Saturday, June 22, 2019

अनाथाचा बंधू विठ्ठल कृपासिंधू ।


अनाथाचा बंधू विठ्ठल कृपासिंधू ।

          आषाढ महिना चालू झाला कि वेध लागतात आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनाचे. मग पाय आपोआप वळतात पंढरीच्या वाटेकडे. पांडुरंग किंवा विठ्ठल महाराष्ट्राचे लाडके दैवत आहे. गोर-गरिबांचा, संतांचा आवडता देव आहे. पांडुरंग, विठ्ठल, विठू माउली, विठोबा अशा अनेक नावाने हे दैवत पंढरपुरात विसावले व संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान बनले. हे दैवत म्हणजे सात्विकतेचे प्रतीक आहे. विठ्ठलाच्या भेटीसाठी जायचे म्हणजे मोह, माया, मत्सर, राग, लोभ, वासना अशा दुर्गुणांचा त्याग करावा लागतो. मनात फक्त शुद्ध व निर्मळ भक्तिभाव ठेवावा लागतो. 
            पंढरपूर विठ्ठलाचे वस्तीस्थान. तिथे आहे पांडुरंगाचा निवास. कटीवर कर(हात) ठेवून प्रेमभावेने विठ्ठल आपल्या भक्तांकडे बघत युगानुयुगे विटेवर उभा आहे. त्याचे सावळे, सुंदर, मनोहारी रूप बघितले कि डोळे सुखावतात. धन्य झाल्यासारखे वाटते. गळ्यात तुळशीमाळा आहेत. मस्तकावर मुकुट धारण केला आहे. कानात मकरकुंडले घातली आहेत. पीतांबर नेसला असून भरजरी शेला पांघरला आहे. कपाळावर कस्तुरी मळवट भरला आहे. असे विठ्ठलाचे विलोभनीय, मनोहारी रूप बघितले कि भक्तजन विठ्ठलाच्या प्रेमात पडतात. त्याच्या रूपावर भाळतात. त्याचे रूप डोळ्यात साठवतात. आपल्या अंतर्मनात त्याच्या रूपाचा ठसा उमटवतात. देहभान विसरून, स्वतःला विसरून विठ्ठलाचे विलोभनीय रूप पाहात बसतात. त्या रूपाशी एकरूप होतात. विठ्ठलमय होऊन जातात. 
               विठ्ठल हा गरिबांचा अनाथांचा देव आहे. त्याची मनापासून भक्ती केली कि तो आपल्या भक्तांना संकटातून सोडवतो. जो कोणी भक्त विठ्ठलाची अंतःकरणापासून भक्ती करेल, त्याचे नामःस्मरण घेईल त्यालाच विठ्ठल मदत करतो. त्याच्यावर आपले कृपाछत्र धरतो. मग तो कितीही गरीब असो, अनाथ असो विठ्ठल अशा भक्तांबाबत कनवाळू, कृपाळू असतो. म्हणूनच तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात कि, "अनाथाचा बंधू विठ्ठल कृपासिंधु ।" म्हणजेच "विठ्ठल अनाथ, गोर-गरिबांचा बंधू असून त्यांच्याबाबत कृपेचा सागर (कृपासिंधु ) आहे." विठ्ठलाची भक्ती केल्याने संसारातील साऱ्या चिंता मिटून जातात. सर्व पाशातून मुक्तता मिळते. 'मी' व 'माझे' पणाचा नाश होतो म्हणजे माझे कुटुंब, माझी संपत्ती, 'मी केले आहे', 'मी मिळवले आहे.' हा गर्व झालेला असतो तो विठ्ठलभक्तीमुळे गळून पडतो. 
               तुकाराम महाराजांना संसारात अनेक यातना भोगाव्या लागल्या. कष्ट सोसावे लागले. म्हणून ते विठ्ठलनामात दंग होऊ लागले. विठ्ठलाचे नामस्मरण करू लागले. भजन-कीर्तन करू लागले. विठ्ठलाशी एकरूप होऊ लागले. त्यांचे जीवनच विठ्ठलमय झाले. म्हणूनच ते म्हणतात कि, "बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ।।" म्हणजेच आपले मुखात सतत विठ्ठलाचे नाव असावे. त्याचे सावळे सुंदर रूप डोळ्यासमोर आणून त्याचे नामस्मरण करावे. विठ्ठलाला आपल्या अंतःकरणात स्थान द्यावे. त्याची मनापासून भक्ती करावी. विठ्ठलावर मनापासून प्रेम करावे. आपल्या मनातच विठ्ठलाला साठवावे. त्याच्यावर श्रद्धा ठेवावी.



















