Sunday, October 27, 2019

तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- आम्हासाठी अवतार । (अभंग २६४ -- ओवी १ व २)

 
तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- आम्हासाठी अवतार । (अभंग २६४ -- ओवी १ व २)

आम्हासाठी अवतार । मत्स्यकूर्मादि सूकर ।। १ ।।
मोहें धावें घाली पान्हा । नाव घेता पंढरीराणा ।। २ ।।

अर्थ : मत्स्य(मासा), कूर्म(कासव), सूकर(वराह) आदिकरून अवतार आमच्या करिताच आहेत. हे पंढरीनाथा अशा नावाने हाका मारल्याबरोबर त्वरेने धाव घेऊन विठ्ठलमाउली परमप्रीतीचा पान्हा सोडते. 

भावार्थ :  मत्स्य(मासा), कूर्म(कासव), सूकर(वराह), राम, कृष्ण, नरसिंह, पांडुरंग असे हे विष्णूचे दहा अवतार आहेत. जेव्हा जेव्हा मानवजातीवर संकट येतात, मानव आपला धर्म सोडून अधर्माकडे जातो, आपली नितीमत्ता बदलतो, सत्याचा मार्ग सोडून असत्याच्या मार्गाने जातो तेव्हा विष्णूने वरील अवतार धारण करून मानवजातीला संकटातून सोडवले आहे. धर्माची शिकवण दिली आहे. सत्याच्या मार्गावरून चालायला सांगितले आहे. 
              तुकाराम महाराजांच्या काळात लोक धर्मभ्रष्ट झाले होते. भक्तीमार्ग सोडून भलतीकडेच चाललेले होते. अंधश्रद्धा, कर्मकांड याचे अवडंबर माजवले होते. लोक यातच गुरफुटून जात होते. लोकांना यातून बाहेर काढण्यासाठी तुकाराम महाराजांनी भक्तीमार्ग अवलंबला. ते पांडुरंगाची भक्ती करू लागले. भजन-कीर्तनातून समाज प्रबोधन करू लागले. समाजाला सत्याच्या मार्गावरून चालायला सांगितले. समाजाला धर्माची शिकवण देण्यासाठी, चांगले कर्म करण्यास प्रवृत्त करण्यासाठी अभंग रचना केली. मानवजातीला संकटातून सोडवण्यासाठी, अधर्म, असत्य या मार्गांपासून परावृत्त करण्यासाठी विष्णू पांडुरंगाच्या रुपात पृथ्वीतलावर अवतरला. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, मत्स्य, कूर्म, सूकर आदि विष्णूचे जे अवतार आहेत ते आमच्याकरिताच आहेत म्हणजेच मानवजातीसाठीच घेतलेले आहेत. 
               पांडुरंग हा विष्णूचा अवतार आहे. भक्तांना संकटातून सोडवण्यासाठी, त्यांना सुख, समाधान लाभावे यासाठी विष्णू पांडुरंगाच्या रुपात पृथ्वीतलावर अवतरला व पंढरपूरात स्थिरावला. जो भक्त पांडुरंगाची अंतःकरणापासून भक्ती करतो, सतत त्याचेच नामस्मरण घेतो अशा भक्तांवर पांडुरंग आपले कृपाछत्र धरतो. आईप्रमाणे भक्तांवर माया करतो. एखादा भक्त संकटात सापडला असेल तर त्याच्यावरील संकट आपल्यावर घेतो. उदाहरण संत सखू, संत जनाबाई, संत गोरा कुंभार इत्यादी. संतांवर आलेल्या संकटांचे निवारण पांडुरंगाने केले. तसेच संतमंडळींनी पांडुरंगाची निस्सीम भक्ती केली म्हणून पांडुरंगाने संतमंडळींवर आईप्रमाणे प्रेम केले. त्यांची माउली झाला. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, पंढरीराणाचे (पांडुरंगाचे) नाव घेतल्याबरोबर त्वरेने धाव घेऊन विठ्ठलमाउली परमप्रीतीचा पान्हा सोडते म्हणजेच भक्तांसाठी धावून येते व आपल्या भक्तांवर आईप्रमाणे माया करते.































































Saturday, October 26, 2019

अवीट गोडीचे गाणे -- आली माझ्या घरी ही दिवाळी

 

 
अवीट गोडीचे गाणे -- आली माझ्या घरी हि दिवाळी 

        
               "आली माझ्या घरी हि दिवाळी" हे अष्टविनायक चित्रपटातील गीत आहे. हा चित्रपट १९७९ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजदत्त यांनी केले. या चित्रपटात सचिन पिळगावकर, वंदना पंडित, शरद तळवळकर, राजा गोसावी, पद्मा चव्हाण, रमेश भाटकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. 
                या चित्रपटातील सर्वच गाणी सुंदर आहेत. त्यापैकीच हे एक गीत. हे गीत गायले आहे अनुराधा पौडवाल यांनी. या गीताला संगीत दिले आहे अनिल-अरुण यांनी. मधुसूदन कालेलकर यांनी हे गीत लिहिले आहे. सचिन व वंदना पंडित यांच्यावर हे गीत चित्रित झाले आहे. 


