Saturday, November 2, 2019

कविता -- गुलाबाची गोष्ट


कविता -- गुलाबाची गोष्ट 

एकदा एका बागेत 
गुलाबांचे रान,
रानामध्ये गुलाबाच्या 
कळ्या होत्या छान. 

कळ्यांना राखीत होते 
टोकदार काटे,
हिरवीगार पाने जणू 
पाळणाच वाटे. 

त्यातच एका कळीला 
झाला अभिमान,
कंटाळून काट्याला म्हणे 
''काढते वर मान'

काटा म्हणे कळीला 
"बाळा जरा जपून,
खुपश्या नजरा 
तुला पाहतात लपून"

कळी म्हणे काट्यास,
"कशी राहू जपून?
सौंदर्याला का ठेवू 
काटयांमध्ये लपून?"

"स्तुती माझी करणारे 
कुणीतरी हवे,
वीट आला रोजच पाहून 
काट्यांचे हे थवे."

असे म्हणून कळीने 
काढले वर डोके, 
बघू आता कोण मला 
कैसे कसे रोके. 

टपोरी ती कळी आता 
उघडयावर आली,
चोहीकडे कळीचीच 
स्तुती सुरू झाली. 

जेव्हा त्या कळीचे 
झाले फुलात रूपांतर,
राखणदार काटयांपासून 
झाले आता अंतर. 

नाईलाज होऊन 
काटा कळीस म्हणाला, 
"कसे करू रक्षण,
आता सांगू मी कुणाला ?"

मग ती वेळ आली, 
होती ज्याची भिती,
काट्यास ठाऊक होती 
माणसाची नीती. 

ठाऊक होते त्याला 
आता जाणार ती सोडून,
नेणार होता कुणीतरी 
गुलाबाला तोडून. 

क्रूर हातांनी जेव्हा 
तोडले त्याचे फुल,
रडला फार काटा 
जसे नवजात मूल. 

पाणावलेल्या डोळ्याने 
जेव्हा पाहिले काट्यास,
फुलासही उमगले 
आले दुःख का वाटयास. 

सुवास त्याचा घेऊन 
जेव्हा कंटाळा आला, 
कोमेजलेले फुल आता 
हवे ते कुणाला ?

एक एक पाकळी तोडून 
केला त्याचा नाश,
लाचार काटा पाहत राहिला 
होऊन हताश. 

असे हे अवेळी 
नसते आले ग मरण,
सौंदर्याचा अभिमान 
बनले हे कारण. 

काटा म्हणे फुलास,
"तरी सांगत होतो बाळा.. 
नको जाऊस दूर असा 
तोडून जिव्हाळा... !

असाच एक राखणदार 
तुमचाही असेल,
तुमच्याच प्रेमात जो 
दिन-रात खपेल. 

नका जाऊ दूर आणि 
नका होऊ नष्ट, 
येतील जेव्हा विचार... 
आठवा गुलाबाची गोष्ट... !

















































































































































No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...