Sunday, June 16, 2019

तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल ।




तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल ।

बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ।। १ ।।
येणें सोसें मन झाले हावभरी । परत माघारी घेत नाही ।। २ ।।

अर्थ :- 'विठ्ठल बोलावा व विठ्ठल पाहावा आणि विठ्ठलच जिवाभावाने प्रिय करावा.  ह्या सोसानेच मन हवभरी झाले आहे. ते तेथून संसाराकडे परत होत नाही.'
भावार्थ :- तुकाराम महाराजांना संसारात अनेक यातना भोगाव्या लागल्या. कष्ट सोसावे लागले. त्यांच्या वाण्याच्या व्यवसायात खोट बसून धंदा बुडाला. दुष्काळाने त्यांच्या जवळील पैसे धान्य संपले. अन्नान्न करून बायको गेली. अशा त्यांच्यावर एकामागून एक आपत्ती कोसळल्यामुळे त्यांचे संसारातील मन उडाले.  भंडारा डोंगरावर जाऊन एकांतात बसू लागले. विठ्ठलनामात दंग होऊ लागले. जेथे जातील तेथे विठ्ठलाचे   नामस्मरण करू लागले. भजन कीर्तन करू लागले. असे ते विठ्ठलाशी एकरूप होऊ लागले. त्यांना   जिकडे तिकडे विठ्ठलच दिसू लागला. त्यांच्या अंतःकरणात पूर्णपणे विठ्ठल  विसावला आहे. तुकाराम महाराजांचे जीवनच विठ्ठलमय झाले आहे. म्हणूनच ते म्हणतात कि ''बोलावा विठ्ठल। पाहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ।।" म्हणजेच आपले मुखात सतत विठ्ठलाचे नाव असावे. त्याचे सावळे सुंदर रूप डोळ्यांसमोर आणून त्याचे नामस्मरण करावे. विठ्ठलाला आपल्या अंत:करणात स्थान दयावे. त्याची मनापासून भक्ती करावी. विठ्ठलावर मनापासून प्रेम करावे. आपल्या मनात विठ्ठलाला साठवावे. 
                    तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाची भक्ती केल्याने, त्याचे नामस्मरण केल्याने मन भरून आले आहे. विठ्ठलमुळेच संसारातील सारी दु:खे बाजूला पडली. विठ्ठलाच्या नामस्मरणामुळे मन आनंदाने भरून गेले आहे. मनात आता संसाराबद्दल कुठलेही किल्मिष उरले नाही. मन आता विठ्ठल भक्तीतच रामू लागले आहे. विठ्ठलभक्तीमुळे संसाराची ओढ कमी झाली आहे. मन संसाराकडे परत ओढले जात नाही. 
बंधनापासूनी उकलली गाठी । देतां आली मिठी सावकाश ।। ३ ।।
तुका म्हणे देह भरीला विठ्ठलें । काम क्रोधे केलें घर रितें ।। ४ ।।
 अर्थ :- "संसारबंधनाच्या गाठी सुटल्यामुळे मोकळा झालो व त्या योगाने स्वस्थपणे हरीला मिठी मारता आली. तुकाराम महाराज म्हणतात, अंतःकरण व देह विठ्ठलस्वरूपाने भरून गेल्याने कामक्रोधादि वृत्ती अंतःकरणापासून नाहीश्या झाल्या."     
 भावार्थ :- तुकाराम महाराज विठ्ठलनामात, त्याच्या भजन कीर्तनात दंग राहू लागले. तिन्ही त्रिकाळ विठ्ठलभक्ती शिवाय त्यांना काही सुचेनासे झाले. विठ्ठलाचे नामस्मरण करावे, त्याचे भजन कीर्तन गावे असा त्यांचा दिनक्रम चालू झाला. यामुळे त्यांचे संसारातील मन उडू लागले. संसारामुळे विटलेले मन विठ्ठलभक्तीमुळे आनंदित होऊ लागले. संसाराची ओढ कमी होऊ लागली. विठ्ठलभक्तीमुळे मान अपमान याचे त्यांना काही वाटेनासे झाले. त्यांचे अंतःकरण पवित्र, निर्मळ होऊ लागले. मनातील राग, लोभ, मत्सर, वासना ह्या वृत्ती नाहीश्या झाल्या. विठ्ठलभक्तीमुळे त्यांचा देहच विठ्ठलरूप झाला. म्हणूनच ते म्हणतात कि संसारबंधनातून सुटल्यामुळे हरीला (विठ्ठलाला) मिठी मारता आली. 