आली माझ्या घरी ही दिवाळी
सप्तरंगात न्हाऊन आली…


मंद चांदणे धुंद श्वास हा, मी तर त्यात भिजावे
जन्म जन्म रे तुझ्या संगती एकरुप मी व्हावे
प्रीत नयनी वसे, लाज गाली हसे
कोर चंद्राची खुलते भाळी
आली माझ्या घरी ही दिवाळी…


पाऊल पडता घरी मुकुंदा, गोकुळ हरपून गेले
उटी लाविता अंगी देवा, सुगंध बरसत आले
हर्ष दाटे उरी, नाथ आले घरी
सूर उधळीत आली भूपाळी
आली माझ्या घरी ही दिवाळी…


नक्षत्रांचा साज लेऊनी, रात्र अंगणी आली
दीप उजळले नयनी माझ्या ही तर दीपावली
संग होता हरी जाहले बावरी
मी अभिसारीका ही निराळी
आली माझ्या घरी ही दिवाळी…









Sunday, October 20, 2019

कविता -- प्रीतीचा हा मज छंद लागला कसा ।।

कविता -- प्रीतीचा हा मज छंद लागला कसा ।।

पाहण्याचा तिजकडे मला लागला छंद असा, 
जीवनाचा मिळाला हा आनंद कसा,
वळून वळून पाहे तिजकडे,
मन हे असे वेडे,
स्वतःचाच पडला मजला विसर कसा ।। १ ।।

नजर चोरुनी पाही ती मजला,
श्वासा-श्वासात उरला ना कसा,
गगन हि ठेंगणे मजला,
आनंद गगनात मावेना कसा ।। २ ।।

ती समोर येता, शब्द न फुटती ओठातुनी,
डोळ्यांच्या भावना स्पर्शून गेल्या एकमेका कशा,
तु माझी अन मी तुझा, 
करार जणू हा जाहला कसा,
प्रीतीचा हा मज छंद लागला कसा ।। ३ ।।


        प्रियकर एका मुलीच्या प्रेमात पडतो तेव्हा तो तिच्याकडे प्रेमाने पाहतो. तो जेव्हा आपल्या प्रेयसीकडे प्रेमाने पाहतो तेव्हा त्याला स्वतःचाच विसर पडतो. त्याचे मन तिच्यात गुंतले जाते. या मनात सारखा तिचाच विचार सुरू असतो. त्याचे मन तिच्यासाठी, तिच्या एका नेत्रकटाक्षासाठी वेडे झाले असते. त्याची तहान भूक हरपली जाते. त्याला तिच्याकडे बघण्यात एक स्वर्गीय सुख मिळत असते. संपूर्ण जीवनाचा आनंद लुटत असतो. या आनंदापुढे, सुखापुढे त्याला सर्व गोष्टी क्षुल्लक वाटत असतात. ती जेव्हा चोरून त्याच्याकडे पाहते तेव्हा गगन ठेंगणे होते. त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. 
          तो तिच्यात एवढा गुंतला असतो कि ती समोर आली तरी तिच्याशी काय व कसे बोलावे हे त्याला सुचत नाही. त्याच्या ओठातून शब्द फुटत नाही. पण दोघांच्या नजरेत एकमेकांबद्दल प्रेम दिसत असते. हे प्रेम डोळ्यांच्या भावनातून व्यक्त होत असते. 

कवयित्री -- सौ. सोनाली राहुल बेल्लूबी













कथा लेखन स्पर्धा -- पब्जी कट्टा ( कथा लेखन स्पर्धेतील उत्तेजनार्थ कथा )


  कथा लेखन स्पर्धा 

 पब्जी कट्टा 
( कथा लेखन स्पर्धेतील उत्तेजनार्थ कथा )

