Sunday, May 23, 2021

मुक्कदर का सिकंदर -- प्रेमाचा पंचकोन

 

 मुक्कदर का सिकंदर -- प्रेमाचा पंचकोन

          हा चित्रपट २७ ऑक्टोबर १९७८ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक प्रकाश मेहरा होते. या चित्रपटाची कथा लक्ष्मीकांत शर्मा यांनी लिहिली असून पटकथा विजय कौल यांची आहे. कादर खान यांनी संवाद लिहिले आहेत. या चित्रपटातील गाणी अंजान यांनी लिहिली असून कल्याणजी-आनंदजी यांनी संगीतबद्ध केली आहेत. अमिताभ बच्चन, विनोद  खन्ना, राखी, रेखा, अमजद खान, निरुपा रॉय यांच्या मुख्य भुमिका आहेत. मयूर राज वर्मा या बाल कलाकाराने लहान सिकंदरची (अमिताभची) भूमिका उत्तम वठवली आहे. 

          शेवटचे 'जिंदगी तो बेवफा है' हे दर्दभरे गीत किशोर कुमारने गावे असे मोहमद रफी यांना वाटत होते परंतु संगीत दिग्दर्शक कल्याणजी-आनंदजी यांनी सांगितले कि या  गाण्याला मोहमद रफी यांचा आवाज सूट होईल. मोहमद रफी हे गाणे गायला तयार झाले व त्यांनी हे गाणे गायले. अमिताभच्या मृत्यूच्या प्रसंगावेळी हे गीत गायले जाते. विनोद खन्नावर हे गाणे चित्रित झाले आहे. 

          प्रकाश मेहराबरोबर काम केलेल्या ९ चित्रपटांपैकी हा अमिताभचा  ५ वा चित्रपट होता. चित्रपटात सर्वसाधारणपणे प्रेमाचा त्रिकोण दाखवतात पण या चित्रपटात प्रेमाचा पंचकोन दाखवला आहे. अमिताभचे राखीवर प्रेम असते. रेखाचे प्रेम अमिताभवर असते. अमजदखानचे प्रेम रेखावर असते. राखीचे प्रेम विनोद खन्नावर असते व विनोद खन्नाचेही प्रेम राखीवर असते. लेखकाने एकमेकांच्या प्रेमाच्या कथा सुंदररित्या गुंफल्या आहेत व प्रकाश मेहरांनी पडदयावर उत्कृष्टरीत्या दाखविल्या आहेत. या प्रेमकथा बघताना कुठेही कंटाळा वाटत नाही उलट या प्रेमकथेत प्रेक्षकच गुंतून पडतो. 

          ह्या चित्रपटातील नायक हळवा दाखवला आहे. खऱ्या प्रेमासाठी आसुसलेला आहे. त्याचे जिच्यावर प्रेम असते  तिच्याशी तो उघडपणे व्यक्त करू शकत नाही. मनातले प्रेम ओठावर येत नाही. तिच्यासाठी तो झुरत असतो, तिच्या आठवणीने व्याकूळ होत असतो. मनातले दुःख कमी करण्यासाठी व आपली वेदना विसरण्यासाठी तो कोठीवालीचा आसरा घेतो. कोठीवालीसुद्धा त्याच्यावर मनापासून प्रेम करू लागते पण तिला कळते कि आपले ज्याच्यावर प्रेम आहे त्याचे दुसरीवरच प्रेम आहे मग ती विष खाऊन आत्महत्या करते. ह्या चित्रपटात नायक अमिताभ आहे तर त्याचे राखीवर प्रेम आहे. कोठीवाली रेखा आहे. 

          अमिताभचे प्रेम राखीवर आहे. राखी त्याची लहानपणीची मेमसाब आहे. या मेमसाबच्या प्रेमात तो अखंड बुडालेला असतो पण आपले प्रेम तिच्यापुढे व्यक्त करू शकत नाही. आपली वेदना विसरण्यासाठी अमिताभ कोठीवर येतो तेव्हा अमिताभला बघून रेखा त्याच्या प्रेमात पडते. दोघेही प्रेमाचे भुकेले आहेत. वेदना, तडफड एकच आहे पण दोघांचे प्रेम वेगळे आहे. एक दिवस अमिताभला कळते कि विनोदची प्रेयसी राखी म्हणजेच आपली मेमसाब आहे. तो कोठीवर जाऊन रेखाला हि हकीकत सांगतो तेव्हा रेखाला त्याचे खरे प्रेम कोठे आहे हे समजते. ती पाठमोरी उभी राहून ऐकत असते. तिला मनातून वेदना होत असतात. तिचा प्रेमभंग झाल्याने मनातून तुटून जाते. एवढयात अमजद खान तिथे येतो आणि तो अमिताभवर हल्ला करतो. अमजद खानचे प्रेम रेखावर असते पण रेखा व अमिताभवर त्याचा संशय असतो. या संशयापोटीच तो अमिताभचा कट्टर दुश्मन बनतो. एक दिवस विनोद खन्ना रेखाकडे येतो व तिला सांगतो कि अमिताभचा नाद सोड. विनोद खन्नाला ती आश्वासन देते कि अमिताभला भेटणेऐवजी मरण पत्करीन. अमिताभ रेखाला भेटायला येतो तेव्हा ती अंगठीतील विष पिते व अमिताभच्या बाहुपाशात प्राण सोडते. यात अमिताभचे व रेखाचे प्रेम निस्वार्थ आहे. दोघेही प्रेम मिळवण्यासाठी आसुसलेले आहेत. 

          अमिताभने सिकंदरची भुमिका उत्तम प्रकारे निभावली आहे. रेखाची जोहराबाईची भुमिका लक्षात राहण्यासारखी आहे. या दोघांवर चित्रित झालेले गाणे 'सलाम-ए-इष्क मेरी जान' चांगलेच लोकप्रिय झाले. अमिताभ म्हणजेच सिकंदर मोठा होतो तेव्हा तो मोटरसायकलवरून येत असतो व आपल्याच धुंदीत 'रोते हुवे आते है सब' हे गाणे गुणगुणतो. हि अमिताभची एन्ट्री प्रेक्षकांच्या टाळ्या घेऊन जाते. ह्या गाण्यालासुद्धा चांगलीच लोकप्रियता मिळाली. हे गाणे आजही गुणगुणले जाते. 'ओ साथी रे' हे अमिताभवर चित्रित झालेल्या दर्दभऱ्या गाण्यालासुद्धा चांगलीच लोकप्रियता मिळाली. 

          उत्कृष्ठ अभिनयामुळे अमिताभला फिल्मफेअरतर्फे दिल्या जाणाऱ्या 'सर्वश्रेष्ठ अभिनेता' पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. सर्व कलाकारांनी केलेल्या उत्कृष्ठ अभिनयामुळे व लोकप्रिय गाण्यांमुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला.
















No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...