 

Saturday, June 15, 2019

लढवय्या खेळाडू युवराज सिंग

 

लढवय्या खेळाडू युवराज सिंग 

          विश्वचषक स्पर्धा ऐन रंगात आली असताना युवराज सिंगच्या निवृत्तीची बातमी धडकली. एकेकाळी आपल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे युवराज सिंगने भारतीय संघात स्थान मिळवले. आपल्या उत्कृष्ठ खेळीने युवराज सिंग भारतीय संघाचा आधारस्तंभ बनला होता. त्याने फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही चमक दाखवली. भारतीय संघ अडचणीत असला कि युवराज सिंग मदतीला धावून यायचा. म्हणूनच कर्णधाराचा त्याच्यावर विश्वास असायचा. 
             क्रिकेटचे बाळकडू त्याला घरातूनच मिळाले. त्याचे वडील योगराज सिंग भारतासाठी क्रिकेट खेळले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच युवराज तयार झाला. युवराज डावखुरा फलंदाज आहे. त्याच्या आक्रमक फटकेबाजीमुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. त्याने २००२ मध्ये इंग्लंड मध्ये नेटवेस्ट  चषकमध्ये अंतिम सामन्यात धडाकेबाज खेळी करत भारताला कप   जिंकून  दिला. २००७ मध्ये t -२० विश्वचषक स्पर्धेत स्टुअर्ट ब्रॉडला एकाच षटकात सलग ६ चेंडूवर ६ षटकार ठोकून विक्रम केला. २०११ च्या विश्वकरंडक स्पर्धेत आपल्या अष्टपैलू खेळीने चार वेळा मॅन ऑफ द मॅच व मालिकावीर असे पुरस्कार पटकाविले. युवराजसिंगच्या १७ वर्षाच्या कारकिर्दीत ३०४ एकदिवशीय सामने खेळून १४ शतके व ५२ अर्धशतकांच्या जोरावर ८७०१ धावा आहेत. ४० कसोटी सामने खेळून ३ शतके ११ अर्धशतकांच्या जोरावर १९०० धावा आहेत तर t-२० मध्ये ५८ सामन्यात ८ अर्धशतकांच्या जोरावर ११७७ धावा आहेत. युवराजसिंगने तिन्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारात आपला ठसा उमटवला आहे. 
                युवराज सिंगने कर्करोगासारख्या असाध्य रोगाशी सामना केला आहे. त्याने क्रिकेटमध्ये मैदानावर लढत राहण्याची जी जिद्द दाखवली तशीच जिद्द त्याने कर्करोगाशी सामना करताना दाखवली. या जिद्दीमुळेच तो कर्करोगासारख्या भयानक रोगातून मुक्त झाला व परत त्याने क्रिकेट मैदानावर पाय ठेवले. क्रिकेट बरोबरच कर्करोगाशी तो अखेरपर्यंत लढत राहिला. म्हणूनच तो एक लढवय्या खेळाडू आहे.




