               राहुलचा आज बारावीचा निकाल लागला. घरातल्यांच्या अपेक्षेप्रमाणे नाही पण चांगल्या मार्कांनी राहुल पास झाला. तो स्वतः आनंदात होताच कारण त्याच्या घरातील सर्वजण आनंदात होते. पण या सर्वात सगळ्यांत दुःखी होता ' पब्जी कट्टा' म्हणजेच त्याचा मित्रवर्ग. त्याचे कारण त्यांचा निकालच लागला होता. त्यांच्यातील अनेकजण नापास झाले होते आणि कित्येकांना कमी मार्क मिळाले होते. मग राहुलच एकटा कसा उत्तम गुणांनी पास झाला यासाठी जरा भुतकाळात डोकवावे लागेल. 
               राहुल हा मध्यमवर्गीय कुटुंबातला एक हुशार मुलगा. दहावीला ९२% मिळाले म्हणून हौसेने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. वडिलांनी खुश होऊन राहुलला नवीन मोबाईल घेऊन दिला. मग काय राहुल महाराज हवेत... बघता बघता मोबाईलने राहुलचं आयुष्यच व्यापून घेतलं. सोशल मिडीया आणि गेमिंग या दोन गोष्टीच त्याचं आयुष्य वाटायला लागलं. याच काळात उन्हाळी सुट्टी संपून कॉलेज सुरु झालं. पण महाराजांचा जीव इतका गुंतला होता त्या मोबाईलमध्ये कि कॉलेजकडे जरासुद्धा लक्ष नव्हतं त्याचं. आता कॉलेजमध्ये त्याला मित्र मिळाले खरे पण तेही मोबाईलप्रेमीच. आणि सर्वांचा समज एकच झाला होता, कॉलेज अभ्यासासाठी नसतंच मुळी, फक्त मजा करण्यासाठीच असतं. 
               या सगळ्यात भर म्हणून कि काय, एक नवीन गेम त्यांच्याकडे आली ' पब्जी'. मग काय आधीच मोबाईलप्रेमी हे लोक, लगेच प्रेमात पडले या गेमच्या. राहुल काही याला अपवाद नव्हता. त्यांच्या ग्रुपचं नावच पडलं ' पब्जी कट्टा'. 
               घरचे त्याच भ्रमात होते कि राहुल व्यवस्थित अभ्यास करतोय. त्यात त्याला बाहेरचे क्लासही लावले होते, म्हणजे आयतं कारण मिळालं होतं त्याला घराबाहेर राहण्याचं. या गेमनं राहुलला एवढं वेड लावलं कि त्याच अभ्यासात जराही मन लागत नव्हतं. रात्र रात्र जागणं, सतत बाहेर जाणं, कॉलेजला न जाणं हेच करता करता अकरावी संपत आली होती. आपला रिझल्ट खालावतोय हे जाणवत असून देखील राहुलला  पब्जी कट्टा काही सोडवत नव्हता. 
               इकडे राहुलचे वडील त्यांच्या भविष्यासाठी दिवसरात्र घाम गाळत होते. पुढे अकरावीत राहुल कसाबसा पास झाला. याचा त्याच्या घरच्यांना जबर धक्का बसला होता. यंदा बारावीच वर्ष पण यावर राहुलचं सरळसाधं म्हणणं होतं, "यंदा अकरावीत सगळं नवीन होतं ना, त्यामुळे कमी मार्क पडले आता बारावीत बघा किती अभ्यास करतो!" अशाच खोटया आशेवर घरच्यांना त्यानं ठेवलं होतं आणि नेहमीप्रमाणे गेम आणि मित्रांकडंच लक्ष्य मात्र वाढलं होतं. 
               वडिलांना मात्र आता राहुलचं वागणं खटकायला लागलं. त्यांनी जरा काय बोलायचा प्रयत्न केला कि लगेच याचं रक्त तापायचं आणि मग उलट उत्तर देणं चालू व्हायचं. पोरगं वयात आलंय, रागात काहीतरी बरंवाईट करून घेईल यामुळं वडीलदेखील संयमानं  घ्यायचे. 
               पण दिवस जसजसे पुढे जात होते तसतसं राहुलचं वागणं आणि घरातलं वातावरण बदलत होतं, आणि शेवटी व्हायचं तेच झालं. वडिलांनी रागात राहुलचा मोबाईल काढून घेतला. मग काय राहुल प्रचंड चिडला. त्याचा प्राण काढून घेतलाय असंच त्याला वाटायला लागलं. घरात चिडचीड करणं, जेवण न करणं असं वागणं सुरु झालं आणि आईने राहुलला पाठीशी घातलं तर आई आणि वडील यांच्यात वादावादी सुरू व्हायची. पण राहुलने यावरही पर्याय शोधला. लपून छपून मोबाईल वापरायचा. मित्रांकडे मोबाईलसाठी जायला लागला. यात त्याचा रिझल्ट खुप खालावला होता. 
               आता बोर्डाच्या परीक्षांना सहा महिनेसुध्दा राहिले नव्हते. पण त्यात एक दिवस आला आणि तो राहुलसाठी आयुष्याला वळण देणारा ठरला. राहुलला त्याचे दहावीतील वर्गशिक्षक भेटले. चौकशी करता करता त्यांनी राहुलला त्याच्या अभ्यासाविषयी विचारले तसा राहुल दचकला, कावराबावरा झाला आणि खोटं बोलायला लागला. सरांनी ते ओळखलं. त्यांना सगळी कल्पना आली. सरांनी त्याला जवळ घेतलं आणि त्याच्या क्षमतेची जाणीव त्याला करून दिली. त्याला सांगितलं कि तुझ्या वडिलांनी किती स्वप्न पहिली आहेत तुझ्यासाठी...आणि किती अपेक्षा आहेत त्यांच्या तुझ्याकडून. आणि हे सगळं ऐकून राहुल स्तब्ध झाला. त्यानं सरांना नमस्कार केला आणि तडक घरी आला. 
               घरी जाताच त्यानं वडिलांना कडकडून मिठी मारली आणि ढसाढसा रडायला लागला. अचानक असं काय झालं या विचारानं वडिलांनासुध्दा धक्का बसला. राहुलने त्यांना अभ्यास करण्याचं वचन दिलं. राहुलला आपल्या चुकीची जाणीव झाली होती. वडिलांच्या डोळ्यातली स्वप्न त्याला दिसली होती. आईच्या डोळ्यातलं प्रेम आणि काळजी त्यानं बघितली होती. त्याच्यात एक जिद्द आणि आत्मविश्वास जागा झाला होता. राहुलने प्रामाणिकपणे आणि मेहनतीने अभ्यास केला आणि आज त्याच्या हातात चांगलं फळ आहे. आज तो आणि त्याचे आईवडील समाधानी आहेत. 
               आपल्या समाजात असंख्य राहुल आणि कित्येक ' पब्जी कट्टे' तयार झाले आहेत. परंतु त्यांना दिशा देणारे, मार्ग दाखवणारे कोणी भेटत नाही आणि त्यामुळे कित्येक जणांचं आयुष्य मातीमोल ठरत आहे... 

