Sunday, October 13, 2019

कथा लेखन स्पर्धा --- परतफेड (कथा लेखन स्पर्धेतील तृतीय क्रमांकाची कथा)


 कथा लेखन स्पर्धा

परतफेड
(कथा लेखन स्पर्धेतील तृतीय क्रमांकाची कथा)

               पुण्यातील वारजेमध्ये टेकडीच्या खाली एक देऊळ. देवळात दुर्गा देवी, गणपती, मारुती, शनी या देवांच्या मूर्ती. सकाळ संध्याकाळ जवळपासचे भाविक दर्शनाला येतात. एकाच ठिकाणी त्यांना सर्व देवांचे दर्शन घेण्याची सोय मंदिरामुळे झालेली. याच देवळाच्या बाहेर बसण्यासाठी काही सिमेंटचे बाक ठेवलेले. जणू ते ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव. सकाळी आणि संध्याकाळी त्यांचे भेटण्याचे हे ठिकाण. सकाळी कमी पण संध्याकाळच्या गप्पा अगदी निवांत. घरच्या समस्यांपासून ते राजकारणापर्यंत कोणताही विषय वर्ज्य नाही. शिवाय एकमेकांची चौकशी करणे, नेहमीच्या मेम्बरपैकी कोणी आले नाही तर त्याची आवर्जून चौकशी करणे हे नेहमीचेच.
               आता संध्याकाळ झालेली आहे. सगळी मंडळी जमलेली आहेत. निवांत गप्पा आणि हास्यविनोद सुरु आहेत.  सध्या चघळायला पावसाचा विषय हाताशी आहेच. गणपतराव म्हणाले, "काय गंमत आहे पावसाची बघा. काल छत्री आणली नव्हती तर नेमका पाऊस आला. जाताना भिजतच गेलो. आणि आज छत्री आणली तर लख्ख ऊन पडलेय." रामराव म्हणाले, "जाऊ दया हो गणपतराव. पावसाचं काय घेऊन बसलात..! त्याला काय माहित असते का तुम्ही छत्री आणली कि नाही. त्याला यायचा तेव्हा येतो. आपण आपली काळजी घेतलेली बरी या वयात.
               तेवढयात राजाभाऊ म्हणाले, "अहो, गोपाळराव दिसत नाहीत दोन तीन दिवस झाले. कुठे गावाला वगैरे गेलेत का? पण तसे असते तर बोलले असते. कारण जाताना नेहमी ते सांगून जातात."
               सुरेशराव म्हणाले, "मला माहित आहे गोपाळरावांबद्दल."
               "अहो, बोला कि मग " राजाभाऊ उद्गारले आणि सगळे सुरेशरावांकडे टक लावून बघू लागले. ते काय सांगतात याची सर्वांनाच उत्सुकता होती.
               "काय सांगू आणि कसं सांगू?" सुरेशराव म्हणाले व  पुढे सांगू लागले, "आपल्या गोपाळरावांवर सध्या वाईट दिवस आहेत."
               "का? काय झालं ?" सगळ्यांनी एकदम विचारलं.
               सुरेशराव म्हणाले, "अहो, गोपाळरावांची रवानगी त्यांच्या सुनेने आणि मुलाने वरच्या एका छोटया खोलीत केलीय. सकाळी ड्युटीवर जाण्यापूर्वी सून त्यांना एकदा चहा देऊन जाते आणि जेवणाचा डबा ठेवून जाते. नवराबायको दोघे कामावर जातात आणि बिचाऱ्या गोपाळरावांना काय हवं काय नको ते बघायला दिवसभर कोणी नसतं. संध्याकाळी दोघे कामावरून येतात. पुन्हा त्यांना चहा आणि जेवण वरच्या रूममध्येच दिले जाते. अडगळीत टाकल्यासारखं झालं आहे त्यांना."
