Sunday, October 20, 2019

कथा लेखन स्पर्धा -- पब्जी कट्टा ( कथा लेखन स्पर्धेतील उत्तेजनार्थ कथा )


  कथा लेखन स्पर्धा 

 पब्जी कट्टा 
( कथा लेखन स्पर्धेतील उत्तेजनार्थ कथा )

               राहुलचा आज बारावीचा निकाल लागला. घरातल्यांच्या अपेक्षेप्रमाणे नाही पण चांगल्या मार्कांनी राहुल पास झाला. तो स्वतः आनंदात होताच कारण त्याच्या घरातील सर्वजण आनंदात होते. पण या सर्वात सगळ्यांत दुःखी होता ' पब्जी कट्टा' म्हणजेच त्याचा मित्रवर्ग. त्याचे कारण त्यांचा निकालच लागला होता. त्यांच्यातील अनेकजण नापास झाले होते आणि कित्येकांना कमी मार्क मिळाले होते. मग राहुलच एकटा कसा उत्तम गुणांनी पास झाला यासाठी जरा भुतकाळात डोकवावे लागेल. 
               राहुल हा मध्यमवर्गीय कुटुंबातला एक हुशार मुलगा. दहावीला ९२% मिळाले म्हणून हौसेने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. वडिलांनी खुश होऊन राहुलला नवीन मोबाईल घेऊन दिला. मग काय राहुल महाराज हवेत... बघता बघता मोबाईलने राहुलचं आयुष्यच व्यापून घेतलं. सोशल मिडीया आणि गेमिंग या दोन गोष्टीच त्याचं आयुष्य वाटायला लागलं. याच काळात उन्हाळी सुट्टी संपून कॉलेज सुरु झालं. पण महाराजांचा जीव इतका गुंतला होता त्या मोबाईलमध्ये कि कॉलेजकडे जरासुद्धा लक्ष नव्हतं त्याचं. आता कॉलेजमध्ये त्याला मित्र मिळाले खरे पण तेही मोबाईलप्रेमीच. आणि सर्वांचा समज एकच झाला होता, कॉलेज अभ्यासासाठी नसतंच मुळी, फक्त मजा करण्यासाठीच असतं. 
               या सगळ्यात भर म्हणून कि काय, एक नवीन गेम त्यांच्याकडे आली ' पब्जी'. मग काय आधीच मोबाईलप्रेमी हे लोक, लगेच प्रेमात पडले या गेमच्या. राहुल काही याला अपवाद नव्हता. त्यांच्या ग्रुपचं नावच पडलं ' पब्जी कट्टा'. 
               घरचे त्याच भ्रमात होते कि राहुल व्यवस्थित अभ्यास करतोय. त्यात त्याला बाहेरचे क्लासही लावले होते, म्हणजे आयतं कारण मिळालं होतं त्याला घराबाहेर राहण्याचं. या गेमनं राहुलला एवढं वेड लावलं कि त्याच अभ्यासात जराही मन लागत नव्हतं. रात्र रात्र जागणं, सतत बाहेर जाणं, कॉलेजला न जाणं हेच करता करता अकरावी संपत आली होती. आपला रिझल्ट खालावतोय हे जाणवत असून देखील राहुलला  पब्जी कट्टा काही सोडवत नव्हता. 
               इकडे राहुलचे वडील त्यांच्या भविष्यासाठी दिवसरात्र घाम गाळत होते. पुढे अकरावीत राहुल कसाबसा पास झाला. याचा त्याच्या घरच्यांना जबर धक्का बसला होता. यंदा बारावीच वर्ष पण यावर राहुलचं सरळसाधं म्हणणं होतं, "यंदा अकरावीत सगळं नवीन होतं ना, त्यामुळे कमी मार्क पडले आता बारावीत बघा किती अभ्यास करतो!" अशाच खोटया आशेवर घरच्यांना त्यानं ठेवलं होतं आणि नेहमीप्रमाणे गेम आणि मित्रांकडंच लक्ष्य मात्र वाढलं होतं. 
               वडिलांना मात्र आता राहुलचं वागणं खटकायला लागलं. त्यांनी जरा काय बोलायचा प्रयत्न केला कि लगेच याचं रक्त तापायचं आणि मग उलट उत्तर देणं चालू व्हायचं. पोरगं वयात आलंय, रागात काहीतरी बरंवाईट करून घेईल यामुळं वडीलदेखील संयमानं  घ्यायचे. 
               पण दिवस जसजसे पुढे जात होते तसतसं राहुलचं वागणं आणि घरातलं वातावरण बदलत होतं, आणि शेवटी व्हायचं तेच झालं. वडिलांनी रागात राहुलचा मोबाईल काढून घेतला. मग काय राहुल प्रचंड चिडला. त्याचा प्राण काढून घेतलाय असंच त्याला वाटायला लागलं. घरात चिडचीड करणं, जेवण न करणं असं वागणं सुरु झालं आणि आईने राहुलला पाठीशी घातलं तर आई आणि वडील यांच्यात वादावादी सुरू व्हायची. पण राहुलने यावरही पर्याय शोधला. लपून छपून मोबाईल वापरायचा. मित्रांकडे मोबाईलसाठी जायला लागला. यात त्याचा रिझल्ट खुप खालावला होता. 
               आता बोर्डाच्या परीक्षांना सहा महिनेसुध्दा राहिले नव्हते. पण त्यात एक दिवस आला आणि तो राहुलसाठी आयुष्याला वळण देणारा ठरला. राहुलला त्याचे दहावीतील वर्गशिक्षक भेटले. चौकशी करता करता त्यांनी राहुलला त्याच्या अभ्यासाविषयी विचारले तसा राहुल दचकला, कावराबावरा झाला आणि खोटं बोलायला लागला. सरांनी ते ओळखलं. त्यांना सगळी कल्पना आली. सरांनी त्याला जवळ घेतलं आणि त्याच्या क्षमतेची जाणीव त्याला करून दिली. त्याला सांगितलं कि तुझ्या वडिलांनी किती स्वप्न पहिली आहेत तुझ्यासाठी...आणि किती अपेक्षा आहेत त्यांच्या तुझ्याकडून. आणि हे सगळं ऐकून राहुल स्तब्ध झाला. त्यानं सरांना नमस्कार केला आणि तडक घरी आला. 
               घरी जाताच त्यानं वडिलांना कडकडून मिठी मारली आणि ढसाढसा रडायला लागला. अचानक असं काय झालं या विचारानं वडिलांनासुध्दा धक्का बसला. राहुलने त्यांना अभ्यास करण्याचं वचन दिलं. राहुलला आपल्या चुकीची जाणीव झाली होती. वडिलांच्या डोळ्यातली स्वप्न त्याला दिसली होती. आईच्या डोळ्यातलं प्रेम आणि काळजी त्यानं बघितली होती. त्याच्यात एक जिद्द आणि आत्मविश्वास जागा झाला होता. राहुलने प्रामाणिकपणे आणि मेहनतीने अभ्यास केला आणि आज त्याच्या हातात चांगलं फळ आहे. आज तो आणि त्याचे आईवडील समाधानी आहेत. 
               आपल्या समाजात असंख्य राहुल आणि कित्येक ' पब्जी कट्टे' तयार झाले आहेत. परंतु त्यांना दिशा देणारे, मार्ग दाखवणारे कोणी भेटत नाही आणि त्यामुळे कित्येक जणांचं आयुष्य मातीमोल ठरत आहे... 

वरद प्रशांत इनामदार,
रविवार पेठ, वाई 
जिल्हा सातारा
















































































































































No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...