वरद प्रशांत इनामदार,
रविवार पेठ, वाई 
जिल्हा सातारा
















































































































































Sunday, October 13, 2019

कथा लेखन स्पर्धा --- परतफेड (कथा लेखन स्पर्धेतील तृतीय क्रमांकाची कथा)


 कथा लेखन स्पर्धा

परतफेड
(कथा लेखन स्पर्धेतील तृतीय क्रमांकाची कथा)

               पुण्यातील वारजेमध्ये टेकडीच्या खाली एक देऊळ. देवळात दुर्गा देवी, गणपती, मारुती, शनी या देवांच्या मूर्ती. सकाळ संध्याकाळ जवळपासचे भाविक दर्शनाला येतात. एकाच ठिकाणी त्यांना सर्व देवांचे दर्शन घेण्याची सोय मंदिरामुळे झालेली. याच देवळाच्या बाहेर बसण्यासाठी काही सिमेंटचे बाक ठेवलेले. जणू ते ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव. सकाळी आणि संध्याकाळी त्यांचे भेटण्याचे हे ठिकाण. सकाळी कमी पण संध्याकाळच्या गप्पा अगदी निवांत. घरच्या समस्यांपासून ते राजकारणापर्यंत कोणताही विषय वर्ज्य नाही. शिवाय एकमेकांची चौकशी करणे, नेहमीच्या मेम्बरपैकी कोणी आले नाही तर त्याची आवर्जून चौकशी करणे हे नेहमीचेच.
               आता संध्याकाळ झालेली आहे. सगळी मंडळी जमलेली आहेत. निवांत गप्पा आणि हास्यविनोद सुरु आहेत.  सध्या चघळायला पावसाचा विषय हाताशी आहेच. गणपतराव म्हणाले, "काय गंमत आहे पावसाची बघा. काल छत्री आणली नव्हती तर नेमका पाऊस आला. जाताना भिजतच गेलो. आणि आज छत्री आणली तर लख्ख ऊन पडलेय." रामराव म्हणाले, "जाऊ दया हो गणपतराव. पावसाचं काय घेऊन बसलात..! त्याला काय माहित असते का तुम्ही छत्री आणली कि नाही. त्याला यायचा तेव्हा येतो. आपण आपली काळजी घेतलेली बरी या वयात.
               तेवढयात राजाभाऊ म्हणाले, "अहो, गोपाळराव दिसत नाहीत दोन तीन दिवस झाले. कुठे गावाला वगैरे गेलेत का? पण तसे असते तर बोलले असते. कारण जाताना नेहमी ते सांगून जातात."
               सुरेशराव म्हणाले, "मला माहित आहे गोपाळरावांबद्दल."
               "अहो, बोला कि मग " राजाभाऊ उद्गारले आणि सगळे सुरेशरावांकडे टक लावून बघू लागले. ते काय सांगतात याची सर्वांनाच उत्सुकता होती.
               "काय सांगू आणि कसं सांगू?" सुरेशराव म्हणाले व  पुढे सांगू लागले, "आपल्या गोपाळरावांवर सध्या वाईट दिवस आहेत."
               "का? काय झालं ?" सगळ्यांनी एकदम विचारलं.
               सुरेशराव म्हणाले, "अहो, गोपाळरावांची रवानगी त्यांच्या सुनेने आणि मुलाने वरच्या एका छोटया खोलीत केलीय. सकाळी ड्युटीवर जाण्यापूर्वी सून त्यांना एकदा चहा देऊन जाते आणि जेवणाचा डबा ठेवून जाते. नवराबायको दोघे कामावर जातात आणि बिचाऱ्या गोपाळरावांना काय हवं काय नको ते बघायला दिवसभर कोणी नसतं. संध्याकाळी दोघे कामावरून येतात. पुन्हा त्यांना चहा आणि जेवण वरच्या रूममध्येच दिले जाते. अडगळीत टाकल्यासारखं झालं आहे त्यांना."
               "काय  हल्लीची पोरं..! ज्या मुलांना आपण आपली हौसमौज मारून आपण वाढवलं. ते जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा असं निष्ठुरपणे वागतात. त्यात प्रेमाने दोन शब्द बोलायला त्यांना वेळ नाही." कोणीतरी म्हणाले. "पण गोपाळराव म्हणजे राजा माणूस बरं का.. ! वाहिनी संसार टाकून अर्ध्यातून निघून गेल्या. पण गोपाळरावांनी खचून न जाता मुलांची शिक्षणं पूर्ण केली. त्यांची लग्न केली. किती उत्साह आणि ऊर्जा ! या वयातही तरुणाला लाजवतील असा उत्साह आहे त्यांच्याकडे." राजाभाऊ म्हणाले,
               "पण गोपाळरावांबद्दल असं नाही ऐकवत. फार वाईट वाटतं. आपण काहीतरी केलं पाहिजे." सुरेशराव म्हणाले.
               "सुरेशराव तुम्हीच काहीतरी करा. तुम्ही त्यांच्या जवळच राहता. आणि त्यांना घेऊनच या तुमच्यासोबत. आपण सगळे मिळून बघू या काय करता येईल ते." हे राजाभाऊंचे बोलणे सगळ्यांनाच पसंत पडले.
                सुरेशराव म्हणाले, "ठीक आहे. मी जाईन उद्या सकाळी त्यांच्याकडे." सुरेशरावांचे बोलणे संपल्यावर एकमेकांचा निरोप घेऊन सगळेच निघाले. आता अंधार पडला होता आणि आकाशातही कृष्णमेघांनी गर्दी केली होती. 
               दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ. नेहमीच्या कट्टयावर एकेक करून सगळे जमायला सुरवात झाली. रात्री आणि सकाळी चांगला पाऊस झाल्याने वातावरणात सुखद गारवा होता. गार वाऱ्याच्या झुळुका अंगाला सुखद वाटत होत्या. एवढ्यात राजाभाऊ आणि गोपाळराव येताना दिसले आणि सगळे एकदमच म्हणाले, "ते बघा, गोपाळराव आलेत." सगळे एकदम स्तब्ध झाले. खरे तर आज त्यांच्या टीममधल्या मोरूअण्णांचा वाढदिवस होता. पण गोपाळरावांवर आलेली वाईट वेळ पाहून सगळ्यांनी तो साजरा करायचा नाही असं ठरवलं होतं. 
               "अरे, तुम्ही सगळे एवढे गंभीर का बसलात? नेहमीचे हास्यविनोद कुठे गेले ? आणि आज मोरूअण्णांचा वाढदिवस आहे, काही आहे कि नाही सेलिब्रेशन ?" गोपाळरावांनी नेहमीच्याच उत्साहाने प्रश्नांची सरबत्ती केली. पण तरी सगळे शांत होते. "अरेच्च्या! सगळ्यांना झालं तरी काय " गोपाळराव म्हणाले. 
               "गोपाळराव, आम्हाला कळले आहे सगळे तुमच्याबद्दल त्यामुळे वाईट वाटले." राजाभाऊ म्हणाले. 
               "छोडो यार, मी त्याचा विचार करणे सोडून दिले आहे. And now I am as happy as I was before." गोपाळराव म्हणाले. 
               "पण कसं काय गोपाळराव ? काय रहस्य आहे तुमच्या आनंदाचे जरा सांगा कि.. "
               "सांगतो," गोपाळराव म्हणाले, "परवाच्या दिवशी मी मुंबईला गेलो होतो. रविवारी नातीचा वाढदिवस होता. सकाळी गेलो आणि रात्री परत यायला निघालो. मुलगी म्हणत होती कि आल्यासारखे थांबा ना बाबा दोनचार दिवस. पण नाही थांबलो. मुलगी, जावई दोघे कामावर जाणार. मग आपण थांबून काय करायचे ? विनाकारण त्यांनाही त्रास नको. मग निघालो परत. येताना गाडीला गर्दी होती. पण रिझर्वेशन असल्याने जागेचा प्रश्न नव्हता. बसलो निवांत. पण मुलाचा, सुनेचा विचार सारखा डोक्यात येत होता. मागच्या सगळ्या गोष्टी आठवून डोळ्यात आसवांनी नकळत गर्दी केली."
              समोर एक पस्तीस चाळीस वर्षाचा गृहस्थ बसलेला होता. तो माझे बराच वेळापासून निरीक्षण करीत होता. त्याचा चेहरा कमालीचा प्रसन्न होता. चेहऱ्यावर मंद स्मितहास्य विलसत होते. तो म्हणाला, "काका, प्लिज मला सांगाल का कि तुम्ही का रडताय ?" मी डोळे पुसत म्हणले, "ऐकून काय करणार मित्रा ? आपल्या अंतरीच्या व्यथा असतात आणि आपल्यालाच त्या भोगायच्या असतात."
               तो तरुण मंदसा हसला, "काका, आपले दुःख दुसऱ्याला सांगितल्याने कमी होते हे तर तुम्हाला माहिती असेलच. सुखाचा गुणाकार आणि दुःखाचा भागाकार करायचा असतो ना..!"
               मी त्याला माझी व्यथा आणि कथा सांगितली. तो मोठ्या आश्वासक स्वरात म्हणाला, "मी तुमच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने लहान आहे. पण तरीही आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकणार का ?"
               "नक्कीच," मी म्हणालो. कारण कोणास ठाऊक पण त्या समोरच्या माणसाने माझ्या मनाचा ताबा घेतला होता. 
               तो म्हणाला, "काका, बघा, आपण जे दुःखी होतो ना ते आपल्या अपेक्षांमुळे. आपल्या सगळ्यांकडून काही ना काही अपेक्षा असतात. आणि त्या पूर्ण नाही झाल्या कि अपेक्षाभंगाचे दुःख वाट्याला येते."
              "बरोबर", मी म्हणालो, "पण मग यावर उपाय काय ?"
              "सगळ्या गोष्टींवर उपाय असतोच. आपण त्या दृष्टीने विचार करीत नाही. अपेक्षा करण्याऐवजी परतफेडीचा विचार मनात ठेवायचा. असं बघा, आपण संसारासाठी अनेक गोष्टी घेताना कुठूनतरी कर्ज घेतलेले असते. आपण त्या कर्जाचे हप्ते फेडत असतो. आणि एक वेळ अशी येते कि कर्ज पूर्ण फिटते. आणि ते खाते बंद होते. हाच न्याय आपण आपल्या रोजच्या व्यवहारात पण लावायचा. मुलांच्या, सुनेच्या, लोकांच्या अपेक्षा करणे सोडून द्यायचे. आपण आपल्याला मिळालेल्या सगळ्या गोष्टींची परतफेड करतो आहे असे समजायचे. जणू काही हे मागील जन्माचे देणे होते. अशा एक एक गोष्टींची परतफेड आपण करीत जाऊ तसतसे ते एकेक खाते बंद होत जाईल आणि अपेक्षाच नसल्यामुळे त्या अपेक्षाभंगाच दुःखसुध्दा होणार नाही."
               "आणि काय सांगू मित्रानो, त्या क्षणापासून माझे दुःख, मालिन्य, औदासिन्य कुठल्या कुठे पळाले. आणि मी तुमच्या सगळ्यांइतकाच किंबहुना तुमच्यापेक्षा जास्त आनंदी आणि सुखी आहे." गोपाळराव म्हणाले आणि सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 