 

Saturday, June 8, 2019

तुकाराम महाराज गाथा अभंग -- समचरणदृष्टि विटेवरी साजिरी ।



तुकाराम महाराज गाथा अभंग --  समचरणदृष्टि विटेवरी साजिरी ।


समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथे माझी हरी वृत्ति राहो ।। १ ।।
आणीक नलगे मायिक पदार्थ । तेथे माझें आर्त नको देवा ।। २ ।।
ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी । तेथे चित्त झणी जडो देसी ।। ३ ।।
तुका म्हणे त्यांचे कळलें आम्हा वर्म । जे जे कर्मधर्म नाशिवंत ।। ४ ।।

          तुकाराम महाराजांनी पांडुरंगालाच आपले दैवत मानले. पांडुरंगाची मनापासून भक्ती करू लागले. त्यांनी पांडुरंगाला आपल्या हृदयात साठवले. म्हणूनच त्यांना असे वाटते कि ज्याचे विटेवर उभे राहिल्यावर चरण व दृष्टी सरळ व सुशोभित आहे त्याठिकाणीच म्हणजेच पांडुरंगाच्या जागी माझी वृत्ती (मन) राहो. ह्याहून जे निराळे मायिक पदार्थ आहेत, मायिक पदार्थ म्हणजे माया, मोह उत्पन्न करणारे पदार्थ जसे कि सोने, चांदी, धन-दौलत, जमीन-जुमला इ. ह्या ठिकाणी माझी इच्छा किंवा मन जाऊ नये. जी काही ब्रह्मादिक पदे म्हणजेच उच्चं पदे आहेत ह्या ठिकाणी जर माझे मन गेले किंवा जडले तर माझ्यात एक अहंकार तयार होईल. यामुळे तुझ्यावरील व तुझ्या भक्तीवरील माझे मन उडेल. 
            तुकाराम महाराजांना असे सूचित करायचे आहे कि माणसे विनाकारण आपल्या क्षणिक सुखासाठी मायिक पदार्थांच्या मागे लागले आहेत पण हे पदार्थ नाशवंत व दुःख देणारे आहेत. पण खरे सुख तर पांडुरंगाच्या चरणी व त्याच्या डोळ्यात दिसत आहे व हे सुख नाशवंत नाही हे वर्म तुकाराम महाराजांना कळले आहे.










 


Friday, June 7, 2019

बारा राशींवर कविता

 बारा राशींवर कविता 

मेष... 

सरळस्वभावी असे रोखठोक 
मतप्रदर्शन करिती बिनधोक 
घेतले तर ह्यांच्याशी वाकडे 
करिती एक घाव दोन तुकडे.. 

वृषभ... 

सौन्दर्यप्रधान असे शृंगारिक 
आनंद वेचती बारीकसारीक 
कामात विलंब असे दडलेला 
ह्यांचा आळस ह्यांना नडलेला..

मिथुन... 

सतत सतत असते बोलणारी 
मनमोकळी जीवनी चालणारी 
नको तिथे नको तेव्हा बोलतात 
स्वतः हुशार समजून चालतात.. 

कर्क... 

असती हे लोक भावनाप्रधान 
 सत्यात उतरवती हे विधान 
विश्वासात येऊन होती राजी 
मग सहज दर्शवती नाराजी.. 

सिंह... 

असती हे लोक रुबाबदार 
वाणीस असे ह्यांच्या धार 
भरलेला असतो अहंकार 
क्षुल्लक प्रतिष्ठेचे बंद दार.. 

कन्या... 

वाटे सर्वांना हवीहवीशी 
बाब ह्यांच्यात नवीनवीशी 
शंकेखोर ह्यांचा स्वभाव 
विश्वासाचे पुसती हे नाव.. 

तुळ... 

जीवनी असे समतोलपणा 
आपुले मानिती सर्वजना 
एकदा जर आला ह्यांना गर्व 
अहंकाराचे सुरु होते पर्व.. 

वृश्चिक... 

कधी हवी कधी नकोनकोशी 
रहस्यमय स्वभाव पाठीशी 
ह्यांचे मन नाही येत कळून 
ह्यांचा जोडीदार जातो पळून.. 

धनु... 

हौशी वृत्ती निर्भीड स्वभाव 
लढाऊपणाचा नसे अभाव 
मी पणा असतो दडलेला 
नात्यांत धूळ खात पडलेला.. 

मकर... 

काटकसरी ह्यांचा स्वभाव 
स्वावलंबी जीवनाचे नाव 
छोटयाश्या गोष्टीवर  निराशा 
चिकाटीची वेगळी भाषा.. 