               "काय  हल्लीची पोरं..! ज्या मुलांना आपण आपली हौसमौज मारून आपण वाढवलं. ते जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा असं निष्ठुरपणे वागतात. त्यात प्रेमाने दोन शब्द बोलायला त्यांना वेळ नाही." कोणीतरी म्हणाले. "पण गोपाळराव म्हणजे राजा माणूस बरं का.. ! वाहिनी संसार टाकून अर्ध्यातून निघून गेल्या. पण गोपाळरावांनी खचून न जाता मुलांची शिक्षणं पूर्ण केली. त्यांची लग्न केली. किती उत्साह आणि ऊर्जा ! या वयातही तरुणाला लाजवतील असा उत्साह आहे त्यांच्याकडे." राजाभाऊ म्हणाले,
               "पण गोपाळरावांबद्दल असं नाही ऐकवत. फार वाईट वाटतं. आपण काहीतरी केलं पाहिजे." सुरेशराव म्हणाले.
               "सुरेशराव तुम्हीच काहीतरी करा. तुम्ही त्यांच्या जवळच राहता. आणि त्यांना घेऊनच या तुमच्यासोबत. आपण सगळे मिळून बघू या काय करता येईल ते." हे राजाभाऊंचे बोलणे सगळ्यांनाच पसंत पडले.
                सुरेशराव म्हणाले, "ठीक आहे. मी जाईन उद्या सकाळी त्यांच्याकडे." सुरेशरावांचे बोलणे संपल्यावर एकमेकांचा निरोप घेऊन सगळेच निघाले. आता अंधार पडला होता आणि आकाशातही कृष्णमेघांनी गर्दी केली होती. 
               दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ. नेहमीच्या कट्टयावर एकेक करून सगळे जमायला सुरवात झाली. रात्री आणि सकाळी चांगला पाऊस झाल्याने वातावरणात सुखद गारवा होता. गार वाऱ्याच्या झुळुका अंगाला सुखद वाटत होत्या. एवढ्यात राजाभाऊ आणि गोपाळराव येताना दिसले आणि सगळे एकदमच म्हणाले, "ते बघा, गोपाळराव आलेत." सगळे एकदम स्तब्ध झाले. खरे तर आज त्यांच्या टीममधल्या मोरूअण्णांचा वाढदिवस होता. पण गोपाळरावांवर आलेली वाईट वेळ पाहून सगळ्यांनी तो साजरा करायचा नाही असं ठरवलं होतं. 
               "अरे, तुम्ही सगळे एवढे गंभीर का बसलात? नेहमीचे हास्यविनोद कुठे गेले ? आणि आज मोरूअण्णांचा वाढदिवस आहे, काही आहे कि नाही सेलिब्रेशन ?" गोपाळरावांनी नेहमीच्याच उत्साहाने प्रश्नांची सरबत्ती केली. पण तरी सगळे शांत होते. "अरेच्च्या! सगळ्यांना झालं तरी काय " गोपाळराव म्हणाले. 
               "गोपाळराव, आम्हाला कळले आहे सगळे तुमच्याबद्दल त्यामुळे वाईट वाटले." राजाभाऊ म्हणाले. 
               "छोडो यार, मी त्याचा विचार करणे सोडून दिले आहे. And now I am as happy as I was before." गोपाळराव म्हणाले. 
               "पण कसं काय गोपाळराव ? काय रहस्य आहे तुमच्या आनंदाचे जरा सांगा कि.. "
               "सांगतो," गोपाळराव म्हणाले, "परवाच्या दिवशी मी मुंबईला गेलो होतो. रविवारी नातीचा वाढदिवस होता. सकाळी गेलो आणि रात्री परत यायला निघालो. मुलगी म्हणत होती कि आल्यासारखे थांबा ना बाबा दोनचार दिवस. पण नाही थांबलो. मुलगी, जावई दोघे कामावर जाणार. मग आपण थांबून काय करायचे ? विनाकारण त्यांनाही त्रास नको. मग निघालो परत. येताना गाडीला गर्दी होती. पण रिझर्वेशन असल्याने जागेचा प्रश्न नव्हता. बसलो निवांत. पण मुलाचा, सुनेचा विचार सारखा डोक्यात येत होता. मागच्या सगळ्या गोष्टी आठवून डोळ्यात आसवांनी नकळत गर्दी केली."