विश्वास देशपांडे, 
समर्थ अपार्टमेंट, साने गुरूजी नगर,
चाळीसगाव, जिल्हा जळगाव
















































































 
               







































































































Saturday, October 12, 2019

कथा लेखन स्पर्धा -- वांझ( कथा लेखन स्पर्धेतील प्रथम क्रमांकाची कथा )


कथा लेखन स्पर्धा 

वांझ 
( कथा लेखन स्पर्धेतील प्रथम क्रमांकाची कथा )
प्रसंग एक ---
"सीमाला आपल्या कार्यक्रमास बोलावू नका"
"पण का? तिने काय आपले घोडे मारलंय"
"घोडे नाही मारले पण.. असल्या बायका नको आपल्यात."
"मी समजले नाही. सीमा सुहागन आहे."
"पण ती वांझ आहे."
"यात तिचा काय दोष, तरुण आहे. होईल कि आज ना उद्या तिला मुलबाळ."
"होईल तेव्हा होईल. पण आपल्या चांगल्या कार्यक्रमात तिचा वावर नको."
"अशाने तिला काय वाटेल? हळदी कुंकवाचा तर कार्यक्रम आहे."
"बरोबर आहे तुझं म्हणणं, पण आज डोहाळे जेवण आहे सुनबाईचं. तिची ओटी खणानारळाने भरावयाची आहे अशा वेळी सिमा पुढे आली तर नविन मुलाच्या जन्मास अडथळा येतो."
"एका बाईनं दुसऱ्या बाईची ओटी भरल्यास काही फरक पडेल असे मला वाटत नाही."
"समाज, सामाजिक रूढी आपल्या मानण्यावर नसतात. जुन्या रितीरिवाजामध्ये काही गोष्टी महत्वाच्या असतात त्या आपण पाळाव्यात. शंकेस वाव नसावा."
"म्हणजे! ममी तुला काय म्हणावयाचे आहे?"
"आग, मुलाच्या जन्मावेळी अडचण आली तर अशाप्रसंगाची वाच्यता होते. बाकी काही नाही."
              सासू विमलाताई आणि सून शांता या दोघीत हा संवाद सुरु होता. समाजरचना, त्यातील बारकावे, रुसवे, मानपान आणि अंधश्रध्दा यांनी कोणता स्तर गाठला आहे हे समजून घ्यावे लागेल. सीमाला मुलबाळ नाही यात तिची काय चूक. एखादया स्त्रीला मुलबाळ नाही यात तिचा दोष २०% तर पुरुषाचा दोष ४०% असतो. पण पुरुषाचा अहंकार आडवा येतो. एखादया बाईला मूल होत नसेल तर पुरुष दुसरे लग्न करावयास रिकामा होतो. स्त्रीच्या मनाचा, तिच्या भावभावनांचा, स्वप्नांचा विचारच कोणी करत नाही. मग समाजात पदोपदी तिचा अपमान होतो. मानहानी होते. सगळ्या बायका तिला टोचत राहतात. उपहास करतात. धर्माची भिती दाखवतात. धर्माने तिच्यावरती कोणती बंधने घातलीत हे सातत्याने तिच्या मनावर बिंबवले जाते. ती बिचारी घरातून सतावली जाते. शेजारपाजाऱ्याकडून नाडली जाते. तिचे जीवन जगणे मुश्किल होते. अशा बायकांना जास्त त्रास झाला तर त्या विहीर जवळ करतात. आत्महत्या करून रिकाम्या होतात. इतरांचा विचार करण्याइतका वेळ त्यांच्याकडे नसतो.
प्रसंग दोन ---
सीमा आपल्या नवऱ्याला म्हणाली, "अहो ऐकलंत का? मला तुमच्याशी महत्वाचे बोलायचे आहे."
नवरा म्हणाला, "बोल, मी ऐकतोय. तुझ्या मनात काय आहे ते एकदा सांगून टाक."
सीमा म्हणाली, "अहो! बायका आता उघड उघड मला वांझ म्हणू लागल्या आहेत."
"म्हणू देत. तू त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. इतरांवर विनाकारण टीका करणाऱ्या बायका त्या. त्यांची अक्कल तेवढीच." नवरा
सीमा म्हणाली, "पण आपण नको का यातून काही मार्ग काढायला."
नवरा म्हणाला, "आपण हातावर हात धरून बसलोय का सीमा; आपण डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे दोघांवर उपचार करून घेत आहोत ना."
सीमा म्हणाली, "पण आतापर्यंत एकाही डॉक्टरचा गुण आला नाही. डॉक्टरी उपचाराबरोबर आपण देवाधर्माचेही बघत आहोत पण त्याचाही काही उपयोग होत नाही."
नवरा म्हणाला, "निराश होऊ नकोस. आपल्याला शंभर टक्के अपत्य होईल. सुंदर बाळ आपल्या नशिबात आहे. वृथा चिंता करू नकोस. एखाद्याच्या नशिबात बाळाचे भाग्य उशिरा असते. त्याला आपण काय करणार. सतत त्याच त्या विचाराने त्रास होईल. एखादा आजार जडेल त्याचे काय करायचे सांग बघू."