कुंभ... 

अचाट ह्यांची बुद्धिमत्ता 
कार्यक्षेत्रात ह्यांची सत्ता 
प्रेमरस असतो दुरावलेला 
एकांतवासात स्थिरावलेला.. 

मीन... 

धार्मिक प्रेमळ वृत्ती असे 
द्वेषभाव कधी मनी नसे 
असती सारे विसरभोळे 
कानी हे कापसाचे गोळे..




















 




















 




















 








 




















 




















 














 














कथा -- त्याग

 
कथा -- त्याग 

          नेहमीप्रमाणेच उन्हाळ्याच्या सुट्टया संपून कॉलेज भरल होतं. पुढच्या वर्गात गेल्याचा आणि नवे मित्र-मैत्रिणी भेटल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. 
           ज्योती आणि प्रकाशही असेच दोघे मित्र. प्रकाशची आई दुसऱ्याचे घरकाम करून त्याला शिकवत होती प्रकाश शिकून कलेक्टर व्हावा, असे त्याच्या आईचं स्वप्न होतं.  ज्योती श्रीमंत घरची मुलगी. प्रकाशला ज्योती आवडू लागली होती. तिचीही त्याला साथ होती. साहजिकच दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तिनं त्याच्या परिस्थितीसह त्याला स्वीकारलं होतं. दोघे रोज भेटत राहिले. रोज प्रेमाच्या गप्पा होऊ लागल्या. तो न विसरता तिच्यासाठी गुलाबाचं फुल आणत असे. ते फुल ती आनंदाने स्विकारत असे. कधीही तिनं त्याच्याकडून अपेक्षा केली नव्हती. त्याला सतत वाटत असे की ज्योती श्रीमंत घरची मुलगी  आहे त्यामुळे तिची अपेक्षा मी पुर्ण करू शकणार नाही. तिच्याबरोबर भावी आयुष्याची रंगवलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेडा झाला होता. सोबत त्याला ज्योतीची साथ होतीच. 
          एक दिवस अचानक ती अंधारून आल्यासारखी त्याच्या जीवनातून निघून गेली. त्यानं तिला खुप शोधलं पण त्याचा शोध व्यर्थ ठरला. शेवटी त्याच्या मनात नाना प्रकारचे विचार घोंघावू लागले. त्याला वाटले, कदाचित ती आपल्या परिस्थितीमुळं सोडून गेली असावी. या विचाराने त्याच्या मनात थैमान घातले. तो ईर्षेने पेटून उठला व ध्येयपूर्तीसाठी झगडू लागला. आटोकाट प्रयत्न करू लागला. रात्रंदिवस मेहनत करू लागला. अभ्यास करत राहिला. एक दिवस त्याच्या आशेचा सूर्य उगवला. कलेक्टर झाल्याची बातमी त्याला कळली. तो एक प्रशासकीय अधिकारी झाला होता. त्या आनंदाने तो हुरळून गेला. ज्योतीच्या आठवणीवर जगणारा प्रकाश उरला नव्हता तर तो एक अधिकारी झालेला प्रकाश होता. त्याला त्याच्या अधिकारपदाचा अभिमान होता, गर्व होता. या गर्वातच तो ज्योतीचे प्रेम, तिची साथ विसरला होता. 
          एक दिवस अचानक प्रकाश रस्त्याने स्वतःच्या गाडीतून जात असताना एक वृध्द जोडपं रस्त्याच्या कडेला दिसतं. तो त्यांना न्याहाळतो; तर ते ज्योतीचे आईवडील असल्याचे कळते. तो त्यांना गाडीत बसण्याची विनंती करतो. ते गाडीत बसतात. तो आपली ओळख सांगतो. आपण कलेक्टर झाल्याचेही गर्वाने सांगतो. तो ज्योतीविषयी त्यांच्याकडे चौकशी करतो. ज्योतीचे आईवडील त्याला आपल्या घरी घेऊन येतात. घरी आल्यावर प्रकाश घर न्याहाळतो तर एका भिंतीवर ज्योतीचा हार घातलेला फोटो दिसतो. तो ज्योतीविषयी चौकशी करतो. वडील त्याला सांगतात, "तिला दोन वर्षापूर्वीच ब्लडकॅन्सर झाला होता. तिला हे माहित होते. त्यातच तिचे निधन झाले." हे ऐकून प्रकाश सैरभैर झाला. त्याला काय बोलावे सुचेनाच. आपल्या ध्येयपूर्तीच्या आड येऊ नये म्हणून तिने आपल्याला हे सांगितले नाही. आपल्यापासून लपवून ठेवले. त्याला आपल्या स्वार्थी वागण्याचा पश्चाताप व्हायला लागला. त्याला अपराधीपणासारखं वाटू लागलं. आपल्यासाठी ज्योतीने केवढा त्याग केला व आपण तिला दूषणे देत बसलो याचे त्याला दुःख वाटू लागले. तिच्या त्यागाबद्दल फोटोपुढे नतमस्तक झाला.



















