Saturday, November 2, 2019

अवीट गोडीचे गाणे : वेडात मराठे वीर दौडले सात !

 

  अवीट गोडीचे गाणे : वेडात मराठे वीर दौडले सात ! 

           हे गीत प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा शिलेदारांवर आधारित आहे. स्वराज्यासाठी प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा शिलेदार लढून धारातीर्थी पडले. बहलोल खानाच्या ३० हजार फौजेपुढे हे मराठे वीर त्वेषाने लढले. त्यांना उद्देशूनच कवी कुसुमाग्रजांनी हे गीत रचले. लता मंगेशकर यांनी आपल्या सुंदर आवाजात हे गीत गायले. हे गीत ऐकले कि आपलेही बाहू फुरफुरतात. मुठी आवळल्या जातात. सात वीर ३० हजार फौजेसमोर कसे लढले असतील याचा विचार न केलेलाच बरा. या सात वीरांना मृत्यूचे भय अजिबात वाटले नाही. त्यांना फक्त डोळ्यासमोर स्वराज्य दिसत होते. या स्वराज्यासाठीच ते त्वेषाने लढले. 

          प्रतापराव गुजर आणि बहलोलखान यांच्यात घनघोर युध्द झाले. प्रतापरावाने खानाचा पुरता बिमोड केला. खान प्रतापरावाला शरण आला. खानाने तहात 'मला सोडून दयावे, मी मुलखात परत जाईन.' असे म्हणले. युद्धात शरण आलेल्याना मारू नये असे युद्धशास्त्रात सांगितल्याने प्रतापरावाने दया दाखवून खानाला सोडून दिले. बहलोलखान परत येत असल्याची बातमी महाराजांना कळली. महाराज खवळले आणि त्यांनी प्रतापराव गुजरांना खरमरीत पत्र लिहिले. त्यात लिहिले होते, 'बहलोलखान सारखा स्वारी करून येत आहे. त्याला संपवल्याखेरीज आम्हाला तोंड न दाखवणे.' हे पत्र हाती पडताच प्रतापराव गुजर बेभान झाला. त्यांनी तलवार हाती घेतली. त्यांच्याबरोबर विसाजी बल्लाळ, विठोजी शिंदे, दीपाजी राऊतराव, विठ्ठल पिळदेव, सिद्दी हिलाल, कृष्णाजी भास्कर हे सहा मावळे घेतले. बहलोलखानाचा सूड घेण्यासाठी हे सात मावळे देहभान विसरून बेफाम सुटले होते. वाटेत त्यांना कुणीही अडवू शकत नव्हते इतके ते सुडाने पेटले होते. प्रतापरावाची आणि खानाची नेसरीच्या खिंडीत गाठ पडली. बहलोलखानाच्या फौजेपुढे सात जणांचा कितीसा निभाव लागणार ? बहलोलखानाच्या फौजेवर सात वीर तुटून पडले. शर्थीने लढत होते पण खानाची फौजच इतकी होती कि सात वीरांचे प्रयत्न कमी पडत होते. एक एक मोहरा गळत होता. शेवटी प्रतापराव सुद्धा धारातिर्थी पडला. स्वराज्याचा आणखी एक मोहरा गळाला. नेसरीची खिंड रक्ताने पावन झाली. तो दिवस होता शिवरात्रीचा. प्रतापराव परत तोंड दाखवण्यास येणार नव्हता. 


म्यानातुनि उसळे तरवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात !

ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले
सरदार सहा सरसावुनि उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषात
वेडात मराठे वीर दौडले सात !

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना
छावणीत शिरले थेट, भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात !

खालून आग, वर आग, आग बाजूंनी,
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी,
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात !

दगडांवर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणि वार्‍यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात !

कवी : कुसुमाग्रज


No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...