प्रसंग तीन ---
               परवा तर कहरच झाला. सीमाचे सासरे आणि सासूबाई शेजाऱ्याच्या वास्तुशांतीला आले होते. त्यांचा संसार पाहून, मुलाबाळांनी भरलेलं घर पाहून त्यांना असूया निर्माण झाली. सासूबाई म्हणाल्या, "अगं सीमा, डॉक्टरांच्याकडे जाऊन आलीस का?"
सीमा म्हणाली, "होय आई! परवाच जाऊन आले."
"काय म्हणाले डॉक्टर?" सासूबाईंनी विचारले.
"डॉक्टरांनी सर्व रिपोर्ट पाहिले आणि सांगितले कि किरकोळ दोष आहे तो दोन तीन महिन्याच्या औषध उपचारानंतर नाहीसा होईल." सीमा म्हणाली.
सासूबाईंनी विचारले, "दोष कुणाच्यात आहे?"
सीमाला क्षणभर वाटले नवऱ्याचे नाव घ्यावे परंतु तसे न करता ती म्हणाली, "किरकोळ दोष माझ्यातच आहे. पण काळजी करण्यासारखे काही नाही."
सासूबाई म्हणाल्या, "हो नाहीतर माझ्या पोराचे नाव घ्यायचीस आणि विनाकारण आमची बदनामी व्हायची."
              तो संवाद तिथेच संपला. पण सीमा अंतरंगात दुखावली होती.
प्रसंग चार ---
               दुपारची जेवणाची वेळ झाल्याने मी दवाखाना बंद करण्याच्या नादात होतो एवढयात सीमा माझ्या ओपीडीत आली. तिने तिचा प्रॉब्लेम सांगितला. तिची कागदपत्रे मी पहिली. वेगवेगळ्या डॉक्टर्सचे रिपोर्ट पहिले. तिचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला.
सीमा म्हणाली, "डॉक्टर साहेब, मला मूल होईल ना हो?"
" हो होईल."
"काही अडचण आहे का?" सीमाने विचारले.
"नाही. तशी अडचण काहीच नाही."
"मग अजून माझ्या नशिबात अपत्य का नाही?" सीमाने प्रश्न केला.
"सीमा थोडा दम धर. काही गोष्टींना वेळ लागतो." मी सीमाला समजावत म्हणालो.
"आता माझ्याच्याने दम धरवत नाही डॉक्टर. खरं खरं सांगा काय ते, काहीही भयंकर असले तरी माझी ऐकण्याची तयारी आहे." सीमा अगतिकपणे म्हणाली.
               मी तिला धीर देत म्हणालो, "सीमा, तुझ्या नवऱ्याच्या सीमेनमध्ये तक्रार आहे. विर्यातील शुक्रजंतू मृत होत आहेत म्हणून आपल्याला दुसऱ्या पुरुषाचे सीमेन घ्यावे लागेल. दुसऱ्या पुरुषाचे शुक्रजंतू घेऊन टेस्टटयूबमध्ये त्याचे फलन करून टेस्टटयूब बेबी तंत्रज्ञानाने बेबीचा जन्म करावा लागेल. याच्याशिवाय आता दुसरा उपाय सध्यातरी माझ्याकडे नाही."
               माझे बोलणे ऐकून सीमा सुन्न झाली. हि गोष्ट नवऱ्याला कशी सांगावी याचा ती विचार करू लागली. परपुरुषापासून अपत्यप्राप्ती हि कल्पना आपल्या नवऱ्याला आवडेल काय याचा ती विचार करू लागली. 
               सीमा निघून गेली पण तिचा अश्रूंनी भरलेला चेहरा माझ्या नजरेसमोरून जात नव्हता. एकदा भावनाप्रधान होऊन ती म्हणाली होती, "डॉक्टर, काहीही करा. कोणताही मार्ग सांगा. तो कितीही कठीण असो. नैतिक-अनैतिकतेच्या पुढचा असो मला फरक पडणार नाही. कारण समाजाने, माझ्या घरातील माणसांनी माझे जीवन नकोसे केले आहे. कधी कधी वाटते संपवावे जीवन. घरात मी एकटीच असते. त्या भयाण एकांताने मला सर्वांचीच भिती वाटते."
             मी तिची समजूत काढत म्हणालो, "सीमा बेटी, तू माझ्या समोर बोललीस तसे इतरांसमोर बोलू नकोस. कमकुवत होऊ नकोस. तुझ्या सारख्या स्त्रीचा लोक फायदा घेतात. चुकीच्या मार्गाला लावतात. अवघ जीवन नरक होते. माझ्यावर विश्वास ठेव. ट्रीटमेंट सुरु ठेव. तुला नक्की अपत्य होईल."
             सीमाने डोळे पुसले. माझ्या पायावर डोके ठेवले आणि म्हणाली, "तुम्हीच माझे आईबाप आहात."आणि ती निघून गेली. 
             नेहमीप्रमाणे मी पेशंट तपासत होतो. तेवढयात कंपाउंडर आत आला आणि म्हणाला, "डॉक्टर, सीमाने आत्महत्या केली."
              