 



















Saturday, June 1, 2019

सांघिक कामगिरी निर्णायक ठरेल

सांघिक कामगिरी निर्णायक ठरेल 

          दर चार वर्षांनी भरणाऱ्या क्रिकेटच्या 'कुंभमेळ्याला' आता सुरवात झालेली आहे. आतापर्यंत ११ विश्वचषक स्पर्धा झाल्या. पहिली स्पर्धा इंग्लंडमध्ये झाली व आताची स्पर्धा इंग्लंडमध्येच होत आहे. पहिली स्पर्धा झाली तेव्हा एकदिवशीय क्रिकेट नवखे होते. भारतीय क्रिकेटही एकदिवशीय सामान्यांना रुळले न्हवते. पण भारताने १९८३ चा विश्वचषक जिंकला आणि भारतीय क्रिकेटचे सारे चित्रच पालटले.भारतीय क्रिकेटकडे गांभीर्याने पाहिले जाऊ लागले. हळूहळू भारतीय क्रिकेट एकदिवशीय सामन्यात वर्चस्व गाजवू लागले. भारताने पाकिस्तानच्या सहकार्याने १९८७ ची स्पर्धा आपल्याच देशात भरवून यशस्वीही करून दाखवली. इंग्लंडच्या बाहेर स्पर्धा घेण्याचा मान भारताने मिळवला. आतापर्यंत या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने तब्बल ५ वेळा जिंकून बाजी मारली आहे. वेस्ट इंडिज व भारत यांनी प्रत्येकी २ वेळा तर श्रीलंका व पाकिस्तान यांनी प्रत्येकी एकदा हि विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. 
          विश्वचषक स्पर्धा म्हणले कि सर्वाधिक चर्चा होते ती भारत पाकिस्तान सामन्याची. हा सामना म्हणजे क्रिकेटच्या मैदानावरील एक धर्मयुद्धच असते. दोन्ही संघातील खेळाडूंवर सामान्यापेक्षा प्रेक्षकांचेच दडपण असते. दोन्ही देशातील प्रेक्षकांना हार मान्य नसतेच. आपला संघ जिंकावा असे दोन्ही देशातील पाठिराख्यांची भावना असते. या भावनेतूनच दोन्ही देशातील खेळाडूंवर दडपण येते व खेळाडूही मैदानावर खेळ न खेळता एक धर्मयुद्धच खेळत असतात. आतापर्यंत भारताने विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानला एकदाही जिंकू दिले नाही. 
           या स्पर्धेत प्रत्येक संघ एकमेकांशी खेळणार असल्याने भारताने सर्व सामान्यांकडे गांभीर्याने पाहून प्रत्येक सामना कसा जिंकता येईल याकडे लक्ष केंद्रित करावे. यासाठी विराट कोहलीने विश्वविजेतेपदाचा अनुभव असलेला महेंद्रसिंग धोनीला हाताशी धरून व प्रत्येक खेळाडूवर विश्वास टाकून मैदानावर रणनीती आखावी. भारताकडे गुणवान खेळाडू आहेत फक्त गरज आहे ती सांघिक कामगिरीची. हि सांघिक कामगिरीच भारताला विश्वचषक स्पर्धा जिंकून देईल.
          



















तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...