              समोर एक पस्तीस चाळीस वर्षाचा गृहस्थ बसलेला होता. तो माझे बराच वेळापासून निरीक्षण करीत होता. त्याचा चेहरा कमालीचा प्रसन्न होता. चेहऱ्यावर मंद स्मितहास्य विलसत होते. तो म्हणाला, "काका, प्लिज मला सांगाल का कि तुम्ही का रडताय ?" मी डोळे पुसत म्हणले, "ऐकून काय करणार मित्रा ? आपल्या अंतरीच्या व्यथा असतात आणि आपल्यालाच त्या भोगायच्या असतात."
               तो तरुण मंदसा हसला, "काका, आपले दुःख दुसऱ्याला सांगितल्याने कमी होते हे तर तुम्हाला माहिती असेलच. सुखाचा गुणाकार आणि दुःखाचा भागाकार करायचा असतो ना..!"
               मी त्याला माझी व्यथा आणि कथा सांगितली. तो मोठ्या आश्वासक स्वरात म्हणाला, "मी तुमच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने लहान आहे. पण तरीही आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकणार का ?"
               "नक्कीच," मी म्हणालो. कारण कोणास ठाऊक पण त्या समोरच्या माणसाने माझ्या मनाचा ताबा घेतला होता. 
               तो म्हणाला, "काका, बघा, आपण जे दुःखी होतो ना ते आपल्या अपेक्षांमुळे. आपल्या सगळ्यांकडून काही ना काही अपेक्षा असतात. आणि त्या पूर्ण नाही झाल्या कि अपेक्षाभंगाचे दुःख वाट्याला येते."
              "बरोबर", मी म्हणालो, "पण मग यावर उपाय काय ?"
              "सगळ्या गोष्टींवर उपाय असतोच. आपण त्या दृष्टीने विचार करीत नाही. अपेक्षा करण्याऐवजी परतफेडीचा विचार मनात ठेवायचा. असं बघा, आपण संसारासाठी अनेक गोष्टी घेताना कुठूनतरी कर्ज घेतलेले असते. आपण त्या कर्जाचे हप्ते फेडत असतो. आणि एक वेळ अशी येते कि कर्ज पूर्ण फिटते. आणि ते खाते बंद होते. हाच न्याय आपण आपल्या रोजच्या व्यवहारात पण लावायचा. मुलांच्या, सुनेच्या, लोकांच्या अपेक्षा करणे सोडून द्यायचे. आपण आपल्याला मिळालेल्या सगळ्या गोष्टींची परतफेड करतो आहे असे समजायचे. जणू काही हे मागील जन्माचे देणे होते. अशा एक एक गोष्टींची परतफेड आपण करीत जाऊ तसतसे ते एकेक खाते बंद होत जाईल आणि अपेक्षाच नसल्यामुळे त्या अपेक्षाभंगाच दुःखसुध्दा होणार नाही."
               "आणि काय सांगू मित्रानो, त्या क्षणापासून माझे दुःख, मालिन्य, औदासिन्य कुठल्या कुठे पळाले. आणि मी तुमच्या सगळ्यांइतकाच किंबहुना तुमच्यापेक्षा जास्त आनंदी आणि सुखी आहे." गोपाळराव म्हणाले आणि सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 

विश्वास देशपांडे, 
समर्थ अपार्टमेंट, साने गुरूजी नगर,
चाळीसगाव, जिल्हा जळगाव
















































































 
               







































































































1 comment:

  1. आपल्याला कथा आवडल्यास संपर्कासाठी माझा नं 9403749932

    ReplyDelete

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...