सी. डी. पवार,
मलकापूर, ता. कराड,
जिल्हा - सातारा






































































































कथा लेखन स्पर्धा -- अस्तित्व(कथा लेखन स्पर्धेतील व्दितीय क्रमांकाची कथा)



 कथा लेखन स्पर्धा





अस्तित्व
(कथा लेखन स्पर्धेतील व्दितीय क्रमांकाची कथा)

        नमस्कार...! मी कोण? माझं नाव काय? मलाच ठाऊक नाही. तरीही मला आज बोलायचंय. मनातलं सगळं बोलून मोकळं व्हायचंय. मलाच माझं नाव माहीत नाही, स्वतःचं अस्तित्व सांगता येत नाही; असं म्हटल्यावर लगेच सगळे मला वेड्यात काढतील, हसतील; पण माझं म्हणणं ऐकून घ्यावंच लागेल. प्रत्येकालाच मला सांगता नाही येणार माझं कोणाशी काय नातं आहे हे... तरीही तुम्हाला सगळ्यांना माझं हे म्हणणं ऐकावं लागेल.

          खरं तर कोणाला दोष द्यावा; कोणाला नको हेच समजत नाही, पण खरं सांगा आई-बाबा माझी चूक काय होती.? नेमकं माझं काय चुकलं.? कुठे चुकलो मी.? एकदा सांगा फक्त एकदा... तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही भेटत गेलात, प्रेमाच्या  रसात बुडून हरवून गेलात. अगदी प्रत्येक वेळी जगाचं भान विसरून एकमेकांना समर्पित करत एकरूप होत गेलात. अगदी त्या प्रत्येक भेटीत कसलेही भान ठेवता कधी पावसात भिजता भिजता, कधी समुद्राकाठी असं कुठे, कुठे अन् कित्येकदा रंगलात एकमेकांच्या रंगात. पण.....

          फक्त शरीर रूपाने एकरूप होण्याकरिता; तुमच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्याकरता होत गेला एकरूप.. फक्त आणि फक्त शरीर सुखासाठी; यौवनातल्या भाराऊन येणार्या कित्येक भावनांच्या पिंजऱ्यात अडकत तुम्ही भावनांच्या पूर्तीसाठी भेटत राहिलात. जगाची, समाजाची बंधन विसरून यौवनक्रीडेत रममाण झालात आणि मनातल्या उफाळून येणाऱ्या भावनांचा जसा चुराडा होत गेला, त्या संपून गेल्यावर मात्र तुम्ही  तुमच्या सो कॉल्ड विचारांनी हा खेळ थांबवलात. मॅच्युरिटीचा आव आणत बंधनात अडकता तुम्ही हा शरीर खेळ... हो....! मी शरीर खेळच म्हणेन..!!!शरीर खेळ थांबवलात आणि त्याच वेळी माझ्या अस्तित्वाच बीज पेरून तुम्ही मात्र बंधन मुक्त झालात. नव्या पिढीची लिव्ह इन रिलेशन शिप...

          पण माझं काय माझ्या निर्माण झालेल्या त्या अस्तित्वाचा तुमच्यापैकी कोणीच विचार नाही केला; काहीच वाटलं नाही.?बाबांचं सोड.. आई तुला सुद्धा काही वाटू नये? तुझ्यातच निर्माण होणाऱ्या लहानग्या जीवाची तुलाच माया वाटू नये? एवढा पापी होतो का मी? माझं अस्तित्व? तुला जड होतं होत ? तुला नको होतं, तर मग आधीच का विचार नाही केला सुरक्षिततेचा.. माझ्याही अन तुमच्याही. आईला तर माझ्या अस्तित्वाची जाणिव पुरेशी ठरली माझा तिरस्कार करून माझं अस्तित्व संपवण्यासाठीक्षणभराचा विचार करता अगदी बाबालाही सांगता संपवून टाकल सगळं.. मला मारून...

          खरंच आई इतकं सोपं असतं का हे सारं ?"भावना विरहित होऊन तरीही काही भावनांसाठी एकरूप होऊन पुन्हा वेगळं होणं?" आणि आपल्याच एका अस्तित्वाला ओझं समजून संपवून टाकणं? का? का मला स्वप्न पाहण्याआधीच मारलंस?मला समाजात जिवंत होण्याआधीच मारुन टाकलंस? मला एक अस्तित्व देऊन पूर्णत्वास जाण्याआधीच मारलंस? का आई का? " ।।आई माझा गुरु, आई कल्पतरु। ।।सौख्याचा सागरू ,आई माझी ।।"हे म्हणताना आता हसावं की रडावं हे मात्र कळत नाहीये. तरी आई मी नाही रागवलो तुझ्यावर.. फक्त हे प्रश्न सतावतात खूपदा. बाकी काहीच तक्रार नाही. शेवटी एकच सांगेन आई एकदा माझ्या जागी येऊन विचार कर एकदाच फक्त एकदा "भृण" बनून थोडं जगून बघ. त्या जाणिवेतून एकदाच फक्त एकदाच श्वास घेऊन बघ. मग होईल जाणिव माझ्या नसलेल्या अस्तित्वाची.





देवस्थळी पूर्वा प्रशांत

मु. पो चोरवणे, ता . संगमेश्वर, जि. रत्नागिरी

पिन. 415803

फोन नं. 7875107731

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...