शराबी -- उत्कट अभिनयाचा अविष्कार
हा चित्रपट १८ मे १९८४ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता सत्येंद्र पाल असून दिग्दर्शक प्रकाश मेहरा आहेत. या चित्रपटाची कथा प्रकाश मेहरा यांनी लिहिली असून पटकथा लक्ष्मीकांत मेहरा यांनी लिहिली आहे. कादर खान यांनी संवाद लिहिले आहेत. या चित्रपटातील गाणी अंजान व प्रकाश मेहरा यांनी लिहिली असून बप्पी लहरी यांनी संगीतबद्ध केली आहेत. आशा भोसले, किशोर कुमार यांनी गाणी गायली आहेत. अमिताभने किशोर कुमार समवेत 'जहाँ मिल जाये चार यार' हे गाणे गायले आहे. अमिताभवर चित्रित झालेले 'दे दे प्यार दे' हे गाणे सुपरहिट झाले. हे गाणे आजही लोकप्रिय आहे.
या चित्रपटात अमिताभ बच्चन, जयाप्रदा, प्राण, ओम प्रकाश, रणजीत, सुरेश ओबेरॉय यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. या संपूर्ण चित्रपटात अमिताभ दारूच्या नशेत दाखवला आहे. अमिताभने दारुड्याची भूमिका अफलातून केली आहे. त्याच्या सर्वश्रेष्ठ भुमिकेपैकी हि एक भुमिका आहे.
या चित्रपटात विकीचे (अमिताभ) वडील (प्राण) आपल्या व्यवसायामुळे विकीकडे संपुर्ण दुर्लक्ष करतात. त्यांना मुलापेक्षा आपला व्यवसाय प्रिय असतो. विकीला हे कळते तेव्हा त्याला लहान वयातच दारूचे व्यसन लागते. वडिलांचे त्याच्याकडे दुर्लक्ष असते परंतु मुन्शी (ओम प्रकाश) त्याचा वडिलांप्रमाणे सांभाळ करतो. वडिलांचे प्रेम त्याला देतो. विकीलाही ते जवळचे वाटू लागतात. एका प्रसंगात तर असे दाखवले आहे कि, विकी आपल्या वडिलांबरोबर भांडून घराबाहेर पडतो. त्याच्या बरोबर मुन्शीही बाहेर पडतो. एके ठिकाणी दोघे रस्त्याच्या कडेला रात्र काढतात. विकीला दारूची तलफ होते. एका माणसाची अर्धवट पडलेली दारूची बाटली तोंडाला लावतो. विकी दारूसाठी तडफडत असलेला बघून मुन्शी दुसऱ्या दिवशीपासून काम करू लागतो. एके दिवशी काम करताना एका अपघातात मुन्शीचा मृत्यू होतो. मुन्शीच्या मृत्यूला आपले दारूचे व्यसनच जबाबदार आहे असे वाटून विकी दारू सोडतो. हा प्रसंग अमिताभने व ओम प्रकाशने उत्तम वठवला आहे.
एका प्रसंगात अमिताभ जयप्रदाचा पत्ता चार गुंडाना विचारतो. ते गुंड त्याला पत्ता सांगणेऐवजी त्याच्याकडून घडयाळ, चेन, पैसे हिसकावून घेतात. जयाप्रदाला भेटून आल्यावर अमिताभ परत त्या गुंडाना बारमध्ये भेटतो. ते गुंड दारू पीत बसलेले असतात तिथे जावून 'ओ चार कहाँ और आप कहाँ' असे म्हणत त्यांची धुलाई करतो व त्यांच्याकडून आपल्या सर्व वस्तू परत मिळवतो.
या चित्रपटात विकीचे मीनावर उत्कट प्रेम दाखवले आहे. ती एक स्टेजवर नृत्य करणारी कलाकार दाखवली आहे. विकी तिच्या प्रेमासाठी शोची सारी तिकिटे खरेदी करतो. आपल्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी तिची आतुरतेने वाट बघतो. 'इंतहा हो गयी इंतजार की' या गाण्यातून आपल्या प्रेमाच्या भावना प्रकट करतो.
या चित्रपटात अमिताभ आपला डावा हात कोटाच्या खिश्यात घालून संवाद बोलताना दाखवला आहे. खरे तर शुटिंगदरम्यान एक बॉम्ब अमिताभच्या हातात फुटला होता. त्यामुळे त्याचा हात भाजला होता. त्या अवस्थेतही तो शुटिंग करीत होता. हाताची जखम लपवण्यासाठी डावा हात खिश्यात घालून संवाद बोलत होता. तरुण पोरांच्यात हि स्टाईल प्रसिद्ध झाली.
या चित्रपटातील अमिताभचे डायलॉग चांगलेच लोकप्रिय झाले.
१) भाई वाह, मुंछे हो तो नथुलाल जैसी हो वरना ना हो ।
२) अरे भाई, शराबी को शराबी नही तो क्या पुजारी कहोगे, गेंहू को गेंहू नही तो क्या जवारी कहोगे ।
३) हमारी जिंदगी का तंबू तीन बांबू पे खडा है... शायरी...शराब...और आप ।
४) तोफा देने वाले कि नियत देखीं जाती है तोफें कि किमत नही देखी जाती।
५) दो आसू इस आँख से गिरे, फिर दो ऊंस आँख से, फीर दो इस आँख से, दो उस आँख से, फिर दो इस आँख से, दो उस आँख से, कितने हुए? नौ लाख के हार के लिये, बाराह लाख के आंसू ?
अमिताभच्या जबरदस्त अभिनयामुळे, त्याच्या तोंडून असलेल्या संवादांमुळे व गाण्यांमुळे हा चित्रपट सुपरहिट झाला. तिकीट खिडकीवर तुफान चालला. अमिताभच्या अभिनयासाठी व गाण्यांसाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करीत होते.
No comments:
Post a Comment