Saturday, May 22, 2021

तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- तुज ऐसा कोण उदाराची रासी ।


 तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- तुज ऐसा कोण उदाराची रासी ।

तुज ऐसा कोण उदाराची रासी । आपुलेचि देसी पद दासा ।। १ ।।

शुद्ध हीन कांही न पाहासी कुळ । करिसी निर्मळ वास देहीं ।। २ ।।

भावें हे कदान्न खासी त्याचे घरी । अभक्तांच्या परी नावडती ।। ३ ।।

नवजासी जेथें दुरी दवडिता । न येसी जो चित्ता योगियांच्या ।। ४ ।।

तुका म्हणे ऐसी ब्रीदें तुझी खरी । बोलतील चारी वेद मुखें ।। ५ ।।

तुज ऐसा कोण उदाराची रासी । आपुलेचि देसी पद दासा ।। १ ।।

शुद्ध हीन कांही न पाहासी कुळ । करिसी निर्मळ वास देहीं ।। २ ।।

अर्थ : तुझ्यासारखा औदार्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे ? साक्षात आपले स्वतःचेच पद तू आपल्या दासांना देतोस. चांगले कुळ, वाईट कुळ तू काही पाहात नाहीस. ज्या कोणाचा निर्मळ देह झाला असेल त्या देहामध्ये वास्तव्य करतोस. 

भावार्थ : विठ्ठल आपल्या भक्तांबाबत दयाळू आहे, प्रेमळ आहे. जो कोणी भक्त विठ्ठलाची अंतःकरणापासून भक्ती करीत असेल, त्याचे नित्यनियमाने नामःस्मरण घेत असेल अशा भक्तांना आपल्या हृदयात स्थान देतो. विठ्ठलाच्या हृदयात स्थान मिळवणे म्हणजे उंच पद मिळवण्यासारखेच आहे. हे स्थान मिळवण्यासाठी (पद मिळवण्यासाठी) विठ्ठलाची पराकोटीची भक्ती करावी लागते. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, गोरा कुंभार, सावतामाळी, नरहरी सोनार, चोखामेळा, बंका महार, जनाबाई, कान्होपात्रा, भागू महारीण या संतांनी विठ्ठलाची अंतःकरणापासून भक्ती केली. विठ्ठल हा त्यांचा श्वास होता. विठ्ठलाशी ते एकरूप झाले  होते. विठ्ठलालाही त्यांची भक्ती आवडत होती. त्यांची भक्ती बघूनच विठ्ठलाने त्यांना आपल्या हृदयात स्थान दिले. विठ्ठलाने त्यांची जात पात, कुळ चांगले कि वाईट हे न बघता त्यांना आपल्या अंतरंगात स्थान दिले. विठ्ठल आपल्या भक्तांबाबत कधीच दुजाभावपणा करीत नाही उलट सर्व भक्तांवर मनापासून प्रेम करतो, त्यांना माया लावतो. म्हणूनच बंका, भागू, जना, चोखा हे क्षूद्र जातीचे असूनसुद्धा विठ्ठलाने यांना आपले प्रेम दिले, यांच्यावर माया केली. कान्होपात्रा तर एका गणिकेची (वेश्येची) मुलगी होती तरीही विठ्ठलाने तिला आपलेसे केले. तिला आपल्या अंतरंगात स्थान दिले. याचाच अर्थ असा कि विठ्ठलाच्या ठायी जात-पात, धर्म, कूळ, उच-नीच या गोष्टींना थारा नाही. जो भक्त विठ्ठलाची अंतःकरणापासून भक्ती करेल त्यालाच विठ्ठल आपले स्वतःचे पद बहाल करतो म्हणजेच आपल्या अंतरंगात वसवतो, हृदयात स्थान देतो. 

          विठ्ठल ज्या भक्ताचा निर्मळ देह झाला असेल अशा देहात वास्तव्य करतो म्हणजेच देहातील काम, क्रोध, लोभ, मत्सर, वासना, अहंकार इत्यादी दुर्गुण जाऊन त्या देहात फक्त निस्वार्थीभावना असेल तसेच देहाने मोहमायेचा, साऱ्या संसाराचा त्याग करून आपला देह देवाचे चरणी वाहिला असेल, या देहात देवाव्यतिरिक्त कुणाला स्थान नसेल तसेच हा देह देवाशी एकरूप झाला असेल अशा देहात देव वास्तव्य करितो कारण हा देह पवित्र, निर्मळ झालेला असतो. अशा देहात देवाला वास्तव्य करायला आवडते. देवही अशा भक्तांमध्ये एकरूप झालेला असतो. 

भावें हे कदान्न खासी त्याचे घरी । अभक्तांच्या परी नावडती ।। ३ ।।

अर्थ :  मोठया प्रीतीने भक्तांच्या घरी जाऊन निरस अन्नाचे सेवन करितोस. अभक्तांचे गोड अन्नही तुला आवडत नाही. 

