू असते. आईचे आपल्या मुलांवर मनापासून प्रेम असते. आईचे व मुलाचे नाते वात्सल्याचे असते. या नात्यात निस्वार्थीभावना असते. आई आपल्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते. मुलांना काही दुखले खुपले तर त्याच्या वेदना आईला होतात. मुलांच्या भविष्याबाबत आईला काळजी वाटत असते. ती आपल्या मुलांच्या भविष्याबाबत मार्गदर्शक ठरत असते. मुलांना योग्य मार्गावरून चालण्यास शिकवत असते. मुलांना घडवत असते. 

          शिवाजी महाराजांना घडवण्यात जिजाऊंचा मोठा वाटा होता. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच शिवाजी महाराज रयतेचे राजे झाले. त्यांनी आपले स्वराज्य स्थापन केले. दुसरे उदाहरण म्हणजे सिंधुताई सपकाळ. त्या अनाथ मुलांच्या माय झाल्या. अनाथ, रस्त्यावर सापडलेल्या, लोकांनी सोडलेल्या मुलांना त्यांनी आपलेसे केले. त्यांना आईची माया लावली. त्यांचे पालनपोषण केले, त्यांना वाढवले. पोटच्या पोराप्रमाणे मुलांचा सांभाळ केला. खरोखरच त्या अनाथ मुलांच्या माय झाल्या. 

          इथे आईच्या प्रेमाची गोष्ट सांगावीशी वाटते. आई हालअपेष्टा सोसून आपल्या बाळाला वाढवते, मोठे करते. मुलगा शिकून सवरून कमावता होतो. आई त्याचे लग्न चांगल्या मुलीशी लावून देते. काही काळानंतर मुलीला ती आई संसारात नकोशी वाटते म्हणून नवऱ्याला फितवून आईपासून दोघेही वेगळे होतात. मुलगा बायकोच्या प्रेमात आंधळा झालेला असतो. ती म्हणेल तसे वागत असतो. एकेदिवशी बायको त्याला सांगते कि, 'तुझ्या आईचे काळीज काढून आण.'  मुलगा बायकोच्या प्रेमात एवढा आंधळा झालेला असतो कि, मागचा पुढचा विचार न करता लगेच तयार होतो. 

          तो आपल्या आईकडे येतो व तिचे काळीज मागतो. मुलाच्या प्रेमापोटी आई आपले काळीज दयायला लगेच तयार होते. मुलगा आईचे काळीज काढतो व चालू लागतो. चालता चालता त्याच्या पायाला ठेच लागते व तो पडतो. त्याला लागलेले बघून आईचे काळीज गलबलते व बोलू लागते 'बाळा, लागले नाही ना तुला?' हे शब्द ऐकून मुलाचे हृदय द्रवते. त्याला वाईट वाटते. केलेल्या कृत्याचा पश्चाताप होतो.  या गोष्टीवरून असे दिसून येते कि आईचे आपल्या मुलावर किती प्रेम असते.

          पक्षी प्राण्यांच्यातही आईचे प्रेम दिसून येते. आई आपल्या पिलांसाठी चारा व अन्न शोधून आणते. त्यांच्या पंखात व अंगात बळ येईपर्यंत त्यांचा सांभाळ करते. भूमाता हि आपली आईच आहे. या जमिनीवर आपण धान्य पिकवतो. हि भूमाता आपली काळजी घेते, आपल्याला धान्य देऊन आपले पालनपोषण करते. गाईलाही आपण माता मानलेलं आहे. आई हि देवासमान असते व गाईच्या पोटात तेहेतीस कोटी देवांचे वास्तव्य असते म्हणूनच गाईला आपण गोमाता मानलेले आहे. 

 

 


 

 

 

 

 

 

 

 

 

          


























No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...