Monday, May 24, 2021

 

 कुली -- अमिताभला संजीवनी 

           हा चित्रपट १९८३ साली प्रदर्शित झाला. ह्या चित्रपटाची निर्मिती केतन देसाई यांनी केली असून मनमोहन देसाई यांनी दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा कादर खान यांनी लिहिली आहे. या चित्रपटातील गाणी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केली असून शब्बीर कुमार, अलका याज्ञीक, अनुराधा पौडवाल, शैलेंद्र सिंग, आशा भोसले,  सुरेश वाडकर यांनी गाणी गायली आहेत. अमिताभच्या आवाजासाठी पहिल्यांदाच शब्बीर कुमारच्या आवाजाचा उपयोग करण्यात आला. 

          या चित्रपट अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, रती अग्निहोत्री, शोभा आनंद, कादर खान, वहिदा रेहमान, पुनीत इस्सर, सुरेश ओबेरॉय यांच्या महत्वपूर्ण भुमिका आहेत. निळू फुले यांना छोटासा रोल मिळाला आहे यात पण त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. अमिताभने रेल्वे कुलीची भुमिका साकारली असून इकबाल अस्लम खान हे नाव धारण केले आहे. अमिताभने या चित्रपटात रेल्वे हमालांवर होणाऱ्या अन्यायाविरुध्द आवाज उठवलेला आहे. 

अमिताभचा विनोदी प्रसंग --

          अमिताभ म्हणलं कि विनोद आलाच. दिग्दर्शक अमिताभच्या विनोदी प्रसंगाचा खुबीने चित्रपटात वापर करून घेतो. या चित्रपटातही रती अग्निहोत्रीबरोबरचा रेडिओवरून आम्लेट बनवण्याचा प्रसंग पोट धरून हसायला लावतो. अमिताभ रती अग्निहोत्रीला उचलून घरी आणतो त्याचवेळी रेडिओवर आम्लेट तयार करण्याची कृती सांगितली जात असते. रती स्टेशन बदलते तेव्हा योगासनावरील कार्यक्रम सुरु होतो. अमिताभ रेडिओ स्टेशनवरील कार्यक्रमानुसार कृती करत असतो. पुढे मिरची खाण्याबद्दल उपदेश केला जातो, तेव्हा अमिताभने तोंड तिखट झाल्याचे जे एक्स्प्रेशन दिले आहे ते लाजवाब. रती पुन्हा स्टेशन बदलते व योगाचे प्रात्यक्षिक सांगितले जाते. अमिताभ त्याप्रमाणे योगांचे प्रात्यक्षिक करतो व त्याचे पाय एकमेकांत अडकून बसतात तेव्हा तो रतीला 'हमारी टांग जरा उलझी है, उसको जरा सुलझाईये' अशी विनंती करतो. इकडे गॅसवर ठेवलेले आम्लेट करपून जाते. 

अमिताभला अपघात --

          या चित्रपटावेळी हाणामारीच्या दृश्यांच्यावेळी पुनीत इस्सर बरोबर मारामारी करीत असताना अमिताभ टेबलाला धडकला व टेबलाचा कोपरा पोटात घुसून जखमी झाला. जखमेचे स्वरूप इतके गंभीर होते  कि डॉक्टरांनी अमिताभच्या जगण्याची आशाच सोडून  दिली. डॉक्टरांनी ऑपरेशन केले. ऑपरेशन झाल्यावर अमिताभला मुंबईला आणण्यात आले. बंगळूरमधील ऑपरेशन यशस्वी झाले नव्हते त्यामुळे आणखी एक ऑपरेशन करणे भाग होते. यासाठी त्याला मुंबईच्या ब्रीच कॅंडी इस्पितळात आणले गेले. ऑपरेशन झाल्यावर सुद्धा दोन आठवडे अमिताभची मृत्यूशी झुंज चालू होती. अमिताभ या अपघातातून सुखरूप बाहेर पडावा यासाठी देशभर सर्व जातीधर्माचे लोक प्रार्थनास्थळांमध्ये जाऊन दुवा मागत होते, नवस बोलत होते. हॉस्पिटल बाहेर रक्तदान करण्यासाठी लोक रांगा लावत होते. आपला आवडता हिरो या अपघातातून लवकर बरा होऊन त्याचे पडदयावर कधी एकदा दर्शन मिळते असे अमिताभच्या चाहत्यांना झाले होते. 

          अमिताभ या अपघातातून बरा झाला. लोकांनी केलेल्या प्रार्थनेमुळे व दुव्यांमुळे अमिताभला संजीवनी मिळाली. तो मृत्यूच्या दाढेतून परत फिरला. यातून बरा होऊन तो कुलीच्या शुटिंगला सज्ज झाला व चित्रपट पुर्णही केला. 

अमिताभचे संवाद --

           अमिताभचा चित्रपट म्हणलं कि त्याच्या करारी आवाजातील संवाद आलेच. त्याचे संवाद ऐकण्यासाठीसुद्धा लोक चित्रपटगृहात गर्दी करत असतात. त्याचे काही प्रसिद्ध संवाद 

१)  हमारी तारीफ जरा लंबी है, बचपनसे सर पे है अल्लाह का हाथ और अल्लारखा है अपने साथ ।'

२)  हम मजदुरोंका सीना लोहे कि दिवार  है और येह हमारे हथियार है, ये हमारा पेट पाल भी सकते है और तुम जानवरोंका पेट फाड भी सकते है ।

           अमिताभने उत्कृष्ठ अभिनय केला. त्याला ऋषी कपूर व रती अग्निहोत्री यांनी उत्कृष्ठ साथ केली. सर्व कलाकारांनी केलेल्या उत्कृष्ठ  अभिनयामुळे व अपघातामुळे अमिताभला मिळालेल्या सहानुभूतीच्या लाटेमुळे प्रेक्षकांनी हा चित्रपट  पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी केली. हा चित्रपट सुपरहिट ठरला.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

      

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 














No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...