तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- आम्हासाठी अवतार । (अभंग २६४ -- ओवी १ व २)
आम्हासाठी अवतार । मत्स्यकूर्मादि सूकर ।। १ ।।
मोहें धावें घाली पान्हा । नाव घेता पंढरीराणा ।। २ ।।
अर्थ : मत्स्य(मासा), कूर्म(कासव), सूकर(वराह) आदिकरून अवतार आमच्या करिताच आहेत. हे पंढरीनाथा अशा नावाने हाका मारल्याबरोबर त्वरेने धाव घेऊन विठ्ठलमाउली परमप्रीतीचा पान्हा सोडते.
भावार्थ : मत्स्य(मासा), कूर्म(कासव), सूकर(वराह), राम, कृष्ण, नरसिंह, पांडुरंग असे हे विष्णूचे दहा अवतार आहेत. जेव्हा जेव्हा मानवजातीवर संकट येतात, मानव आपला धर्म सोडून अधर्माकडे जातो, आपली नितीमत्ता बदलतो, सत्याचा मार्ग सोडून असत्याच्या मार्गाने जातो तेव्हा विष्णूने वरील अवतार धारण करून मानवजातीला संकटातून सोडवले आहे. धर्माची शिकवण दिली आहे. सत्याच्या मार्गावरून चालायला सांगितले आहे.
तुकाराम महाराजांच्या काळात लोक धर्मभ्रष्ट झाले होते. भक्तीमार्ग सोडून भलतीकडेच चाललेले होते. अंधश्रद्धा, कर्मकांड याचे अवडंबर माजवले होते. लोक यातच गुरफुटून जात होते. लोकांना यातून बाहेर काढण्यासाठी तुकाराम महाराजांनी भक्तीमार्ग अवलंबला. ते पांडुरंगाची भक्ती करू लागले. भजन-कीर्तनातून समाज प्रबोधन करू लागले. समाजाला सत्याच्या मार्गावरून चालायला सांगितले. समाजाला धर्माची शिकवण देण्यासाठी, चांगले कर्म करण्यास प्रवृत्त करण्यासाठी अभंग रचना केली. मानवजातीला संकटातून सोडवण्यासाठी, अधर्म, असत्य या मार्गांपासून परावृत्त करण्यासाठी विष्णू पांडुरंगाच्या रुपात पृथ्वीतलावर अवतरला. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, मत्स्य, कूर्म, सूकर आदि विष्णूचे जे अवतार आहेत ते आमच्याकरिताच आहेत म्हणजेच मानवजातीसाठीच घेतलेले आहेत.
पांडुरंग हा विष्णूचा अवतार आहे. भक्तांना संकटातून सोडवण्यासाठी, त्यांना सुख, समाधान लाभावे यासाठी विष्णू पांडुरंगाच्या रुपात पृथ्वीतलावर अवतरला व पंढरपूरात स्थिरावला. जो भक्त पांडुरंगाची अंतःकरणापासून भक्ती करतो, सतत त्याचेच नामस्मरण घेतो अशा भक्तांवर पांडुरंग आपले कृपाछत्र धरतो. आईप्रमाणे भक्तांवर माया करतो. एखादा भक्त संकटात सापडला असेल तर त्याच्यावरील संकट आपल्यावर घेतो. उदाहरण संत सखू, संत जनाबाई, संत गोरा कुंभार इत्यादी. संतांवर आलेल्या संकटांचे निवारण पांडुरंगाने केले. तसेच संतमंडळींनी पांडुरंगाची निस्सीम भक्ती केली म्हणून पांडुरंगाने संतमंडळींवर आईप्रमाणे प्रेम केले. त्यांची माउली झाला. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, पंढरीराणाचे (पांडुरंगाचे) नाव घेतल्याबरोबर त्वरेने धाव घेऊन विठ्ठलमाउली परमप्रीतीचा पान्हा सोडते म्हणजेच भक्तांसाठी धावून येते व आपल्या भक्तांवर आईप्रमाणे माया करते.
No comments:
Post a Comment