भावार्थ : विठ्ठल आपल्या भक्तांवर मनापासून प्रेम करतो म्हणूनच आपल्या आवडत्या भक्तांच्या घरी जाऊन साधी चटणी भाकरीही गोड मानून खातो व तृप्त होतो. कृष्णाने सुदाम्याने आणलेले पोहे आवडीने खाल्ले. लहानग्या नामदेवाने घरून आणलेला नैवेद्द विठ्ठल आवडीने खात होता. देवाने विदुराच्या घरच्या कण्या आवडीने खाल्ल्या. यातूनच देवाचे आपल्या भक्तांवर किती प्रेम आहे हे दिसून येते. भक्तसुद्धा निस्वार्थभावनेने, शुद्ध भक्तीभावाने व देवावरील प्रेमापोटी आपल्या घासातला घास देवाला देत असतो म्हणूनच शबरीने रामाला चाखलेली उष्टी बोरे दिली व ती बोरे रामाने आवडीने खाल्ली. काही भक्त आपला मोठेपणा, श्रीमंती दाखवण्यासाठी देवाला लाडू, जिलेबी, बासुंदी पुरी असले गोडाधोडाचे जेवण देतो. यातून या भक्ताचे देवावरील प्रेम दिसत नसून अहंकार, बडेजावपणा दिसून येतो व जिथे अहंकार आहे तिथे देव जात नाही म्हणूनच अभक्तांचे गोड अन्नही देवाला आवडत नाही. 

नवजासी जेथें दुरी दवडिता । न येसी जो चित्ता योगियांच्या ।। ४ ।।

तुका म्हणे ऐसी ब्रीदें तुझी खरी । बोलतील चारी वेद मुखें ।। ५ ।।

अर्थ : भक्तांनी घरातून हाकलून दिले तरी जात नाहीस पण योग्यांच्या ध्यानात देखील तू येत नाहीस. तुकाराम महाराज म्हणतात, अशी तुझी खरी ब्रीदें आहेत असे चार वेद सांगतात. 

भावार्थ : विठ्ठल आपल्या आवडत्या भक्तांच्या घरात वास्तव्य करतो कारण ह्या घरात सतत विठ्ठलनामाचा घोष चालू असतो. घरातील सर्व मंडळी विठ्ठल भक्तीत व नामस्मरणात तल्लीन झालेले असतात. घर विठ्ठल  नुसते विठ्ठलभक्तीने भारावून गेलेले असते त्यामुळे या घरात दुष्ट प्रवृत्तींना थारा नसतो. हे घर सात्विकतेने भरून गेलेले असते, पवित्र, निर्मळ झालेले असते. अशा घरात आनंद, सुख-समृद्धी नांदत असते. या घरातील माणसांची वृत्ती समाधानी झालेली असते व जिथे सुख, शांती, समाधान असते तिथे देव आपले वास्तव्य करतो. अशा घरात राहायला देवाला आवडते म्हणूनच अशा घरातून देवाला भक्ताने हाकून(हाकलून) दिले तरी परत येतो. 

           काही योगी रात्रंदिवस ध्यान करीत बसलेले असतात पण त्यांचे चित्त ध्यानात नसते. आपण योगी आहोत, सिद्धपुरुष आहोत, देव माझ्यावर प्रसन्न झाला असून त्याचेकडून मला सिद्धी प्राप्त झाली आहे हे लोकांना दाखवण्यासाठी त्यांची ध्यानधारणा चालू असते. या ध्यानधारणेत त्यांचा दिखावाच जास्त असतो. या ध्यानधारणेत भक्तीचा लवलेश कमी असतो किंबहुना नसतोच. म्हणूनच यांनी केलेली ध्यानधारणा देवापर्यंत पोहोचत नाही. म्हणूनच या योग्यांनी रात्रंदिवस जरी ध्यानधारणा केली तरी विठ्ठल त्यांचे चित्तात (ध्यानात) येत नाही. 

           तुकाराम महाराज म्हणतात, देव आपल्या भक्तांची जात-पात, कुळ न बघता आपल्या भक्तांवर प्रेम करतो, त्यांच्यावर माया करतो. त्यांच्या देहात वास्तव्य करतो, त्यांचे घरात राहतो व त्यांचे हातचे खातो. देव आपल्या भक्तांच्या प्रेमापोटी हे सारे करत असतो. देवाचे व भक्ताचे नाते वात्सल्याचे झालेले असते. या वात्सल्यापोटीच देव आपल्या भक्ताची काळजी वाहत असतो. भक्ताचे रक्षण करीत असतो. हीच खरी देवाची ओळख (ब्रीद) आहे हे चारी वेदामध्ये सांगितले आहे.

         

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 













 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...